27.7 C
Latur
Thursday, February 2, 2023
Homeविशेषक्रौर्याच्या मुळाशी...

क्रौर्याच्या मुळाशी…

एकमत ऑनलाईन

दिल्लीतल्या निर्भया प्रकरणानंतर देशभरात जागृती येईल असे वाटले होते; परंतु कोणताही मोठा फरक पडलेला नाही, हे स्त्रियांवरील वाढत्या अत्याचाराच्या घटनांवरून दिसून येते. श्रद्धा वालकरचे प्रकरण हा महिला अत्याचारांच्या घटनांतील क्रूर अध्याय आहे. अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आलेली ही हत्या अंगावर काटा आणणारी आहे. नात्यागोत्यांचे बंध इतक्या टोकाला जाण्याची कारणे काय? जगण्यातले ताणतणाव, स्वातंत्र्याबद्दलचा कल्लोळ यामुळे भाव-भावनांचेच बकालीकरण होत आहे का? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. हे सर्व प्रश्न मानसशास्त्राच्या पातळीवरचे आहेत. प्रत्यक्षात याचे मूळ पुरुषसत्ताक मनोवृत्तीत आहे, हे नाकारून चालणार नाही.

गेल्या काही वर्षांमध्ये देशातील महिलांच्या कार्यकर्तृत्वाची यशोपताका सर्व क्षेत्रांमध्ये फडकत असताना दुस-या बाजूला स्त्रियांवरचे अत्याचार वाढताना दिसत आहेत. यामध्ये बालिकांचाही समावेश आहे. बलात्काराच्या गुन्ह्यात अल्पवयीन मुलींबाबत पॉस्को कायद्यामध्ये झालेल्या सुधारणेमुळे बारा वर्षांखालील बालिकेवर बलात्कार झाल्यास फाशीची शिक्षा निर्धारित करण्यात आली. त्यामुळे बलात्कारी प्रवृत्तीला आळा बसेल ही शक्यता गृहित धरण्यात आली. परंतु आज घडणा-या अनेक घटनांचा विचार करता कायद्याचा धाक, भीती आहे किंवा कसे हा प्रश्न सर्वसामान्य लोकांना पडतो आहे. कितीही कायदे करून आजही देशभरातील महिलांवरचे अत्याचार थांबायला तयार नाहीत. प्राचीन काळापासून स्त्री ही वस्तू मानली गेली असून त्या वस्तूचा मालक पुरुष आहे, अशी धारणा समाजात आहे. लहानवयापासून पुरुषांवर मर्दपणाचे संस्कार केले जातात. तो जीवनात अयशस्वी असला तरी चालेल, इतरांसमोर तो गुलामीचे जीवन स्वीकारत असला तरी चालेल परंतु त्याच्या ताब्यात असलेल्या स्त्रीने गुलामगिरीविरुद्ध बंड केले तर त्याचा मर्दपणा उफाळून आलाच पाहिजे ही समाजाची धारणा आहे. बलात्कार करणारा कोणी लैंगिक सुखासाठी ते अपकृत्य करतो असे म्हणता येत नाही. स्त्री प्रतिकार करत असताना पुरुषाला कसले लैंगिक सुख मिळणार? पण त्याला भिन्न प्रकारचा आनंद लाभतो. तो म्हणजे स्त्रीला असहाय्य बनविण्यात पुरुषातला मर्द समाधान पावतो. खरे म्हणजे मर्दपणा या कल्पनेत सारे अवगुण चिकटले आहेत.

सध्या देशभर दिल्लीत झालेल्या श्रद्धा वालकर या तरुणीच्या हत्येसंदर्भात संताप व्यक्त होत आहे. या मुलीला एका अर्थी फूस लावून दिल्लीत नेले गेले. लिव्.ह इन रिलेशनशिपमध्ये राहण्यास तिने मान्यता दिली. आफताब पूनावाला या तरुणाबरोबरचा तिचा संबंध एकाअर्थी अधिकृत स्वरूपाचा नव्हता. परंतु प्रतिपक्षाला शून्यवत करणे, त्याच्यावर वर्चस्व गाजवणे, हिंसेचा आश्रय घेणे म्हणजे मर्दपणा! गुणवान स्त्री म्हणजे पुरुषाच्या इच्छेतच स्वत:चे सुख मानणारी! त्याच्यापुढे गोगलगाय बनणारी! प्रतिकाराचा विचारही न करणारी, म्हणजेच आदर्श स्त्री! पुरुषांच्या इच्छापूर्तीला नकार देणा-या स्त्रीला जगणाचा हक्क नाही असे मानले जाते. तिला यमसदनालाच पाठविले पाहिजे हे मानणे म्हणजे मर्दपणा, हेच या अत्यंत क्रूर घटनेवरून लक्षात येते.
या पार्श्वभूमीवर स्त्री-पुरुष समानतेचे भान बालपणातच देण्यात आले पाहिजे; तरच त्या प्रश्नांची तीव्रता कमी होईल. आपल्याकडे माणुसकी किंवा माणूस म्हणून कोणते गुण धारण केले पाहिजेत, याचे प्रशिक्षण दिले जात नाही. मानव हा प्रक्षिशित प्राणी आहे. माणूस जातीचे सारे सद्गुण स्त्रीमध्येच सामावले पाहिजेत का? जेव्हा स्त्री आणि पुरुष दोघेही माणुसकीत श्रेष्ठ ठरतील, तेव्हा निरामय समाज निर्माण होईल. समाजव्यवस्था अन्यायावर, विषमतेवर आधारित असली तरी टिकायचा प्रयत्न करते. न्याय, समता, बंधुभाव, स्वातंत्र्य या गुणांचे स्त्री आणि पुरुष अशा नागरिकांना समान प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करणे, हे सत्तेचे कर्तव्य असते.

दिल्लीतल्या निर्भया प्रकरणानंतर देशभरात जागृती येईल असे वाटले होते; परंतु कोणताही मोठा फरक पडलेला नाही. मध्यंतरी आंध्र प्रदेशात एका उच्चशिक्षित तरुणीवर अत्याचार झाले. त्यावेळीसुद्धा देशभरात संतापाची लाट उसळली होती. उत्तर प्रदेशातल्या हाथरस गावातील घटना संपूर्ण देशाला हादरवून टाकणारी ठरली. अशा प्रकारची विकृती का थांबत नाही हा प्रश्न आहे. स्त्रियांच्या संदर्भातील अनेक कायदे आपण गेल्या काही वर्षांमध्ये मिळवले. पण फक्त कायदा आणि सुव्यवस्था सुधारून स्त्रियांकडे बघण्याचा हा दृष्टिकोन बदलणार नाही. स्त्रियांकडे बघण्याच्या दृष्टिकोनाची पाळेमुळे आपल्या पुरुषसत्ताक व्यवस्थेमध्ये आहेत आणि ही व्यवस्था अधिक कठोरतेने मोडायची असेल तर एका मजबूत स्त्री चळवळीची गरज आहे. ज्यात स्त्रियांबरोबरच संवेदनशील पुरुषही मोठ्या संंख्येने असणे अत्यंत गरजेचे आहे.

स्त्रियांवर बलात्कार आणि अन्य प्रकारच्या लैंगिक अत्याचाराव्यतिरिक्त अनेक प्रकारे हिंसा होत असते. अशा गुन्हेगारांना पकडले गेले, कडक शिक्षेची मागणी करण्यात आली, त्यांना शिक्षाही झाली. पण तरीही रोज बलात्काराच्या घृणास्पद घटना घडतच आहेत. फाशीच्या किंवा अन्य कडक शिक्षा दिल्यामुळे स्त्रियांवरील हिंसा कमी होणार नाहीत. ९० ते ९५ टक्के बलात्काराच्या घटनांमध्ये बलात्कारी परिचित किंवा नातेवाईक असतो. या अत्याचाराचे मूळ म्हणजे स्त्री-पुरुषांत असलेली असमानता. समाजातील स्त्रियांचा दुय्यम दर्जा हे आहे. स्त्रीला माणूस मानलेच जात नाही. तिला पुरुषांच्या वासनेचे साधन असलेली वस्तू म्हणून वापरले जाते! तिच्याकडे पुरुषाचा वंश निर्माण करण्याची एक मशिन म्हणून बघितले जाते!

दु:खदायक गोष्ट ही की स्त्रियासुद्धा स्वत:ला दुय्यम दर्जाच्या नागरिक मानतात आणि पुरुषाला श्रेष्ठ समजतात. त्या स्वत:ला पुरुषांपेक्षा कमजोर समजतात. पुरुषांवर अवलंबून असल्याचे समजतात. गेल्या ३०-३५ वर्षांत जागतिकीकरणाने पुरुषसत्ताक व्यवस्थेला आणखी खतपाणी घातले आहे. बड्या देशी-विदेशी कंपन्यांना आपला माल विकायचा असतो. त्यासाठी ते जाहिराती करतात आणि जाहिरातींसाठी स्त्री देहाचा वापर करतात. सगळ्या जाहिरातींमध्ये कामुकता आणि स्त्री देहप्रदर्शन असतेच. या सर्व आविर्भावाचा शेवट लैंगिक पातळीवर पुरुषाला स्त्री मिळाली पाहिजे इथे आणि फक्त इथेच होतो. भांडवली समाजातील अजून एक विकृती आहे सौंदर्यस्पर्धा. देश पातळीपासून गल्ली-बोळापर्यंत आजही सौंदर्यस्पर्धांना उधाण आले आहे. जे लोक महिलांना कुठलाही निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य देत नाहीत ते सौंदर्यस्पर्धा म्हणजे स्त्री-स्वातंत्र्याची अभिव्यक्ती मानतात. खरेतर हा रस्ता शरीरापासून शरीराकडेच जातो. म्हणूनच स्त्रियांवरील हिंसा थांबवायच्या असतील आणि स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलायचा असेल तर स्त्री देहाला वस्तू बनवणा-या सौंदर्यस्पर्धा आणि जाहिरातींना ठाम विरोध करण्याची गरज आहे.

श्रद्धा वालकर ही तरुणी महाराष्ट्राची रहिवासी होती. तिच्याबाबत घडलेली घटना ही राज्याच्या दृष्टीने अधिक संवेदनशील ठरते. ही घटना महिला अत्याचाराचे ताजे आणि अतिशय भयानक उदाहरण ठरते. आपल्या मैत्रिणीचा गळा दाबून हत्या करून तिच्या देहाचे ३५ तुकडे करून ते फ्रिजमध्ये ठेवले आणि एकेक करून शांतपणे नष्ट करण्याचा खटाटोप केला. ही हत्या मे महिन्यात झाली होती. माणूस इतका नराधम पातळीपर्यंत कसा पोचतो? कुठल्या संप्रेरकांचे अतिरेकी उत्तेजन किंवा अभाव त्याला या नीचतम पातळीला नेते? ही राक्षसी मनोवृत्ती कुठून येते? याचे उत्तर वर्षानुवर्षे जोपासल्या जाणा-या हिंसक मनोवृत्तीचाच भाग म्हणावा लागतो. अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आलेली ही हत्या अंगावर काटा आणणारी आहे. नात्यागोत्यांचे बंध इतक्या टोकाला जाण्याची कारणे काय? जगण्यातले ताणतणाव, स्वातंत्र्याबद्दलचा कल्लोळ यामुळे भाव-भावनांचेच बकालीकरण होत आहे का? असे अनेक प्रश्न यातून निर्माण होतात. पण हे सर्व प्रश्न मानसशास्त्राच्या पातळीवरचे आहेत. परंतु सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्याप्रमाणे तो लव्ह जिहाद सारखाच प्रकार ठरतो. अशा कितीतरी घटना गेल्या दोन-तीन वर्षांमध्ये देशाच्या विविध भागात घडल्या.

आमिष दाखवून, ब्लॅकमेल करून किंवा दहशतीच्या माध्यमातून हा प्रकार घडवून आणला जातो. याबाबतचे पहिले प्रकरण केरळमध्ये घडले. तूर्त पोलिसांचा तपास वेगळ्याच धाग्यांच्या शोधात आहे. उदाहरणार्थ, या हत्या प्रकारणात अमली पदार्थाचा सहभाग आहे का? कॅनिबलिझम म्हणजेच नरमांसभक्षणाचा हिंस्त्र पैलू यात असावा का? महिलांबाबत होणारे हे अत्याचार कायदा आणि सुव्यवस्थेची नाचक्की करणारे आहेत. म्हणून कठोरपणे आज कायद्याला भीक न घालणा-या क्रूरकर्म्याची जमात मुळासकट उपटली पाहिजे. अतिशय शीघ्र आणि कठोर शिक्षा हाच त्यावरचा प्रभावी उपाय आहे. कारण महिला अत्याचाराचा प्रवास जर बघितला तर भारतासारख्या देशात दर २०-२५ मिनिटाला एका स्त्रीवर बलात्कार होतो. बलात्कार ही टोकाची हिंसा झाली; पण रोजच्या जीवनात स्त्रीला बलात्कारा व्यतिरिक्त इतर अनेक त-हेच्या लैंगिक आक्रमणाला तोंड द्यावे लागत असतेच. भारतासारख्या देशात वाढत जाणारे हे प्रकार फार मोठ्या धोक्याचा इशारा देणारे, विकृतीचे उदात्तीकरण करणारेही ठरतात. त्याला रोखणे गरजेचे आहे.

-मोहन एस. मते
मुक्त पत्रकार

 

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या