21.4 C
Latur
Friday, October 7, 2022
Homeविशेषमराठी साहित्यातील अजरामर कवयित्री बहिणाबाई चौधरी

मराठी साहित्यातील अजरामर कवयित्री बहिणाबाई चौधरी

एकमत ऑनलाईन

जीवनाचे सार अतिशय साध्या व बोली भाषेत मांडणा-या निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांचा जन्म ११ ऑगस्ट १८८० ला जळगाव जिल्ह्यातील असोदे या गावी झाला. वयाच्या तेराव्या वर्षी जळगावचे नथुजी चौधरी यांच्याशी बहिणाबाईंचा विवाह झाला. नथुजी आणि बहिणाबाईंना तीन अपत्ये ओंकार, काशी आणि सोपान. जळगावच्या प्लेगच्या साथीत ओंकारला कायमचे अपंगत्व आले. वयाच्या तिसाव्या वर्षी बहिणाबाईंना वैधव्य आले. दैनंदिन जीवन जगताना घरातील कर्तीबाई म्हणून त्या शेतातच काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करू लागल्या. बाईच्या जातीला शेती आणि घर एवढाच तो उंबरठा अशा परिस्थितीत बहिणाबाईंना सरस्वतीचे देणे अशा उपजत ज्ञानाचा आविष्कार त्यांच्या आयुष्यात साकारू लागला. रोजच्या जगण्यातील सुख, दु:ख, माणसा-माणसांविषयी वाटणारे माणुसकीचे दर्शन आणि सणांची उत्तम माहिती आपल्या काव्यातून उत्स्फूर्ततेने मांडणा-या बहिणाबाई मराठी साहित्यातील अजरामर कवयित्री आहेत. याचा आम्हा कवयित्रींना सार्थ हेवा आणि अभिमान आहे.

बहिणाबाईंना लिहिता येत नव्हते. त्यामुळे त्यांनी केलेल्या अनेक कविता कुणी लिहून न ठेवल्यामुळे काळाच्या ओघात नष्ट झाल्या. काही रचना पुत्र सोपान देव चौधरी यांनी आणि काही त्यांच्या मावसभावाने टिपून ठेवल्या. बहिणाबाईंचा वयाच्या ७१व्या वर्षी जळगावी ३ डिसेंबर १९५१ रोजी मृत्यू झाला. त्या निरक्षर होत्या. तथापि त्यांच्याकडे जिवंत काव्यरचनेची निसर्गदत्त प्रतिभा होती. शेतकाम आणि घरकाम करता-करता उत्स्फूर्तपणे ‘‘लेवा गण बोली’’ तील ओव्या व कविता रचून गात असत. सोपानदेव चौधरी आणि त्यांचे मावसबंधू पितांबर चौधरी यांनी वेळोवेळी कविता तेथल्या तेथे उतरून घेतल्या आणि जपल्या. बहिणाबाईंची गाणी व कविता हस्तलिखित स्वरूपात होती.

आपल्या आईच्या मृत्यूनंतर या कविता सोपानदेवांनी आचार्य अत्रे यांना दाखवल्या. अत्रे म्हणाले, ‘‘अहो हे तर बावनकशी सोनं आहे’’. आणि अत्र्यांनी त्या कविता प्रकाशित करण्यात पुढाकार घेतला. आचार्य अत्रे यांच्या विस्तृत प्रस्तावनेसह बहिणाबाईंची गाणी १९५२ मध्ये प्रकाशित झाली. धरत्रीच्या आरशामधी सरग (स्वर्ग) पाहणा-या श्रेष्ठ कवयित्रीचा महाराष्ट्रास परिचय झाला. बहिणाबाईंचे हे अमूल्य काव्य जगासमोर आणायला आचार्य अत्रे कारणीभूत ठरले. किंबहुना ‘‘जुन्यात चमकले आणि नव्याने झळकले’’ असे बावनकशी सोन्याप्रमाणे बहिणाबाईंचे काव्य आहे. अत्र्यांनी ‘हा तर मोहरांचा हंडा’ असा काव्याविषयी अभिप्राय दिला होता. कवयित्री बहिणाबाईंना घरातील आणि शेतीतील कामे करता-करता काव्य सुचले आणि ते काव्य कवितेच्या प्रांगणात अजरामर ठरले. मराठी साहित्यात लोकगीतांची परंपरा फार जुनी आहे. पण, त्यातही स्त्रीगीतांची आणि ओव्यांची परंपरा नुसतीच जुनी नाही तर एक वैशिष्ट्यरूपी काळानुसार अभ्यासपूर्वक प्रचलित होते आहे. बहिणाबाईंनी निसर्गाशी एकरूप होवून स्वच्छंदी काव्य पशु-पक्ष्यांवर, माणसाच्या माणसामधील माणुसकीवर इत्यादीवर काही प्रचलित आणि बोधप्रद काव्यरचनेची काव्यं आणि जीवनात संघर्षावर मात करून उभ्या आयुष्यात कसे जगायचे हे सांगितले.
काव्यातील स्त्रीजीवन –
‘अरे संसार संसार जसा तवा चुल्ह्यावर
आधि हाताला चटके तेव्हा मिळते भाकर
ऐका संसार संसार दोन जीवांचा विचार
देतो दु:खाने होकार अन् सुखाने नकार’’
बोधप्रद काव्य –
आयुष्य जगताना कधी सुखाची झालर तर कधी दु:खाची झालर झेलताना माणसाने खचून जाऊ नये. यासाठी त्यांनी पाखरांच्या माध्यमातून उभय माणूसजातीला ख-या अर्थाने बहिणाबाईंनी उदाहरण देऊन खरोखरच बोधप्रद केले आहे.
‘अरे खोप्यामधी खोपा, सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं, झोका झाडाले टांगला
खोपा इनला इनला, जसा गिळळयाचा कोसा
पाखरायी कामगिरी, जरा देख रे माणसा ….
तिची उलुशीच चोच, तेच दात, तेच ओठ
तुले दिले रे देवानं, दोन हात, दहा बोटं ….’
शेतीतील काव्य –
पेरणीच्यावेळी पाऊस यावा ही शेतक-यांची इच्छा असते. पाऊस येण्याचीही वेळ झालेली असते. अशा वेळी बहिणाबाई सहज म्हणून जातात-
‘‘ पेरनी पेरनी भीज भीज धर्ती माते
बिय बियान्याचे भरून ठेवले पोते’’
पेरणी चांगली झाली. भरभरून शेती झाली.
चांगली पिकं आली ते बघून बहिणाबाईंना काव्य सुचले.
‘‘ बीय टरारे भुईत, सर्वे, कोंब आले व-हे
गहवरल शेत जसं, अंगारती शहारे’’
शेतक-यांच्या जीवनाचे यथार्थ चित्रण आपल्याला बहिणाबाईंच्या कवितांतून पाहायला मिळते. त्यांच्या दु:खाचे, सुखाचे, कष्टाचे चित्र आपल्या डोळ्यासमोर काव्य वाचताना जिवंत होते.
काव्यातील अध्यात्म –
‘मन’ या कवितेत माणसाचं मन कसं आहे हे शब्दांत मांडण्याचा प्रयत्न त्या करतात.
‘मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोर
किती हाकला हाकला, फिरी येते पिकावर’
मन किती चपळ आणि ओढाळ असते याचे यापेक्षा अचूक वर्णन अजून तरी कोणाला जमलेले नाही. याच मनाचे वर्णन त्या कधी खसखशीएवढे बारीक तर कधी आभाळाएवढे विशाल असेही करून जातात.
मुक्तछंद काव्य –
बहिणाबाईंनी आजपर्यंत लिहिलेले काव्य हे उत्स्फूर्त स्फूट काव्य हे एखाद्या शिकलेल्या ज्ञानी माणसालाही लाजवेल असे होते, एक दिवस शेतात काम करणा-या शेतकरी बायकांनी बहिणाबाईंना विचारलं की, तुम्ही तर आमच्यासारखंच शेतात काम करता.. मग तुम्हाला एवढं कसं सुचतं? यावर बहिणाबाई म्हणतात-
‘‘माझी माय सरसोती, माले शिकवते बोली
लेक बहिणाबाईच्या मनी, किती गुपीत पेरानी
माझ्यासाठी पांडुरंगा , तुझ गीता भागवत
पावसात समावत, माटी मधी उगवतं’’
बहिणाबाईंच्या काव्याच्या निमित्ताने जळगाव-धुळे जिल्ह्यातील अहिराणी बोली प्रकाशात येते आणि अहिराणीच्या बोलीभाषेचे स्वरूप या काव्यातून समजते.. सामाजिक आणि उपदेशात्मक काव्य
‘‘मानूस मानूस, मतलबी रे मानसा
तुले फार हाव, तुझी हाककेल आशा
मानसा मानसा , तुझी नियत बेकार
तुझ्याहून बरं, गोठ्यातील जनावर’’
अरे माणसा-माणसा कधी होशील माणूस? असा जाबही त्या विचारतात. लोभापायी पशु होऊ नकोस. आपल्यापेक्षा मुकी जनावरं बरी. आपल्यात फरकसुध्दा करत नाहीत. बहिणाबाई माणसाला आर्तपणे सांगतात, हे माणसा तुला जन्म माणसाचा मिळालेला आहे पण तु ख-या अर्थाने माणूस कधी होणार?
अशा सामाजिक समस्या बहिणाबाईंनी काव्यातून मांडल्या आहेत.

-दीपाली गिरवलकर-जट्टे
मोबा.: ९५७९७ १५९२८

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या