20.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeविशेषबॅड बँकेमुळे समस्या सुटेल?

बॅड बँकेमुळे समस्या सुटेल?

बॅड बँकेचा सर्वांत मोठा फायदा असा असेल की, बँकांच्या ताळेबंदात सुधारणा होईल आणि नवीन कर्जे देणे सुलभ होईल. अनेक बँका एनपीएपासून मुक्त होतील. बँकांचा ताळेबंद स्वच्छ असेल तर सरकारलाही फायदाच होईल. जर एखाद्या बँकेचे खासगीकरण करायचे असेल तर ती प्रक्रिया सोपी होईल. बॅड बँकेचा अर्थ एवढाच आहे की, जेवढ्या बँकांकडे सध्या थकित कर्जांची समस्या आहे, ती सर्व थकित कर्जे या बँकेकडे हस्तांतरित केली जातील.

एकमत ऑनलाईन

‘बॅड बँक’ स्थापन करण्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. त्यासाठी नॅशनल असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी लिमिटेड या कंपनीमार्फत जारी करण्यात आलेल्या सिक्युरिटी रिसीटसाठी ३०,६०० कोटींची हमी देण्याच्या निर्णयाला मोदी मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. बॅड बँक ही एकप्रकारे असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनीच असते आणि बँकांची थकित कर्जे म्हणजे एलपीए आपल्याकडे घेणे हे तिचे काम असते. बँक कोणत्याही बॅड असेटचे रूपांतर गुड असेटमध्ये करण्याचे काम करते. जेव्हा बँक एखाद्याला कर्ज देते, तेव्हा संबंधित व्यक्ती किंवा कंपनी वेळेत सर्व हप्ते फेडेल, याची शाश्वती नसते. काही व्यक्ती कर्ज पूर्णपणे फेडत नाहीत. अशा वेळी बॅड बँकेची भूमिका सुरू होते.

सिक्युरिटी रिसीटमुळे एखाद्या आर्थिक संपत्तीवर असेट रिकन्स्ट्रक्शनच्या अधिकाराला निर्विवाद मान्यता मिळते. सामान्यत: असेट रिकन्स्ट्रक्शन कंपनी किंवा बॅड बँक अडकून पडलेल्या कर्जाच्या १५ टक्के रक्कम देऊन ती कर्जे खरेदी करते. उर्वरित ८५ टक्के रक्कम सिक्युरिटी रिसीटच्या रूपात असते. आता बँकांना आपल्याकडे थकलेली कर्जे एलएआरसीएलला विश्वासाने विकता येतील. कंपनीच्या सरकारी रिसीटवर सरकारची हमी मिळेल. याच्याच आधारावर ती बँकांच्या बुडित कर्जांची खरेदी करेल. बॅड बँक म्हणजे बुडलेल्या कर्जांची (एनपीए) बँक असे म्हटले जाते.

भारतीय बँकांपुढे संपूर्ण देशभरात अडकून पडलेल्या किंवा बुडित कर्जांची समस्या आ वासून उभी आहे आणि त्यामुळेच बॅड बँकेची स्थापना करावी लागली आहे. विजय माल्ल्या आणि नीरव मोदी यांच्यासारखे लोक कोट्यवधी रुपयांचे कर्ज घेऊन भारताबाहेर पळून गेले. कोरोना महामारीमुळेही एनपीएमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. २०२० या आर्थिक वर्षात बँकांचा एनपीए वाढून ११.५ टक्के झाला. गेल्या वर्षी तो ८.७ टक्के होता. अर्थात, एनपीएचे समूळ उच्चाटन कधीच करता येत नसले, तरी तो सीमित स्तरावर राखणे शक्य असते. वास्तविक आपल्या बँकिंग प्रणालीत इतक्या त्रुटी आहेत, ज्यामुळे एनपीएचा आकडा दिवसेंदिवस फुगतच गेल्याचे पाहायला मिळते. बँकिंग प्रणालीत भ्रष्टाचारही आहे आणि बँका तसेच एनएफबीसी कंपन्या जास्तीत जास्त ग्राहक जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत.

बँका अगदी सहजासहजी, झटपट कर्जे देत असल्यामुळे कर्ज देताना जी प्रक्रिया पूर्ण केली पाहिजे ती केली जात नाही. बँका औद्योगिक घराण्यांना अब्जावधींचे कर्ज देतात आणि त्याचबरोबर सर्वसामान्य लोकांनाही कर्ज देतात. एकाच मालमत्तेच्या तारणावर अनेक बँकांनी कर्ज दिल्याच्या घटना अनेकदा समोर येतात. जेव्हा ही फसवणूक उजेडात येते, तेव्हा संबंधितांना पकडण्यासही खूप वेळ लागतो. एनपीएच्या बाबतीत सार्वजनिक क्षेत्रातील बँका चक्रीवादळाप्रमाणे गोल-गोल फिरत राहिल्याचे दिसते आणि या दुष्टचक्रातून त्यांना बाहेर पडता येईनासे झाले आहे. या चक्रीवादळातून या बँकांना बाहेर काढण्याचा हेतू बॅड बँकेच्या स्थापनेमागे आहे. खासगी बँका आणि सहकारी बँकांमध्येही घोटाळे होतात. पीएनबी बँकेच्या घोटाळ्यानंतर रिझर्व्ह बँकेने खूपच कडक धोरण अवलंबिले आणि बँकांनीही एनपीएची वसुली जोरदारपणे सुरू केली.

विजय माल्ल्या, नीरव मोदी आणि इतरांच्या मालमत्ता जप्त करण्यात येऊन त्यातून बरीच वसुली करण्यात आली आहे. गेल्या सहा वर्षांत बँकांनी पाच लाख कोटींपेक्षा अधिक रकमेची वसुली केली आहे. बॅड बँक आता बॅड लोन स्वत:कडे हस्तांतरित करून घेईल आणि नंतर वसुलीसाठी प्रयत्न करेल. आपल्या हिशेबपत्रात थकित कर्जे असावीत असे कोणत्याही बँकेला वाटत नाही, कारण त्यामुळे त्या बँकेच्या ताळेबंदावर प्रतिकूल परिणाम होतो.

बॅड बँक हा काही भारताने शोधून काढलेला तोडगा नाही, तर त्याची सुरुवात अमेरिकेपासून झाली आहे. १९८० च्या दशकात ब-याच अमेरिकी बँकांची परिस्थिती खूपच खालावली होती. एनपीएमुळे बँका बुडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचल्या होत्या. अशा स्थितीत बॅड बँकेची संकल्पना आणण्यात आली आणि बॅड असेटचे रूपांतर गुड असेटमध्ये करण्याचे प्रयत्न सुरू झाले. अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, स्पेन आणि पोर्तुगालसह अनेक देशांमध्ये अशा बँका कार्यरत आहेत.

बॅड बँकेचा सर्वांत मोठा फायदा असा असेल की, बँकांच्या ताळेबंदात सुधारणा होईल आणि नवीन कर्जे देणे सुलभ होईल. अनेक बँका एनपीएपासून मुक्त होतील. बँकांचा ताळेबंद स्वच्छ असेल तर सरकारलाही फायदाच होईल. जर एखाद्या बँकेचे खासगीकरण करायचे असेल तर ती प्रक्रिया सोपी होईल. बॅड बँकेचा अर्थ एवढाच आहे की, जेवढ्या बँकांकडे सध्या थकित कर्जांची समस्या आहे, ती सर्व थकित कर्जे या बँकेकडे हस्तांतरित केली जातील. एक प्रकारे ही खूप मोठी सुधारणा आहे. कोविडच्या साथीनंतर बँकांनी लोकांना सहजगत्या कर्ज द्यावे, अशी मोठी गरज निर्माण होणार आहे. बँका सहजपणे कर्जे देतील, तेव्हाच देशाच्या आर्थिक प्रगतीला वेग येईल.

सीए संतोष घारे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या