27.3 C
Latur
Thursday, March 23, 2023
Homeविशेषबॉलिवूडचे ‘हेरगिरीप्रेम’

बॉलिवूडचे ‘हेरगिरीप्रेम’

एकमत ऑनलाईन

बॉलिवूड निर्माते-दिग्दर्शक आणि लेखकांना नेहमीच काही विषय आकर्षित करत आले आहेत. यामध्ये हेरगिरी, गुप्तहेर याविषयीचे आकर्षणही दिसून येते. सध्या देशभरात चर्चेत असणा-या आणि तिकिट खिडकीवर धुमाकूळ घालणा-या ‘पठाण’ चित्रपटात शाहरूख खानने हेराची भूमिका साकारली असून ती प्रेक्षकांनी उचलून धरली आहे. हेरगिरीवर बेतलेल्या कथानकावर चित्रपट तयार करण्याची बॉलिवूडला सुमारे सहा दशकांची परंपरा राहिली आहे. देव आनंद यांचेही चित्रपट लोकांच्या पसंतीस पडले. रहस्यमय गोष्टीचा उलगडा करणारा हेर हा लोकांना खूपच भावला.

रगिरीवरच्या चित्रपटांचा बोलबाला जगात नेहमीच राहिला आहे. पूर्वीपासूनच त्याची क्रेझ होती. हॉलिवूडचे बाँडपट तर आजही तितक्याच आवडीने पाहिले जातात. पडद्यावरचा हेर कसा असावा याचा वस्तुपाठच हॉलिवूडचे दिग्गज कलाकार शॉन कॉनरी यांनी घालून दिला. बॉलिवूडमध्ये देखील बाँडसदृश्य चित्रपटांची परंपरा राहिली. पूर्वी आपल्याकडचे हेर शेजारील देशाचे नापाक इरादे मोडून काढण्याचे काम करत असत. कालांतराने एखाद्या खुनाचा शोध लावणे, सरकारविरोधातील कारस्थान उघडकीस आणणे हे काम पडद्यावरच्या हेराकडून होऊ लागले. धर्मेंद्र यांचा ‘आँखे’ याच श्रेणीतील आहे. सांगायचे तात्पर्य म्हणजे शाहरूख खानने ‘पठाण’मध्ये हेराची भूमिका साकारली आणि ती प्रेक्षकांनी उचलून धरली. हेरगिरीवर बेतलेल्या कथानकावर चित्रपट तयार करण्याची बॉलिवूडला सुमारे सहा दशकांची परंपरा राहिली आहे. देव आनंद यांचेही चित्रपट लोकांच्या पसंतीस पडले. रहस्यमय गोष्टीचा उलगडा करणारा हेर हा लोकांना खूपच भावला.

देव आनंद : (सीआयडी १९५६)
अभिनेता गुरु दत्त यांनी अनेक चित्रपटांत संस्मरणीय भूमिका साकारल्या. तसेच अन्य कलाकारांना सोबत घेऊन त्यांनी चित्रपटांची निर्मितीही केली. गुरु दत्त यांनी ‘सीआयडी’ची निर्मिती केली आणि त्यात देव आनंद यांची प्रमुख भूमिका होती. दिग्दर्शक राज खोसला होते. या चित्रपटात देव आनंद यांची सीआयडी अधिका-याची भूमिका होती. ते एका हत्याप्रकरणाचा तपास करताना दाखविले आहेत. देव आनंदबरोबरच शकिला आणि वहिदा रेहमान चित्रपटात आहेत. हा चित्रपट २ नोव्हेंबर १९५६ रोजी प्रदर्शित झाला.

धर्मेंद्र : आँखे (१९६८)
रामानंद सागर यांच्या ‘आँखे’ चित्रपटात धर्मेंद्र यांनी देशभक्त हेराची भूमिका साकारली. या चित्रपटात देशविघातक कारवाया करणा-या टोळीचा भांडाफोड होतोे. या चित्रपटात धर्मेंद्र यांच्याशिवाय माला सिन्हा, मेहमूद, कुमकुम आणि सुजीत कुमार यांच्या भूमिका आहेत. गीतरचना साहिर लुधियानवी यांची तर संगीत रवी यांचे होते. चित्रपटातील सर्व गाणी सुपरडुपर हीट ठरली. विशेषत: ‘मिलती है जिंदगी में….’ या गाण्यासाठी रामानंद सागर यांना सर्वोत्तम दिग्दर्शनाचा फिल्फमेअर पुरस्कार मिळाला. हा चित्रपट १ जानेवारी १९६८ रोजी प्रदर्शित झाला.

देव आनंद : ज्वेल थिफ (१९६७)
एका हि-याच्या अंगठी चोरी प्रकरणाभोवती फिरणारा ‘ज्वेल थिफ’ चित्रपट २७ ऑक्टोबर १९६७ रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाची निर्मिती स्वत: देव आनंद यांनी प्रॉडक्शन हाऊस नवकेतन फिल्म बॅनरच्या नावाखाली केली. चित्रपटाचे दिग्दर्शन त्यांचे बंधू विजय आनंद यांनी केले. देव आनंद यांच्याव्यतिरिक्त अशोक कुमार, वैजयंतीमाला, तनुजा यांच्या प्रमुख भूमिका होत्या. वैजयंतीमाला यांच्या भूमिकेसाठी सुरुवातीला सायरा बानो यांच्याशी संपर्क करण्यात आला होता. परंतु दिलीप कुमार यांच्याशी विवाह केल्याने सायरा बानो यांनी काम करण्यास नकार दिला.

जितेंद्र : फर्ज (१९६७)
रविकांत नगाईच यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला चित्रपट ‘फर्ज’ मध्ये जितेंद्र याने गुप्तचराची भूमिका केली. हा एजंट आपल्या मित्राच्या खुनाचे रहस्य उघड करतो. चित्रपटाच्या यशाबरोबरच जितेंद्र यांच्या नृत्यशैलीने लोकप्रियता मिळवली. जितेंद्र हे जंपिंग जॅक नावाने प्रसिद्ध झाले. ६ ऑक्टोबर १९६७ रोजी प्रदर्र्शित झालेल्या चित्रपटाने जितेंद्र यांची स्टारडमकडे वाटचाल सुरू झाली.

राज कपूर : दो जासूस (१९७५)
‘दो जासूस’ या चित्रपटात राज कपूर आणि राजेंद्र कुमार यांनी धरमचंद आणि करमचंद नावाच्या हेराची भूमिका साकारली. हे दोन्ही हेर कोट्याधीश बापाच्या बेपत्ता मुलीचा शोध घेत तस्करी करणा-या टोळीचा शोध लावण्यात यशस्वी ठरतात. या चित्रपटात अरुणा इराणी, प्रेम चोप्रा, फरिदा जलाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गायक शैलेंद्र सिंह यांनी देखील महत्त्वाची भूमिका केली. ‘संगम’ चित्रपटानंतर राजेंद्र कुमार आणि राज कपूर हे प्रथमच एकत्र आले. ६ जून १९७५ रोजी प्रदर्शित झालेल्या चित्रपटाचे दिग्दर्शन नरेशकुमार यांनी केले होते.

अमिताभ बच्चन : द ग्रेट गॅम्बलर (१९७९)
‘द ग्रेट गॅम्बलर’ या चित्रपटात अमिताभ बच्चन यांचा डबल रोल आहे. एक म्हणजे सर्वांत मोठा जुगारबाज आणि त्याने आतापर्यंत कोणताही डाव गमावलेला नसतो. तर दुसरा पोलिस अधिकारी. तो राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित गोपनीय कागदपत्रांच्या मागावर असतो. या चित्रपटात झिनत अमान, नितू सिंग, प्रेम चोप्रा, उत्पल दत्त, मदन पुरी यासारख्या मातब्बर कलाकारांनी काम केले. शक्ती सामंत यांच्या दिग्दर्शनाखाली साकारलेला चित्रपट ६ एप्रिल १९७९ रोजी प्रदर्शित झाला.

मिथुन चक्रवर्ती : सुरक्षा (१९७९)
मिथुन चक्रवर्ती यांच्या कारकीर्दीच्या सुरुवातीच्या काळात ‘सुरक्षा’ हा चित्रपट त्यांना ‘लकी’ ठरला. तत्कालीन काळात मोठ्या नायकाचे चित्रपट पडत असताना मिथुनदाचा ‘सुरक्षा’ चित्रपट हिट झाला आणि ते बॉलिवूडचे नवे नायक म्हणून प्रेक्षकांसमोर आले. या चित्रपटात मिथुनदाने गुप्तचराची भूमिका केली. हा गुप्तचर देशाच्या शत्रूचे कारस्थान उघडकीस आणतो. मिथुनदाबरोबर रंजीता यांनी आघाडीची भूमिका केली आहे. रविकांत नगाईच यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला चित्रपट २२ जून १९७९ रोजी प्रदर्शित झाला.

राज कपूर : गोपीचंद जासूस (१९८२)
‘दो जासूस’नंतर निर्माते-दिग्दर्शक नरेशकुमार यांनी राज कपूर यांना घेऊन पुन्हा हेरगिरीवर ‘गोपीचंद जासूस’ नावाचा चित्रपट काढला. राज कपूर हे मध्यम वयोगटातील हेर दाखवले असून चोरीस गेलेल्या हि-याचा शोध लावण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविली जाते. या चित्रपटात राज कपूरशिवाय झिनत अमान, आय. एस. जोहर, सुजीत कुमार यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १९ फेब्रुवारी १९८२ रोजी प्रदर्शित झाला होता.

सुशांतसिंह राजपूत : डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी
हेरगिरीवरच्या चित्रपटांचा विषय निघतो तेव्हा ‘व्योमकेश बक्षी’चे नाव आल्याशिवाय रहात नाही. ही भूमिका शरदेंदु बंदोपाध्याय यांनी उभी केली आणि त्याच्यावर दूरदर्शनवर मालिकाही प्रसारित झाली आहे. चित्रपटाचे कथानक १९४० च्या दशकातील आहे. तत्कालीन काळात दुसरे महायुद्ध भडकलेले असते आणि कोलकाता शहरावर जपानच्या आक्रमणाची भीती असते. अशा वातावरणात वावरणा-या व्योमकेश बक्षीची भूमिका सुशांतसिंह राजपूत याने साकारली. चित्रपटाचे दिग्दर्शन दिबाकर बॅनर्जी यांनी केले. ३ एप्रिल २०१५ रोजी प्रदर्शित झालेला हा चित्रपट फ्लॉप झाल्याने सुशांतच्या करिअरला धक्का बसला.

– सोनम परब

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या