27 C
Latur
Saturday, August 13, 2022
Homeविशेषसरहद्दीवरील सशस्त्र कॅम्पस

सरहद्दीवरील सशस्त्र कॅम्पस

एकमत ऑनलाईन

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर निजाम सरकार आणि रझाकारांचा प्रतिकार तीव्र बनत गेला. हैदराबाद स्वतंत्र देश म्हणून अस्तित्वात यावे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. या सर्व बाबींना सामर्थ्यानिशी सामोरे जाणे आणि आंदोलनाची व्याप्ती वाढवणे हैदराबाद स्टेट काँग्रेसला महत्त्वाचे वाटत होते. आता परिस्थिती अशी आली होती की संस्थानात राहून निर्वेधपणे आंदोलन चालवणे कठीण होते. यातूनच सरहद्दीवरच्या सशस्त्र केंद्रांची गरज निर्माण झाली. सर्वप्रथम हैदराबाद स्टेट काँग्रेसचे मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे हलवण्यात आले. या केंद्राची सर्व जबाबदारी भाऊसाहेब वैशंपायन यांच्यावर देण्यात आली. त्यांच्या मदतीला अनंत भालेराव, नारायणराव लोहारेकर, शंकरलाल पटेल व इतर मंडळी होती. तर मराठवाड्याचे प्रमुख केंद्र मनमाडला हलवण्यात आले. मनमाड ऑफिसची जबाबदारी श्रीनिवासराव बोरीकर आणि आ. कृ. वाघमारे यांच्याकडे देण्यात आली. याशिवाय अच्युतराव खोडवे आणि सखाराम मंडलिक यांनीही या कार्यात मदत केली. सरहद्दीवर कॅम्प उघडत असताना काही नियम करण्यात आले होते. परवानगीवाचून कोणीही कॅम्प उघडू नयेत अशा पद्धतीची सक्त ताकीद देण्यात आली होती. या कॅम्पची रचना कशी असावी? त्याने किमान कोणत्या अपेक्षा पूर्ण कराव्यात? याविषयी कृति समितीने परिपत्रकाद्वारे मार्गदर्शन केले. प्रत्येक जिल्ह्याचा एक प्रमुख असेल, त्याच पद्धतीने प्रत्येक कॅम्पचा एक प्रमुख असेल. केंद्राने जिल्हा केंद्राकडे आणि जिल्हा केंद्राने प्रांतिक आणि मध्यवर्ती केंद्राकडे महिन्याच्या शेवटी संपूर्ण जमा-खर्चाचा तपशील आणि केलेल्या कामाचा आढावा पाठविणे आवश्यक होते.

कॅम्पच्या माध्यमातून एखादी अ‍ॅक्शन करायची असेल तर त्याचा तपशील कॅम्पमधील निवडक व्यक्तीने एकत्र येऊन ठरवावा. अ‍ॅक्शन प्रत्यक्षात आणण्याच्या आधी त्या ठिकाणी जाऊन संपूर्ण माहिती काढणारी पथके आणि आत दूरवर कायम संपर्क ठेवणारी पथके असावीत अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आल्या. जिल्हा व केंद्र पातळीपर्यंत जबाबदार आणि शिस्तीचे महत्त्व जाणणारे कार्यकर्ते लाभल्यामुळे हैदराबाद आंदोलनाचा हा सशस्त्र लढ्याचा भाग अत्यंत उल्लेखनीय आणि स्तुत्य असा ठरला आहे. कृति समितीने सूचना केल्याप्रमाणे मध्यवर्तीची दोन आणि प्रांतिकची तीन कार्यालये जुलै-ऑगस्ट १९४७ मध्ये सुरू करण्यात आली. प्रसिद्धी, संघटन व्यवस्था, निधी आणि संपर्क यासाठी जिल्ह्याची केंद्रे सरहद्दीबाहेर निघालेली दिसतात. सर्वप्रथम उस्मानाबाद जिल्ह्याचे कार्यालय सोलापूर येथे जुलै १९४७ मध्ये सुरू झाले. सोलापूर येथे बाबासाहेब परांजपे, फुलचंद गांधी, राघवेंद्रराव दिवाण, व्यासाचार्य संदीकर, विश्वंभरराव हराळकर हे होते. उस्मानाबाद जिल्ह्यासाठी सोलापूरशिवाय बार्शी, गौडगाव, चिंचोली, वाघोली, अंबेजवळगा, कवडगाव, वागदरी, मुस्ती या ठिकाणी कॅम्प उघडले गेले. बार्शी केंद्रावर शेषेराव वाघमारे, चंद्रशेखर वाजपेयी, लक्ष्मणराव चाकूरकर, भगवानराव आंबेगावकर, किशनराव शिरसीकर ही प्रमुख मंडळी होती.

गौडगाव कॅम्पवर रामभाऊ रंगनाथ जाधव, नरहरराव मालखरे, राजेंद्र देशमुख, वसंत अंबादास देशमुख, दत्तात्रय गणेश, मनोहर टापरे, भगवान तोडकरी यांचा समावेश होता. चिंचोली कॅम्पवर रामचंद्रजी मंत्री, श्रीधर वर्तक, बापूसाहेब वाघमारे, अमृतराव मास्तर, साळुंके गुरुजी ही मंडळी होती. पुढे चालून बार्शी व चिंचोली हे कॅम्प एकत्र करण्यात आले. वाघोली, अंबेजवळगा व कौडगाव हे तीन कॅम्प गौडगाव व चिंचोली या कॅम्पच्या अंतर्गत येत होते. वागदरी कॅम्पचे प्रमुख म्हणून शाहूराव जाधव काम पाहत होते. मुस्ती कॅम्पवर श्रीनिवास गोविंदाचार्य अहंकारी, नानासाहेब चिंचोलीकर वकील, राम माधव गायकवाड ही मंडळी होती. पानगाव कॅम्पचे प्रमुख म्हणून ज्ञानोबा पाटील इर्लेकर, त्यांचे सहकारी उद्धवराव पाटील, दत्तोबा भोसले, रामराव ज्ञानोबा आवरगावकर, नरसिंगराव देशमुख काटीकर, बाळासाहेब पाटील यांचा समावेश होता. अशा पद्धतीने उस्मानाबाद जिल्ह्याच्या सरहद्दीवर अनेक सशस्त्र कॅम्प कायम करण्यात आले होते. सशस्त्र लढ्याची आवश्यकता अधिक तीव्र आणि आक्रमक बनत चालली होती. त्यामुळे कॅम्पवरच्या सैनिकांना शस्त्रास्त्रे तसेच रेल्वे रूळ उखडणे यासाठी विध्वंसाचे पुरेसे साहित्य पुरवणे आवश्यक होते.

त्याचप्रमाणे मुंबई, पुणे, सोलापूर, बेंगलोर, नागपूर, नाशिक, इंदोर या ठिकाणी महत्त्वाचे कार्यकर्ते नेमून शस्त्रास्त्रे व इतर साहित्य मिळवणे आणि हैदराबादच्या लढ्याला मदत म्हणून निधी जमा होणे इ. व्यवस्था करण्यात आली. या केंद्रांनी बजावलेली कामगिरी व तेथील कार्यकर्त्यांनी पार पाडलेली कामे स्वतंत्र अभ्यासाचा विषय होईल. मराठवाड्यात सर्वच कॅम्पनी जंगल सत्याग्रह, करोडगिरी नाके तसेच संस्थानातील पोलिस ठाणे, सरकारी गोदाम यावर हल्ले करणे, त्याप्रमाणे रेल्वेचे रूळ उखडणे, तारा तोडणे, स्टेशन उद्ध्वस्त करणे, वाहतूक खंडित करणे, पाटील-कुलकर्णी यांच्याकडून राजीनामे घेणे, वसूल केलेला सारा हस्तगत करणे, सरकारचे धान्य शेतक-यांकडून वसूल केले असेल तर सरकारच्या गोदामावर हल्ले करून परत मिळवणे व त्या त्या शेतक-यांना वाटणे इ. कामे केली.

-भाऊसाहेब उमाटे
लातूर, मो. ७५८८८ ७५६९९

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या