22.5 C
Latur
Sunday, September 26, 2021
Homeविशेषबॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड

बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड

एकमत ऑनलाईन

सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत सातत्याने जे वास्तव समोर येत आहे, त्यामुळे चंदेरी पडद्याच्या मागे लपलेला कचरा समोर आला आहे. हिंदी चित्रपटसृष्टीतील नेपोटिझमपासून अंडरवर्ल्डच्या हस्तक्षेपापर्यंत अनेक गोष्टी हळूहळू समोर येत आहेत. अभिनेत्री कंगना राणावत हिनेही बरेच खुलासे केले आहेत. रिपब्लिक टीव्हीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखतीत तिने बॉलिवूडमधील नशेचा फैलाव आणि बाहेरून आलेल्या कलावंतांचे शोषण या बाबींचा उल्लेख केला.

सुशांत मृत्यूप्रकरणातील प्रमुख संशयित रिया चक्रवर्तीच्या व्हॉट्स अ‍ॅप चॅटमधून या प्रकरणाचे अमली पदार्थांशी असलेले कनेक्शन समोर आले आणि आता नार्कोटिक्स कन्ट्रोल ब्यूरो (एनसीबी) त्याची तपासणी करीत आहे. कायदा आणि सुव्यवस्था राखणा-यांचे बॉलिवूडमध्ये काहीच चालत नाही, तर अंडरवर्ल्डशी संबंधित लोक ही सृष्टी चालवतात, असा कंगनाचा आरोप असून, जर कुणी पोलिसांची मदत मागितली तर त्याला वेडा ठरवले जाईल आणि एकतर त्याच्यावर बहिष्कार टाकला जाईल किंवा संपवून टाकले जाईल, असा कंगनाचा दावा आहे. अनेक सरकारांनी बॉलिवूडमध्ये ड्रग माफियांना सक्षम होण्यास मदत केली, असा आरोपही ती करते.

अनेकदा असे किस्से समोर येतात, जे ऐकून वाटते दोनच गोष्टी मुंबईवर राज्य करतात. एक अमली पदार्थ आणि दुसरी म्हणजे अंडरवर्ल्ड. या दोन्ही गोष्टींचा चित्रपटसृष्टीशी घनिष्ठ संबंध असल्याचे दिसते. सुशांतसिंहच्या मृत्यूप्रकरणाचे रोज नवनवीन कोन समोर येत आहेत. आता रिया चक्रवर्तीवर अमली पदार्थांच्या तस्करीत सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सुशांतची टॅलेन्ट मॅनेजर जया साहा हिने डिलिट केलेले व्हॉट्स अ‍ॅपवरील संभाषण प्रवर्तन निदेशालयाच्या हाती लागले आहे. त्यानंतर एनसीबीनेही या प्रकरणी एफआयआर नोंदविली. अमली पदार्थांची ही कहाणी नवीन नाही. मायानगरी मुंबईत या धंद्याची मुळे खोलवर रुजलेली आहेत.

तीन मित्रांनी मिळून उभारले कोविड हॉस्पिटल

मुख्य म्हणजे, जेव्हापासून अंडरवर्ल्ड आहे, तेव्हापासून अमली पदार्थ आहेत. करीम लाला, हाजी मस्तान आदी अंडरवर्ल्ड डॉनपासून ही कहाणी सुरू झाली आणि नंतर दाऊद इब्राहिमपासून छोटा राजनपर्यंत अनेक व्यक्ती कहाणीत सहभागी झाल्या. अंडरवर्ल्ड, बॉलिवूड आणि ड्रग्ज यांचा संबंध जाणून घेण्यासाठी तीस किंवा चाळीसच्या दशकात डोकवावे लागेल. करीम लाला हा त्याच्या काकाच्या सांगण्यानुसार त्यांच्या कपड्यांच्या व्यवसायात मदत करण्यासाठी अफगाणिस्तानातून मुंबईला आला होता. हा व्यवसाय करीत असतानाच त्याची मैत्री झुम्मा खान घासवाला याच्याशी झाली. तोही करीम लालाप्रमाणेच पठाण होता. परंतु घासवाला आणि त्याचा मुलगा त्यावेळी मुंबईत अमली पदार्थांचे तस्कर म्हणूनही ओळखले जात. या बाप-लेकानी करीम लाला यालाही कालांतराने धंद्यात भागीदार करून घेतले.

काही महिन्यांनंतर करीम लालाने अमली पदार्थांचा स्वत:चा व्यवसाय सुरू केला आणि त्यातून मिळविलेल्या पैशातून लॅमिंग्टन रोडवर गेस्ट हाऊस खरेदी केले. या गेस्ट हाऊसमधून त्याने अमली पदार्थांबरोबरच मटक्याचाही व्यवसाय सुरू केला. नंतर हाजी मस्तानसुद्धा तेवढाच मोठा तस्कर बनला. असाच एक ड्रग माफिया आहे विक्की गोस्वामी. काही वर्षांपूर्वी बॉलिवूडमधील अभिनेत्री ममता कुलकर्णीने त्याच्याशी लग्न केले. दाऊद इब्राहिमच्या अमली पदार्थांच्या व्यवसायाची ज्यांना माहिती आहे, त्यांना ठाऊक आहे की, दाऊदने त्यातून कोट्यवधी नव्हे तर अब्जावधी रुपये कमावले ते केवळ तीन व्यक्तींमुळे. खालिद पहिलवान, मवद खान आणि विक्की गोस्वामी ही ती तीन नावे होत.

विक्की गोस्वामी हा सुरुवातीला छोटा राजनसाठी काम करीत होता. नंतर तो दाऊदला जाऊन मिळाला. १९९३ च्या मुंबई बाँबस्फोटांनंतर जेव्हा छोटा राजन दाऊदपासून वेगळा झाला, तेव्हा विक्की दाऊदबरोबर न जाता छोटा राजनसोबत राहिला. त्याच दरम्यान अहमदाबाद येथील विक्की गोस्वामीच्या घरावर गोळीबार झाला. नाराज झालेल्या दाऊद इब्राहिमने हे कृत्य केल्याचे सांगितले जाते. असेही सांगितले जाते की, काही वर्षांपूर्वी केनियामध्ये विक्की गोस्वामीला झालेली अटक आणि त्याची पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णीला पोलिसांनी ताब्यात घेतले तेही दाऊदच्या सांगण्यावरूनच! कदाचित यामुळेच घाबरून जाऊन विक्की गोस्वामी पुन्हा दाऊदचा हस्तक बनला असावा.

2 ऑक्टोबर रोजी शेतकरी संघटनेचे राज्यव्यापी समर्थन व संपूर्ण स्वातंत्र्य आंदोलन

त्यानंतर मात्र त्याचा ड्रग्जचा धंदा भारतातच नव्हे तर जगभरात वेगाने विस्तारला आणि आजही विस्तारत आहे. सुमारे चार वर्षांपूर्वी ठाणे पोलिसांनी विक्की गोस्वामीच्या मालकीचा दोन हजार कोटी रुपयांचा १८.५ टन एफेड्रीन हा अमली पदार्थ जप्त केला होता. या प्रकरणात ममता कुलकर्णीला आरोपी करण्यात आले आणि याच प्रकरणात विक्की अजूनही ‘वॉण्टेड’ आहे. वरिष्ठ पोलिस अधिका-यांच्या मते, दाऊदचे ड्रग्ज नेटवर्क अफगाणिस्तान, पाकिस्तान, नेपाळ, भारत, बांगला देश, थायलंड आणि लाओससह संपूर्ण आशियात आणि आफ्रिकेत विस्तारले आहे.

ज्यावेळी हिंदी चित्रपट तयार करण्यासाठी लागणा-या पैशांसाठी निर्मात्यांना वणवण करावी लागत असे, तेव्हा कमाईसाठी या सुंदर दुनियेचा मोह पडलेलाच होता. पैशांची गरज समजल्यामुळे आणि मोठ्या नफ्याच्या आमिषाने अंडरवर्ल्डमधील काहीजण बॉलिवूडशी जोडले गेले. दोन्ही दुनियांमध्ये देवाणघेवाण सुरू झाली. जे लोक या जाळ्यापासून दूर राहिले, त्यांना भीती दाखविण्यात आली. बॉलिवूडवर दबदबा निर्माण करण्यासाठी अंडरवर्ल्डने धमक्या, खंडणी एवढेच नव्हे तर हत्या करण्यासही मागेपुढे पाहिले नाही. कॅसेट किंग गुलशनकुमार यांच्या हत्येनंतर अनेक बॉलिवूडकरांना संरक्षण मागण्यासाठी पोलिसांकडे धाव घ्यावी लागली. दुसरीकडे, अंडरवर्ल्डमधील पार्ट्यांमध्येही फिल्मी सितारे चमकू लागले. अंडरवर्ल्डला बॉलिवूडमधून पैसाही हवा होता आणि हा झगमगाटही! तसे पाहायला गेल्यास चित्रपटसृष्टीतील लोकांशी जवळीक करणे आपल्याकडे राजकारण्यांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वांना आवडते.

परंतु अंडरवर्ल्ड डॉन यासाठी धाक दाखवून फिल्मी सिता-यांना बोलावून घेऊ लागले. अशा ठिकाणी राजीखुशीने कुणीच जात नव्हते. बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्यातील हे नाते पुढेपुढे इतके दृढ होत गेले की, चित्रपटातील पात्रे आणि कलावंतच नव्हे तर अनेकदा कथाही निश्चित करण्याचा हक्क अंडरवर्ल्ड मागू लागले. अर्थात, अशा अनेक प्रकरणांमध्ये जिथे एखाद्या गँगस्टरची छबी दिसणार असेल, तरच अंडरवर्ल्डने हस्तक्षेप केला. अंडरवर्ल्डचा पैसा बॉलिवूडमध्ये गुंतविला जात असल्यामुळेच हातावर मोजण्याइतके अपवाद वगळता चित्रपटांमध्ये अंडरवर्ल्डचे यथार्थ चित्रण केले जात नाही, असा आरोप केला जातो. गरिबी आणि जुलूम यामुळे नायक किंवा नायिकेने शस्त्र उचलणे इतके स्वाभाविक होऊन गेले की, त्यामुळे भीतीऐवजी हिंमत आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

जीएसटी रिटर्न भरण्याची अंतिम मुदत आता 31ऑक्टोबर

अंडरवर्ल्डमधील व्यक्तींच्या जीवनातील प्रेम आणि अन्य मानवी बाबी दाखविणेसुद्धा योग्य नसल्याचे काही समीक्षकांचे मत आहे. मुंबई बाँबस्फोटानंतर दाऊद आणि त्याच्या हस्तकांना देशाबाहेर पळ काढावा लागला तर दुसरीकडे सरकार आणि पोलिसांनी अंडरवर्ल्ड-बॉलिवूड संबंधांवर कडक नजर ठेवायला सुरुवात केली. अंडरवर्ल्डमधील व्यक्तींशी संपर्क तोडणे चित्रपटसृष्टीतील व्यक्तींसाठी सोपे बनले. चित्रपटाला उद्योगाचा दर्जा मिळाला आणि बँकांनी त्यासाठी कर्जेही द्यायला सुरुवात केली. अंडरवर्ल्डवरील आर्थिक अवलंबित्व घटले. नव्या शतकाच्या प्रारंभी उदारवादी आर्थिक धोरणाने मूळ धरले आणि चित्रपटांसाठी पैसा गोळा करण्याचे अन्य कायदेशीर मार्गही विस्तारत गेले. अनेक चित्रपट परदेशांत प्रदर्शित होऊ लागले. आजमितीस बॉलिवूड-अंडरवर्ल्डचे जे नाते आहे ते ब-याच अंशी लपूनछपून असल्याचे दिसते.

सामान्यत: हे नाते तुटल्यात जमा आहे, असे मानले जाते. परंतु त्याच वेळी बॉलिवूड आणि ड्रग्ज हे कनेक्शन समोर आले असून, ड्रग्जचा संबंध पुन्हा अंडरवर्ल्डशीच आहे. चित्रपटसृष्टीतील नायिका आणि अंडरवर्ल्ड डॉन यांच्या प्रेमकहाण्याही ब-याच प्रमाणात प्रसिद्ध आहेत. ममता कुलकर्णी आणि विक्की गोस्वामीप्रमाणेच सोना आणि हाजी मस्तान, मंदाकिनी आणि दाऊद इब्राहिम, मोनिका बेदी आणि अबू सालेम अशा अनेक जोड्यांची चर्चा झाली असून, अनेक मार्गांनी बॉलिवूडला विळखा घालण्याचा प्रयत्न अंडरवर्ल्डकडून केला जातो, हे वारंवार समोर आले आहे.

सोनम परब

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या