26.1 C
Latur
Sunday, September 19, 2021
Homeविशेषआयुर्वेदिक औषधी पांढरा कुडा

आयुर्वेदिक औषधी पांढरा कुडा

एकमत ऑनलाईन

पांढरा कुडा ही आयुर्वेदिक औषधी असून लहान पानझडी वृक्ष आहे. पानझडी मोसमी जंगलात वाढणारी इंद्रजव ही वनस्पती. या लहान वृक्षाचे मूळस्थान भारत व आशिया खंडातील काही प्रदेश असावा असा अंदाज आहे. पांढरा कुडा ही पानझडी वनस्पती उष्ण आणि समशितोष्ण हवामान असल्यास चांगली वाढते. हे लहान वृक्ष सावलीमध्ये वाढत असले तरीही भरपूर आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असल्यास याची वाढ जोमदारपणे होते. धुक्याचा या वृक्षाच्या वाढीवर फारसा परिणाम होत नाही.

कमी-अधिक वार्षिक पर्जन्यमानाच्या प्रदेशातसुध्दा ही वनस्पती चांगली वाढलेली आढळते. पांढरा कुडा वनस्पती त्वचेच्या विविध आजारांवर अत्यंत उपयोगी आहे. त्यासाठी या वनस्पतीच्या सालीचा काढा तयार करावा. तसेच कडुनिंबाची साल, भुईअर, वावडिंग, नागरमोथा, सुंठ, काळी मिरी व पिंपळी समप्रमाणात घेऊन त्याची पेस्ट तयार करावी. २० ते ३० मिली काढ्यामध्ये १० ते २० ग्रॅम पेस्ट मिसळून रुग्णाला दररोज नियमितपणे काही दिवस प्यायला द्यावी. दातदुखी या आजारामध्ये अस वेदना होतात. त्यासाठी पांढरा कुडा वनस्पती अत्यंत गुणकारी आहे. त्यासाठी या वनस्पतीच्या खोडाची साल स्वच्छ धुऊन मंद आचेवर उकळून त्याचा काढा तयार करावा.

या काढ्याने दररोज सकाळ-संध्याकाळ काही दिवस गुळण्या कराव्यात त्यामुळे दातदुखी कमी होते. तसेच इंद्रजवाचे बारीक चूर्ण हिरड्यावर चोळावे ज्यामुळे दाताच्या भोवती पू होऊन मुखदुर्गंधी येणे बंद होते. कानात मळ साचणे, कानात पू होणे, कानातून पाणी येणे, अशा अनेक समस्यांमुळे कानदुखीचा त्रास होतो व त्यामुळे अचानक कमी ऐकायला येते. यासाठी कुड्याच्या साली बारीक वाटून त्याचे वस्त्रगाळ चूर्ण तयार करावे. हे एक चिमूटभर चूर्ण कानात टाकावे व त्यावर मखमलीच्या पानाचा रस पिळावा. पांढरा कुडा वनस्पतीमध्ये अग्निदीपक गुणधर्म आहेत. ज्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित होते. पाचक प्रणाली सुरळीत न झाल्यास पोटदुखीच्या तक्रारी वारंवार निर्माण होतात. त्यासाठी कुटज वनस्पतीच्या पानांचा व सालीचा काढा तयार करावा.

हा तयार केलेला १० ते २० मिली काढा नियमितपणे दररोज दोन वेळा सकाळ-संध्याकाळ घेतल्यास पचनक्रियेस मदत होते व पोटदुखीचा त्रास कमी होतो. मूत्रपिंडात किंवा लघवीच्या मार्गात तयार होणा-या कठीण व स्फटीकजन्य पदार्थामुळे तीव्र वेदना होतात. यासाठी कुडा वनस्पतीच्या मुळाची साल ५ ग्रॅम घेऊन दह्यामध्ये बारीक वाटावी. हे तयार केलेले वाटण दिवसातून दोन वेळा काही दिवस नियमितपणे सेवन करावे. इंद्रजव वनस्पतीमध्ये त्रिदोषशामक तत्त्वे आहेत. शरीरातील वात व पित्त दोषाचे असंतुलन झाल्यामुळे लघवीच्या अनेक समस्या निर्माण होतात. त्यासाठी इंद्रजव फळाचे किंवा बियाचे बारीक वाटून चूर्ण तयार करावे. हे तयार केलेले २ ते ३ ग्रॅम चूर्ण दुधाबरोबर दररोज दोन वेळा नियमितपणे काही दिवस घेतल्यास लाभदायक होते.

अतिसार या आजारामध्ये शौचास पातळ होऊन वारंवारिता होते त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन त्वचा कोरडी पडते. त्यासाठी १० ग्रॅम इंद्रजवाच्या बिया बारीक वाटून अर्धा लिटर पाण्यामध्ये मंद आचेवर उकळाव्यात व काढा तयार करावा. हा काढा मधाबरोबर रुग्णाला दिल्यास अतिसार कमी होऊन आराम मिळतो. या आजारामध्ये गुद्द्वाराच्या आतल्या व बाहेरच्या भागातील रक्तवाहिन्या सुजतात व ब-याच वेळा त्यातून रक्त बाहेर येते व ठणकल्यागत वेदना होतात. त्यासाठी कुटज झाडांच्या सालीचा काढा तयार करावा. या १५ ते २० मिली काढ्यामध्ये ५ ग्रॅम गायीचे तूप व एक ग्रॅम सुंठ चूर्ण मिसळून दररोज दोन वेळा सकाळ-संध्याकाळ रुग्णाला काही दिवस दिल्यास मूळव्याधीचा रक्तस्त्राव थांबून आराम मिळतो.

जुनाट मुरडा या आजारामध्ये पोटात कळ येऊन वेदना होतात. त्यासाठी इंद्रजव ५ ग्रॅम, सैंधव मीठ १ ग्रॅम, भाजलेले कांचन बी ५ ग्रॅम आणि वावडिंग ५ ग्रॅम हे सर्व बारीक वाटून त्याची वस्त्रगाळ पूड करून सर्व मिसळून चूर्ण तयार करावे. हे तयार केलेले चूर्ण दररोज सकाळी ५०० मिली पाणी अथवा मधाबरोबर काही दिवस दिल्यास फायदा होतो. या आजारामध्ये कातडीवर न खाजणारे चट्टे व बधिरता येते. हा एक जंतूसंसर्गाने वाढणारा आजार असून हळूहळू मज्जासंस्थेवर हल्ला करतो. त्यासाठी १० ग्रॅम पांढ-या कुडाची साल पाण्यामध्ये वाटून बारीक करावी. हे तयार केलेले मिश्रण दररोज तीन वेळा सकाळ-दुपार-संध्याकाळ रुग्णाला नियमितपणे काही महिने दिल्यास फायदेशीर होते.

शौचाच्या वेळी चिकटपणा व आव होत असल्यास ५ ग्रॅम इंद्रजव, २.५ ग्रॅम तुपात व तळलेली सुंठ, ७ ग्रॅम हिरडा घेऊन त्याचे चूर्ण तयार करावे. हे तयार केलेले चूर्ण ताज्या ताकाबरोबर १ चमचा दिल्यास शौचाला चिकट होत नाही व तसेच आव बरी होण्यासाठी सुध्दा हे चूर्ण उपयोगी आहे. वायू किंवा वातापासून ब-याचजणांना पोटदुखी होते. कारण पोटात वातदोषाचे संतुलन बिघडलेले असते. आयुर्वेदिक भाषेत याला पोटशूल म्हणतात. त्यासाठी ३ ग्रॅम इंद्रजव भाजून घेऊन त्यात १ ग्रॅम सैंधव अर्थात काळे मीठ घालून चूर्ण तयार करावे. हे चूर्ण दोन-दोन तासांनी घ्यावे त्यामुळे पोटशूळ थांबून आराम मिळतो. प्रामुख्याने लहान मुलांना जंतांचा जास्त त्रास होतो. त्यासाठी १० ग्रॅम इंद्रजव बिया अर्धा लिटर पाण्यामध्ये मंद आचेवर उकळून एक अष्ठमांश उरवून त्याचा काढा तयार करावा.

या काढ्यात मध आणि डिकमली मिसळून दोन वेळा एकेक छोटा चमचा प्यायला द्यावा त्यामुळे लगेचच लहान मुलांच्या पोटातील जंत कमी होतात. ब-याच वेळा उष्णतेच्या परिणामामुळे तोंडात लाल रंगाचे फोड येतात व वेदना होतात. त्यासाठी पांढ-या कुडाच्या बिया आणि काळे जिरे प्रत्येकी २० ग्रॅम घेऊन बारीक वाटून त्याचे चूर्ण तयार करावे. दिवसातून दोन वेळा ही भुकटी तोंडातील फोडावर नियमितपणे काही दिवस लावल्यास फोड कमी होण्यास मदत होते. अनेक वेळा घाईगडबडीत किंवा अपघाताने जखम होते. पांढरा कुडा या वनस्पतीमध्ये जखम लवकर बरी होण्याचे गुणधर्म आहेत. त्यासाठी कुटज वनस्पतीच्या सालीचा काढा तयार करून त्या काढ्याने जखम नियमितपणे धुऊन काढावी तसेच कुटज बियाची पेस्ट तयार करून जखमेवर लावावी त्यामुळे जखम लवकर दुरुस्त होते.

श्वासाच्या जुन्या आजारामध्ये इंद्रजव अत्यंत गुणकारी औषधी आहे. त्यासाठी १० ग्रॅम इंद्रजव बिया अर्धा लिटर पाण्यामध्ये मंद आचेवर उकळून एक अष्टमांश उरवून त्याचा काढा तयार करावा. हा तयार केलेला काढा एकेक छोटा चमचा याप्रमाणे सकाळ-संध्याकाळ नियमितपणे काही दिवस दिल्यास दमा कमी होतो. कुटज या वनस्पतीमध्ये ताप कमी करण्याचे गुणधर्म आहेत. त्यासाठी कुटज वृक्षाची साल आणि गुळवेल एकत्र करून त्याचा काढा तयार करावा अथवा हे दोन्ही रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी हे पाणी वस्त्रगाळ करून दोन ते तीन दिवस नियमितपणे पिल्यास ताप लवकर कमी होण्यास मदत होते.
टिप : वनौषधीचा वापर करताना आयुर्वेदतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

प्रा. डॉ. ज्ञानोबा एस. जाधव
कळंब, मोबा. ९४२३३ ४२२२९

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या