37.8 C
Latur
Wednesday, May 25, 2022
Homeविशेषबदलती कुटुंबव्यवस्था

बदलती कुटुंबव्यवस्था

एकमत ऑनलाईन

आपल्याकडे एकत्र कुटुंबपद्धती बराच काळपर्यंत नांदत होती. इतर देशांतही ही कुटुंबपद्धती मान्य होती. याचे फायदे खूप जास्त प्रमाणात होते. आपापसात प्रेम होते. उमदी स्पर्धा होती. एकत्र कुटुंबाला वटवृक्षाची उपमा दिली जायची. पण कालांतराने ही पद्धत रोडावली. संयुक्त कुटुंबपद्धती संपून एकेरी कुटुंबपद्धती सुरू झाली. ‘छोटे कुटुंब, सुखी कुटुंब’ याला भरघोस मान्यता मिळाली आणि संयुक्त कुटुंबपद्धती उताराला लागली. ‘लिव्ह इन’चा ट्रेंडही अवतरला. पण कोणताही बदल कायमस्वरूपी नसतो.

आपला देश, आपली संस्कृती, ‘वसुधैव कुटुंबकम’ ला मानणारी आहे. म्हणजे सारी पृथ्वी माझं कुटुंब आहे. जगात बरेच देश कुटुंबसंस्था मानणारे, जपणारे आहेत. ‘अतिथी देवो भव’ हा मूलमंत्र आपल्याकडे मोठ्या अगत्याने जपला जातो. यावरून बरेच रामायण घडलेले आहे. अनेकांच्या सत्वपरीक्षा घेतल्या गेल्या. याविषयीची कथानकं पुराणात आढळून येतात.
एकत्र कुटुंबसंस्था ही आपल्या संस्कृतीची धरोहर आहे. पूर्वीपासून या पद्धतीचा सकारात्मक विचार केला गेलेला आहे. आपला देश कृषिप्रधान, एकत्र शेती, बागायती असायची. कुटुंबातील पुरुषमंडळी शेतीच्या कामात यायची, कामाची वाटणी व्हायची आणि त्यानुसार कार्यपद्धती ठरत असायची. आजोबा कुटुंबप्रमुख असायचे. त्यांच्या शब्दाला मान असायचा. कोणीही त्यांच्या शब्दाबाहेर जायचे नाही. स्त्रीवर्गात घरच्या कर्त्या स्त्रिया असायच्या. त्यांनाही तोच मान असायचा. प्रत्येक घरात एखादी स्त्री आत्या, काकू, आजी बालविधवा असायची. लाल आळवणात असलेली स्त्री प्रत्येक घरात बहुतेक वेळेला सापडायची. तिचं कार्यक्षेत्र फक्त स्वयंपाकघरच नाही; तर काही वेळा संपूर्ण घरावर धाक असायचा. यामागे तिचे कष्ट, कर्तव्यतत्परता आणि प्रेम असायचे. घरातल्या वडीलधा-या पुरुषांइतकाच तिलाही मान असायचा. एखाद्या निर्णयावरील अंतिम निर्णय तिचा देखील असायचा.

एकत्र कुटुंबाला वटवृक्षाची उपमा दिली जायची. आजी, आजोबा, काका, काकू, आत्या, आर्ईवडील, सर्वांची मुलंबाळं अशी एकूण २५-३० माणसं, शिवाय घरगडी, शेतावरचे गडी, शिकणारी मुलं असा जवळपास ५०-६० लोकांचा राबता असयाचा. घरातील स्त्रीवर्ग सतत स्वयंपाकघरात कामात असायचा. संध्याकाळी अंगणात तुळशीजवळच्या दिव्याची सांजवात झाली की आजीभोवती नातवंडांची गर्दी कथा ऐकायला जायची. अशी दृश्यं गावात घरोघरी दिसायची. हा काळ फारसा जुना नाही. मुख्य व्यवसाय शेती असल्यामुळे एकत्र कुटुंबपद्धती फार काळ तग धरून होती. निसर्ग आजच्यासारखा लहरी नव्हता. नियमित होता. पाऊस-पाणी पिकांना पोषक असायचे. दर सुगीच्या दिवसांत कारभारणीच्या अंगावर नवीन दागिना चमकायचा. कुटुंबातील वडीलधारी खांदेपालट व्हायची. प्रसंगी सल्ला मात्र जरूर विचारला किंवा दिला जायचा. सुखाच्या कल्पना लिमिटेड होत्या. वातावरण शांत- समाधानी होतं! मोठमोठे उद्योग-व्यवसाय वाढीला लागले होते. खर्च वाटला जात असे. लहान मुले मोठ्या भावंडांमध्ये चांगली वाढायची. हा सख्खा-हा चुलत असा भेदभाव नसायचा. एखादा भाऊ कमी शिकलेला असला तरी या रामरगाड्यात त्याचा निभाव लागून जात असे. संसार होत असे.

आधुनिक युगाचे वारे वाहू लागले. स्त्रीस्वातंत्र्याचा डोलारा तो-यात उभा राहू लागला! पाश्चिमात्त्य संस्कृती अनुसरली जाऊ लागली. बायका घराबाहरे पडल्या. नोकरी करू लागल्या. नवरा, बायको आणि दोन मुले या चौकोनी कुटुंबाची संकल्पना मूळ धरू लागली. नोकरी शोधार्थ गावाकडचे स्वस्थ-शांत जीवन सोडून शहराकडे वाटचाल होऊ लागली. नव-याच्या मागोमाग स्त्रिया आपापले संसार गुंडाळून शहराकडे धावू लागल्या. गावाकडची प्रशस्त घरे रिकामी होऊ लागली. शहरात छोटी छोटी घरं सजू लागली. शहराकडे ओघ वाढल्याने जागेच्या किमती आकाशाला भिडू लागल्या. नाइलाजाने स्त्रियांना संसाराला हातभार लावण्यासाठी घराबाहेर पडावे लागले. इथेच संयुक्त कुटुंबाची पक्की वीट खिळखिळी झाली. सणावारापुरते गावाकडे जाणे फक्त उरले. मोठमोठ्या वाड्यात म्हातारे आजोबा-आजी मुलांची वाट बघत बसू लागले. हा सारा बदलत्या वातावरणाचा परिणाम काही काळ होता.

कोणताही बदल कायमस्वरूपी नसतो. त्या-त्या बदलाची एक ठराविक काळापर्यंतच चलती असते. विभक्त कुटुंबपद्धतीचे काही चांगले तर काही अतिशय वाईट परिणाम भोगल्यावर परत निसर्गाकडे (बॅक टू नेचर) लोक आजकाल वळू लागले आहेत. आम्हाला घरात सासू-सासरे हवे असे विवाहोत्सुक मुली म्हणताना दिसू लागल्या आहेत. तर काही जणी अजूनही फक्त नवरा हवा! आईवडील नको, असेही म्हणतात. एक मुलींचा वर्ग असा आहे ज्यांना घरात माणसं हवीशी वाटतात. आताशा ब-याच मराठी-हिन्दी मालिकांमध्ये एकत्र फॅमिली दाखवितात. पण त्या फॅमिलीतील आपापसातले राजकारण, द्वेष एवढा पराकोटीचा दाखवितात की खरंच नको वाटतं! कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा घातकच असतो. ते जाऊ द्या! पण आज बदलत्या काळानुसार घडणा-या अपघातांनुसार पुन्हा संयुक्त कुटुंबांची संख्या वाढताना दिसतेय. आज कितीतरी नामवंत घराणी पिढ्यान्पिढ्या एकत्र नांदताना दिसून येतात. आपला व्यवसाय, नाव कमावताना दिसतात. महाराष्ट्रीयन कुटुंबापेक्षा इतर प्रांतीय वर्गात फार पूर्वीपासून एकत्र कुटुंबपद्धती दिसून येते. याचे प्रमुख कारण त्यांचे सामायिक व्यवसाय आहेत.

आज चित्र बदलतंय. विवाहसंस्था जिथे अडचणीत आहे तिथे संयुक्त तर सोडा पण विभक्त कुटुंबपद्धती देखील संपते की काय असा प्रश्न ऐरणीवर आहे. मुलामुलींची वाढती लग्नवयं, आर्थिक स्वातंत्र्य या गोष्टी कुठेतरी बोचतात. आज मुली मुलांपेक्षा अधिक कार्यक्षम आहेत. शिक्षणात, नोकरीत बरोबरीपेक्षा वरचढ आहेत. त्यामुळे विवाहात त्या थोड्या वरचढ ठरत आहेत. आता ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ हा नवप्रकार वाढीस लागला आहे. मुक्तता हवी बंधन नको. नाही पटलं तर तुझा-माझा मार्ग मोकळा! हा प्रकार लोकप्रिय होऊ लागला तरी, काही वेळेला आम्हाला घरात मोठी माणसं हवी असाही आग्रह धरला जातो. नाण्याच्या जशा दोन बाजू असतात तसेच या प्रकारात दोन मतप्रवाह आढळतात. उत्पत्ती-स्थिती-निवृत्ती याप्रमाणे. नवीन पुन्हा येऊ लागेल किंवा आलेले आहे. काळाच्या ओघात ब-याच पद्धती बदलतात. जुुन्याच पद्धती नवीन विचाराने सजून आपल्यासमोर येतात. मध्यंतरीच्या काळात कोर्टमॅरेज फार लोकप्रिय होते. त्या लोकांना आधुनिक समजले जात असे. पण आज पुन्हा विवाह ४-५ दिवसांचे होऊ लागलेत. त्यामुळे पुन्हा एकत्र कुटुंबपद्धतीचे रोपटे मूळ धरू लागले आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोना प्रकरणी आलेल्या एकटेपणात सर्वांची सोबत, सहवास, आपुलकी वाढीला लागली आहे. आपापसातील हेवेदावे कमी होऊ लागलेत. जीवनाचे क्षणभंगुरत्व प्रत्येकाला उमगले जात आहे. म्हणून एकमेकांना धरून राहू. या विचाराने पुन्हा एकत्र कुटुंबपद्धती रूढ होऊ लागली आहे. हा फरक, विचार निश्चितच स्वागतार्ह आहे. हो ना?

– अरुणा सरनाईक

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या