37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeविशेषपूर्वक्षितिजावर कृत्रिम सूर्योदय?

पूर्वक्षितिजावर कृत्रिम सूर्योदय?

एकमत ऑनलाईन

जगातील बहुतेक देश चंद्रावर आणि मंगळावर रॉकेट पाठविण्यासाठी धडपडत आहेत. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी अमेरिकेच्या नासा या अंतरिक्ष संशोधन संस्थेने सूर्याच्या दिशेनेही यान सोडले आहे. परंतु चीनने मात्र कृत्रिम सूर्यच बनवला. चिनी शास्त्रज्ञांनी गुरुवारी या कृत्रिम सूर्याची चाचणी घेतली. १०५६ सेकंदांपर्यंत या कृत्रिम सूर्याने जवळजवळ १०० दशलक्ष अंश सेल्सिअसपर्यंत ऊर्जा निर्माण केली. चीनच्या या सूर्याने एक जागतिक विक्रमही नोंदविला आहे. वस्तुत: हा एक न्यूक्लिअर फ्यूजन रिअ‍ॅक्टर असून, चीनमधील हेफेई येथे हा प्रयोग करण्यात आला. सतरा मिनिटांत ७ कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा या कृत्रिम सूर्यापासून मिळाली. आतापर्यंत आण्विक रिअ‍ॅक्टरमधून जास्तीत जास्त १.२ कोटी अंश सेल्सिअस ऊर्जा उत्सर्जित झाली होती. हेफेई इन्स्टिट्यूट ऑफ फिजिकल सायन्सने प्रगत असा सुपरकंडक्टिंग हीटिंग सिस्टिम प्रकल्प सुरू केला आहे. घनरूप हायड्रोजनच्या मदतीने तेथे हेलियम तयार होतो. या प्रक्रियेदरम्यान भरपूर ऊर्जा निर्माण होते. चायना अकादमी ऑफ सायन्सेसचे संशोधक गोंग झियान्जू यांनी शुक्रवारी ७० दशलक्ष अंश सेल्सिअसपर्यंत ऊर्जानिर्मिती केल्याची घोषणा केली. गोंग यांच्याच मार्गदर्शनाखाली हा प्रयोग सुरू आहे.

‘शिन्हुआ’ या चीनच्या अधिकृत वृत्तसंस्थेशी बोलताना गोंग म्हणाले की, आम्ही २०२१ च्या पहिल्या सहा महिन्यांत १०१ सेकंदांपर्यंत १२ दशलक्ष अंश सेल्सिअस ऊर्जानिर्मितीचा टप्पा गाठला होता. यावेळी मात्र हे प्लाज्मा ऑपरेशन सुमारे १०५६ सेकंद चालले. या कालावधीत तापमान ७० दशलक्ष अंश सेल्सिअसच्या आसपास राहिले. त्यामुळे फ्यूजनवर आधारित अणुभट्टी चालविण्यासाठी एक ठोस शास्त्रीय आणि प्रायोगिक आधार तयार झाला आहे. चीनच्या हाती गवसलेल्या या अफाट ऊर्जेमुळे जगभरातील शास्त्रज्ञांना मात्र तणाव आला आहे. जागतिक शस्त्रास्त्र स्पर्धेत चीनने बाजी मारलेली असतानाच, मानवाला अमर्यादित ऊर्जा देऊ शकणारे नवे तंत्रज्ञान शोधून काढण्यासाठी जगातील महासत्ता धडपडत आहेत. चीनच्या कृत्रिम सूर्याच्या संदर्भात हे यश अत्यंत महत्त्वाचे असल्याचे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. चीनच्या या यशामुळे अमेरिका आणि ब्रिटनसारख्या देशांनाही या तंत्रज्ञानाविषयी संशोधन करणे भाग पडले आहे.

दुसरीकडे, कृत्रिम सूर्याच्या मदतीने आपली स्थिती आणखी मजबूत करण्यास चीनने प्रारंभ केला आहे. न्यूक्लिअर फ्यूजन प्रक्रियेदरम्यान अमर्यादित ऊर्जा उत्सर्जित होते आणि हेच तंत्रज्ञान चिनी सूर्यामध्ये वापरण्यात आले आहे. सूर्यापासून जशी मिळते, तशीच उष्णता आणि प्रकाश मानवाला मिळेल, अशी शास्त्रज्ञांना आशा आहे. १९५० च्या दशकातच सोव्हिएत रशियातील शास्त्रज्ञांनी ईएएसटी आणि इतर प्रकारच्या अणुभट्ट्यांची कल्पना वास्तवात आणण्यास सुरुवात केली होती. टोकामकसाठी अर्थात कृत्रिम सूर्य तयार करण्यासाठी चीनने आतापर्यंत पाण्यासारखा पैसा खर्च केला आहे. टोकामक ही एक इन्स्टॉलेशनची प्रक्रिया असून, त्यात प्लाज्मामध्ये हायड्रोजन आयसोटॉप उकळण्यासाठी उच्च तापमानाचा वापर केला जातो. ही प्रक्रियाच ऊर्जा उत्सर्जित करण्यास मदत करते. यासंदर्भात प्रकाशित झालेल्या वृत्तांतानुसार, या यशस्वी प्रयोगामुळे अत्यंत कमी इंधनाचा वापर होईल आणि किरणोत्सर्गी कच-याच्या निर्मितीचे प्रमाण जवळजवळ शून्य असेल. इन्स्टिट्यूट ऑफ प्लाज्मा फिजिक्सचे उपसंचालक सांत युन्ताओ यांनी सांगितले की, आजपासून पाच वर्षांनी आम्ही आमच्या फ्यूजन रिअ‍ॅक्टरची बांधणी करण्यास प्रारंभ करू. तिच्या उभारणीसाठी आणखी दहा वर्षे लागतील. त्यानंतर आम्ही विद्युत जनित्र तयार करू आणि साधारण २०४० पर्यंत वीजनिर्मिती सुरू करू.

आण्विक फ्यूजनच्या क्षेत्रातील अन्य प्रयोगकर्त्यांमध्ये एमआयटीचे बिल गेट्स समर्थित एसपीएआरसी आणि दक्षिण कोरियाचे केएसटीएअर यांचा समावेश आहे. त्यांनी अलीकडेच ३० सेकंदांसाठी एक दशलक्ष अंशांवर सुपर-हॉट प्लाज्मा कायम राखण्याचा विक्रम नोंदविला होता. यामध्ये एक दशलक्ष अ‍ॅम्पियर करंट प्राप्त करणे आणि शंभर सेकंदांच्या कालावधीत एक हजार दशलक्ष अंश तापमान निर्माण करण्याचा समावेश होता. चीनने हा जो कृत्रिम सूर्य तयार केला आहे, तो ख-या सूर्यापेक्षाही सहा पट अधिक ऊर्जा देऊ शकतो असे सांगण्यात आले आहे. त्यात न्यूक्लिअर फ्यूजनद्वारे ऊर्जानिर्मिती होते. आता प्रश्न असा आहे की, चीनने हा कृत्रिम सूर्य तयार करण्याचे कारण काय? वास्तविक विजेचा सर्वाधिक वापर करणारा देश आजमितीस चीन हाच आहे. विशेषत: रात्रीच्या वेळी जेव्हा पथदिवे लावले जातात त्यानंतर ऊर्जेचा वापर अनेक पटींनी वाढतो. चीनने देशाच्या अनेक भागांमध्ये रात्रीही दिवसासारखा उजेड ठेवण्याची योजना आखली आहे. त्यामुळे विजेची बचत होईल, असे चीनला वाटते.

ईएएसटीची निर्मिती ही प्रामुख्याने अणु संचयनामागील विज्ञान जाणून घेण्यासाठी आणि पृथ्वीवर नवीन पर्यायी ऊर्जा निर्माण करण्यासाठी केली गेली आहे. आगामी काळात स्वच्छ ऊर्जास्रोत म्हणून याचा प्रामुख्याने वापर होऊ शकतो. वास्तविक, अणुविखंडनाच्या (न्यूक्लिअर फ्यूजन) माध्यमातून जगात ऊर्जा निर्माण केली जाते. परंतु त्यामुळे होणारा किरणोत्सर्गी कचरा मानवासाठी अत्यंत घातक असतो. चीनच्या आधी फ्रान्सने कृत्रिम सूर्याचा प्रयोग २००३ मध्ये केला होता. जवळजवळ एवढेच तापमान ३९० सेकंद राखण्यात त्या प्रयोगाला यश आले होते. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रात विक्रम प्रस्थापित करण्याची ओढ चीनला लागलेली असणे स्वाभाविकच आहे.

वास्तविक, अशा प्रयोगाला ‘कृत्रिम सूर्य निर्माण करण्याचा यशस्वी प्रयोग’ असे म्हणणे काही शास्त्रज्ञांना मान्य नाही. प्रयोगाचा कल काहीसा त्या दिशेने असू शकतो; मात्र आकार आणि आकारमान या बाबतीत विचार केल्यास ख-या सूर्याचा या सूर्याशी काहीही मेळ बसू शकत नाही. आगामी काळात आकाशात राहून संपूर्ण जगाला उष्णता आणि ऊर्जा देऊ शकेल, असा कृत्रिम सूर्य आपण तयार करू शकत नाही.

ढोबळमानाने सांगायचे झाल्यास हा प्रयोग म्हणजे अणुऊर्जेची पुढील आवृत्ती आहे. अशा प्रयोगांच्या माध्यमातून अधिकाधिक ऊर्जा निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रयोगांमधून स्वच्छ ऊर्जा मिळणार असल्याने त्याचे महत्त्व विशेष आहे. अशा प्रकारे ऊर्जा निर्माण केल्यास किरणोत्सर्गी कच-याची निर्मितीही टाळता येईल. बदलत्या काळानुसार अधिकाधिक स्वच्छ ऊर्जेची गरज वाढत आहे. परंतु प्रत्यक्षात तिचा वापर व्यावहारिक स्वरूपात करण्याची गरज आहे. जेव्हा हे स्वप्न वास्तवात आणले जाईल तेव्हा खरा फायदा होईल.

-प्रा. विजया पंडित

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या