26.9 C
Latur
Monday, June 14, 2021
Homeविशेषकॅशलेस व्यवहार काळजीपूर्वकच करावा

कॅशलेस व्यवहार काळजीपूर्वकच करावा

एकमत ऑनलाईन

कॅशलेस व्यवहाराची नवीन पिढीला सवय झाली आहे. तशी सवय जुन्या पिढीतील प्रौढांना तेवढी झाली नाही. पन्नाशीनंतरची पिढी ज्यांना जुने तेच सोने वाटते. नवीन तंत्रज्ञान शिकायला, आत्मसात करायला घाबरतात, त्यांना नवीन तंत्रज्ञानाचा वापर करताना त्यात चूक झाली व आर्थिक फटका बसला तर? अशी नकारात्मक मानसिकता आढळते. सध्या नवीन तरुण वर्ग कॅशलेस व्यवहाराद्वारेच आर्थिक व्यवहार जास्त करतात. तशा प्रकारचे सरकारचे धोरण देखील आहे. त्यास उत्तेजन दिले जाते. रोखीद्वारे व्यवहार करण्याऐवजी डिजिटल ट्रेंड वाढविण्यासाठी प्रयत्न केला जातो. ज्यात बँकेने कठोर नियम केले आहेत. प्राप्तिकर विभागाची करडी नजर अशा रोखीच्या व्यवहारावर असते. तसेच म्युच्युअल फंड हापूस, ब्रोकर प्लॅटफॉर्म देखील कॅशलेस व्यवहार वाढविण्यासाठी प्रयत्न होतोय.

बँकेसंदर्भात बोलायचे झाल्यास एटीएममधून अनेकवेळा रोख काढण्यावर जादा सेवाशुल्क लावणे, रोख रक्कम काढण्यावर कमाल रुपयांची मर्यादा, ज्यामुळे ग्राहकांचा कल हा कॅशलेस व्यवहाराकडे वाढून नोटा छपाईचा खर्च वाचविणे, भ्रष्टाचारास आळा घालणे, आर्थिक व्यवहाराचा पुरावा राहत असल्याने त्यावर कर द्यावा लागतो. असे व्यवहार हे कायदेशीर स्वरूपाचे होतात. आर्थिक व्यवहार बेकायदेशीर स्वरूपात होत असतील तर प्राप्तिकराची नोटीस येऊ शकते. वास्तविक पाहता आपण बँकेमध्ये आपल्या खात्यावर दहा लाखांपर्यंत रोख भरून बँक ठेव स्वरूपात आर्थिक व्यवहार कमाल स्वरूपात करता येतात. त्यापेक्षा जास्त मर्यादेत व्यवहार करता येत नाही. तसे झाल्यास प्राप्तिकराची नोटीस कदाचित येऊ शकते.

एखादा व्यक्ती स्थावर संपत्तीमध्ये जमीन-जुमला स्वरूपात गुंतवणूक करताना कॅशलेस स्वरूपातच असावी. अपवादात्मक परिस्थितीचा विचार करता तीस लाख रुपयांपर्यंत रोखीने व्यवहार करता येत असला तरी असा व्यवहार संशयाच्या फे-यात येऊ शकतो. प्राप्तिकर विभाग काहीवेळा तशी परवानगी देऊ शकत असले तरी भविष्यात प्राप्तिकराची नोटीस येऊ शकते. शक्यतो असा व्यवहार कॅशलेस पध्दतीने केलेला अधिक चांगला. असा व्यवहार हा खरेदी किंवा विक्री संदर्भात असू शकतो.

नांदेड जिल्ह्यास अवकाळी पावसाने झोडपले

बचत खात्याचा विचार करता एक लाख रुपयांच्या आत रोख रक्कम भरता येते. त्या संदर्भात उत्पन्नाच्या मार्गाचा पुरावा व पॅन नंबर द्यावा लागतो. चालू खात्याची अशी मर्यादाही ५० लाखांपर्यंतची आहे. त्यापेक्षा जास्त किंवा वारंवार असे व्यवहार होत असतील तर प्राप्तिकराची नोटीस येऊ शकते. म्युच्युअल फंड शेअर बाजार, बॉण्ड, रोखे इ.मध्ये गुंतवणूक करताना रोखीच्या स्वरूपात अपवादात्मक परिस्थितीत दहा लाखांपर्यंतच असा रोखी व्यवहार करता येईल. यासंदर्भात प्राप्तिकराचा विवरण पत्रकात तसा तपशिल द्यावा लागतो. त्याबाबतचा पुरावा देखील देणे बंधनकारक ठरते. त्यापेक्षा कॅशलेसद्वारे आर्थिक व्यवहार करणे अधिक सुरक्षित व फायदेशीर ठरू शकते.

अनेक व्यक्ती डेबिट कार्डासोबत क्रेडिट कार्डाचा उपयोग आर्थिक व्यवहार करण्यासाठी करतात. क्रेडिट कार्डद्वारे बिल बँकेत भरायची रक्कम जास्तीत जास्त एक लाखापर्यंतच रोख रक्कम भरता येते. त्या नियमाचे उल्लंघन क्रेडिट कार्ड बिल बँकेत जमा करताना होत असेल तर प्राप्तिकराची नोटीस येऊ शकते. यासाठी अनेकांनी कॅशलेस व्यवहाराची सवय जाणीवपूर्वक लावणे गरजेचे ठरते, तशी काळाची गरज झाली आहे.

वास्तविक पाहता के्रडिट कार्ड हे दुधारी शस्त्र आहे. त्याचा वापर आर्थिक शिस्तीने केला तर अधिक फायदा होऊ शकतो. परंतु आपल्याकडे आर्थिक बेशिस्तीची शिस्त असल्याने फायद्यापेक्षा अधिक तोटाच होतो. कारण क्रेडिट कार्डचा वापर कसा करायचा या संदर्भात असणारे अज्ञानच तोट्यासाठी कारणीभूत ठरते. आर्थिक शिस्त ज्याच्या अंगी असेल तर क्रेडिट कार्ड वापर केल्याने फायदा होतो. असे क्रेडिट स्कोअर मिळणे, रिवॉर्ड मिळणे, ज्यामुळे कमी किमतीत खरेदी होते. माझे अनेक मित्र व नातेवाईक अशा फायद्यासंदर्भात जागृत असतात. विमानाचा प्रवास व त्याचे भाडे अतिशय माफक याचा फायदा घेतात. त्यामुळे क्रेडिट कार्ड धारकाची बाजारपेठेत असणारी पत वाढते.

याच्या उलट असे क्रेडिट कार्ड हे बेशिस्तीने वापरले असेल तर कार्डची बिलेही विहित कालावधीत भरली असतील तर संबंधित बँका या त्याच्या ग्राहकासाठी जबर दंड व व्याज लावतात. त्याची वसुली पठाणी स्वरूपात करतात. अशा व्यवहाराची माहिती सिबिल रिपोर्टपर्यंत प्रवाही होते. त्यामुळे त्यांची पत ढासळते. पत घसरल्याने त्यांना मोठ्या स्वरूपाचे कर्ज मिळत नाही कारण त्यांची पत कमी झालेली असते. अशा प्रकारच्या दुष्टचक्रात अनेकजण (सापळ्यात) अडकतात. याचे भान नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणा-यांनी लक्षात ठेवूनच आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करावा लागतो.

कॅशलेस व्यवहाराचा अवलंब करताना मोबाईल, लॅपटॉप किंवा कॉम्प्युटरमध्ये वापरली जाणारी अ‍ॅप्स ही अधिकृत असावीत. तसे असेल तरच आपल्याला बँकेकडे तक्रार करता येईल. डिजिटल पेमेंटचा वापर करताना खूपच सतर्क प्रौढांनी असावे. कारण व्यवहार पूर्ण झाल्यावर लॉगआऊट करण्याची सवय बाळगावी. अक्रित साईट, अ‍ॅपचा वापर करावा ज्यामुळे नुकसान टाळता येते.

यासाठी कॅशलेस व्यवहार करताना पासवर्ड हा स्ट्राँग असावा. त्याची गुप्तता बाळगून तो सुरक्षित असावा. असुरक्षित नेट किंवा फुकटचे वायफाय याचा वापर टाळावा. अशा विंडो सुरक्षित असाव्यात. आपण वापरत असणारा पासवर्ड सातत्याने बदलावा. अनेकांना फिशिंग मेल येतात. त्याच्या जाळ्यात अलगद फसतात. यासाठी अँटीव्हायरसचा वापर करावा. अनेक वेळा आपल्या आर्थिक व्यवहाराचा डेटा चोरणारे अनेक दरोडेखोर मालवेअर्स अ‍ॅप आपल्या मोबाईल, कॉम्प्युटर, लॅपटॉपमध्ये अ‍ॅपद्वारे प्रवेश करतात. अशांना प्रतिबंध घालण्याची माहिती असावी. ज्यामुळे आपला आर्थिक व्यवहार सुरक्षित कॅशलेस पध्दतीने करता येतो. त्यात अतिआत्मविश्वास म्हणजे नुकसानीस स्वत: आमंत्रण दिल्यासारखेच. बघा पटतंय का ते?

प्रदीप गुडसूरकर
लातूर, मोबा.: ७०२०१ ०११४२

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
201FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या