23.6 C
Latur
Tuesday, October 4, 2022
Homeविशेषराष्ट्रकुलमधील भरारी

राष्ट्रकुलमधील भरारी

एकमत ऑनलाईन

ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर राष्ट्रकुल स्पर्धा हा क्रीडाविश्वातील तिसरा महाकुंभमेळा म्हणून ओळखला जातो. भारताने आतापर्यंत ५०३ पदके जिंकली असून त्यापैकी ३५० पदके ही नव्या पिढीतील खेळाडूंनी पाच स्पर्धांमध्ये जिंकली आहेत. १९३४ ते १९९८ पर्यंत भारताच्या नावावर केवळ १५३ पदके होती. यावरून गेल्या दोन दशकांत भारतीय खेळ आणि खेळाडू हे पदक जिंकण्याबाबत उत्साही असल्याचे दिसून येईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये चमक दाखवणा-या खेळाडूंपैकी बहुतांश खेळाडू हे अत्यंत सामान्य कुटुंबातून, हलाखीच्या आर्थिक परिस्थितीतून आलेले आहेत. त्यामुळेच त्यांचे यश हे विशेष कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.

ऑलिम्पिक आणि आशियाई क्रीडा स्पर्धेनंतर राष्ट्रकुल स्पर्धा हा क्रीडाविश्वातील तिसरा महाकुंभमेळा म्हणून ओळखला जातो. २८ जुलैपासून सुरू झालेली राष्ट्रकुल स्पर्धा ८ ऑगस्ट रोजी समाप्त झाली. सुरुवातीच्या टप्प्यांत भारतीय खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत वेटलिफ्टिंग आणि ज्युडोमध्ये पदके पटकावली. तीन सुवर्ण, तीन रौप्य, तीन कास्यपदकांसह नऊ पदके भारतीय खेळाडूंनी जिंकली. पहिल्या चार दिवसांत पदकांची आकडेवारी पाहिल्यास वेटलिफ्टिंगमध्ये तीन सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदकांसह सात पदके जिंकली तर ज्युडोमध्ये एक रौप्य आणि एक कांस्य पटकावले.

१९३४ मध्ये भारताने पहिल्यांदा राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पाऊल टाकले होते. यंदा भारताचे १०६ पुरुष आणि १०४ खेळाडू मैदानात उतरले होते. सरकारने या २०१ खेळाडूंवर ७७ कोटी रुपये खर्च केला असून त्यात परदेशी आणि देशातील प्रशिक्षण आणि उपकरणांचा समावेश आहे. भारतीय खेळाडूंनी १६ प्रकारांत सहभाग घेतला आहे. इंग्रजांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊन ७५ वर्षे झालेली असताना आणि स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना ब्रिटनच्या मैदानावर भारताने अधिकाधिक पदके जिंकावीत अशी अपेक्षा बाळगली जात होती. केंद्र सरकार आणि चाहत्यांचे खेळाडूंच्या कामगिरीवर विशेष लक्ष आहे. २०१० मध्ये दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताने सर्वाधिक कमाई करत ३८ सुवर्ण, २७ रौप्य आणि ३६ कांस्यपदके पटकावली होती.

परंतु बर्मिंगहॅममध्ये इतिहास घडवून मायदेशी येणे वाटते तेवढे सोपे नव्हते. कारण राष्ट्रकुलमध्ये भारताने नेमबाजी प्रकारात सर्वाधिक पदके पटकावली आहेत. असे असताना भारताने यंदा या प्रकारात भाग नोंदवलेला नाही, हे विशेष. त्यामुळे पदकांची संख्या कमी राहिली. भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत आतापर्यंत १८१ सुवर्ण, १७३ रौप्य आणि १४९ कांस्य अशी एकूण ५०३ पदके मिळाली आहेत. त्यातही नेमबाजी प्रकारात सर्वाधिक ६३ सुवर्ण, ४४ रौप्य आणि २६ कांस्य अशी एकूण १३५ पदके मिळाली आहेत. पदकतालिकेत भारताची क्रमवारी वाढविणा-या नेमबाजीत यंदा समावेश नसणे हे भारताला अग्रस्थान मिळवून देण्यास अडचणीचे ठरले.

सर्वाधिक पदकांची अपेक्षा असलेल्या कुस्ती, वेटलिफ्टिंग, बॉक्सिंग, अ‍ॅथलेटिक्स, बॅडमिंटन, टेबल टेनिसबरोबरच एक-दोन पदकांवरच समाधान मिळवून देणारे हॉकी आणि क्रिकेटच्या बळावर १०१ पदकांचे लक्ष्य भेदणे भारतीय खेळाडूंना सोपे नव्हते. यंदाच्या स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून देण्याचा मान हा महाराष्ट्राच्या २१ वर्षीय संकेत महादेव सरगरने मिळवला. त्याने ५५ किलो वजनाच्या वेटलिफ्टिंगमध्ये स्नॅचमध्ये ११४ आणि क्लीन व जर्कमध्ये १३५ असे एकूण २४८ किलो वजन उचलून पहिले सुवर्ण मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. परंतु क्लीन आणि जर्कच्या दुस-या प्रयत्नात त्याच्या स्नायूवर ताण पडल्याने सुवर्ण जिंकणा-यापेक्षा एक किलो वजन कमी उचलल्याने रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. संकेतनंतर सर्वांचे लक्ष गुरुराजा पुजारीवर होते. ६१ किलो वजनाच्या श्रेणीत पुजारीने स्नॅचमध्ये ११८ आणि क्लीन व जर्कमध्ये १५१ असे एकूण २६९ किलो वजन उचलले आणि यावेळी त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. स्पर्धेचा दुसरा दिवस संपण्यापूर्वी भारताच्या खात्यात सुवर्ण येणे पक्के होते. हे पदक होते

टोकिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्य जिंकणारी, २०१४ च्या राष्ट्रकुलमध्ये रौप्य आणि २०१८ मध्ये सुवर्ण पदक जिंकणारी वेटलिफ्टिंगपटू मीराबाई चानू. चानूने चाहत्यांना निराश केले नाही आणि ४९ वजनाच्या गटात स्नॅचमध्ये ८८ किलो वजन उचलून राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली आणि क्लीन व जर्कमध्ये ११३ किलो आणि एकूण २०१ किलो वजन उचलून राष्ट्रकुल चॅम्पियनशीपमध्ये नवीन विक्रम नोंदविला आणि भारताच्या नावावर पहिल्या सुवर्णाची नोंद झाली. दुस-या दिवसाचा शेवट होण्यापूर्वी भारताच्या नावावर आणखी एक रौप्य पदक जमा झाले. मणिपूरची कन्या बिंदियाराणी देवीने ५५ किलो वजन गटात रौप्यपदक जिंकले. तिने स्नॅचमध्ये ८६ किलो आणि क्लीन व जर्कमध्ये ११६ असे एकूण २०२ किलो वजन उचलले. थोडक्या कारणावरून तिचे सुवर्ण हुकले.

वेटलिफ्टिंगमध्ये पदकाचा सिलसिला तिस-या दिवशी देखील सुरूच राहिला. जेरेमी लालरीनुंगाने ६७ किलो वजन गटात स्नॅचमध्ये १४० वजन उचलत दहा गुणांची आघाडी घेत सुवर्णपदकावर हक्क सांगितला. क्लीन आणि जर्कमध्ये पहिल्याच संधीत १५६ अणि दुस-या संधीत १६० असे एकूण ३०० किलो वजन उचलत जेरेमीने सुवर्णपदक नक्की केले. अर्थात दुस-या आणि तिस-या संधीत तिला मार लागला, परंतु तिने हार मानली नाही आणि देशाच्या नावावर दुसरे आणि वेटलिफ्टिंगमध्ये पाचवे पदक निश्चित केले. जेरेमीनंतर तिस-या दिवशी भारताच्या पदरात आणखी एक सुवर्णपदक पडले. पश्चिम बंगालच्या देऊलपूर येथील अंचित श्युलने स्नॅचमध्ये १४३ आणि क्लीन व जर्कमध्ये १७० असे एकूण ३१३ किलो वजन उचलून तिने आशा पल्लवित केल्या. परंतु ती अंतिम फेरीत दक्षिण आफ्रिकेच्या खेळाडूला मागे टाकू शकली नाही. या खेळात २०१४ नंतर दुसरे रौप्य पदक तिने आपल्या नावावर केले. त्याचवेळी ६० किलो वजनात ज्युडोपटू विजयकुमारने कांस्यपदक जिंकले. चौथ्या दिवशी तिसरे पदक वेटलिफ्टिंगमध्ये हरजिंदर कौरने देशाला मिळवून दिले. त्याने ७१ किलो वजनाच्या गटात स्नॅचमध्ये ९३ आणि क्लीन व जर्कमध्ये ११९ असे एकूण २१२ किलो वजन उचलून कांस्यपदक जिंकले. यानुसार भारताची पदक संख्या नऊवर पोचली. टेबल टेनिसमध्ये गतविजेता असणा-या भारतीय महिला संघाला मलेशियाकडून आश्चर्यकारक पराभव पत्करावा लागला.

विशेष म्हणजे मलेशियाच्या संघात कोणताही विश्व मानांकित खेळाडू नव्हता. पुरुष संघाने उपान्त्य फेरीत नायजेरियाला ३-० असे पराभूत करत अंतिम सामन्यात धडक मारली. बॉक्सिंगमध्ये पाच वेळेस आशियायी चॅम्पियन राहिलेला २८ वर्षीय शिव थापाने ६३.५ किलो वजनी गटात पाकिस्तानच्या सुलेमान बलोचला ५-० असे पराभूत केले. परंतु दुस-या फेरीत तो बाहेर पडला. निखत जरीनने सुवर्णपदक पटकावले. १९९८ नंतर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचे कमबॅक झाले आहे. भारतीय महिला संघाला पहिल्या सामन्यात सुवर्णपदकाचा दावेदार मानल्या जाणा-या ऑस्ट्रेलियाकडून तीन गडी राखून पराभव पत्करावा लागला. परंतु दुस-या सामन्यात पाकिस्तानला ८ गडी राखून पराभूत करत विजयाचा झेंडा फडकाविला. १९३४ ते १९९८ पर्यंत भारताच्या नावावर केवळ १५३ पदके होती. यावरून गेल्या दोन दशकांत भारतीय खेळ आणि खेळाडू हे पदक जिंकण्याबाबत उत्साही असल्याचे दिसून येईल. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये चमक दाखवणा-या खेळाडूंपैकी बहुतांश खेळाडू हे अत्यंत सामान्य कुटुंबातून, हालाखीच्या आर्थिक परिस्थितीतून आलेले आहेत. त्यामुळेच त्यांचे यश हे विशेष कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे.

-नितीन कुलकर्णी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या