23.4 C
Latur
Sunday, August 9, 2020
Home विशेष जन्मशताब्दी विशेष : धगधगती मशाल!

जन्मशताब्दी विशेष : धगधगती मशाल!

माणसाला जगण्यासाठी लढणा-यांच्या कथा ऐकवल्या म्हणजे माणसात जगण्याचे बळ येत असते असे म्हणतात. ही बाब साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांचे कम्युनिस्ट चळवळीतील कार्य, साहित्य पाहिले आणि वाचले म्हणजे सहज मनाला पटून जाते. अण्णा भाऊ साठे यांच्या कार्याचा व साहित्याचा केंद्रबिंदू माणूस राहिलेला आहे. त्यांचे एकूणच कार्य हे मानव्यासाठी होते असेही म्हणता येईल. त्यांचा माणूस श्रमिक होता, कष्टकरी, शेतकरी, नागवलेला व नाडल्या गेलेला शोषित-पीडित होता. त्यांच्या साहित्यातला माणूस चळवळीचा, जातविरहित, धर्मविरहित माणूस होता. वेदनेला, भुकेला आणि आसवांना कोणतीही जात-धर्म नसतो अशी अण्णा भाऊ साठे यांची धारणा होती.

चरितार्थासाठी कोळसा वेचणे, फेरीवाल्याच्या पाठीमागे डोक्यावर गाठोडे घेऊन फिरणे, कुत्रे सांभाळणे, रंगकाम, बुटपॉलिश इ. कामे करत करत एक दिवस त्यांना दादरच्या मोरबाग गिरणीत झाडूवाला म्हणून काम मिळाले. मुंबईत त्यांनी श्रमिकांचे कष्टमय, दु:खी जीवन पाहिले. संप, मोर्चे पाहून श्रमिकांचा लढाऊपणाही अनुभवला.

अण्णा भाऊ साठे १९३६ मध्ये कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाखाली येऊन भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे क्रियाशील कार्यकर्ते झाले. दरम्यान काही दिवसांनंतर वडिलांचे निधन झाल्याकारणाने कुटुंबाची जबाबदारी अंगावर आली म्हणून ते पुन्हा आपल्या मूळ गावी परत आले. या काळात ते त्यांचे चुलत भाऊ बापू साठे यांच्या तमाशा फडात काम करू लागले. या काळात ते क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या संपर्कात आले. १९४२ च्या चले जाव आंदोलनात सहभाग घेतल्यामुळे इंग्रज शासनाने त्यांच्यावर पकड वॉरंट काढले. पोलिसांच्या नजरा चुकवीत ते पुन्हा मुंबईत परत आले आणि नंतरच्या काळात मुंबईत लोकशाहीर, साहित्यसम्राट म्हणून त्यांचा लौकिक झाला.

Read More  लातुरात पुनश्च लॉकडाऊन

१९४३-४४ दरम्यान त्यांचा ख्यातनाम शाहीर अमर शेख यांच्याशी परिचय होऊन नाव जोडल्या जाऊ लागले. १९४३ मध्ये त्यांचा स्टॅलीनग्राडचा पोवाडा पार्टी या मासिकात प्रसिध्द झाला. स्वातंत्र्य चळवळीत कम्युनिस्टांच्या नेतृत्वाखाली कामगार, शेतक-यांची महत्त्वपूर्ण भागीदारी होती. या चळवळीच्या विस्तारासाठी कम्युनिस्ट पार्टीने सांस्कृतिक आघाडी भक्कम करण्याचे ठरविले आणि टिटवाळा येथे १९४४ साली झालेल्या शेतकरी परिषदेत लालबावटा कलापथकाची स्थापना करण्यात आली. अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख, दत्ता गव्हाणकर यांच्या रूपाने एक सक्षम सांस्कृतिक आघाडी कम्युनिस्ट पार्टीला मिळाली. या निमित्ताने अण्णा भाऊ साठे यांचा इप्टाशी (इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन) संपर्क आला आणि त्याद्वारे अण्णा भाऊंचा संयुक्­त महाराष्ट्राच्या चळवळीत सहभाग वाढला. याठिकाणी त्यांच्या प्रतिभेचे विविध पैलू जनतेसमोर आले.

अण्णा भाऊंचे एक विकसित, प्रगल्भ, तेजाने तळपणारे स्वतंत्र व्यक्तिमत्त्व साकार झाले. (अर्जुन डांगळे, १९९८) सांस्कृतिक आघाडीवर काम करणा-या अण्णा भाऊ साठे, अमर शेख, दत्ता गव्हाणकर, कारखानीस, उषा उध्वेरेषे, शंकर भाऊ साठे इ. ना दरमहा ६० रुपये मानधन मिळत असे. संयुक्­त महाराष्ट्राच्या चळवळीत अण्णा भाऊंनी सांस्कृतिक आघाडीद्वारे लालबावटा कलापथकातून स्वत:ला झोकून दिले. त्यांच्या शाहिरी, लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्य आदींचा यात समावेश होता. काही दिवस ते भायखळा येथील चाँदबीबी चाळीत राहिले, ती कामगार वस्ती होती. तेथील दैन्य, दारिद्र्य आणि कळाहीन जीवन पाहून अण्णा भाऊ साठे अस्वस्थ झाले. त्यांच्यातील लेखक, कवी, शाहीर बेचैन होत असे. याच काळात त्यांनी आघाडीच्या साहित्यिकांचे साहित्य वाचले. कम्युनिस्ट पक्षाचे त्यांनी काम करताना कामगारांचे दैन्य, त्यांचे व्यसन, इ. झोपडपट्टीत राहणारांचे दारिद्र्य, हलाखीचे जगणे, स्वत: अनुभवले. या काळात त्यांनी कम्युनिस्ट विचारांचे साहित्य ब-याच प्रमाणात वाचले.

ते स्वत: गिरणीत कामगार म्हणून काम करीत असल्याने या देशातील कामगारांना मार्क्सवाद न्याय देऊ शकतो असे त्यांना वाटे. जगातील सर्व श्रमिकांनो एक व्हा ! हा मार्क्सचा आवाज त्यांनी श्रमिक मजुरांपर्यंत आपल्या कवनांतून पोहोचविण्याचा प्रयत्न केला. कष्टकरी, मजूर, कामगार राबराब राबतात, त्यांना त्यांच्या श्रमाचे मोल मिळत नाही. भांडवलदार त्यांच्या श्रमावर जगतात, त्यांचे शोषण करतात. लोकांच्या दारिद्र्याला भांडवलदार जबाबदार आहेत हे त्यांनी अभ्यासले व त्यांच्या लावणी, शाहिरी, पोवाड्यांतून वर्ग संघर्षाला लोकांची मने तयार करण्यासाठी प्रयत्न केले. वर्गलढा एकत्रित करण्यासाठी त्या काळात सांस्कृतिक आघाडीद्वारे हे तीन तरुण म्हणजे अण्णा भाऊ साठे, आजरा (कोल्हापूर)चे दत्ता गव्हाणकर व बार्शीचे महेबूब हुसेन पटेल ऊर्फ शाहीर अमर शेख हे होत.

Read More  महानिर्वाण शताब्दी विशेष : गीता, गीतारहस्य आणि लोकमान्य

संयुक्­त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास लिहिताना या त्रिकुटाच्या नावांना वळसा घालून संयुक्­त महाराष्ट्र चळवळीचा इतिहासच पूर्ण होऊ शकणार नाही किंवा कोणी तसा प्रयत्न केला तर, तो संयुक्­त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास अपूर्ण असेल. १९४४ साली लालबावटा कलापथक या बॅनरखाली कम्युनिस्ट पक्षांतर्गत महाराष्ट्रभर शाहीर अमर शेख, अण्णा भाऊ आदी कलावंतांचा आवाज घुमला. हा अण्णा भाऊ साठेंच्या बहराचा काळ होता. अण्णा भाऊ साठे यांनी गीते, पोवाडे, शाहिरी लेखन करायचे, शाहीर अमर शेख यांनी पहाडी आवाजात गायचे तसेच शाहीर दत्ता गव्हाणकर हे ही त्याकाळचे म्हणजे १९३५ साली इंग्रजी विषयात बी.ए. शिक्षण घेतलेले अस्खलीत इंग्रजीत संवाद करत. या तिघांनी संयुक्­त महाराष्ट्राच्या चळवळीला लालबावटा कलापथकाद्वारे प्रचंड ताकद दिली.

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्यलेखन त्या काळात कम्युनिस्ट पक्षाच्या ह्ययुगांतरह्ण या मुखपत्रात छापून येत होते. कम्युनिस्ट विचारधारेत धर्माला स्थान नाही त्यामुळे अण्णा भाऊंनी लेखनधर्म शिरोधार्ह मानला आणि आपली वाटचाल केली. अण्णा भाऊ साठे यांनी कायम माणसांचा शोध घेत त्याचे अस्तित्व व स्वाभिमानाचे मोल साहित्यातून कथन केले. काही लोक जाणीवपूर्वक राजकीय हेतू नजरेत ठेवून अण्णा भाऊ साठे कसे गांधीवादी, आंबेडकरवादी होते असे ठसविण्याचा प्रयत्न करताना दिसतात. वास्तविकता अण्णा भाऊ साठे यांनी त्यांच्या विविध साहित्यकृती तथा कम्युनिस्ट पक्षाच्या ह्ययुगांतरह्ण या मुखपत्रातून लिहिलेल्या विविध लेखांत म्हटले आहे की, मी कॉ. श्रीपाद अमृत डांगे यांच्या प्रभावाने कम्युनिस्ट विचारधारेत काम करतो आहे.

कम्युनिस्टांमध्ये धर्माला स्थान नाही, मला जे सत्य वाटते तेच मी लिहीतो, लिहीताना माझ्या ध्येयाच्या विचारधारेस अनुरूप असे ते लिहीतो, जे माझ्या संवादी आहेत तेच मी लिहीतो, मला कल्पनेच्या भरा-या लावून लिहिता येत नाही. मार्क्स, लेनिन, मॅक्झीम गॉर्की हे अण्णा भाऊ साठेंचे आदर्श होते. अण्णा भाऊंचे जीवन कष्टप्रद ब संघर्षशील होते. त्यामुळेसुध्दा त्यांना उणेपुरे ४९ वर्षांचेच आयुष्य लाभले असे म्हणता येईल. त्यांचे जीवन म्हणजे धगधगती मशाल होते. ती मशाल घेऊन त्यांनी लेखणीद्वारे अत्याचाराला, जातीच्या-धर्माच्या बुंध्याला चूड लावण्याचा प्रयत्न केला. ०१ ऑगस्ट १९२० रोजी सुरू झालेला अण्णा भाऊ साठे यांच्या आयुष्याचा प्रवास १९ जुलै १९६९ रोजी थांबला. जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना माझे शत शत नमन. विनम्र अभिवादन!

सुरेश साबळे
बुलडाणा, मोबा.: ९८५०३ ८०५९८

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,140FansLike
93FollowersFollow