लोकसभा आणि विधासभा निवडणुकीत उभे राहण्यासाठीची उमेदवारांची वयोमर्यादा २५ वर्षांवरुन २१ वर्षे करण्याचा विचार सुरू आहे. सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यात आला असून केंद्र सरकार त्यादृष्टीने विचारमंथन करत आहे. डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी ‘प्रज्वलीत मनाचे तरूण हेच उद्याचे नेतृत्व करतील,’ असे भाकित केले होते. आज ब्राझील, चीन, अमेरिका, रशिया, जपान या देशांच्या तुलनेत भारतामध्ये तरुणांची वाढती संख्या हे देशाच्या भावी क्षमतेचे महत्त्वाचे एक रहस्य आहे. या अनुषंगाने हा निर्णय स्वागतार्ह आहे.
एकविसावे शतक हे भारताचे असणार आहे. एकविसाव्या शतकात भारत जगावर राज्य करेल ते धर्माच्या माध्यमातून नव्हे तर प्रगत विज्ञान व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून असे भाकित स्वामी विवेकानंद यांनी शिकागो परिषदेत केले होते. ते आता खरे ठरत आहे. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांनी ‘प्रज्वलीत मने’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात त्यांनी भारत हा तरुणांचा देश आहे आणि प्रज्वलीत मनाचे तरूण हेच उद्याचे नेतृत्व करतील, असे भाकित केले होते. आज भारतीय लोकसंख्येपैकी ६५ टक्के लोकसंख्या ही तरुणांची आहे. ब्राझील, चीन, अमेरिका, रशिया, जपान या देशांच्या तुलनेत भारतामध्ये तरुणांची वाढती संख्या हे भारताच्या भावी क्षमतेचे महत्त्वाचे एक रहस्य आहे. या अनुषंगाने लोकसभा आणि विधासभा निवडणुकीत उभे राहण्यासाठीची उमेदवारांची वयोमर्यादा २५ वर्षांवरुन २१ वर्षे करण्याचा विचार सुरू आहे. सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडण्यात आला असून केंद्र सरकार त्यादृष्टीने विचारमंथन करत आहे. १९८६ मध्ये तेव्हाचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्या काळात १८ व्या वर्षी तरुणांना मतदानाचा अधिकार दिला. आता २१ वर्षे वय झालेल्या कोणत्याही तरूणास विधानसभा किंवा लोकसभा निवडणूक लढवण्याचा अधिकार द्यावा असा सूर निघत आहे. या भूमिकेस काँग्रेस पक्षासह शिवसेना, राष्ट्रीय जनता दल यांसारख्या अनेक प्रादेशिक पक्षांनीही पाठिंबा दिला आहे. हा निर्णय झाल्यास तरूणांना नव्या नेतृत्वाची संधी लाभणार आहे. येणा-या लोकसभा निवडणुकत लोकसभेचे चित्र अधिक तरूणांच्या दिशेने प्रभावी बनत आहे. मागील लोकसभेचे वर्गीकरण मोठे अद्भूत आहे. त्यामध्ये ५० वर्षांहून अधिक वयोगटातील ३५७ खासदार आहेत; तर १२९ खासदार ४१ ते ५० या वयोगटातील आहेत. ही आकडेवारी पाहता आपणास असे लक्षात येते क भविष्यकाळात तरूणांचा सहभाग वाढणे अत्यंत महत्त्वाचे आहे. तरूणांचा सहभाग वाढला तर भारत जगाला सक्षम नेतृत्व देवू शकेल. आता या प्रकारच्या तरतुदीच्या संदर्भात काही सकारात्मक पैलू आणि काही मर्यादांचेही भान असणे आवश्यक आहे.
युवकांचा वाढता सहभाग: या नव्या नियोजित कायद्यामुळे युवकांचा राजकारणातील सहभाग वाढेल. गांधीजी असे म्हणत असत की तरूणांनी राजकारणात भाग घेतला पाहिजे. राजकारणाचा अभ्यास केला पाहिजे. राजकारणात सक्रीय होऊन विधायक कामे केली पाहिजेत. राजकारणाचे गुन्हेगारीकरण थांबवण्यासाठी राजकारणाचे अध्यात्मिकीकरण व्हावे, असा गांधीजींचा आग्रह होता. महर्षि अरविंद यांचा ‘सांस्कृतिक राष्ट्रवाद’ सुद्धा हेच सांगतो की विज्ञान आणि संकृतीमध्ये समन्वय साधून संकृतीचे तेजस्वी स्वरूप भविष्यकाळात अधिक मजबूत करण्याचे कार्य जागृत तरूण वर्गच करू शकतो. या महामानवाची मुक्ती गाथा हेच सांगते क, तरूणांनी देशाच्या विज्ञान संस्कृती आणि धर्म यांमध्ये सुवर्णमध्य साधून भविष्यात नवे नेतृत्व केले पाहिजे. डॉ. कलामांचा तरूणांचा देश हा आग्रह सार्थ होता. युवकांचा राजकारणातील सहभाग वाढल्यामुळे नीरक्षीरविवेक वाढेल. राष्ट्र अधिक बलशाली होईल. निणर्यक्षमता अधिक चांगली घेता येईल आणि भावी पिढी आश्वासक बनून चांगल्या पद्धतीने कार्य करू शकेल.
नव्या नेतृत्वाचा उदय: विधानसभा आणि लोकसभा या कायदे मंडळांमध्ये तरूणांचा भरणा अधिक वाढला तर देशात नवे नेतृत्व उदयास येईल. भविष्यात बदलते प्रश्न, बदलते जग आणि बदलत्या समाज जीवनाचा विचार करता नव्या नेतृत्वाची गरज आहे. असे नवे नेतृत्व भारत मातेचे पांग फेडण्यासाठी आणि विज्ञान तंत्रज्ञानातील भारताची उंची गाठण्यासाठी प्रभावी ठरेल. या नव्या नेतृत्वाच्या उदयाच्या दृष्टीने हा निर्णय फलदायी ठरू शकेल. सुधारणा, कामगिरी आणि परिवर्तन (रिफॉर्म, परफॉर्म अँड ट्रान्सफॉर्म) हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सुत्र आहे. या तिन्ही बाबतीमध्ये तरूण वर्ग अधिक विजीगिषू आहे, अधिक निर्णयक्षम आहे. अधिक दूरदृष्टीने विचार करणारा आहे. तरूणांमध्ये आणखी एक चांगला गुण दिसतो. तो म्हणजे ते ‘अॅक्ट’ या फॉर्म्युल्याचे पालण करतात. तेव्हा तरूणांची ही शक्ती महत्त्वाची वाटते. आणखी एक सूत्र प्रिंन्स्टन विद्यापीठातील प्रा. आयव्ही लेटबेटर्ली यांनी मांडलेले आहे. त्यांच्या मते संशोधन करण्याची वृत्ती ही महत्त्वाची असते. संशोधनामुळे प्रश्न कळतात आणि मग कृती ठरवता येते. हा कृती कार्यक्रम संवादाच्या माध्यमातून लोकांपर्यंत घेवून जाता येतो. वारंवार आपल्या कामगिरीचे मुल्यमापन करून सुधारणा करता येते. ‘पळा पळा कोण पुढे पळे तो’ या सूत्राचे गमक या ‘रेस’ फॉर्म्युलामध्ये आहे. प्रा. लेटबटर्ली यांचे हे सूत्र भारतीय तरुण चांगल्या पद्धतीने कृतीत आणू शकतील आणि नवे नेतृत्व सर्वच क्षेत्रांमध्ये प्रभावीपणे उदयास येऊ शकेल. शेती, उद्योग, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा या सर्वच क्षेत्रात नव्या नेतृत्त्वाची गरज असून हे नेतृत्व नव्या दिशेने जाण्यासाठी कार्य करु शकेल.
नव्या नेतृत्त्वाकडून नव्या क्षमतांची मांडणी होणार
जनसंपर्क, कार्यपद्धती याबाबतीमध्ये युवकवर्ग अधिक आश्वासक कामगिरी करु शकतो. २०२२ ते २०४७ हा काळ स्वातंत्र्याचे अमृतपर्व म्हणून वर्णन केला जात आहे. पंतप्रधान मोदी यांनी वर्णन केलेल्या या अमृतकाळात भारताच्या भाग्योदयाची भावी स्वप्ने साकार करायची आहेत. गांधीजींच्या स्वप्नातला भारत असो किंवा पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या स्वप्नातला भारत असो किंवा पंडित राममनोहर लोहिया यांच्या विचारांचा भारत असो; या सा-यांचे सूत्र एकच आहे, ते म्हणजे भारताचे भवितव्य तरुणांच्या हाती आहे. तरुणवर्गाला नव्या निर्णयाने देशाचे भाग्य उजळण्याचे सामर्थ्य लाभणार आहे.
मर्यादा व क्षमता : या निर्णयाचा विचार करता काही लोकांना असे वाटते क याबाबत थोडी सावधपणाने वाटचाल केली पाहिजे. देशाच्या लोकसंख्येत मोठ्या प्रमाणावर तरुणांचा सहभाग आहे ही गोष्ट खरीच आहे; परंतु नवे आणि जुने यांच्यामध्ये समन्वयाची गरज असते. नवे नेतृत्व अधिक वेगाने पुढे जाते, तर जुने नेतृत्व मर्यादांचे भान ठेवते. तेव्हा येणा-या २० वर्षांत तप्त मुशीतून सोने जसे तावून सुलाखून निघते तसे तावून सुलाखून निघालेल्या युवानेत्यांचे स्वागत करत असताना आपण जुन्या आणि नव्यांच्या अनुभवांचे आदानप्रदान होणे गरजेचे आहे, हेही विसरता कामा नये. जुन्या राजकय नेत्यांची कार्यपद्धती, त्यांचा साधेपणा, त्यांचे संस्कारी राजकारण, त्यांचा सेवाभाव, त्यांची त्यागसमर्पण वृत्ती हे गुण तरुणांनी त्यांच्याकडून घेतले पाहिजेत.
समारोप : छत्रपती शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, महात्मा फुले, दयानंद सरस्वती, लोकमान्य टिळक, लोकहितवादी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. राममनोहर लोहिया या सर्वांच्या विचारांचे सार तरुणांच्या संघटनामध्ये आहे. डॉ. आंबेडकर म्हणत असत, शिक्षण घ्या, संघटित व्हा आणि स्वप्ने साकार करण्यासाठी संघर्ष करा. तरुणांना त्यांचे सांगणे असे की, ध्येयमंदिराकडे जाताना वाटेमध्ये प्रचंड वादळ उठेल, हातातील नंदादीप विझेल, तेव्हा हृदयातील नंदादीप तेवत ठेवून ध्येयमंदीर गाठण्याचा प्रयत्न करा. अशा स्वरुपाच्या दीपस्तंभाच्या प्रकाशपर्वात तरुणांनी वाटचाल केली तर तरुणवर्ग देशाचे चित्र बदलण्यासाठी पुढे सरसावेल यात शंका नाही.
-प्रा. डॉ. वि. ल. धारुरकर