28 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeविशेषदक्षिणेतील भगतसिंग नारायणराव पवार

दक्षिणेतील भगतसिंग नारायणराव पवार

एकमत ऑनलाईन

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हैदराबाद संस्थानातील परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत होती. रझाकार
संघटना सैनिकी थाटात संचलन करून ‘आझाद हैदराबाद झिंदाबाद’ च्या घोषणा देत होती. भारत सरकार या समस्येवर तात्काळ उपाययोजना करेल असे वाटत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये संस्थानी जनतेने आपल्या पद्धतीने या संकटाशी धैर्याने सामना केला. असाच एक धाडसी प्रयत्न संस्थानातील नारायणराव पवार, जगदीश आर्य, गंगाराम पालमकोल या तीन बहादूर तरुणांनी केला होता. निजाम वेगवेगळ्या खेळी खेळत होता. कासिम रझवी व रझाकारांनी संस्थानात धुमाकूळ घातला होता. अन्याय, अत्याचाराने परिसीमा गाठली होती. या सर्व परिस्थितीला सातवा निजाम मीर उस्मान अली हेच जबाबदार होते.

मुळावरच घाव घातला तर हैदराबादची डोकेदुखी कायमची संपून जाईल या विचाराने या क्रांतिकारी तरुणांनी हा प्रयत्न केला. या क्रांतिकार्याला आरंभ अवघ्या २१ वर्षांच्या क्रांतिवीर नारायणराव पवार यांनी केला. हे मूळचे बिदर जिल्ह्यातील सायगावचे (ता. भालकी). पुढे त्यांचे वडील सौळदापका व तेथून पोट भरण्यासाठी म्हणून वरंगल येथे गेले. नवीन रेल्वे रुळाचे काम चालू होते. प्रामाणिकपणा व मेहनतीच्या जोरावर ते मुकादम पदापर्यंत पोहोचले. तेथेच घर, जमीन घेऊन स्थायिक झाले. नारायणरावांना शिक्षणासाठी हैदराबाद येथे ठेवले. हैदराबादमधील एक प्रसंग नारायणरावांच्या जीवनात फार मोठा बदल करणारा ठरला. तो म्हणजे मोहम्मद अली जीना यांचे भाषण. ते भाषण ऐकून नारायणराव संतप्त झाले. आता आपण शांत बसून चालणार नाही. भले आपला प्राण गेला तरी चालेल. पण हैदराबाद स्वतंत्र झालाच पाहिजे ही त्यांची मनोभूमिका झाली. हळूहळू सोबती मिळू लागले. यामध्ये बाळकृष्ण, जगदीश आर्य, गंगाराम पालमकोल, पोचनाथ रेड्डी, विश्वनाथ या समविचारी तरुणांचा समावेश होता. पैसा आणि हत्यारांचा अभाव होता. पण हे बहादूर तरुण हार मानणारे नव्हते.

पंडित नरेंद्रजी यांना निजाम स्टेटमधील महत्त्वाच्या आर्य समाजाच्या शाखांमध्ये बॉम्ब असणे आवश्यक वाटत होते. कारण रझाकारांचा मुख्य रोष आर्य समाजावरच होता. त्यामुळे सदैव सज्ज असणे आवश्यक वाटत होते. ज्यावेळेस रझाकार हल्ला करतील त्यावेळेस त्यांना प्रतिकार करता यावा हा त्यामागचा मुख्य उद्देश होता. हैदराबाद आर्य समाजमंदिरामध्ये पोचमपल्ली रेड्डी यांनी क्रांतिकारी विचारांच्या सर्व तरुणांची एक मीटिंग बोलावली. या मीटिंगमध्ये भीष्मदेवजी पण सहभागी झाले होते. या ठिकाणी एक योजना सांगण्यात आली. सर्व सरकारी कार्यालये, पोस्ट ऑफिस, रेल्वे स्टेशन, बँक इ. वर बॉम्बहल्ले करावेत आणि निजाम राजवटीला जबरदस्त हादरे द्यावेत अशी ही योजना होती. नारायणराव पवार व त्यांच्या मित्रांनी ही योजना यशस्वी करण्याची जबाबदारी घेतली. पैशाची कमतरता होती. मात्र या कार्यासाठी विविध मार्गाने पैसा जमा करण्यात आला. या योजनेला पोचमपल्ली रेड्डी यांनी संमती दिली. नारायणराव पवार व त्यांचे साथीदार बॉम्ब आणण्यासाठी सोलापूरमार्गे मुंबईला जात होते. सोलापूरला त्यांची भेट कोंडालक्ष्मण यांच्याशी झाली. ते आर्य समाजाचे यांचे सहकारी होते.

त्यांनी सांगितले की, तुम्ही पोस्ट ऑफिस किंवा इतर सरकारी कार्यालयांवर बॉम्ब टाकण्यापेक्षा सातवे निजाम मीर उस्मान अली खान यांच्यावरच बॉम्ब टाका. ही योजना अत्यंत कठीण होती पण अशक्य नव्हती. नारायणराव पवार व त्यांच्या मित्रांना ही योजना आवडली. हातबॉम्ब व इतर साहित्य मिळाले. निजामालाच संपवण्याची योजना आखली गेली. या योजनेला कार्यान्वित करण्याची जबाबदारी नारायणराव पवार, जगदीश आर्य व गंगाराम पालमकोल या तिघांवर सोपवली गेली. यासाठी आवश्यक सर्व माहिती मिळवली गेली. सातवे निजाम मीर उस्मानअली खान बहादूर दररोज सायंकाळी आपल्या ‘किंग कोठी’ या निवासस्थानापासून कारने त्यांच्या आईच्या मजारला (समाधीला) दर्शनासाठी जात असत. नेमका याच संधीचा फायदा घेण्याचा निर्णय घेतला गेला. यांच्याकडे एकूण चार बॉम्ब होते. त्यातील दोन बॉम्ब घेऊन नारायणराव पवार किंग कोठीच्या समोरील बोग्गलकुंटा रोडवर थांबणार होते. ते बॉम्ब टाकण्याचा पहिला प्रयत्न करणार होते. त्यानंतर जगदीश आर्य एक बॉम्ब व एक रिव्हॉल्व्हर घेऊन पुढे काही अंतरावर थांबतील व शेवटी गंगाराम पालमकोल एक बॉम्ब व एक रिव्हॉल्व्हर घेऊन वळणावर थांबतील अशी ही योजना होती. तिघांकडे पण विषाच्या एक-एक बॉटल दिल्या होत्या.

योजनेप्रमाणे ४ डिसेंबर १९४७ रोजी सायंकाळी निजामाच्या गाडीची वाट बघत हे तिघेपण थांबले. सुरुवातीला नारायणराव हातबॉम्ब घेऊन उभे राहिले व पुढे काही अंतरावर जगदीश आर्य व गंगाराम पालमकोल उभे राहिले. किंग कोठीतून गाडी निघाली. नारायणराव अगोदरच सावध होते. गाडी जवळ येताच नारायणरावांनी बॉम्ब फेकला. पण दुर्दैवाने तो बॉम्ब खिडकीवर आदळून बाहेर पडला व घरंगळत जाऊन काही अंतरावर फुटला. बॉम्बस्फोटाच्या आवाजाने सर्वांचे लक्ष वेधले गेले. यामुळे कारमध्ये असलेल्या निजामाला काही झाले नाही. मात्र रस्त्याच्या कडेला उभे असलेले तीन लोक जखमी झाले. पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर नारायणराव दुसरा बॉम्ब टाकण्याच्या प्रयत्नात होते. पण तात्काळ पोलिसांनी झडप घालून नारायणरावांना पकडले. इकडे गाडीच्या ड्रायव्हरने गाडी पुढे न घेता, रिव्हर्स गिअर टाकून मागे घेतली व परत किंग कोठीत नेली.

त्यामुळे पुढे बॉम्ब घेऊन थांबलेल्या जगदीश आर्य व गंगाराम पालमकोल यांना काहीच करता आले नाही. नारायणराव पवार यांनी व त्यांच्या साथीदारांनी बॉम्ब टाकण्याचा पुरेसा सराव केला नव्हता. तसेच त्यांनी गाडी रिव्हर्स गिअरमध्ये टाकून मागे घेता येऊ शकते याचा विचार केला नव्हता. नारायणरावांना मारतच पोलिस स्टेशनला घेऊन गेले. तेथे त्यांना खूप मारहाण झाली. पण त्यांनी आपल्या साथीदारांची नावे सांगितली नाहीत. काही वेळाने निजामाचे पंतप्रधान मीर लायक अली आले. त्यांनी पण सविस्तर चौकशी केली. पुढे त्यांचे इतर साथीदार पकडले गेले. गंगाराम हा हैदराबादपासून ३० कि.मी. दूर असलेल्या पालमकोल या त्यांच्या मूळ गावी पकडला गेला. सर्वांवर खटला चालून नारायणरावांना फाशीची शिक्षा झाली व अन्य सहका-यांना जन्मठेप झाली. अजून फाशीची तारीख निश्चित झाली नव्हती. पुढील आठ दिवसांत सातवे निजाम आला हजरत उस्मान अली खान बहादूर यांची स्वाक्षरी होईल व फाशीची अंमलबजावणी होईल असे यांना सांगण्यात आले. पण सुदैवाने लवकरच पोलिस कारवाई झाली आणि मिल्ट्री गव्हर्नर जे. एन. चौधरी यांनी फाशीची शिक्षा जन्मठेपमध्ये बदलली. त्यांची तुरुंगातून सुटका झाली नाही. पुढे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या मध्यस्थीनंतर ते तुरुंगातून सुटले. अशा या जिवावर उदार होऊन स्वातंत्र्यासाठी लढणा-या दक्षिणेतील भगतसिंग नारायणराव पवार व त्यांच्या सर्व सहका-यांना त्रिवार वंदन.

-भाऊसाहेब उमाटे
लातूर, मो. ७५८८८ ७५६९९

 

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या