23.8 C
Latur
Tuesday, September 27, 2022
Homeविशेषशरीरात हवे रसायनांचे संतुलन

शरीरात हवे रसायनांचे संतुलन

एकमत ऑनलाईन

आपली जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्यामुळे आपल्या शरीरावर अनेक प्रतिकूल परिणाम झाले आहेत. ताणतणाव सातत्याने वाढत असल्याने त्यामुळेही आरोग्याविषयक समस्या वाढत आहेत. आपले शरीर एखाद्या यंत्राप्रमाणे असून, त्यात सर्व अवयव सुट्या भागांप्रमाणे आपापले काम करीत असतात. या अवयवांचे कार्य एकमेकांना जोडलेले असल्यामुळे एखाद्या ठिकाणी झालेल्या बिघाडाचा परिणाम हळूहळू संपूर्ण शरीरावर होतो. आपल्या शारीरिक क्रिया सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी अनेक प्रकारची रसायने, द्रवपदार्थ आणि हार्मोन्सची गरज असते. चांगल्या आरोग्यासाठी शरीरात या पदार्थांचे संतुलन किती आवश्यक आहे, हे समजून घेणे गरजेचे आहे.

ट्रायग्लिसराइड: ट्रायग्लिसराइड्स एक प्रकारची लिपिड म्हणजेच चरबी आहे. या चरबीची निर्मिती यकृतात होते. ही चरबी अन्नामधून तयार होते. चांगल्या प्रकृतीसाठी ती गरजेची आहे; परंतु त्याचा उच्च स्तर धोकादायक ठरू शकतो. आपण जेव्हा भोजन करतो तेव्हा अतिरिक्त कॅलरीजचे रूपांतर ट्रायग्लिसराइड्समध्ये होते आणि चरबीच्या कोशिकांमध्ये ती साठून राहते. सातत्याने अतिरिक्त कॅलरीजचे सेवन केल्याने, विशेषत: उच्च कार्बोहायड्रेट्सयुक्त पदार्थ खाल्ल्याने ट्रायग्लिसराइडचा स्तर वाढतो. ट्रायग्लिसराइडचा स्तर अति झाल्यास रक्तवाहिन्या कडक होतात किंवा रक्तवाहिन्यांच्या भिंती जाड होतात. यामुळे हार्ट अ‍ॅटॅक, स्ट्रोक आणि कोरोनरी आर्टरी डिसीज, पेरिफेरल आर्टरी डिसीज अशा अन्य हृदयरोगांचा धोका वाढतो. तसेच यामुळे उच्च रक्तदाब, स्थूलता आणि रक्तातील साखर वाढण्याचाही धोका असतो. ट्रायग्लिसराइड्सच्या अतिरिक्त स्तरामुळे पॅनक्रियाजमध्ये सूज येऊ शकते. असे झाल्यास तीव्र वेदना होतात. ट्रायग्लिसराइड्सचा सामान्य स्तर १५० मिलिग्रॅम प्रति डेसिलिटरपेक्षा कमी असायला हवा. तज्ज्ञांच्या मते, खाण्यापिण्यात साखरेचे आणि कार्बोहायड्रेट्सचे प्रमाण कमी करून ट्रायग्लिसराइड्सचा स्तर वाढण्याचा धोका ५० टक्क्यांपर्यंत कमी करता येऊ शकतो.

तसेच रोज एक मूठभर सुका मेवा खाल्ल्यास ट्रायग्लिसराइड्सचा वाढलेला स्तर कमी होऊ शकतो. कारण त्यात फायबर, ओमेगा-३, फॅटी अ‍ॅसिड आणि अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात. वाढत्या वयात याचा स्तर वाढण्याचा धोका अधिक असतो. ४५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले पुरुष आणि ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या महिलांनी दरवर्षी ट्रायग्लिसराइड्सचा स्तर तपासणे आवश्यक आहे. इन्सुलिन: इन्सुलिन हा एक हार्मोन (संप्रेरक) आहे. तो पॅनक्रियाजमध्ये (स्वादुपिंड) तयार होतो. पचनक्रिया व्यवस्थित चालण्यात याचा महत्त्वाचा वाटा असतो. इन्सुलिनची प्रक्रिया सुरळीत असेल तरच आपण जे भोजन करतो, त्यातील ग्लूकोज शरीर ग्रहण करू शकते. इन्सुलिन निर्माण होण्याची प्रक्रिया योग्य नसेल तर ग्लूकोज रक्तात साठत जाते आणि लघवीवाटे बाहेर पडते. जर स्वादुपिंडात इन्सुलिनची निर्मिती योग्य प्रमाणात होत नसेल तर संबंधित व्यक्त टाइप-वनची मधुमेह रुग्ण ठरते. जर स्वादुपिंड कमी प्रमाणात इन्सुलिनची निर्मिती करीत असेल तर संबंधित व्यक्त टाइप-टूचा मधुमेही मानली जाते.

इन्सुलिनअधिक प्रमाणात तयार होत असल्यास फॅटी अ‍ॅसिड्स वाढून ट्रायग्लिसरॉइड वाढण्याचा धोका संभवतो. अशा स्थितीत रक्तातील साखर कमी होऊ लागते. ही स्थितीसुद्धा घातक असते. इन्सुलिनचे अयोग्य प्रमाण मधुमेहाव्यतिरिक्त हृदय, डोळे, किडनी, रक्ताभिसरण संस्था आणि शरीराच्या अन्य अवयवांवरही प्रतिकूल परिणाम करते. त्यामुळे अन्य आजार बरे होण्यासही विलंब लागतो. रिकाम्या पोटी रक्तात साखरेचे प्रमाण १४० मिलिग्रॅम प्रति डेसिलिटर असणे म्हणजे सामान्य असणे होय. जेवणानंतरच्या दोन तासांत हा स्तर २०० मिलिग्रॅम प्रति डेसिलिटरपेक्षा अधिक असेल, तर त्याचा अर्थ असा, क संबंधित व्यक्तीला मधुमेह आहे. १४० ते १९९ मिलिग्रॅम प्रति डेसिलिटर या टप्प्यात साखर असणेही मधुमेहाचे प्रारंभिक लक्षण आहे. दिल्ली डायबेटिस रिसर्च सेंटरच्या म्हणण्यानुसार, मधुमेह रुग्णांना साखरेचे प्रमाण नियंत्रित करण्याबरोबरच रक्तदाब १३०-८० या स्तरावर राखणे आवश्यक आहे. कमरेचा घेर वाढत असेल तर ते रोखले पाहिजे.

कोर्टिसोल: कोर्टिसोल हा एक स्टेरॉइड हार्मोन असून, तो अधिवृक्क ग्रंथीमधून स्रवतो. किडन्यांच्या वरील बाजूस या ग्रंथी असतात. या संप्रेरकाला स्ट्रेस हार्मोन असेही म्हणतात. तणावावर शरीराची प्रतिक्रिया सामान्य करण्यास हा हार्मोन मदत करतो. शरीराच्या चयापचय आणि रोगप्रतिकार यंत्रणेतही या संप्रेरकाची भूमिका असते. या संप्रेरकाचे अनेक क्रियांवर नियंत्रण असते. हा हार्मोन सातत्याने कमी होणे किंवा वाढणे यामुळे संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. एंडोक्राइन ग्लँडमधील काही निश्चित प्रक्रियांवर हा हार्मोन नियंत्रण ठेवतो. याच्या प्रतिक्रियेमुळे शरीरात कोर्टिसोल हार्मोन स्रवतो. प्रदीर्घकाळ तणाव असल्यास स्थूलता, हृदयरोग, नैराश्य, बेचैनी आणि अन्य आरोग्यविषयक समस्या उद्भवू शकतात. पोट आणि चेह-यावर चरबी जमा होणे, स्रायूंचा कमकुवतपणा, शुगर वाढणे, कमकुवत हाडे आणि हृदयाची गती वाढणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत. शरीरावर सूज वाढीस लागते आणि रोगप्रतिकार शक्त कमी होते. याचा रक्तदाबावरही परिणाम होतो. हार्वर्ड स्कूल ऑफ हेल्थच्या म्हणण्यानुसार, हृदयाशी संबंधित आजार जडण्याची शक्यता तणावांमुळे २० टक्क्यांनी वाढते. तणाव नियंत्रणात ठेवणे, आनंदी राहणे, लोकांच्या भेटीगाठी घेणे, व्यायाम करणे तसेच पुरेशी झोप घेणे, चांगले खाणे, आवडते काम करणे असे उपाय यावर सुचविले जातात. सातत्याने बराच काळ काम केल्यानेसुद्धा कोर्टिसोलवर वाईट परिणाम होतो. प्रत्येक दोन तासांनंतर पंधरा मिनिटांचा ब्रेक घेणे आवश्यक आहे. टोरांटो येथील सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ रिसर्चच्या मते, पाण्याची कमतरतासुद्धा कोर्टिसोलचा स्तर वाढवू शकते.

युरिक अ‍ॅसिड: युरिक अ‍ॅसिड हा रक्तात आढळणारा निरुपयोगी पदार्थ आहे. हा पदार्थ यकृतात तयार होतो आणि रक्तात मिसळून मूत्रपिंडांपर्यंत पोहोचतो. तेथून मूत्रावाटे तो शरीरातून बाहेर पडतो. प्युरिन्स म्हणविल्या जाणा-या रसायनांचा स्तर वाढतो तेव्हा असे घडते. जेव्हा शरीरात युरिक अ‍ॅसिड अधिक असते तेव्हा विविध ते विविध अवयवांमध्ये साठून राहू लागते. युरिक अ‍ॅसिड अधिक असल्यास युरिक अ‍ॅसिडचे खडे बनतात आणि ते सांध्यांमध्ये साचून गाठींचे स्वरूप धारण करू शकतात. खडे मूत्रपिंडात जमा होऊन मुतखडा तयार होऊ शकतो. यावर उपचार करण्यास विलंब झाल्यास हाडे, सांधे आणि ऊती कायमस्वरूपी खराब होऊ लागतात. मूत्रपिंडाचे आजार, हृदयरोग, टाइप-टू मधुमेह, उच्च रक्तदाब, फॅटी लिव्हर अशा आजारांना हे निमंत्रण ठरते. पुरुषांसाठी ४ ते ८.५ मिलिग्रॅम प्रति डेसिलिटर आणि महिलांसाठी २.७ ते ७.३ मिलिग्रॅम प्रति डेसिलिटर हा युरिक अ‍ॅसिडचा योग्य स्तर होय. युरिक अ‍ॅसिड वाढल्यास पाणी जास्त प्रमाणात प्यावे, जेणेकरून हे अ‍ॅसिड लघवीवाटे निघून जावे. खाण्यात प्रथिनयुक्त पदार्थ, उदा. लाल मांस, सी-फूड्स, घेवडा तसेच चरबीयुक्त डेअरी पदार्थ कमी असावेत. विशेषत: रात्रीच्या जेवणात डाळी कमी असाव्यात. ब्रिटिश जर्नल ऑफ स्पोटर््स मेडिसिनमध्ये प्रकाशित एका लेखात म्हटले आहे की, जिममध्ये जाणा-या युवकांनी प्रोटिन सप्लिमेन्ट्स घेऊ नयेत. तसेच मांसाहारी भोजन कमी करावे.

कोलेस्ट्रॉल: कोलेस्ट्रॉल ही सुद्धा एक प्रकारची चरबी असून, तो यकृतात तयार होतो. खाद्यपदार्थांमधूनही कोलेस्ट्रॉल शरीराला मिळतात. रक्तात आढळणारा हा चिकट पदार्थ पेशी आणि काही संप्रेरकांसाठी खूप आवश्यक असतो. त्याचा स्तर वाढल्यास मात्र रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे (ब्लॉकेज) तयार होऊ लागतात. कोलेस्ट्रॉल दोन प्रकारचे असतात. काही चांगले (उपयुक्त) कोलेस्ट्रॉल असतात. त्यांना एचडीएल म्हणतात तर काही वाईट (हानिकारक) असतात. त्यांना एलडीएल म्हणतात. कोलेस्ट्रॉल वाढल्यास रक्तप्रवाह सामान्य राहत नाही. रक्तदाब वाढतो, जो हृदयविकाराला कारणीभूत ठरतो. रक्तवाहिन्या संकुचित होतात. हृदय आणि मेंदूच्या पेशी मृत होऊ लागतात. कोलेस्ट्रॉलचा सामान्य स्तर एलडीएलसाठी १०० मिलिग्रॅम प्रति डेसिलिटरपेक्षा कमी तर एचडीएलसाठी ४० मिलिग्रॅम प्रति डेसिलिटरपेक्षा अधिक असावा लागतो. कोलेस्ट्रॉल वाढले असल्यास डॉक्टरांना दाखवून सल्ला घ्यावा. आपल्या खाण्यापिण्याच्या चांगल्या सवयीही कोलेस्ट्रॉलवर नियंत्रण ठेवतात. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जेवणात फायबर अधिक असावे. फळे, भाज्या, कडधान्ये आदी अधिक प्रमाणात सेवन करावे.

डॉ. भारत लुणावत

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या