काट्याने काटा काढल्याप्रमाणे डासांनी डासांचा नायनाट करायचा, ही युक्ती डेंग्यू आणि जीका विषाणूंचा प्रसार करणा-या डासांना रोखण्यासाठी वापरली जाणार आहे. अमेरिकेतील फ्लोरिडा प्रांतात जनुकीय बदल केलेले ७५ कोटी डास सोडण्याच्या पथदर्शी प्रकल्पास मान्यता मिळाली असून, या निमित्ताने जनुकीय बदल केलेले डास असतात कसे, हे समजून घेणे अगत्याचे ठरेल. प्रयोगशाळेत खास प्रकारचे नर डास तयार केले जातात आणि त्यात एक विशिष्ट प्रकारचे प्रथिन असते. नर डास कधीच आजारांचे कारण ठरत नाहीत, कारण नर कधीच माणसांना चावत नाहीत.
अन्नासाठी नर डास फुलांच्या रसावर अवलंबून असतो. माणसांना दंश करून जीवघेणे आजार पसरविण्याचे काम डासाची मादी करते. जेथे आधीपासूनच डासांची संख्या अधिक आहे, तिथे जनुकीय बदल केलेले डास सोडले जातील. जनुकीय बदल केलेले डास अधिकाधिक मादी डासांबरोबर प्रजनन करतील. या नरांमध्ये असलेले खास प्रकारचे प्रथिन प्रजननाच्या प्रक्रियेत मादीच्या शरीरात सोडले जाईल. त्यामुळे नव्याने जन्माला येणा-या डासांच्या माद्या माणसाला दंश करण्याच्या वयापर्यंत पोहोचण्यापूर्वीच मरतील. नर डासाचे जनुक पुढील पिढ्यांमध्ये पोहोचेल आणि हळूहळू डासांच्या माद्यांची संख्या घटत जाईल. काही दिवसांनी माणसांमध्ये डेंग्यू, जीका, चिकूनगुनिया अशा आजारांचे प्रमाणही त्यामुळे कमी होईल.
अमेरिकेतील पर्यावरणीय समितीने मे महिन्यात ऑक्सिटेक या ब्रिटिश कंपनीला जनुकीयदृष्ट्या सुधारित (जेनेटिकली मॉडिफाईड) डासांच्या निर्मितीसाठी अनुमती दिली होती. त्यानुसार एडिस इजिप्ती या डेंग्यूस कारणीभूत ठरणा-या जातीचे नर डास प्रयोगशाळेत तयार करण्यात येतील. जनुकीय बदल केलेल्या या नर डासांचे नामकरण ‘ओएक्स-५०३४’ असे करण्यात आले आहे. २०२१ मध्ये फ्लोरिडा प्रांतातील एका बेटावर हे डास सोडण्यात येतील. दोन वर्षांच्या अवधीत एकंदर ७५ कोटी डास अशा प्रकारे सोडण्यात येतील. सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये मात्र या प्रयोगाविषयी अनेक मतमतांतरे आहेत.
एका गटाचे म्हणणे असे आहे की, समाजात असे प्रयोग करणे म्हणजे अगदी ज्युरासिक पार्कसारखे प्रयोग करणे ठरेल. अन्य एका गटाचे म्हणणे असे आहे की, ज्या डासांवर कीटकनाशकांचा परिणाम होत नाही, असे डास पर्यावरणात सोडल्यामुळे पर्यावरणीय परिसंस्थांचे नुकसान होऊ शकेल. ऑक्सिटेल या पथदर्शी प्रकल्प चालविणा-या कंपनीच्या म्हणण्यानुसार, या प्रयोगामुळे पर्यावरण आणि समाज या दोहोंचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. सरकारतर्फे करण्यात आलेल्या संशोधनात तसे स्पष्टही झाले आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार, या प्रयोगाविषयी ब्राझीलमध्ये संशोधन झाले आहे आणि त्याचे निष्कर्ष सकारात्मक आहेत. फ्लोरिडाव्यतिरिक्त टेक्सासमध्येही २०२१ मध्ये हा प्रकल्प सुरू करण्याची योजना तयार करण्यात येत आहे.
ऑक्सिटेक कंपनीच्या शास्त्रज्ञांच्या मते, गेल्या काही वर्षांत कंपनीने असे दहा लाख जनुकीय बदल केलेले डास वातावरणात मुक्त केले आहेत. त्याचा अद्याप कोणताही धोका समोर आलेला नाही आणि कोणतेही नुकसानसुद्धा झालेले नाही. परंतु मूळ प्रश्न असा की, असा प्रयोग करण्याची वेळ आलीच कशामुळे? दक्षिण फ्लोरिडामध्ये डासांची दहशत सातत्याने वाढत आहे. विशेषत: शहरी विभागात तलावांमध्ये या डासांची संख्या वाढत आहे. त्यांच्यावर कीटकनाशकांचाही परिणाम होईनासा झाला असून, त्यामुळेच हा आगळा प्रकल्प सुरू करण्याची योजना तयार करण्यात आली आहे.
या योजनेला हिरवा कंदील दाखविण्यापूर्वी बराच विचारविनिमय करण्यात आला. पर्यावरणवादी संघटनांनी या प्रयोगाच्या दुष्परिणामांविषयी दिलेला इशारा हेच या विचारविनिमयाचे कारण होय. या प्रयोगामुळे होऊ शकणारे दुष्परिणाम ज्युरासिक पार्कच्या रूपाने ठळकपणे समोर येण्याची चिन्हे नसली, तरी कीटकनाशकांना न जुमानणारे डास निर्माण होतील, ही धास्ती साधार आहे. सध्या संपूर्ण जगभरात थैमान घालणारा कोरोनाचा विषाणू प्रयोगशाळेत तयार करण्यात आला असावा, अशी शक्यता काहीजण व्यक्त करीत असून, राजकीय पातळीवर तसे आरोपही झाले आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रयोगशाळेत तयार केलेला डास आणि त्याचे फायदे-तोटे हा चर्चेचा विषय ठरणे अपरिहार्य आहे.
सोलापूर शहरात ५८ कोरोनाबाधीत, ३ मृत
चेंज डॉट ओआरजी नावाच्या वेबसाईटवर या योजनेविरुद्ध लिहिल्या गेलेल्या एका प्रस्तावाला २.४० लाख लोकांचे समर्थन प्राप्त झाले आहे. अमेरिकेच्या भूमीचा उपयोग ऑक्सिटेक कंपनीने ‘टेस्टिंग ग्राऊंड’ म्हणून केला असल्याबद्दलही टीका होत आहे. परंतु हा प्रयोग ब्राझीलमध्ये पूर्वीच झाला असल्याचा दावा ऑक्सिटेकने केला आहे. सध्या फ्लोरिडामध्ये हा प्रयोग करण्यास अमेरिकेच्या मध्यवर्ती सरकारची अनुमती मिळाली असली, तरी प्रांतिक सरकारने अद्याप या प्रयोगाला हिरवा कंदील दाखविलेला नाही. ‘फ्रेन्डस ऑफ दी अर्थ’ या पर्यावरणवादी संस्थेने म्हटले आहे की, अनुवंशिक परिवर्तन केलेले डास फ्लोरिडातील लोकांच्या अंगावर विनाकारणच सोडले जात आहेत.
सध्याच्या महामारीच्या काळात पर्यावरणाला आणि लुप्त होत चाललेल्या प्राणीप्रजातींना या प्रयोगापासून मोठा धोका संभवतो. या सर्व उलटसुलट चर्चांच्या पार्श्वभूमीवर हा प्रयोग खरोखर झालाच आणि तो यशस्वी झाला तर डासांचा नायनाट करणारे डास जगभर गाजण्याची शक्यता आहे. एडिस इजिप्ती ही डासांची प्रजाती संपूर्ण मानवजातीला शाप ठरली आहे. डेंग्यू, जीका, चिकूनगुनिया यांसारखे जीवघेणे आजार या डासामुळे पसरत आहेत. प्राणघातक पिवळ्या तापालाही डासच कारणीभूत ठरत आहेत. ‘लोहा लोहे को काटता है’ या म्हणीनुसार जर डासच डासांचा नायनाट करण्यास सक्षम ठरले तर या जीवघेण्या आजारांनी दरवर्षी ग्रस्त होणा-या लाखो लोकांचा मोठा फायदा होणार आहे.
अमेरिकेत फ्लोरिडा आणि टेक्सास या प्रांतांमध्ये डेंग्यूचा प्रकोप विशेषत्वाने जाणवतो. गेल्या वर्षी जानेवारी ते ऑक्टोबर या कालावधीत अमेरिकेत २७ लाख लोकांना डेंग्यूची लागण झाली होती आणि १२०० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू झाला होता. संपूर्ण जगाची चर्चा करायची झाल्यास गेल्या वीस वर्षांत डेंग्यूच्या रुग्णांच्या संख्येत आठपट वाढ झाली आहे. २०१९ या एकाच वर्षात जगातील ४२ लाखांहून अधिक लोकांना डेंग्यूची बाधा झाली होती. चिकूनगुनिया आणि पिवळ्या तापाच्या बाबतीत कमी-अधिक फरकाने हीच स्थिती आहे. अमेरिकेत असे प्रकोप वाढणे चिंतेची बाब मानली जात आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ७५ कोटी डास सोडण्याच्या योजनेचे सामान्य लोकांकडून ब-याच अंशी स्वागत होणे स्वाभाविक आहे. ही योजना यशस्वी ठरल्यास ओएक्स-५०३४ नावाचे हे डास कीटकनाशकांना पर्याय म्हणून जगभरात वापरात येऊ शकतील.
निकालासह सर्व परीक्षा प्रक्रिया 31 ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होणार – उदय सामंत
अर्थात, यासंदर्भात पर्यावरणवादी लोक आणि अभ्यासक जे काही सांगत आहेत, त्याकडे कानाडोळा करणेही परवडणारे नाही. ब्राझीलमध्ये केलेल्या प्रयोगाचे पुरावे संबंधित कंपनीने अमेरिकेतील नागरिकांना द्यायला हवेत. तसेच ब्राझीलमध्ये प्रयोग यशस्वी झाला होता तर त्याची पुरेशी प्रसिद्धी का केली गेली नाही, याचेही उत्तर द्यावे लागेल. कीटकनाशकांना न जुमानणा-या डासांची प्रचंड निर्मिती झाल्यास आणि मानवजातीला त्यापासून धोका उत्पन्न झाल्यास या संभाव्य धोक्याचा काय विचार केला आहे, याचे स्पष्टीकरण लोकांना द्यावे लागेल.
निसर्गात मुळातच अनेक प्राणी आणि वनस्पती प्रजाती विलुप्त होत आहेत. या प्रक्रियेला अशा प्रयोगांमुळे वेग येणार नाही, याची शाश्वती मिळायला हवी. जनुकीय तंत्रज्ञानावर पूर्वीपासून आक्षेप घेतले गेले असून, त्यांचे निराकरण पुरेशा पुराव्यांनिशी झालेले नाही. हे सर्व धोके आणि आक्षेप विचारात घेऊनच नवीन संशोधन उपयोगात आणले पाहिजे. अन्यथा एक धोका नष्ट करताना आणखी अनेक धोके मानवजातीपुढे आ वासून उभे राहतील.
प्रा. विजया पंडित