25.6 C
Latur
Wednesday, July 6, 2022
Homeविशेषस्वराज्याचा दीपस्तंभ

स्वराज्याचा दीपस्तंभ

एकमत ऑनलाईन

राजमाता जिजाऊ कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. त्या जितक्या संवेदनशील मनाच्या होत्या तितक्याच त्या स्वाभिमानी आणि लढवय्या होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा भूमिपुत्रांच्या स्वराज्याची त्यांना ओढ होती. त्यांनी शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या तीन पिढ्यांमध्ये स्वराज्याची ज्योत पेटवली. जिजाऊ माँसाहेब या स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि संस्कारपीठ आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

राजमाता जिजाऊ माँसाहेब या लढाऊ, बाणेदार, स्वाभिमानी होत्या. त्या उत्तम न्यायाधीश होत्या. त्या करारी आणि कनवाळू होत्या. त्यांच्या जीवनात अनेक संकटे आली. निजामाच्या दरबारात वडील लखुजीराजे आणि बंधूंची हत्या झाली. खंडागळे यांचा हत्ती पिसाळला त्याप्रसंगी आप्तस्वकीयांत जीवघेणा संघर्ष झाला. दीर शरीफजीराजे, ज्येष्ठ पुत्र संभाजीराजे रणमैदानात धारातीर्थी पडले. पुत्र शिवाजीराजे यांना जिवे मारण्यासाठी अफजल खान आला, पन्हाळा वेढा आग्रा कैद, पुरंदरचा तह, राज्याभिषेकाचे राजकारण, असे अनेक प्रसंग जिजाऊ माँसाहेब यांनी अनुभवले, पण अशा कठीण प्रसंगी जिजाऊ माँसाहेब डगमगल्या नाहीत, हतबल झाल्या नाहीत, त्यांनी धीर सोडला नाही, संकटाने त्या गर्भगळीत झाल्या नाहीत, याउलट संकटसमयी जिजाऊ लढणा-या होत्या, रडणा-या नव्हत्या. संकटाला संधी समजून त्यावरती त्यांनी यशस्वी मात केली.
राजमाता जिजाऊ कणखर, निर्भीड, हिंमतवान होत्या. त्या जितक्या संवेदनशील मनाच्या होत्या तितक्याच त्या स्वाभिमानी आणि लढवय्या होत्या. परकीयांची चाकरी करण्यापेक्षा भूमिपुत्रांच्या स्वराज्याची त्यांना ओढ होती. त्यांनी शहाजीराजे, शिवाजीराजे आणि संभाजीराजे या तीन पिढ्यांमध्ये स्वराज्याची ज्योत पेटवली. जिजाऊ माँसाहेब या स्वराज्याचे प्रेरणापीठ, ज्ञानपीठ, विद्यापीठ आणि संस्कारपीठ होत्या.

पती निधनानंतर सती न जाता जिजाऊ आपल्या पुत्राच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या. स्वराज्यनिर्मितीसाठी त्यांनी स्वत:ला झोकून दिले. पारंपरिक अनिष्ट प्रथांना त्यांनी लाथाडले. सती प्रथासारख्या क्रूर, अमानुष प्रथेला लाथाडणा-या जिजाऊ क्रांतिकारक आहेत. त्या ग्रंथप्रामाण्यवादी नव्हत्या म्हणूनच, त्या अशी हिंमत करू शकल्या. आदिलशहाचा सरदार मुरार जगदेवाने पुण्यावर गाढवाचा नांगर फिरवून भूमिपुत्रांत भय निर्माण केले होते, त्याच पुण्यात बाल शिवबाला हाताशी धरून जिजाऊंनी सोन्याचा नांगर फिरवून भूमिपुत्रांत अभय निर्माण केले, यावरून स्पष्ट होते की जिजाऊ बुद्धिप्रामाण्यवादी अर्थात प्रयत्नवादी होत्या. यश मिळविण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागेल, रणांगण गाजवावे लागेल, चातुर्य पणाला लावावे लागेल, हे त्यांनी ओळखले होते. जपमाळ ओढून आणि नामजप करून स्वराज्य स्थापन करता येणार नाही, हे वास्तव ओळखणा-या जिजाऊ प्रागतिक विचारांच्या होत्या. त्या भाबड्या किंवा प्रवाहपतित नव्हत्या. त्या देवभोळ्या-धर्मभोळ्या तर अजिबात नव्हत्या. त्यांचा विश्वास कर्तृत्वावर होता.

जिजाऊ माँसाहेबांना अन्यायाची चीड आणि न्यायाची चाड होती. त्या गरीबांप्रति अत्यंत कारुण्यमूर्ती होत्या. त्यामुळे त्या निर्भीड आणि लढवय्या होत्या. बाल शिवबाला मांडीवर बसवून महिलांवर अत्याचार करणा-या रांजेगावच्या बाबाजी गुजरला त्यांनी कठोर शिक्षा ठोठावली. आपल्या राज्यातील सर्व स्त्रिया आणि लहान मुलं यांचे रक्षण झालेच पाहिजे, हा नियम जिजाऊंनी घालून दिला. आपले राज्य नीतिमूल्यांची जोपासना करणारे असले पाहिजे, हा त्यांचा कटाक्ष होता. त्या अत्यंत न्यायनिष्ठुर होत्या. त्यांनी शिरवळ परगण्यातील मुजेवी येथील लखो विठ्ठल आणि पुणे परगण्यातील बहेरखेड येथील गणोजी गुरव यांना जमिनीच्या खटल्यात योग्य न्याय दिला. आपल्या राज्यात कोणावरही अन्याय होणार नाही आणि अन्याय करणारा मोकळा सुटणार नाही याची काळजी जिजाऊंनी घेतली. जिजाऊंचा गुप्तहेर खात्यावर अंकुश होता. त्यांची स्वतंत्र गुप्तचर यंत्रणा होती. गुप्तचर यंत्रणेवर त्यांनी विशेष लक्ष दिले होते. शिवाजीराजे कोकण मोहिमेवर असताना खवासखान येत असल्याची बातमी जिजाऊंनी शिवरायांना पोच केली.

जिजाऊ स्वत: युद्धकलेत निपुण होत्या. त्या घोडेस्वारीमध्ये तरबेज होत्या. शिवाजीराजे पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले असताना जिजाऊ डोळ्यात तेल घालून गडांचे रक्षण करत होत्या. प्रदीर्घकाळ शिवाजीराजे पन्हाळा वेढ्यात अडकले असताना जिजाऊ अस्वस्थ झालेल्या होत्या. त्या स्वत: शिवबाची सुटका करण्यासाठी हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून निघतात, त्याप्रसंगी जिजाऊ काय म्हणतात त्याचे वर्णन परमानंद पुढीलप्रमाणे करतो. त्या माझ्या पुत्रास (शिवाजीस) स्वत: सोडवण्याचा मी प्रयत्न करीन आणि जोहराचे मुंडके आज युद्धातून घेऊन येईन (शिवभारत, अध्याय २६/१४). यावरून स्पष्ट होते की कठीण प्रसंगी जिजाऊ स्वत: हातात तलवार घेऊन घोड्यावर बसून युद्धास सज्ज असत. कठीण काळात त्या हतबल होऊन रडत बसल्या नाहीत, तर शस्त्र घेऊन रणांगण गाजवण्यास रणमैदानात उतरल्या.

शिवाजीराजे आग्रा कैदेत असताना जिजाऊंनी स्वराज्याचे नेतृत्व केले. त्यांनी स्वराज्याची इंचभर भूमी देखील शत्रूला जिंकू दिली नाही. जिजाऊंनी आपल्या राज्यात कधीही भेदभाव केला नाही. त्यामुळे शिवरायांना साथ देणारे सर्व जाती-धर्मातील मावळे नि:स्वार्थ आणि निर्भीडपणे पुढे आले. जिजाऊंनी मावळ्यांवर उदात्त विचारांचे संस्कार केले. त्यांच्यात नीतिमूल्यांची जोपासना केली. त्यांच्यात ध्येयवाद आणि आत्मविश्वास निर्माण केला. जिजाऊ या पराक्रमी, धैर्यशाली होत्या. त्या गरिबांची साऊली होत्या. त्या अत्यंत गंभीर आणि दूरदृष्टीच्या होत्या. याबाबतचे वर्णन शहाजीराजांच्या पदरी असणारा समकालीन जयराम पिंडे राधामाधवविलासचंपू या ग्रंथात पुढीलप्रमाणे करतो.
जशी चंपकेशी खुले फुुल जाई।
भली शोभली ज्यास जाया जिजाई ।
जिचे कीर्तीचा चंबु जंबुद्वीपाला।
करी साऊली माऊली मुलाला।
राजमाता जिजाऊ या हिंमतवान, कर्तृत्ववान आणि पराक्रमी होत्या त्या शिवाजीराजांच्या मार्गदर्शक दीपस्तंभ होत्या, असे वस्तुनिष्ठ इतिहासकार कृष्णाजी अर्जुन केळुस्कर, वा. सी. बेंद्रे, डॉ. जयसिंगराव पवार सांगतात, तर डॉ. बाळकृष्ण सांगतात, जिजाऊंनी ज्याप्रमाणे शिवरायांना घडवले, तसेच नातू शंभूराजांना देखील घडविले. स्त्री देखील हिंमतवान, बुद्धिमान, कर्तृत्ववान, पराक्रमी, दूरदृष्टीची असते, हे जिजाऊंनी दाखवून दिले. जिजाऊ हे स्वराज्याचे विद्यापीठ आणि ज्ञानपीठ आहे. आपल्या सर्वांचे प्रेरणापीठ आणि संस्कारपीठ म्हणजे जिजाऊ माँसाहेब आहेत. राजमाता जिजाऊ माँसाहेब यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

-डॉ. श्रीमंत कोकाटे,
इतिहास अभ्यासक

 

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या