20.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeविशेषअंतर्गत कलहाचा भाजपलाही शाप

अंतर्गत कलहाचा भाजपलाही शाप

भाजपमध्ये मोदी आणि शहा यांच्यासमोर तर कोणाचेच आव्हान नाही. परंतु राज्यांमध्ये सुरू झालेल्या कुरबुरी असे दर्शवितात की, काही दिवसांपासून पक्षाच्या खालच्या स्तरावर या दोन्ही नेत्यांचा धाक कमी होत चालला आहे. जे. पी. नड्डा हे पक्षाध्यक्ष आहेत हे खरे; परंतु त्यांची परिस्थिती ‘रबर स्टँप’पेक्षा वेगळी नाही. भाजपचे सरकार असलेल्या राज्यांसह जिथे सत्तेत पक्ष नाही, तिथेही पक्षांतर्गत गटबाजी आणि अंतर्गत कलह सुरू असल्याचे दिसते.

एकमत ऑनलाईन

राज्याराज्यांत काँग्रेसमध्ये सुरू असलेले अंतर्गत कलह पाहून माध्यमे असा प्रचार करीत आहेत, की काँग्रेसचे नेतृत्व कमकुवत आहे आणि पक्षावरील त्यांची पकड ढिली झाली आहे. या प्रचाराला आणखी बळ देण्यात भारतीय जनता पक्षही मागे राहत नाही आणि पक्षाच्या सर्वोच्च नेत्यांपासून अगदी खालच्या स्तरावरील नेत्यांपर्यंत सर्वजण काँग्रेसविषयी त-हेत-हेची शेरेबाजी करतात. याच्या अगदी उलट, भाजपविषयी असा प्रचार केला जातो, की पक्षावर नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांची मजबूत पकड आहे. अगदी अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांच्या काळातसुद्धा त्यांची पक्षावरील पकड त्या काळात एवढी घट्ट नव्हती; परंतु मोदी-शहांची आहे, असेही बोलले जाते. आता तर केवळ डोळ्यांच्या इशा-यावर कामे होतात, असे म्हटले जात असले तरी वास्तव असे आहे, की अशी परिस्थिती काही दिवसांपूर्वीपर्यंतच होती.

गेल्या काही दिवसांपासून परिस्थिती अशी आहे की, अनेक राज्यांत भाजपचे नेते आपली मनमानी करीत आहेत आणि पक्षनेतृत्वाच्या डोळ्यांचे इशारे सोडाच; पण त्यांनी सांगितलेल्या शब्दांचाही मान राखेनासे झाले आहेत. ज्या राज्यांत भाजपची सत्ता आहे, तिथेच केवळ अशी परिस्थिती आहे असे नाही. ज्या राज्यांत भाजपची सत्ता नाही, त्याही राज्यांतील नेत्यांमध्ये अशा प्रकारची रस्सीखेच जोरदारपणे सुरू आहे. गेल्या काही दिवसांत भाजपशासित राज्यांमध्ये काही अशा घटना समोर आल्या, ज्यातून भाजपच्या सर्वशक्तिमान नेतृत्वाचा प्रभाव फिका पडत असल्याचा अनुभव आला. परंतु या परिस्थितीबद्दल माध्यमांमध्ये अजिबात चर्चा झाली नाही.

काँग्रेसमध्ये केरळपासून पंजाबपर्यंत रंगलेल्या अंतर्गत कलहाला माध्यमांनी प्रचंड महत्त्व दिले. परंतु छत्तीसगडपासून त्रिपुरापर्यंत आणि कर्नाटकपासून राजस्थान, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आदी राज्यांमध्ये भाजपच्या नेत्यांत चाललेली सुंदोपसुंदी कुणाच्याच नजरेस पडली नाही. छत्तीसगडमध्ये भाजपमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत कलहाची चर्चा माध्यमात कुठेच नाही. माजी मुख्यमंत्री रमणसिंह आणि माजी मंत्री ब्रजमोहन अग्रवाल यांच्यात अशी काही चढाओढ रंगली आहे की, जगदलपूर येथे झालेल्या पक्षाच्या चिंतन शिबिरात दोन्ही गटांनी आपापली ताकद दाखविली. ताकद आजमावण्याच्या या खेळात काही केंद्रीय नेत्यांच्या मदतीने अग्रवाल गटाने रमणसिंह यांना परिघाबाहेर ढकलून दिले. वाद इतका स्पष्टपणे दिसू लागला होता, की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे क्षेत्रीय प्रचारक दीपक विस्फुटे आणि प्रांत प्रचारक प्रेमशंकर सिदार चिंतन शिबिराला गेलेच नाहीत. वस्तुत: पूर्वघोषित कार्यक्रमानुसार त्यांनी उपस्थित राहणे अपेक्षित होते.

उत्तर प्रदेशातही भाजपची अंतर्गत परिस्थिती चांगली नाही आणि गेल्या काही दिवसांपासून तिथे सुरू असलेल्या घटनाक्रमातून असे दिसून आले आहे, की मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासमोर भाजपच्या नेत्यांचा प्रभाव फिका पडला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून योगी आदित्यनाथ हे पक्षात कुणालाच आणि कधीच पसंत नव्हते हे उघड गुपित आहे. राज्याचे मुख्यमंत्रिपद मिळाल्यानंतर योगी आदित्यनाथ यांनी काही कामे केली असोत वा नसोत; परंतु हिंदुत्वाचे अखिल भारतीय पोस्टर बॉय म्हणून आपली उंची नरेंद्र मोदी यांच्या बरोबरीने निश्चित वाढवून घेतली आहे. देशभरातील भाजप समर्थकांमध्ये मोदींच्या खालोखाल लोकप्रिय चेहरा योगींचाच आहे. योगींची हीच उंची मोदींना आणि त्यांच्याहूनही अधिक अमित शही यांना खटकते आहे. काही दिवसांपूर्वी केंद्रीय नेतृत्वाने त्यांना लगाम घालण्याच्या इराद्याने माजी आयएएस अधिकारी असलेले अरविंद शर्मा यांना उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्षपद देऊन लखनौला पाठविले होते. आपल्या या विश्वासू अधिका-याला राज्याचे उपमुख्यमंत्रिपद देण्याची मोदींची इच्छा होती. परंतु योगींनी त्यांना उपमुख्यमंत्री सोडाच; मंत्रिपदही दिले नाही. योगींनी केंद्रीय नेतृत्वासमोर असेही स्पष्ट केले आहे, की पक्ष त्यांच्याच चेह-यावर निवडणूक लढवेल. सध्या पक्ष त्यांचाच चेहरा आणि नाव वापरून निवडणूक लढविताना दिसत आहे. योगीही सर्वकाही आपले नाव आणि चेहरा समोर ठेवूनच करीत आहेत.

एकेकाळी उत्तर प्रदेशचाच भाग असलेल्या उत्तराखंडमध्येही अंतर्गत कलहामुळे भाजपने चार वर्षांत तीनदा मुख्यमंत्री बदलले. परंतु तरीही कलह थांबण्याचे नाव घेत नाही. दोन महिन्यांपूर्वी जेव्हा तीरथसिंह रावत यांना हटवून पुष्करसिंह धामी यांना मुख्यमंत्रिपद देण्यात आले होते, तेव्हा राज्यातील वरिष्ठ नेत्यांनी असंतोष व्यक्त करून त्यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास नकार दिला होता. त्यावेळी तर केंद्रीय नेतृत्वानेच मनधरणी करून नाराज आमदारांना मंत्री बनण्यासाठी कसेबसे राजी केले होते. परंतु अजूनही त्या राज्यात परिस्थिती चांगली झालेली नाही आणि मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मंत्र्यांकडून आणि माजी मंत्र्यांच्या गटाकडून सहकार्य मिळत नाही.

कर्नाटकमध्येही पक्षाला अंतर्गत कलहाचा सामना करावा लागत आहे. दीर्घकाळ खटपट केल्यानंतर काही दिवसांपूर्वी नेतृत्वबदल झाला; परंतु त्यानंतरही आमदारांचा असंतोष थंडावलेला नाही. ज्यांना मंत्रिपदे मिळाली नाहीत, अशा आमदारांनी थेट विरोध सुरू केला आहे आणि मुख्यमंत्री बसवराज बोम्मई तसेच माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न करीत आहेत. अर्थात येडियुरप्पांच्या चिरंजीवांना मंत्री केले नाही, यावरून खुद्द त्यांचेच समर्थक नाराज आहेत.

मध्य प्रदेशात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान आणि पक्षाचे सरचिटणीस कैलाश विजयवर्गीय यांच्यातील संघर्ष पूर्वीपासूनच आहे. आता ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या नेतृत्वाखालील एक नवाच गट अस्तित्वात आला आहे. अर्थात, काही दिवसांपूर्वी विजयवर्गीय आणि शिवराजसिंह चौहान यांनी ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’चे सूर जरूर आळवले होते; परंतु त्यामुळे अंतर्गत कलह अद्याप थंडावलेला नाही. या कलहामुळे शिवराजसिंह चौहान यांना हटवून केंद्रात बोलावून घेतले जाण्याची शक्यता आहे अशी काही दिवसांपूर्वी जोरदार चर्चा होती. तसे पाहायला गेल्यास शिवराजसिंह चौहान हे केंद्रीय नेतृत्वाच्या म्हणजेच नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या पसंतीचे नेते नाहीतच. त्यामुळे उत्तर प्रदेशातील निवडणुकीनंतर त्यांना दिल्लीला बोलावून घेतले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तिकडे त्रिपुरामध्ये मुख्यमंत्री बिप्लव देब यांनी प्रदीर्घ खटपट केल्यानंतर नुकताच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार केला आहे. तीन नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली. परंतु भाजपचे पाच बंडखोर आमदार शपथविधी समारंभाला उपस्थित राहिले नाहीत. माजी मंत्री सुदीप रॉय बर्मन यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी वेगळी बैठक घेतली. झारखंडमध्ये काही दिवसांपूर्वीच आपल्या पक्षाचे विलीनीकरण करून भाजपमध्ये परत आलेले माजी मुख्यमंत्री बाबुलाल मरांडी आपल्या काही समर्थकांच्या मदतीने राज्यातील हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार पाडण्याच्या मोहिमेत व्यग्र आहेत. परंतु पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि तीन माजी मुख्यमंत्री अशा चार गटांमध्ये पक्ष विभागला गेला आहे. महाराष्ट्रात काही दिवसांपूर्वीपर्यंत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या गटात पक्ष विभागला होता. परंतु नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद मिळाल्यानंतर आता पक्षात तीन गट झाले आहेत आणि तीनही वेगवेगळ्या मार्गांवरून चालत आहेत. नारायण राणे यांनी त्यांना नुकत्याच झालेल्या अटकेनंतर शिवसेनेवरील हल्ले तीव्र केले आहेत. परंतु पक्षातील अन्य गट यात त्यांना साथ देताना दिसत नाहीत. एकंदरीत भाजपमध्ये मोदी आणि शहा यांच्यासमोर तर कोणाचेच आव्हान नाही. परंतु राज्यांमध्ये सुरू झालेल्या कुरबुरी असे दर्शवितात की, काही दिवसांपासून पक्षाच्या खालच्या स्तरावर या दोन्ही नेत्यांचा धाक कमी होत चालला आहे. जे. पी. नड्डा हे पक्षाध्यक्ष आहेत हे खरे; परंतु त्यांची परिस्थिती ‘रबर स्टँप’पेक्षा वेगळी नाही.

अभिमन्यू सरनाईक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या