औरंगाबादचे नामांतर झाल्यानंतर त्याला विरोध दर्शवताना औरंगजेबाचे समर्थन केले जात असून ते सर्वथा अयोग्य आहे. औरंगजेब धर्मवेडा, धर्मांध, विध्वंसक, क्रूर आणि निर्दयी होता. तो प्रागतिक विचारांचा नव्हे तर प्र्रतिगामी विचारांचा होता. तो कोणत्याही समुदायाचा आदर्श होऊ शकत नाही. भारतासारख्या विशाल प्रागतिक, बहुप्रवाही, बहुसांस्कृतिक राष्ट्रांचा देखील तो आदर्श होऊ शकत नाही. स्वातंत्र्योत्तर धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा देखील तो आदर्श होऊ शकत नाही. त्यामुळेच औरंगजेबाचे अर्थात औरंगाबाद या नावाचे समर्थन होऊ शकत नाही.
औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर झाल्यानंतर त्याला विरोध दर्शवताना ‘औरंगाबाद’ या नावाचे अर्थात औरंगजेबाचे समर्थन करण्यासाठी त्याचे छायाचित्र नाचविण्यात आले. यासाठी काही मोजके नेते पुढे आले. या समर्थनामध्ये ‘औरंगजेब मुत्सद्दी होता. त्याची राहणी साधी होती. तो काटकसरी होता. तो स्वावलंबी होता. त्याने अनेक मंदिरांनाही देणग्या दिल्या. औरंगाबादचे नामांतर म्हणजे अल्पसंख्याक संस्कृतीवरील हल्ला आहे,’ असा युक्तिवाद केला गेला. इतके सर्व असले तरी औरंगजेबाचे अर्थात ‘औरंगाबाद’ या नावाचे समर्थन होऊच शकत नाही. कारण औरंगजेबाचे चरित्र आणि कार्य हे काही भारतीय मुस्लिमांचा आदर्श होऊ शकत नाही. तो काही भारतीय मुस्लिमांचा मसिहा, उद्धारकर्ता किंवा प्रेरणापुरुष अर्थात महापुरुष होऊ शकत नाही. कारण त्याचे संपूर्ण जीवन धर्मसहिष्णुतेने भरलेले नाही.
धर्मनिरपेक्षता हा शब्दप्रयोग किंवा संकल्पना आधुनिक असल्यामुळे मध्ययुगीन काळावर ती लादणे विसंगत आहे. औरंगजेबाचे जीवनकार्य धर्मांधतेने भरलेले आहे. त्याच्या धर्मांध भूमिकेमुळे शिवरायांनी त्याला एक समज देणारे पत्र पाठवले. त्या पत्रात शिवाजीराजे औरंगजेबाला म्हणतात ‘‘तुमचे पूर्वज (अकबर) समर्थ असतानादेखील त्यांनी जिझिया कर घेतला नाही. जिझिया कर लादून जो भेदभाव तुम्ही करत आहात ते गैर आहे. धार्मिक द्वेष बाळगून धर्मवेडेपणा करणे ही ईश्वराची अवज्ञा आहे. गरीब, अनाथ जनतेला त्रास देणे यात कोणत्याही प्रकारचे शौर्य नाही. न्यायबुद्धीने पाहता कोणत्याही दृष्टीने जिझियाचे समर्थन होऊ शकत नाही,’’ असे प्रगल्भ विचारांचे पत्र शिवरायांनी औरंगजेबाला पाठविले. औरंगजेब हिंदूंवर जिझिया कर लादून आर्थिक तूट भरून काढत होता; तर गरीब जनतेचे इस्लामीकरण करत होता. औरंगजेबाच्या धर्मांधतेवर शिवरायांनी कडक शब्दांत ताशेरे ओढलेले आहेत.
शिवाजीराजे धर्माभिमानी होते. संभाजीराजेही धर्माभिमानी होते, परंतु त्यांनी परधर्मियांचा छळ केला नाही. त्यांचे धर्मांतर करण्यासाठी मोहीम राबविली नाही. याउलट समकालीन पोर्तुगीज प्रतिनिधी डेलनचा म्हणतो की ‘शिवाजीराजे आणि त्यांची प्रजा मूर्तिपूजक असली तरी मूर्तिपूजा न करणा-यांना आपल्या राज्यात आनंदाने नांदू देतात’’. शिवाजीराजे, संभाजीराजे यांनी परधर्मियांचा छळ केला नाही. त्यांचे धार्मिक स्वातंत्र्य हिरावून घेतले नाही. ज्याचा त्याचा अधिकार ज्याला त्याला मिळायला हवा, ही शिवरायांची भूमिका होती. शिवाजीराजांकडून धार्मिक लढाई नव्हती. ती राजकीय होती, परंतु औरंगजेबाकडून ती जशी राजकीय होती तशीच ती धार्मिकही होती. औरंगजेब सक्तीने धर्मांतर करत असताना शिवाजीराजे, संभाजीराजे हात बांधून शांत बसले नाहीत.
स्वधर्मात परत येणा-या नेताजी पालकरांना त्यांनी कोणत्याही स्वकीय-परकीय धर्मांधतांचा मुलाहिजा न बाळगता स्वधर्मात घेतले. तर संभाजीराजांनी सक्तीने मुस्लिम झालेल्या गंगाधर कुलकर्णीला स्वधर्मात घेतले. आजच्या धर्मनिरपेक्ष-निधर्मी संकल्पना उदात्त असल्या तरी त्या मध्ययुगीन इतिहासावर लादणे विसंगत आणि अनैतिहासिक आहे. औरंगजेब केवळ हिंदूंसाठीच धर्मांध होता असे नाही तर इस्लाममधील सुधारणावाद देखील त्याला मान्य नव्हता. त्याने संगीत-गायन यावर बंदी घातली. प्रगल्भ विचारांचा त्याचा धर्मसहिष्णू बंधू दाराची त्याने हत्या केली. दाराच्या शिरच्छेदापाठोपाठ महान सूफी संत सर्मद यांचाही शिरच्छेद केला. त्यांची वधयात्रा काढली गेली. ‘त्या वधयात्रेत राजधानी रडली,’ असे प्राच्यविद्यापंडित शरद पाटील सांगतात. दारा आणि सर्मद यांच्या हत्येवरून स्पष्ट होते की, औरंगजेब हा इस्लाममधील सुधारणावादाच्या विरोधात होता. औरंगजेबाने स्वत:च्या वडिलांना नजरकैदेत डांबले, त्यांचे हाल-हाल केले. भावांच्या हत्या केल्या. पुत्र शहजादा अकबर याला पकडून मारण्यासाठी जंगजंग पछाडले. त्याला आश्रय दिल्यामुळे संभाजीराजांवर त्याने आक्रमण केले. संभाजीराजांना पकडून आग््रयाला पाठवावे, यासाठी दिलेरखानाला फर्मान पाठवले, परंतु फर्मान मिळण्यापूर्वीच संभाजीराजे निसटले. पुढे त्यांना पकडून ११ मार्च १६८९ रोजी तुळजापूर येथे हाल हाल करून निर्दयीपणे ठार मारले.
धर्मांध औरंगजेब आणि सनातनी धर्मांध यांच्या छळाने संभाजीराजांसारख्या महापराक्रमी, महाबुद्धिमान आणि सुंदर राजपुत्राचा वयाच्या अवघ्या बत्तीसाव्या वर्षी शेवट झाला. छत्रपती संभाजी राजांच्या हत्येनंतर छत्रपतींच्या कुटुंबियांना औरंगजेबाने कैदेत टाकले. छत्रपती राजाराम महाराज, महाराणी ताराराणी यांनी दक्षिणेत जाऊन औरंगजेबाविरुद्ध लढा तीव्र केला. राजाराम महाराजांच्या मृत्यूनंतर(१७००) औरंगजेबाला वाटले की, स्वराज्य सहज जिंकता येईल; परंतु महाराणी ताराराणी यांनी मोठ्या धैर्याने, शौर्याने लढा दिला. औरंगजेबाने त्याचा संपूर्ण भारतातील सुमारे ५० कोटींचा खजिना मराठ्यांविरुद्ध लढण्यासाठी ओतला, त्यावेळेस मराठ्यांचा वार्षिक महसूल फक्त २ कोटी होता. मराठा हा शब्द समूहवाचक आहे, तो जातीवाचक नाही. अठरापगड जाती बारा बलुतेदारांना ‘मराठा’ असे संबोधलेले आहे, असे मराठा इतिहासाचे महान भाष्यकार डॉ. जयसिंगराव पवार म्हणतात. राजारामाच्या मृत्यूनंतर कैदेत असणा-या संभाजीपुत्र शाहू महाराजांवर धर्मांतरासाठी औरंगजेबाने दबाव आणला. मातोश्री येसूबाई आणि शाहू महाराज यांच्यावर मोठे संकट कोसळले. या संकटाचा मोठ्या धैर्याने या माता-पुत्राने प्रतिकार केला. औरंगजेबाने काही मंदिरांना देणग्या दिल्या. त्याच्याही सैन्यात हिंदू होते, असा युक्तिवाद केला जातो.
एखाद्या अतिरेक्याने देवदर्शन केले, दानधर्म केला म्हणून तो निर्दोष होत नसतो. कोणत्या सत्ताधीशांच्या सैन्यात किती हिंदू-मुस्लिम आहेत यावरून त्या सत्ताधीशाची सहिष्णुता ठरत नसते. त्या सत्ताधीशाची विचारधारा, ध्येयधोरणे लोककल्याणकारी आहेत की नाही, हे महत्त्वाचे असते. औरंगजेबाचे ध्येयधोरण, विचारधारा सार्वजनिक लोककल्याणाची नव्हती, हे स्पष्ट होते. शिवरायांचे ध्येयधोरण, विचारधारा सार्वजनिक लोककल्याणाची होती. तीच परंपरा पुढे छत्रपती संभाजीराजांनी मोठ्या ताकदीने वृद्धिंगत केली. परंतु औरंगजेबाने त्यांची हत्या करून देशाचे मोठे नुकसान केले. औरंगजेबाच्या धार्मिक धोरणावर प्रकाश टाकताना महान इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंगराव पवार लिहितात, औरंगजेबाने अमूक एका हिंदू देवस्थानास सनद दिली, अशा बातम्या अधूनमधून वृत्तपत्रात प्रसिद्ध होतात. त्यामुळे सामान्य माणसांच्या नव्हे तर अभ्यासकांच्या मनात देखील संभ्रम निर्माण होतो. त्यासाठी औरंगजेबाच्या धर्मनीतीबाबतचे दोन पुरावेच आम्ही सादर करतो आहोत. औरंगजेबाचा विश्वासू चिटणीस इनायतुल्ला खान याने ‘अहकाम अलमगिरी’ या ग्रंथात औरंगजेबाच्या आज्ञा नमूद करून ठेवल्या आहेत. दरबारात बादशहा जे हुकूम करत असे ते ंिलहून ठेवण्याचे व संबंधित अधिका-यांना पाठविण्याचे काम त्याच्याकडे होते.
औरंगजेबाचा त्याने नोंदवलेला एक हुकूम असा- सोमनाथाचे मंदिर सौराष्ट्रात समुद्राच्या काठावर आहे. आमच्या राज्यकारभाराच्या सुरुवातीस ते उद्ध्वस्त होऊन तेथील मूर्तिपूजा बंद पडली होती. सध्या काय स्थिती आहे, माहीत नाही. जर मूर्तिपूजक तेथे पुन्हा पूजा करत असतील तर त्या मंदिराचा विध्वंस करावा. त्याची नावनिशाणी राहू नये. त्यांना तेथून हाकलून लावावे. औरंगजेबाचा दुसरा हुकूम असा- असे म्हणतात की सौराष्ट्रामध्ये आणखी एक मंदिर (द्वारका) आहे. ते उद्ध्वस्त करण्यासंबंधी आपल्याला लिहिण्याची मला बादशहाची आज्ञा झाली आहे. औरंगजेबाच्या या विश्वासू चिटणीसाच्या लिखाणावर इतिहास अभ्यासकांनी विश्वास ठेवण्यास हरकत नसावी, असे डॉ. जयसिंगराव पवार ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराबाई’ या ग्रंथात नमूद करतात. असा हा औरंगजेब धर्मवेडा, धर्मांध, विध्वंसक, क्रूर आणि निर्दयी होता. तो प्रागतिक विचारांचा नव्हे तर प्र्रतिगामी विचारांचा होता. तो कोणत्याही समुदायाचा आदर्श होऊ शकत नाही. भारतासारख्या विशाल प्रागतिक, बहुप्रवाही, बहुसांस्कृतिक राष्ट्रांचा देखील तो आदर्श होऊ शकत नाही. स्वातंत्र्योत्तर धर्मनिरपेक्ष राष्ट्राचा देखील तो आदर्श होऊ शकत नाही. त्यामुळेच औरंगजेबाचे अर्थात औरंगाबाद या नावाचे समर्थन होऊ शकत नाही.
-डॉ. श्रीमंत कोकाटे,
इतिहास अभ्यासक