25 C
Latur
Wednesday, August 10, 2022
Homeविशेषबर्दापूर पोलिस स्टेशनवर हल्ला

बर्दापूर पोलिस स्टेशनवर हल्ला

एकमत ऑनलाईन

हैदराबाद संस्थानातील रझाकारांच्या कारवायांना निजामी पोलिसांचाही पाठिंबा होता. वेळप्रसंगी रझाकार आणि पोलिस एकत्र मोहीम आखत होते. यामुळे संस्थानातील जनता भयभीत झाली होती. या भयभीत जनतेला आत्मविश्वास मिळवून देणे आवश्यक होते. यात सीमा-भागात उभारण्यात आलेल्या सीमावर्ती कॅम्पने पुढाकार घेतला. बीड जिल्ह्याच्या सीमेलगत बार्शीजवळ उभारलेल्या आगळगाव कॅम्पमधील मुक्तिसैनिकांनी निजामाच्या पोलिसांना धडा शिकवण्यासाठी एक योजना आखली. पोलिस ठाण्यावर हल्ला करून पोलिसांना चोप द्यावा आणि शक्य तेवढी हत्यारे त्या ठिकाणाहून मिळवावीत पर्यायाने निजाम सरकारला एक जबरदस्त हादरा द्यावा अशा धाडसी हेतूने बर्दापूर (ता. अंबाजोगाई, जि. बीड) या ठिकाणच्या पोलिस स्टेशनवर हल्ला केला गेला. आगळगाव कॅम्पमधील मुक्तिसैनिक संस्थानातील रझाकार आणि पोलिस यांच्या अन्यायाच्या कथा ऐकून क्रोधीत झाले. संस्थानातील हिंदू नागरिकांचे मनोबल कायम राहावे असा विचार या मुक्तिसैनिकांनी केला. आगळगाव कॅम्पमध्ये अंबाजोगाईचे अनेक मुक्तिसैनिक होते. या मुक्तिसैनिकांना असे वाटू लागले की आपण हल्ला करायचा तर बर्दापूर पोलिस स्टेशनवर करावा. यातील काही स्वातंत्र्यसैनिकांनी यापूर्वी पानगावजवळ रेल्वेचे रूळ उखडण्याची अत्यंत धाडसी मोहीम यशस्वी केली होती. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला होता.

बर्दापूर या ठिकाणी हल्ला करण्यापूर्वी पांडुरंगराव जोशी व हरिश्चंद्र जाधव या दोघांनी या भागात फिरून आवश्यक ती सर्व माहिती मिळवली. बर्दापूर हे ठिकाण अंबाजोगाईपासून बारा मैल अंतरावर आहे. अंबाजोगाई येथे निजाम सरकारच्या सैनिकांचे केंद्र होते. येथे निजामी फौजेचा कायम तळ असायचा. या ठिकाणी जवळपास ५०० घोडेस्वारसुद्धा नियुक्त करण्यात आलेले होते. बर्दापूर पोलिस स्टेशनमध्ये ३५ पोलिस व्यवस्थेला होते. १९२६ ला बांधण्यात आलेले हे ठाणे गावापासून काही अंतरावर होते. बर्दापूरची लोकसंख्या त्या काळामध्ये साधारणपणे सहा हजार असावी. बर्दापूरमध्ये रझाकारांचा फार मोठ्या प्रमाणामध्ये भरणा होता. परिसरातील हिंदूंना धाक बसावा म्हणून रझाकार सशस्त्र मिरवणुका काढत होते. आजूबाजूच्या गावांतून कर वसूल करणे, गावक-यांची छेड काढणे, त्यांना बेदम मारणे अशा घटना सातत्याने घडत होत्या. आगळगाव कॅम्पपासून शंभर एक मैल निजामी हद्दीतील या ठिकाणी हल्ला करणे म्हणजे साक्षात मृत्यूच्या गुहेत शिरण्यासारखे होते. मात्र हा धोका पत्करल्याशिवाय निजामी पोलिस आणि रझाकारांच्या कर्तबगारीचे गर्वहरण होणे शक्य नव्हते. तेव्हा बर्दापूर पोलिस स्टेशनवर हल्ला करून लाल किल्ल्यावर झेंडा फडकवण्याची भाषा करणा-या सालारे आलम कासिम रझवी आणि त्याच्या फौजेची फजिती करण्याची या मुक्तिसैनिकाची इच्छा होती. यासाठी फक्त तीस जणांची निवड करण्यात आली. यात प्रामुख्याने श्रीनिवास खोत, प्रभाकर खेडकर, काशिनाथ मुकदम, अण्णा पाटील, सुखदेव पांडुरंग, दगडू, भागवत मास्तर, हरिश्­चंद्र जाधव, भानुदास विश्वनाथ गावकर आणि शेषराव यांचा समावेश होता.

रेल्वेने सर्वजण तडोळा या स्थानकावर उतरले. भारतीय हद्दीतील हे शेवटचे स्थानक. आतापर्यंतचा प्रवास अत्यंत निर्धोक झाला होता. आता निजामाच्या हद्दीत प्रवेश करायचा होता. सावध असणे आवश्यक होते. सैनिक पायी निघाले. पिंपरी, टाकळी-सांगवी अशा गावी मुक्काम करत ते तिस-या दिवशी रात्री साडेदहाच्या दरम्यान बर्दापूर पोलिस स्टेशनच्या जवळ आले. एका झाडाखाली बसून परत एकदा प्रत्येकाच्या जबाबदारीची उजळणी करण्यात आली. सैनिक विविध गटांत विभागण्यात आले. अण्णा पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावातून कोणत्याही परिस्थितीतून रझाकार व जनता यांची कुमक पोलिसांना मिळणार नाही याची जबाबदारी टाकण्यात आली. श्रीनिवास खोत आणि प्रभाकर खेडकर यांच्या तुकडीने पोलिस ठाण्यावर हल्ला केला. ठाण्यातील पोलिस झोपण्याच्या तयारीत होते. संकेतानुसार काशिनाथ मुकदमने ग्रेनेड फेकला. प्रचंड आवाज झाला.

पहारेकरी खाली कोसळला. ठाण्यामध्ये एकच गोंधळ सुरू झाला. कोणीकडे पळावे हेच पोलिसांना कळत नव्हते. ठाण्यातील पोलिसांनी गावाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मुक्तिसैनिकांनी केलेल्या गोळीबारात चार पोलिस मृत्यू पावले. सात जण जखमी झाले. आता मुक्तिसैनिक ठाण्यामध्ये घुसले. ठाण्यातील निवडक बंदुका ताब्यात घेण्यात आल्या. जिलेटिन लावून ठाण्यातील पेटी उघडण्यात आली पण येथे फारसे काही हाती लागले नाही. पुढे एखाद्या अ‍ॅक्­शनमध्ये उपयोगी पडतील म्हणून पोलिसाचे ड्रेस सोबत घेण्यात आले. आता ठाण्याची इमारत उडवून द्यावी व पुढे जावे असा बेत होता. इमारत उद्ध्वस्त करण्याचे साहित्य इमारतीस लावण्यात आले. बत्ती पेटविण्यात आली. कानठळ्या बसवणारा आवाज झाला. ठाण्याची संपूर्ण इमारत हादरली. पण हा प्रयत्न व्यर्थ गेला. (आजही ही इमारत पहावयास मिळते.) आता विचार करण्यात अर्थ नव्हता. परतायची घाई सुरू झाली. घाईघाईत वॉटरबॅग विसरली. त्या वॉटरबॅगमध्ये बर्दापूर ठाण्याचा नकाशा आणि सैनिकांच्या जाण्या-येण्याचा मार्ग दाखवणारा एक नकाशा होता. इकडे साधारणपणे दुपारी बारा वाजता निजामी फौजेचे एक पथक बर्दापूरला आले. ठाणे रिकामे होते. तेथे त्यांना वॉटरबॅग सापडली. त्यातील कागदा-वर मुक्तिसैनिकांच्या जाण्या-येण्याच्या मार्गाची माहिती होती. निजामी घोडदळाने सापडलेल्या नकाशाच्या आधारे मुक्तिसैनिकांचा पाठलाग सुरू केला. तासन्तास रपेट मारूनसुद्धा घोडदळाच्या हाती काही लागले नाही. कारण मुक्तिसैनिकांनी निजामी फौजेला चकवा देण्यासाठी तो बनावट मार्ग दाखवला होता. या हल्ल्याची सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटली. रझाकार हादरले तर निजामी पोलिस घाबरले आणि हिंदू जनतेला एक आत्मविश्वास प्राप्त झाला.

-भाऊसाहेब उमाटे
लातूर, मो. ७५८८८ ७५६९९

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या