24.2 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeविशेषबदलते जागतिक राजकारण आणि पाकिस्तान

बदलते जागतिक राजकारण आणि पाकिस्तान

एकमत ऑनलाईन

दक्षिण आशिया आणि एकूणच जगाच्या राजकारणात पाकिस्तान आता बराच एकाकी पडला आहे. शीतयुद्धकाळात अमेरिकेला असलेली पाकिस्तानची गरज शीतयुद्ध संपल्यावर हळूहळू कमी होत गेली आणि अफगाणिस्तानातून अमेरिका बाहेर पडल्यावर तर आता ती अजिबातच उरली नाही. अफगाणिस्तानातील सध्याचे तालिबान सरकार हे नव्वदच्या दशकातील तालिबान सरकारपेक्षा वेगळे आहे. कारण या तालिबान सरकारवर अमेरिकेसहित जगातील सर्वच देशांचा मोठा दबाव आहे. त्यामुळे पाकिस्तानला खुलेआम मदत करणे अफगाण सरकारला आता शक्य नाही.

रशिया आणि युक्रेन युद्धामुळे जागतिक राजकारणात मोठा तणाव निर्माण झाला आहे. या युद्धात भारताची भूमिका तटस्थतेची आहे, पण अमेरिकेने म्हटल्याप्रमाणे रशियावर बहिष्कार टाकण्यास भारताने नकार दिला आहे, अमेरिका अर्थातच त्यामुळे नाराज आहे. काही प्रमाणात भारत आणि अमेरिका यांच्यात दुरावाही निर्माण झाला आहे. अशा वेळी अमेरिका दक्षिण आशियातील आपले संतुलन राखण्यासाठी पुन्हा पाकिस्तानला जवळ करेल का, असा प्रश्न काही तज्ज्ञांना सतावत आहे. अर्थात सध्या संपूर्णपणे चीनवर अवलंबून असलेल्या पाकिस्तानशी अमेरिका किती जुळवून घेईल हाही प्रश्न आहेच.
२०१४ पासून भारताच्या दृष्टीने पाकिस्तान हा विषय दुय्यम झाला आहे. काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या कारवायांना आळा घालण्याचा प्रयत्न भारत करतो आहे, तेवढ्यात त्याने पुन्हा पंजाबमध्ये खलिस्तानवाद्यांना खतपाणी पुरवण्याचा उद्योग सुरू केला आहे. पाकिस्तानच्या स्वत:च्या अशा अंतर्गत समस्या आहेत, पण त्या सोडून भारताच्या कुरापती काढायचा एकमेव उद्योग सुरूच आहे. देशात गंभीर आर्थिक, राजकीय समस्या असताना पाकिस्तानने दहशतवादी कारवायांपासून फारकत घेतलेली नाही, हे विशेष आहे. बदलत्या जागतिक राजकारणात पाकिस्तानचे महत्त्व आधीच खूप कमी झाले आहे आणि काळाच्या ओघात ते आणखी कमी होण्याच्या दिशेनेच त्या देशाची वाटचाल सुरू आहे.

दक्षिण आशिया आणि एकूणच जगाच्या राजकारणात पाकिस्तान आता बराच एकाकी पडला आहे. शीतयुद्धकाळात अमेरिकेला असलेली पाकिस्तानची गरज शीतयुद्ध संपल्यावर हळूहळू कमी होत गेली आणि आता अफगाणिस्तानातून अमेरिका बाहेर पडल्यावर तर आता ती अजिबातच उरली नाही. पाकिस्तान सध्या चीनवर पूर्णपणे अवलंबून असलेला देश आहे. गेल्या महिन्यात इम्रान खान यांचे सरकार बरखास्त झाल्यावर शहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखाली आघाडी सरकार स्थापन झाले आहे. इम्रान खान यांना बाजूला करण्यासाठी एकत्र आलेले शरीफ यांचा पाकिस्तान मुस्लिम लीग आणि भुट्टो यांचा पाकिस्तान पीपल्स पार्टी हे या आघाडीतील प्रमुख पक्ष आहेत. त्यांचे एकमेकांबरोबरचे सहकार्य किती काळ टिकते यावर पाकिस्तानातील राजकीय स्थैर्य अवलंबून आहे.

वास्तविक पाहता आंतरराष्ट्रीय राजकारण बदलू लागले आहे, त्याप्रमाणे पाकिस्तानच्या परराष्ट्र धोरणातही बदल होण्याची आवश्यकता आहे आणि देशाची आर्थिक परिस्थिती पाहता अंतर्गत धोरणांमध्ये आमूलाग्र बदल होणे गरजेचे आहे. पण नव्या सरकारने त्यादृष्टीने कोणतीच पावले उचललेली दिसत नाहीत. दक्षिण आशियातील देशांतील परस्पर संबंध सुदृढ असतील तर हा भूभाग मजबूत व्हायला मदत होईल. या भागातील सर्वांत मोठा देश आहे भारत आणि त्याला लागून असलेले सगळे देश आकाराने लहान आहेत. या देशांचे भारताशी सांस्कृतिक साधर्म्य आहे. पाकिस्तान आणि बांगला देश तर भारताचेच भाग होते. पण नेपाळ, म्यान्मार, श्रीलंका, भूतान आणि अगदी अफगाणिस्तानचीही कधी ना कधी भारताशी संलग्नता होती. त्याचमुळे या देशांचे धर्म कोणतेही असले तरी सांस्कृतिकदृष्ट्या हे देश भारताच्या जवळचे आहेत. पाकिस्तानचीही भारताशी तशीच जवळीक असायला हवी. पण पाकिस्तानने भारताशी कायम शत्रुत्वाचेच नाते ठेवले आणि आता या भारतकेंद्रित राजकारणात तो देश आता फसत चालला आहे.

अगदी १९४७ पासून पाकिस्तानचे धोरण भारतकेंद्रित होते. नवे राष्ट्र म्हणून जन्म झाल्यावर पाकिस्तानच्या नेत्यांनी देशउभारणीचे काम हाती घेण्याऐवजी काश्मीरवर हल्ला करून तो भूभाग बळकावण्याचा प्रयत्न केला. आजही भारतकेंद्रित राजकारणाचा परिणाम म्हणूनच तेथे दहशतवादाला राजाश्रय दिला जात आहे. वास्तविक पाहता या दहशतवादाच्या नादाने आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानला आर्थिक मदत मिळणे दुरापास्त झाले आहे. सगळा देश चीनच्या ताब्यात द्यावा लागला आहे. चीनची वसाहत यापेक्षा सध्या तरी पाकिस्तानचे काहीही महत्त्व नाही. तरीही या देशाचे ना राजकारण बदलत आहे ना धोरण. शहबाज शरीफ यांनी पंतप्रधान झाल्यावर पहिल्याच भाषणात काश्मीरचा राग आळवला, त्यावरूनच त्यांचे भारताबाबतचे धोरण काय असेल याची प्रचीती आली होतीच.

पण भारतात शांतता आणि दहशतवादाचा प्रभाव कमी करायचा असेल तर पाकिस्तानचे आणखी खच्चीकरण करण्याची गरज आहे. २०१४ पासून भारताने पाकिस्तानला एकाकी पाडण्यात बरेच यश मिळवले आहे. पण त्याच्या दहशतवादी कारवायांचा भारताला त्रास होऊ नये यासाठी भारताने अद्याप अधिक आक्रमकता दाखवलेली नाही. दहशतवादी हल्ले परतवून लावण्याचे काम आपल्या सुरक्षा यंत्रणा करतात, पण ज्या त-हेने पाकिस्तानी दहशतवादी भारतात घुसतात आणि इथली शांतता भंग करतात, त्या त-हेने भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात नाही. हे हल्ले पूर्णपणे थांबवण्यासाठी आक्रमक रणनीतीची आवश्यकता आहे. अजून तरी भारताने ती अवलंबिलेली नाही. काश्मीरमधील दहशतवाद्यांना पोषक असलेली इकोसिस्टम पूर्णपणे नेस्तनाबूत करायची असेल तर पाकिस्तानचा बंदोबस्त करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय राजकारणात या देशाला एकाकी पाडून त्याची कोंडी करण्याची भारताची रणनीती बरीच यशस्वी झाली आहे. पाकिस्तान आणि चीन यांची युती संपुष्टात येणे म्हणूनच गरजेचे आहे. चीनचे अंतर्गत राजकारण आणि आंतरराष्ट्रीय राजकारण दोन्ही बरेच गोत्यात आले आहे. चीनच्या सत्तारूढ कम्युनिस्ट पक्षात मतभेद उफाळून आले आहेत. अध्यक्ष शी जिनपिंग यांच्याविषयीही संदेह निर्माण झाला आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणात चीनची विस्तारवादी भूमिका त्याला एकाकी पाडत चालली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानला चीन किती वर्षे सांभाळू शकेल हा प्रश्नच आहे.

पाकिस्तानमध्ये इम्रान खानचे सरकार जाऊन शरीफ यांचे सरकार आले याचा अर्थ तेथे राजकीय स्थैर्य निर्माण झाले असा नाही. एक तर हे आघाडीचे सरकार आहे आणि पाकिस्तान मुस्लिम लीग आणि पाकिस्तान पीपल्स पार्टी हे दोन परस्परांचे विरोधक आहेत. केवळ इम्रान खान यांचे सरकार बरखास्त झाल्याने निर्माण झालेल्या संधीचा फायदा या दोन पक्षांनी घेतला आहे. त्यामुळे शहबाज शरीफ यांच्या कारकीर्दीत काही ठोस धोरणात्मक निर्णय होतील अशी अपेक्षा करण्यात अर्थ नाही. पाकिस्तानी लष्कराची मर्जी सांभाळत त्यांना राज्यकारभाराचे शकट हाकायचे आहे. त्यामुळे पाकिस्तानात स्थैर्य, समृद्धी आणि ऐक्य निर्माण होण्यासाठी आवश्यक असणारे धाडसी निर्णय हे सरकार घेऊच शकत नाही. भारताच्या बाजूने बघायचे तर पाकिस्तानला भारताने आता बरेच मागे सोडले आहे. कोणत्याच बाबतीत भारत आणि पाकिस्तान यांची बरोबरी होऊ शकत नाही. आकार, आर्थिक, राजकीय, सामाजिक या सगळ्याच स्तरांवर भारत पाकिस्तानच्या खूप पुढे आहे.

-मिलिंद सोलापूरकर

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या