23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeविशेषपत्राचाळ प्रकरणाच्या मुळाशी...

पत्राचाळ प्रकरणाच्या मुळाशी…

एकमत ऑनलाईन

गैरव्यवहार, भ्रष्टाचार, अपहार ही आपल्या व्यवस्थेला लागलेली कीड असून ती इतक्यात संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. सरकारे बदलली, प्रशासकीय सुधारणा अमलात आल्या, डिजिटलायझेशची कास पकडली, कायद्यात सुधारणा झाल्या; परंतु आर्थिक गैरव्यवहारांच्या, भ्रष्टाचाराच्या, फसवणुकीच्या कहाण्या रोज ऐकण्याचे दुर्दैव जनतेच्या नशिबातून जात नाही. या गैरव्यवहाराची झळ सामान्यांना पोचते, तेव्हा त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त झाल्याशिवाय रहात नाही. सध्या शिवसेना प्रवक्ते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांना ईडीने ताब्यात घेतल्यामुळे मुंबईतील पत्राचाळ गैरव्यवहाराची चर्चा होत आहे. हे संपूर्ण प्रकरण पाहिल्यास त्याचा फटका तेथे राहणा-या शेकडो कुटुंबांना बसला आहे. आर्थिक अडचणींमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तपास यंत्रणाकडून कारवाई केली जात असली तरी पत्राचाळीतील भाडेकरूंचा दोष काय? किंवा त्यांचे भवितव्य काय? हा प्रश्न अनुत्तरित आहे.

मुंबईच्या गोरेगाव येथील पत्राचाळ गैरव्यवहार शेकडो कोटींचा असल्याचा आरोप जाहीरपणाने होत आहे. हे प्रकरण गृहनिर्मिती उद्योगाशी संबंधित आहे. २००८ मध्ये ६०० हून अधिक लोकांना घरे देण्याची योजना आखण्यात आली होती; पण २०२२ वर्ष उजाडले तरीही पत्राचाळीतील नागरिकांना घर मिळालेले नाही. त्यांच्यावर भटकंतीची वेळ आली आहे. एवढेच नाही तर गेल्या चार ते पाच वर्षांपासून लोकांना भाडे देखील दिले जात नसल्याची स्थिती आहे. २०१७ पूर्वी पत्राचाळीतील भाडेकरूंना ४० ते ४५ हजार रुपये भाडे मिळत होते. पण आता तेही बंद झाल्यामुळे त्यांच्याकडे सध्या राहात असलेल्या घराच्या भाड्यासाठी पैसे नाहीत आणि राहण्यासाठी हक्काचे घरही नाही, अशी शोचनीय स्थिती या नागरिकांची झाली आहे. पत्राचाळ सिद्धानगर संस्थेचे पदाधिकारी आणि पत्रकार पंकज दळवी म्हणतात, की आम्हाला आजही घरे मिळाले नाहीत. एका भाडेकरूने आपली व्यथा मांडली. पत्राचाळीचे आम्ही लाभार्थी. भाडे मिळत नसल्याने आम्ही पैसे कोठून आणावेत, असा प्रश्न आहे. आर्थिक तंगीमुळे अनेकांनी मुंबईबाहेरचा रस्ता धरला आहे. काहींनी आत्महत्याही केल्या. मी आणखी काय सांगू. ६७२ पैकी आता ५५०-५८० भाडेकरू राहिले आहेत. २०१७ पूर्वी दरमहा पैसे मिळत होते. पण आता काहीच मिळत नाही, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली. गोरेगावच्या पत्राचाळीत राहणा-या प्रत्येक भाडेकरूची अशीच कहाणी आहे.

काहींच्या मते, पत्राचाळ जमीन गैरव्यवहार हा १०३४ कोटी रुपयांचा आहे. गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा)चा भूखंड आहे. ‘ईडी’च्या आरोपानुसार प्रवीण राऊत यांची गुरू आशिष नावाची कन्स्ट्रक्शन कंपनी असून ही चाळ विकसित करण्याचे काम या कंपनीला देण्यात आले होते. परंतु त्यांनी या जागेचा काही भाग खासगी विकासकांना विकला, असा आरोप आहे. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणा-या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. गुरू आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळचे तब्बल ३ हजार फ्लॅटचे बांधकाम करायचे होते. त्यापैकी ६७२ फ्लॅट येथील भाडेकरूंना, तर उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. परंतु २०१० मध्ये प्रवीण राऊत यांनी भूखंडाचा ‘श्रीखंड’ करून खाण्यास सुरुवात केल्याचे तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. या प्रकरणी भाडेकरूंकडून आणि रहिवासी संघटनेकडून तक्रारी झाल्यानंतर तपास यंत्रणा कामाला लागल्या.

पत्राचाळ गैरव्यवहाराचे काही पुरावे हाती लागल्यानंतर प्रवीण राऊत यांना ईडीने २ फेब्रुवारीला अटक केली. प्रवीण राऊत हे संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचे ईडीचे म्हणणे आहे. प्रवीण राऊत हे गुरू आशिष कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आहेत. या कंपनीने म्हाडाच्या जमिनीवर वसलेल्या पत्राचाळीचा पुनर्विकास करण्यासाठी म्हाडाशी करार केला. ही चाळ तब्बल ४७ एकरवर असून तेथे ६२७ भाडेकरू राहतात. या सर्वांसाठी घरे बांधून ती म्हाडाला दिली जावीत, असा करार २०१० मध्ये करण्यात आला. पण प्रवीण राऊत यांनी हाऊसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चरचे (एचडीआयएल, डीएचएफएल समूहातील कंपनी) राकेश वाधवान, सारंग वाधवान आणि अन्य संचालकांना हाताशी घेतले आणि चाळ पुनर्विकासापोटी मिळणा-या चटई क्षेत्र निर्देशांक (एफएसआय) ची परस्पर विक्री केली. याद्वारे बेकायदा तब्बल १,०७४ कोटी रुपयांची माया जमविली.

दुसरीकडे पत्राचाळीचा एक इंचही पुनर्विकास केला नाही. एवढेच नाही तर त्यांनी या कामापोटी बँकेतून ९५ कोटींचे कर्जही मिळविले. प्रवीण राऊत यांनी हा सर्व पैसा त्याचे मित्र, कुटुंबीय यांच्या विविध खात्यात जमा केले. यात ८३ लाख रुपये प्रवीण यांची पत्नी माधुरी यांनी संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांच्या खात्यात जमा केले. त्याच रकमेतून वर्षा संजय राऊत यांनी दादर येथे फ्लॅट घेतला, असा ईडीचा संशय आहे. याप्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीने नोटीस बजावली. मात्र वर्षा यांनी ५५ लाख रुपये माधुरी यांना परत केले. मात्र त्यानंतर ईडीने एप्रिल महिन्यात पालघर येथील जमीन, दादर येथील फ्लॅट, किहीम येथील आठ भूखंड ताब्यात घेतले. यातील भूखंड व जमीन हे प्रवीण राऊत यांच्या मालकीचे आहे. तर दादर येथील फ्लॅट वर्षा संजय राऊत यांच्या मालकीचा आहे. तर काही भूखंड वर्षा राऊत आणि स्वप्ना सुजित पारकर यांच्या नावावर आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. प्रवीण राऊत यांच्या पत्नीच्या खात्यातून संजय राऊत यांच्या बँक खात्यात २०१० रोजी ५५ लाख रुपये ट्रान्सफर झाल्याचे ‘ईडी’ने म्हटले आहे. हेच ५५ लाख रुपये संजय राऊत यांनी परत केले असे सोमय्या म्हणतात.

‘‘ईडी कारवाई करणार असल्याचे संजय राऊत यांना ठाऊक होते आणि म्हणूनच त्यांनी प्रवीण राऊत यांना ५५ लाख रुपये परत केले. ५५ लाख रुपये परत केले, याचा अर्थ संजय राऊत यांनी चोरीची कबुली दिली आहे’’, असे सोमय्यांनी नमूद केले. संजय राऊत यांच्या अनेक मालमत्ता ईडीने जप्त केल्या आहेत. ईडीने समन्स पाठविल्यानंतर राऊत यांनी ५५ लाख रुपये परत केले. ईडी आणि मी खोटे बोलत असू तर संजय राऊत यांनी ५५ लाख रुपये परत का केले? असा सवाल सोमय्या यांनी केला आहे. ५५ लाख रुपयांचा धनादेश त्यांनी दिला आहे, मग रोकड किती मिळाली असेल, असा सोमय्यांचा प्रश्न आहे. खासदार संजय राऊत यांनी मात्र आपल्यावरची कारवाई खोटी असल्याचा दावा केला आहे. खोटी कारवाई, खोटी कागदपत्रे, खोटे पुरावे सादर केले जात आहेत. लोकांना मारून मुटकून आपल्याविरुद्ध बोलण्यास सांगितले जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. सध्याची एकंदर स्थिती पाहता अन्य गैरव्यवहाराप्रमाणेच पत्राचाळ गैरव्यवहाराचे प्रकरण प्रदीर्घ काळ चालणार असे दिसते. त्याचा शेवट कोठे होईल हे आताच सांगता येणार नाही. पत्राचाळच्या भाडेकरूंना बेघर करणा-या लोकांवर ठोस कारवाई होईल का, याविषयीही ठोसपणाने सांगता येत नाही. हे प्रकरण प्रलंबित ठेवून तारीख पे तारीख चालत राहिल्यास घरही नाही, भाडेही नाही आणि गैरव्यवहार करणा-यांवर कारवाईही नाही अशा तिहेरी पातळ्यांवरील नैराश्य पत्राचाळीतील भाडेकरूंच्या वाट्याला येईल. त्यामुळे या प्रकरणाच्या मुळाशी जाऊन सत्यशोधन अत्यंत गतिमानतेने होणे गरजेचे आहे.

-मिलिंद सोलापूरकर

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या