24.4 C
Latur
Monday, September 20, 2021
Homeविशेषकॅमेरा-सेन्स

कॅमेरा-सेन्स

एकमत ऑनलाईन

तंत्रज्ञानाचे पडघम आणि वस्तुस्थिती यातलं अंतर स्पष्टपणे दाखवून देणा-या अनेक घटना आसपास घडत असतात. बहुतांश वेळा ‘अपरिहार्य’ हा शब्द आपल्या माथी मारून तंत्रज्ञान आपल्या अंगणात प्रवेश करतं. ते मानवी जीवन अधिक सुखकर, अधिक सुरक्षित बनवण्यासाठी असतं यात वाद नाही. परंतु सुख हे ब-याच वेळा मानण्यावर अवलंबून असतं आणि सुरक्षितता केवळ तंत्रज्ञानानं मिळू शकते ही अंधश्रद्धा आहे. तुम्हा-आम्हाला असुरक्षित करणारे लोक तंत्रज्ञानाच्या खूप पुढचे असतात. एखादं नवं तंत्रज्ञान आलं म्हणजे आपण अधिक सुरक्षित झालो ही भावना क्षणभंगुर असते.

तसं खरोखर झालं असतं तर आपल्या संगणकात सुरक्षित असलेली संवेदनशील माहिती परदेशी वृत्तपत्रात छापून येण्याच्या घटना घडल्या असत्या का? काही वर्षांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे आले तेव्हा लोक अक्षरश: मोहरून गेले होते. चो-या झाल्याच तर त्या लवकर उघडकीस याव्यात आणि मुद्देमालासह आरोपी सापडावेत, हा त्यामागचा मुख्य हेतू. पोलिसांचं काम सोपं व्हावं, ही अपेक्षा. परंतु सीसीटीव्हीनं काही प्रमाणात काम कमी केलं ते वृत्तवाहिन्यांच्या कॅमेरामनचं. स्पॉटवर न जाता अनेक ठिकाणचं ‘लाईव्ह फूटेज’ वाहिन्यांना आयतं मिळू लागलं. अनेक गंभीर अपघात, मारामा-या, खून अशी दृश्यं जी एरवी टीव्हीच्या पडद्यावर पाहता आली नसती, ती दिसू लागली. परंतु ओळख पटवण्याच्या मूळ हेतूचं काय?

सीसीटीव्ही कॅमेरे आल्याबरोबर त्यांची दखल सगळ्यात आधी चोरट्यांनी घेतली. कॅमे-याचं फुटेज संगणकातल्या नेमक्या कोणत्या भागात ‘सेव्ह’ केलं जातं, इथंपर्यंत सूक्ष्म माहिती चोरट्यांनी मिळवली. काही ठिकाणी किमती चीजवस्तूंबरोबरच सीसीटीव्ही फुटेजसुद्धा चोरीला गेलं. सर्वत्र कॅमेरे पेरलेले असल्यामुळे आपल्याला अधिक दक्षता घ्यावी लागणार आहे, हे मान्य करून चोरट्यांनी कार्यपद्धती बदलली. चेहरे दिसू नयेत याची हरप्रकारे खबरदारी घेतली जाऊ लागली. ताजा किस्सा नांदेड जिल्ह्यातल्या दिंद्रुड गावातला आहे. तंत्रज्ञान कितीही पुढे गेलं तरी ते चालवायला लागणा-या विजेचा अखंडित पुरवठा देशात फारच कमी ठिकाणी होतो.

ट्रान्सफॉर्मर पूर्वीसारखेच जळतात आणि पूर्वीसारखेच दोन-दोन दिवस दुरुस्त होत नाहीत. या गावात तसंच घडलं होतं आणि अंधाराचा फायदा घेऊन चोरटे गावात शिरले. किराणा मालाच्या दुकानाचं गोदाम फोडून आत शिरताना त्यांनी सर्वप्रथम छत्री उघडली. गोदामातल्या सीसीटीव्ही कॅमे-यात आपला मुखचंद्र दिसू नये, यासाठी ही खबरदारी. चोरीच्या संपूर्ण घटनेचं रेकॉर्डिंग झालंय. फक्त चोरट्यांचे चेहरे सोडून बाकी सगळं व्यवस्थित दिसतंय. मागे एकदा उत्तर महाराष्ट्रात संपूर्ण चेहरे झाकणा-या टोप्या घालून चोरटे दुकानातल्या सीसीटीव्हीसमोर चक्क नाचले होते आणि महागड्या पैठण्या चोरून त्यांनी पोबारा केला होता.

तात्पर्य, एखाद्या भागात बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमे-यांची संख्या, त्यावर झालेला खर्च आणि त्यामुळे उघडकीला आलेले गुन्हे यांचं ऑडिट एकदा व्हायला पाहिजे. या कॅमे-यांचा दरारा पापभिरू माणसाला मात्र अस्वस्थ करणारा असतो. ‘तुम्ही सीसीटीव्ही कॅमे-याच्या कक्षेत आहात’ असा बोर्ड हॉटेलात पाहून ज्यांच्या घशाखाली घास उतरत नाही, असे अनेकजण आहेत. रस्त्यावरून गप्पा मारत चालताना कॅमेरा दिसला म्हणून कॉन्शस होणारेही असतील. पण ज्यांच्यासाठी हा सगळा पसारा, ते मात्र निर्धास्त!

शैलेश धारकर

विणेकरी केशव कोलते ठरले यंदाच्या आषाढी वारीतील मानाचे वारकरी

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
196FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या