27 C
Latur
Tuesday, July 5, 2022
Homeविशेषहत्तीबेट आणि रामघाटाची लढाई

हत्तीबेट आणि रामघाटाची लढाई

एकमत ऑनलाईन

आट्टर्गा येथे किसान दलाच्या तरुणांनी गाव बेचिराख करायला निघालेला मदतगार, अमीन व इतर तीन पोलिसांना ठार केले. निजामी राजवटीला आव्हान देणारी ही घटना होती. या घटनेमुळे सर्व गाव चिंतातुर झाले. सरकार आता यापेक्षा मोठी कारवाई करणार आणि यापुढे आपला निभाव लागणार नाही याची त्यांना जाणीव झाली. परत स्थलांतर सुरू झाले. टोळीतील तरुणांनी सुरक्षित ठिकाण म्हणून हत्तीबेटाची निवड केली. रात्रीच्या अंधारातच ते हत्तीबेटाच्या दिशेने चालू लागले. वलांडी मार्गे पहाटे पाचच्या सुमारास टोळी हत्तीबेटावर येऊन पोहोचली. हत्तीबेट म्हणजे विस्तीर्ण पसरलेला डोंगर. तिथे असलेल्या नैसर्गिक गुहा व लेण्यांच्या दालनात टोळी राहू लागली. बेटाशेजारी धर्मापुरी (१९६२ साली हे गाव पूर्णपणे स्थलांतरित झाले आहे.) शंभू उमरगा, करवंदी, चवनहिप्परगा, ममदापूर, देवर्जन अशी अनेक लहान गावे आहेत. तेथील लोकांनी टोळीच्या जेवणाची व्यवस्था केली. काही दिवस टोळी हत्तीबेटावर निवांतपणे राहिली. मात्र टोळीच्या मागावर असलेली निजामी फौजेची तुकडी हत्तीबेटावर चालून आली. दुपारी साधारणपणे तीनच्या सुमारास आक्रमण सुरू झाले. टोळीकडे संख्याबळ आणि शस्त्रसाठा मर्यादित होता. त्यामुळे टोळीप्रमुखांनी सर्वांना शत्रू टप्प्यात आल्याशिवाय प्रतिहल्ला करू नका असे सुचवले. टोळीतील तरुणांनी बेटावर असलेल्या केंगलाच्या आडोशाने मोर्चे धरले. प्रत्येकाला जागा नेमून देण्यात आल्या.

शत्रू वेगाने बेटावर येत होता. प्रशिक्षित फौजेपुढे टोळीचा निभाव लागणार नाही असे फौजेच्या अधिका-यांना वाटले असावे. पण फौज गोळीच्या टप्प्यात येताच टोळीवाल्यांनी एकाच वेळी जोरदार फायरिंग सुरू केली. बेसावध असलेले काही जवान जखमी झाले. फौज मागे हटली पण काही वेळाने त्यांनी परत आक्रमण केले. टोळीकडे शस्त्रसाठा कमी असला तरी हिमतीची आणि लढाऊ वृत्तीची कमी नव्हती. जवळपास सहा वाजेपर्यंत युद्ध चालले. नैसर्गिक आडोशाचा फायदा घेऊन टोळीने फौजेला माघार घेण्यास भाग पाडले. उद्या सकाळी फौजेचे परत आक्रमण झाल्यास आपण संकटात सापडू, त्यामुळे आता येथे थांबणे योग्य नाही असा विचार सर्व प्रमुख मंडळीने केला. क्षणभराची विश्रांती न घेता रात्रीच्या अंधारातच त्यांनी तोंडचीरकडे प्रयाण केले. मजल-दरमजल करत टोळी तोंडचीरला पोहोचली. तोंडचीर, कौळखेड या भागात आप्पाराव पाटील कौळखेडकर यांनी परिसरातील लोकांना संघटित करून टोळी बनवली होती. यात तुकाराम पाटील (तादलापूर), माणिकराव मुळे, चनवीर, हंसराज, बलवीर (डोणगाव) कन्हैयालाल मारवाडी (मदनूर) किशनगिर, दत्तूगीर पैलवान(तोंडचीर) अशा अनेक स्वातंत्र्यप्रेमी तरुणांचा समावेश होता. या टोळीत काही पैलवान व काही बंजारा (लमाण) समाजाचे तरुण पण सहभागी झाले होते. आट्टर्गा किसान दलाची टोळी तोंडचीरला आल्याची खबर उदगीरचे पोलिस व रझाकार यांना समजल्याशिवाय राहिली नाही.

उदगीरचे पोलिस व रझाकार अशा जवळपास अडीचशे लोकांनी तोंडचीरवर हल्ला केला. टोळी गावात नाही याची रझाकारांना कल्पना नव्हती. या हल्ल्यामध्ये किसनगिरी महाराज, हनुमंत आग्रे व देवराव या तिघांना रझाकारांनी ठार केले. गाव लुटले, अनेक घरांना आगी लावल्या. आता मात्र गाववाल्यांना टोळीला गावात राहू न दिल्याचा पश्चाताप झाला. टोळीला घडलेला घटनाक्रम कळवण्यात आला. निरोप मिळताच टोळीवाले परत तोंडचीरला आले. गावाची स्थिती पाहून टोळीवाले उदास झाले. पण शांत राहणे त्यांना पसंत नव्हते. आपल्यावर आक्रमण होणार हे टोळीवाल्यांना माहिती होतेच, त्यांनीही लढाईची परिपूर्ण तयारी केली. रझाकारांनी सर्वप्रथम कौळखेडवर हल्ला केला. पण गावात कुणीही नव्हते. याअगोदर पण रझाकारांनी हे गाव लुटले होते. आप्पाराव पाटलांचा वाडा जाळला होता. रझाकार तोंडचीरकडे निघाले. टोळीला याची खबर अगोदरच लागली होती. यावेळी दोन्ही टोळीतील तरुण एकत्र होते. परिसरातील लोकांची त्यांना साथ मिळाली.

रामघाटात रझाकारांनी टोळीवर हल्ला केला. रझाकारांची संख्या प्रचंड होती. प्रसंग खूप कठीण होता. पण टोळीतील तरुण सिंहासारखे शूर होते. अटीतटीची लढाई सुरू झाली. या लढाईत टोळीतील तरुणांनी शर्थीची झुंज दिली. टोळीतील काही तरुण घनदाट झाडीतून मार्ग काढत रझाकारांच्या पिछाडीवर गेले आणि त्यांनी तेथून जेजालचा (छोटी तोफ) भयानक मारा सुरू केला. हे हत्यार निर्णायक ठरले. इकडे टोळीवाल्यांनी भेदक मारा करून रझाकारांना सळो की पळो करून सोडले. रझाकार सदर यार महम्मद ठार होताच बाकीच्या रझाकारांनी पळ काढला. या लढाईत अनेक रझाकार मारले गेले. अगदी शेवटच्या टप्प्यात टोळीचा देवराव पाटील हा तरुण हुतात्मा झाला. निवृत्तीराव गायकवाड, यशवंतराव सायगावकर, माणिकराव मुळे, व्यंकटराव मुळे, आप्पाराव पाटील, भीमराव बिरादार (पुढील काळात मिरखलचा भीमा म्हणून कुप्रसिद्ध) या वीरांनी आपल्या साथीदारांच्या मदतीने रझाकारांचा निर्णायक पराभव केला. या वेळी मादनहिप्परगा (ता. आळंद, जि. गुलबर्गा) येथे निजामी फौजेसोबत झालेल्या लढाईत डॉ. चनाप्पा, माणिकराव मुळे व समर्थ या टोळीच्या वीरांना हौतात्म्य प्राप्त झाले. पण येथील गढीवर पहिल्यांदा तिरंगा ध्वज फडकावण्याचा मान आट्टर्गा टोळीच्या वीरांना मिळाला. अर्जुन जाधव यांनी किसान दलाच्या शौर्याची गाथा ‘मुक्तीची पहाट’ या ग्रंथात शब्दबद्ध केली आहे.

-भाऊसाहेब उमाटे
लातूर, मो. ७५८८८ ७५६९९

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या