28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeविशेषधवल यशापलीकडे...

धवल यशापलीकडे…

एकमत ऑनलाईन

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये भारतीय क्रीडापटूंनी मिळवलेले यश हे उल्लेखनीय आहे. यंदा भारताने एकूण ६१ पदके पटकावली असून त्यात २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत भारताचे चौथे स्थान राहिले. अर्थात २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील ६६ पदकांच्या तुलनेत यंदाची संख्या कमी आहे. त्यामुळे यशस्वी खेळाडंूवर कौतुकवर्षाव करताना अशी संधी वारंवार मिळत राहावी यासाठी क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत तिरंगा ध्वज जेव्हा फडकतो, तेव्हा प्रत्येक भारतीयाच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. प्रत्येक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारतीय खेळाडूंची कामगिरी दर्जेदार आणि अभिमानास्पद व्हावी असे वाटत असते. यादृष्टीने खेळाडू प्रयत्न देखील करतात. परंतु कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे खेळाडू पदकांपासून वंचित राहतात. अर्थात देशात क्रिकेटशिवाय इतर खेळांचा सकारात्मक विचार होत असल्यानेच पदकांची संख्या वाढत चालली आहे. अशा स्थितीतही क्रीडा क्षेत्रातील पायाभूत सुविधांवर आणखी बरेच काम करणे बाकी आहे.
भारतात सध्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा होत आहे. अशा वेळी ब्रिटनमध्ये बर्मिंगहॅम येथे ११ दिवस खेळल्या गेलेल्या २२ व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी चांगली कामगिरी करत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाचा आनंद द्विगुणित केला. भारतीय खेळाडूंनी प्रत्येक खेळात दमदार कामगिरी करत इंग्रजांच्या भूमीत तिरंगा ध्वज फडकाविला. पदक जिंकण्याचा मुहूर्त वेटलिफ्टर खेळाडूंनी लावला. सुवर्ण, रौप्य आणि कांस्य पदकाने झालेली सुरुवात ही शेवटच्या दिवशी हॉकीतील रौप्य पदकावर येऊन थांबली. वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्रातील सांगली शहराचा संकेत सरगरने देशाला पहिले पदक जिंकून दिले. त्याचवेळी मीराबाई चानूने पहिले सुवर्ण पटकावले. यानंतर देशातील सर्वच कुस्तीपटूंनी पदक जिंकून इतिहास घडविला. बॉक्सिंग आणि बॅडमिंटनने देखील कमाल केली. अ‍ॅथलेटिक्स आणि लॉन बॉलमध्ये देखील खेळाडूंची चांगली कामगिरी राहिली. पॅरा अ‍ॅथलिटनी देखील अनेक पदके जिंकून दिली.

यंदा भारताने एकूण ६१ पदके पटकाविली. त्यात २२ सुवर्ण, १६ रौप्य आणि २३ कांस्य पदकांचा समावेश आहे. पदक तालिकेत भारताचे चौथे स्थान राहिले. अर्थात २०१८ च्या राष्ट्रकुल स्पर्धेतील ६६ पदकांच्या तुलनेत पाच पदके कमीच आहेत. यंदा नेमबाजीचा सहभाग केला गेला नाही. अन्यथा पदकांची संख्या वाढली असती. मीराबाई चानू, महिला लॉन बॉल टीम, सुधीर, बजरंग पुनिया, साक्षी मलिक, दीपक पुनिया, रवी दहिया, विनेश फोगाट, नवीन कुमार, नीतू घनघस, अमित पंघाल, अ‍ॅल्डहॉस पॉल, निकहत जरीन, शरत श्रीजा, पी. व्ही. सिंधू, लक्ष्य सेन, सात्विक-चिराग यांच्यासारख्या स्टार खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. या खेळात प्रथमच सामील केलेल्या महिला क्रिकेट संघाने देखील रौप्य पदक जिंकून इतिहास रचला. महिला हॉकी संघाने देखील १६ वर्षांनंतर पदक जिंकले. दुसरीकडे स्टार बॉक्सर लवलीना बोरगोहेन, हिमा दास, द्युती चंद, सीमा अंतील, मनप्रीत आणि मिनका बत्रासारख्या खेळाडूंनी निराशा केली. दर चार वर्षांनी होणा-या या स्पर्धेत भारताने १९३०, १९५०, १९६२, १९८६ वगळता सर्व स्पर्धांत सहभाग घेतला आहे.

भारतीय अ‍ॅथलिट हे १९३४ मध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये सामील झाले. या स्पर्धेत केवळ पुरुषांच्या ७४ किलो वजन गटात फ्रीस्टाईल प्रकारात कुस्तीपटू रशिद अन्वरने पहिले कांस्यपदक जिंकले. त्यानंतर २४ वर्षांनंतर १९५८ मध्ये ‘फ्लाईंग सिख’ मिल्खा सिंग यांनी देशाला पहिले सुवर्ण जिंकून दिले. त्यानंतर थाळीफेक प्रकारात कृष्णा पुनियाने २०१० मध्ये अ‍ॅथलेटिक्समध्ये भारताला दुसरे सुवर्ण मिळवून दिले. अशी किमया करणारी कृष्णा पुनिया ही मिल्खा सिंगनंतर दुसरी आणि पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली. या प्रकारात ५२ वर्षांच्या खंडानंतर देशाला सुवर्ण मिळाले. भारताने आतापर्यंत राष्ट्रकुल स्पर्धेत एकूण ५६४ पदके जिंकली आहेत. यात २०३ सुवर्ण, १९० रौप्य आणि १७१ कांस्यपदकांचा समावेश आहे.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची क्रमवारी ही सर्वसाधारपणे चौथ्या स्थानावर राहिली आहे. भारताने ४११ पदके ही अलीकडच्या ६ स्पर्धांतून मिळविली आहेत. १५ पदके जिंकून जसपाल राणा हा राष्ट्रकुल स्पर्धेत सर्वांत यशस्वी अ‍ॅथलिट राहिला आहे. २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताची सर्वांत दर्जेदार कामगिरी राहिली. त्यात १०१ पदकांत ३९ सुवर्ण, २६ रौप्य आणि ३६ कांस्यपदके जिंकून दुसरे स्थान पटकावले. २०१४ मध्ये ६४ पदकांंसह भारताने पाचवे आणि २०१८ मध्ये ६६ पदकांसह तिसरे स्थान मिळविले होते.
प्रश्न असा की, लोकसंख्येच्या बाबतीत भारत जगातील अव्वल देश होत असताना क्रीडा क्षेत्रात ऑस्ट्रेलिया, ब्रिटन, कॅनडा, चीन, जपान, रशिया आणि अमेरिकेसारख्या खेळाडूंसारखी कामगिरी का करत नसेल? भारतीय खेळाडू याहून अधिक चांगली छाप पाडू शकतात, परंतु खेळात राजकारण, सरकारी लालफितीचा कारभार, क्रीडा संघटनांची मनमानी, योग्य प्रशिक्षणाचा अभाव, चांगल्या प्रशिक्षकाची निवड न करणे, प्रशिक्षक आणि संघ यांच्यातील बेबनाव, व्यावसायिक प्रशिक्षकाचा अभाव, खेळाडूंवर अनावश्यक दबाव, प्रत्येक ठिकाणी चांगले स्टेडियम नसणे यांसारखी असंख्य कारणे भारताला पदकांपासून दूर ठेवतात. खेळात आपले खेळाडू चमक दाखवत असले तरीही आणखी खूप काम करण्याची गरज आहे. खेळाचा दर्जा आणखी उंचावण्यासाठी राजकारण बाजूला ठेवणे गरजेचे आहे.

माजी खेळाडू आणि चांगली रणनीती आखणा-या लोकांनाच प्रशिक्षक म्हणून नेमणे गरजेचे आहे. फिजिओथेरेपिस्ट देखील चांगले असावेत. चांगले खेळाडू तयार करण्यासाठी पायाभूत सुविधा चांगल्या करणे आवश्यक आहे. सर्वसमावेशक क्रीडा धोरण आखणे आवश्यक आहे. देशातील प्रत्येक गावात आणि शाळेत क्रीडाविषयक धोरण राबविले पाहिजे. प्रशिक्षकाचा संघ आणि खेळाडू यांच्यात चांगला समन्वय असावा. लालफितीचा कारभार थांबवायला हवा. खेळासाठी केंद्रच नाही तर राज्यांनी देखील पुढाकार घेतला पाहिजे. ज्याप्रमाणे हरियाणात क्रीडा सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, त्याप्रमाणे अन्य राज्यांनी देखील त्याचे अनुकरण करायला हवे. हरियाणात शालेय स्तरापासून खेळाडू तयार करण्यावर भर दिला जात आहे. तेथे ब्लॉक पातळीवरच प्रतिभावान खेळाडूंचा शोध घेतला जात आहे. गावागावांत स्टेडियम उभारले जात आहेत. चांगल्या प्रशिक्षकाची नियुक्ती केली जात आहे. केंद्र सरकारचे नवे शैक्षणिक धोरण देखील क्रीडा प्रकारावर भर देणारे आहे. अनेक वर्षांपासून उपेक्षित असलेले मणिपूर राज्याचे उदाहरण घेता येईल. स्टार बॉक्सर मेरी कोमपासून सुरू झालेला पदक जिंकण्याचा सिलसिला अजूनही सुरूच आहे. मेरी कोमनंतर देशाला पदक जिंकून देणारे मीराबाई चानू, एल. सरिता देवी, सुशीला चानू, देवेंद्र सिंह यासारखे तब्बल १९ खेळाडू तयार झाले आहेत. मणिपूरमध्ये क्रीडा संस्कृती वाढली आहे. परिणामी मणिपूरचा कायापालट झाला आहे. अन्य राज्यांंच्या तुलनेत मणिपूरने आघाडी घेतली आहे.

देशात खेळांसाठी पायाभूत सुविधा विकसित केल्यास खेळाचा विकास होईल. राज्य सरकारांनी क्रीडा, प्रशिक्षक, खेळाडूंवर लक्ष देणे गरजेचे आहे. खेळाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षणाच्या पातळीवर एक टक्का सेस देखील लागू केला जाऊ शकतो. देशातील मोठे उद्योगपती हे खेळाडू आणि स्टेडियमना दत्तक घेऊन त्यांचे कल्याण करू शकतात. केंद्र सरकारने देखील क्रीडा बजेट वाढविणे गरजेचे आहे. यानुसार खेळाडूंना चांगला आहार, चांगले प्रशिक्षक आणि चांगले वातावरण लाभेल. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे आपल्या खेळाडूंचा दबदबा जगात वाढेल आणि आपले खेळाडू सर्वाधिक पदके खेचून आणतील. कॉमनवेल्थ गेम्स हे एका काळच्या गुलामीचे प्रतीक असले तरी ही स्पर्धा जगातील सर्वांत मोठी तिसरी स्पर्धा म्हणून ओळखली जात आहे. कॉमनवेल्थचे आयोजन ऑलिम्पिक स्पर्धेदरम्यान होते. त्यामुळे ऑलिम्पिकच्या दृष्टीने तयारी करण्यासाठी ही स्पर्धा उपयुक्त ठरते. पुढील राष्ट्रकुल स्पर्धा २०२६ मध्ये व्हिक्टोरिया येथे होत आहे. यात भारताची क्रमवारी अव्वल राहील, अशी अपेक्षा करू या.

-नितीन कुलकर्णी
क्रीडा अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या