27.4 C
Latur
Tuesday, September 27, 2022

केऑस

एकमत ऑनलाईन

मोरया..! ‘पुढच्या वर्षी लवकर या,’ असं गेल्या वर्षी
म्हटलं होतं, ते आमंत्रण स्वीकारून आपण खरोखर लवकर आलात. या देवा, आपलं मन:पूर्वक स्वागत! जल्लोषात या; पण रस्त्यावरून थोडं जपूनच या. मान्य आहे, खड्डे नेहमीच असतात आणि तुम्हालाही त्याची सवय झालीये… सगळं खरं; पण यावेळी खड्डे नेमके कुणाच्या कार्यकाळात पडले आणि ते भरण्याची जबाबदारी कुणाची, हेच अजून ठरलेलं नाहीये. असे खड्डे जास्तच धोकादायक! मागल्या कारभा-याच्या काळात झालेल्या चांगल्या गोष्टींच्या श्रेयासाठी दोघंही भांडतात; पण वाईट गोष्टींच्या जबाबदारीचा वाटा दोघंही नाकारतात. तुमच्या उत्सवासाठी मांडव घालायचा असेल आणि त्यासाठी खड्डे खणले जाणार असतील, तर मात्र त्यासंबंधी इतके नियम आणि अटी आहेत जणूकाही रस्ते काचेसारखे गुळगुळीत करून ठेवलेत. असो, तर यावर्षीची विशेष खबरबात सांगायची झाल्यास तुमच्या उत्सवापेक्षा नवरात्रोत्सवाकडे सगळ्यांचं लक्ष अधिक आहे,

हे प्रामाणिकपणे कबूल करतो. मुळात नवरात्रोत्सवाचंही कुणाला फारसं काही पडलेलं नाहीये… पण दस-याकडे मात्र सगळ्यांचंच लक्ष आहे. कारण यंदा उत्सव कोणताही असो, ‘यांचा की त्यांचा’ हा एकच प्रश्न चर्चेत आहे. दस-याच्या मेळाव्याला मैदान कुणाला मिळणार आणि मैदान कोण मारणार, याची चर्चा गणेश चतुर्थीपासूनच सुरू आहे. बाकी गोपाळकाला वगैरे ‘ओक्केमध्ये’ झाला. गोविंदांना बक्षिसं, विमा, नोकरी… सर्वकाही यथासांग पार पडलं. गोविंदा उत्सवात ‘यांच्या बालेकिल्ल्यात त्यांची दहिहंडी’ वगैरे शीर्षकाच्या बातम्या बघून शेवटी लोकच कंटाळले. पण नेतेमंडळी आजही एकमेकांच्या प्रभावक्षेत्रात मुद्दाम काहीतरी करायचंच, या निर्धारावर ठाम आहेत. एवढं करून वेगळ्या संकल्पना कुणालाच सुचत नाहीत. दहिहंडीसाठी तीच ती रोख बक्षिसं आणि तेच ते सेलिब्रिटी! एवढंच कशाला, त्यांची गाणी आणि डान्ससुद्धा गेल्या वर्षीसारखेच! गोविंदांना नोकरी देण्याची कॉन्सेप्ट शोधून काढली, तर ‘पहिल्या थरातल्या गोविंदांना नोकरी देणार की सगळ्यात वरच्या थरातल्या गोविंदांना देणार,’ असा कुजकट प्रश्न विचारून कुणीतरी याही संकल्पनेतली हवा काढून घेतली. हे असं चाललंय बघा देवा..!

गणेश चतुर्थीच्या आसपास डायरेक्ट दस-याच्या मेळाव्यावरून वाद सुरू होणार असेल, तर तुम्ही स्वत:ला खरोखर भाग्यवान समजा. या घडीपर्यंत तरी तुमच्या उत्सवावरून फारशी राजकीय धुसफूस झालेली नाही. असंच वातावरण अनंत चतुर्दशीपर्यंत राहिलं तर लोक राजकारण्यांना अनंत आशीर्वाद देतील. बाकी प्रसादाची वगैरे तयारी झालेली आहे. अहो, महागाई आहेच की; पण तुमच्यापुढे तिचं रडगाणं गाण्याची आमची रीत नाही. आमच्यापुढे यंदा भलतेच प्रश्न असले तरीसुद्धा तुमचा उत्सव यथासांग पार पडेल आणि आमचा उत्साह तसूभरही आटणार नाही, याची खात्री बाळगा! बाप्पा, आपण विघ्नहर्ते आहात आणि तळातल्या माणसाचं विघ्न दूर कराल अशी खात्री आहे. आम्ही स्वत:साठी यंदा काहीही मागणार नाही. कदाचित आमच्याकडे सर्वकाही असेल… किंवा नसलं तरीसुद्धा आम्हाला मनापासून तसं वाटत असेल. आम्ही मुळातच खूप गोंधळलेले आहोत. आमच्या डोक्यात प्रचंड मोठ्ठा केऑस आहे आणि आपण सुखी आहोत की नाही, हेही हल्ली कळेनासं झालंय. हा केऑस तसाच ठेवा बाप्पा… किमान दु:ख तरी होत नाही!

– हिमांशु चौधरी

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या