36.5 C
Latur
Saturday, April 17, 2021
Homeविशेषआयशा! तू कल भी गलत थी, आज भी गलत है

आयशा! तू कल भी गलत थी, आज भी गलत है

एकमत ऑनलाईन

‘सुकून से जाना चाहती हूँ, अल्ला से दूँआ करती हूँ की, दोबारा इन्सानों की शक्ल ना दिखाएँ । मेरे पीठ पिछे जो भी हो प्लीज जादा बखेड़ा मत करना।’ असे जगाला सांगत आयशा हसत हसत आत्महत्या करते. जगण्याची हिंमत सोडलेली आयशा ‘कब तक लड़ेंगे अपनोंसे?’ म्हणत मोठ्या हिमतीने मृत्यूला जवळ करते. गुजरातमधील अहमदाबादची तेवीस वर्षांची आयशा ‘मला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली आहेत’ असे म्हणत असंख्य अनुत्तरित प्रश्न जगासमोर मांडून गेली. एक उच्चशिक्षित आणि स्वत:च्या पायावर उभी असणारी तरुणी ‘मला पुन्हा माणसांचे तोंड पाहण्याची इच्छा नाही’ म्हणत जगाचा निरोप घेते. माणसांविषयी तिच्या मनातला हा तिरस्कारच खूप काही सांगून जातो.

आयशाने आत्महत्या का केली? याचे उत्तर प्रत्येकजण आपापल्या परीने देत राहील. माझ्या जाण्यानंतर माझ्या मरणाचे भांडवल करू नका, असे तळमळीने सांगूनही तिच्या सरणावर आपली पोळी भाजून घेणारे मागे हटले नाहीत. सोशल मीडियावर आपले तत्त्वज्ञान पाजळण्यासारखी आणि राजकारण करता येण्यासारखी दुसरी एखादी घटना घडेपर्यंत आयशाला सहानुभूती मिळेल. उद्या आयशा भूतकाळात जमा होईल इतके तिचे मरण स्वस्त आहे का? हा प्रश्न मनाला भेडसावत राहतो. मग देशात आयशासारख्या किती मुली असतील? किती मुलींच्या मरणावर आत्महत्या हे लेबल लावून त्यांच्या गुन्हेगारांना मोकाट सोडले असेल? मी स्वखुशीने आत्महत्या करतेय असे जगाला सांगून मरणाला आपलंसं करणा-या मुलींचा नेमका दोष काय असेल? केवळ ती एक मुलगी असण्याची किंमत तर तिला चुकवावी लागत नाही ना? मुळात मुलीचा जन्म, तिची सुरक्षा, तिचे लग्न आणि त्याच्याशी जोडल्या गेलेल्या अनेक चुकीच्या चालीरीती जोपर्यंत जिवंत आहेत तोपर्यंत कोणतीही मुलगी समाजात दिमाखात मिरवू शकणार नाही.

आज मुली उच्चशिक्षित झाल्या, कमावत्या झाल्या तरीही त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही गोष्टी आजही त्यांच्या हातात नाहीत. एक मुलगी जी वयाची वीस-पंचवीस वर्षे आपल्या आई-बाबासोबत घालवते, त्याच मुलीला लग्नानंतर आपल्या जन्मदात्यांना बोलण्यासाठीही सासरघरचे नियम आजही पाळावेच लागतात. इतकी परकी असते का मुलगी? आज आयशाचा मोबाईल सासरचे लोक जप्त करतात, पण अशा कितीतरी मुली आहेत ज्यांच्याकडे मोबाईल असूनही आपले सुख-दु:ख आईवडिलांना सांगूही शकत नाहीत.

केरळमध्ये ई. श्रीधरन भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार

सकाळी सकाळी स्वयंपाकाची घाई असते आणि घरातली सून फोनवर बोलत बसते म्हणजे काय? दुपारी मुलांचा अभ्यास घ्यायचा, त्यांना खाऊपिऊ घालायचे, आल्यागेल्या पाहुण्यांचं बघायचं तर ही बया आईशी फोनवर काय गुलूगुलू बोलत बसते काय माहीत? संध्याकाळी चहापाणी करायचे, घरातील पुरुष लोक दमून-भागून घरी येतात आणि त्याच वेळी ही बाई माहेरी फोन करून बोलत बसते…. आजही घरोघरच्या सुनांची प्रत्यक्ष- अप्रक्षत्यरीत्या हीच कहाणी आहे. अशा कितीतरी लहान-लहान गोष्टी असतात ज्या आजही मुलीला सासरच्या मर्जीनुसारच कराव्या लागतात. एक मुलगी आपले जन्मदाते, आपले घर सोडून नवीन वातावरणात स्वत:ला सामावून घेते तिथेच तिच्या राहणीमानापासून तिच्या उठण्या-बसण्यापर्यंत तिचे मन तिला का मारावे लागते? आणि ज्या व्यक्तींसाठी ती मुलगी त्या घरात येते ती व्यक्तीही तिला साथ देत नाही हेच अनेक मुलींबाबत घडते.

मान-पान, हुंडा जावई आणि त्याच्या घरच्यांनाच का द्यावा लागतो? मुलीच्या आई-वडिलांना मान नसतोच का? एकीकडे मुलगा-मुलगी समानतेच्या गप्पा मारल्या जातात आणि दुसरीकडे घटनेत तरतूद नसतानाही लग्नानंतर फक्त मुलींनीच सासरी जाणे हा जणू अलिखित कायदाच बनला आहे. कधीच एक मुलगा लग्नानंतर सासरी का जात नाही? जर हा जाब कोणाला विचारला तर चार अतिशहाणे लोक हे देखील म्हणतील की, समाजव्यवस्था आणि कुटुंबव्यवस्था बिघडवण्याची ही कामे आहेत. परंतु मूळ प्रश्न हा आहे की, मुलीचा जन्म, तिचे संगोपन, तिची सुरक्षा, शिक्षण आणि लग्न-संसारासारख्या महत्त्वाच्या गोष्टीतही तिने एकटीनेच का तडजोड करावी ? आणि इथे आपली माणुसकी इतकी गहाण का पडली आहे की, एका मुलीला माणसांचे तोंड बघण्याचीही इच्छा होऊ नये?

‘मरण्याआधी तुझा व्हीडीओ कर’ असे म्हणण्याची हैवानी हिंमत येते कुठून? मुलीने कसे जगावे आणि कसे मरावे हे ठरवणारे तुम्ही कोण? मुलगी म्हणजे कोणाच्या बापाची जाहागिरी नाही की तुम्ही नाचवाल तसे तिने नाचत बसावे. मुलगी म्हणजे कोणाची सार्वजनिक मालमत्ता नाही की कोणीही यावे अन् टिकली मारून जावे. मुलगी म्हणजे एखादी वस्तू नाही की मन भरेपर्यंत तिचा वापर कराल अन् फेकून द्याल. तिच्या आयुष्याशी खेळण्याची मक्तेदारी तुम्हाला दिलीच कोणी?

आयशा…. तू गेलीस पण तुझ्या जाण्याने इथे काहीही बदलणार नाही. इथे फक्त सोशल मीडियावर तुझ्यासाठी काही दिवस हळहळ व्यक्त केली जाईल, तुझ्यासाठी हजारो मेणबत्त्या जळतील, कायद्याशी आणि समाजव्यवस्थेशी काही दिवस भांडण केलं जाईल…. आणि काही दिवसांनंतर ज्याप्रमाणे तुझं शरीर दफन केलं गेलं त्याप्रमाणे तुझी आणि तुझ्यासारख्या लाखो मुलींची कहाणी दफन केली जाईल. आयशा! जो व्यक्ती तुझ्याकडे हुंड्याची भीक मागत राहिला त्या व्यक्तीकडे तू मरेपर्यंत का प्रेमाची भीक मागत राहिलीस?

आयशा! तू नव-याचे घर सोडून आलीस, माहेरी राहिलीस, त्यांच्यावर तू केस केली म्हणून काही लोकांनी तुझ्यावर टीका केली, तुला चुकीचे ठरवले आणि आज तुझ्या मरणानंतरही शहाणपणा शिकवणारे काही लोक तू पळपुटी होतीस, परिस्थितीशी लढली नाहीस, आत्महत्या करून चूकच केलीस असेच म्हणतात, म्हणून आयशा…..
तू कल भी गलत थी…
तू आज भी गलत है !!

सुवर्णा थोरात-तांबारे
कळंब, मोबा. ९५०३० ५९४१४

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,476FansLike
168FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या