31.3 C
Latur
Saturday, May 8, 2021
Homeविशेषलहान मुलांच्या गोष्टी आणि त्यांचे भावविश्व

लहान मुलांच्या गोष्टी आणि त्यांचे भावविश्व

एकमत ऑनलाईन

‘‘एक घनदाट जंगल होतं. या जंगलाच्या पायथ्यालगत एक वाडी होती. वाडीतली सगळी माणसं त्या जंगलाचे रोज आभार मानीत कारण त्या जंगलामुळेच त्या वाडीतल्या सा-या लोकांच्या चुली पेटत. जंगलातला वाळलेला लाकूडफाटा जमवून तो जवळच्या गावात विकून येत. मोळी विकून आलेल्या पैशातून वाडीवरच्या माणसांच्या मुलाबाळांना अन्न मिळे. आता उन्हाळा सुरू झाला होता, शाळेला सुटी लागली आणि सगळी मुलं चिंचा, कै-या, जांभळं खायला जंगलाकडे निघाली….’’

अशा असंख्य गोष्टी आपल्या बालपणी कोणी ना कोणी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टींची तल्लीनता त्यातील गोडवा आठवला की, ते दिवस मनाला आल्हाद देतात. खरं पाहिलं तर मानवाला भाषा अवगत झाली व ती संवादाचे साधन बनली तेव्हापासून गोष्ट सांगणे या प्रक्रियेला जास्त महत्त्व आलं. असं म्हटलं जातं की, स्वत: जगण्यासाठी आपण गोष्ट सांगत असतो. जगातल्या प्रत्येकाकडे सांगण्यासारखी एखादी तरी गोष्ट असतेच मग तो लहान असो किंवा मोठा, प्रत्येकाला गोष्ट ऐकायला आणि सांगायला दोन्ही आवडतं. आपली मुलं जेव्हा शिशुगटात असतात तेव्हा ती अतिशय वेगाने भाषा अवगत करत असतात. त्यांनी ऐकलेल्या प्रत्येक नवीन शब्दाचा अर्थ ते जाणून घेत असतात. लहान वयातल्या मुलांची भाषा समृध्द करणारे गोष्टीइतके सुंदर दालन कोणतेच नाही.

न्यूरोसायंटिस्ट (मेंदूविषयी संशोधन करणारे शास्त्रज्ञ) आणि सायकोलिंग्विस्ट (भाषिक ज्ञान व भाषा शिकण्याची वृत्ती आणि मानसिक प्रक्रिया यांच्या संबंधांचा अभ्यास करणारे तज्ज्ञ) यांनी केलेल्या नव्या संशोधनानुसार एक ते चार वर्षे वयात दोन भाषा शिकण्याने मानवी मेंदूची विविध भाषा शिकण्याची क्षमता विकसित होते तसेच लहान मुलांच्या बाबतीत त्यांना दोन भाषांमधील फरक समजून कोणत्या परिस्थितीनुसार कोणत्या भाषेचे आकलन करायचे हे समजण्याची त्यांची क्षमता विकसित होते. यासाठी मुलांना शिस्तबद्ध पद्धतीने भाषा शिकवणे गरजेचे असते. अर्थातच गोष्ट ही त्यामधील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. गोष्टींमुळे बालविकासात मदत होते. गोष्टींची पुस्तके वाचल्यामुळे तसेच चित्रमय पुस्तकांमुळे तर मुलांच्या भावविश्वात एक वेगळे वलय तयार होते.

‘चिन्हांकित यादीतली माणसं’

मेंदूच्या विकासासाठी आवश्यक
गोष्टी भावना आणि भाषा यांच्या पोषणाला मदत करतात. बालविकास तज्ज्ञांच्या मते आपल्या बाळासोबत आपण केलेलं गोष्टींचं वाचन हे त्यांच्या मेंदूच्या विकासाला पूरक ठरतं. गोष्टींच्या माध्यमातून मेंदूच्या जोडण्या वेगाने होतात. तसेच ते मुलांच्या मानसशास्त्रीय आणि शैक्षणिक विकासाला पूरक ठरते असे प्रतिपादन क्लेअरमॉन्ट ग्रॅज्युएट युनिव्हर्सिटी अमेरिकेतील पॉल जे. झॅक या मेंदुविकासातील संशोधकांनी केले आहे.

आत्मविश्वासात वाढ होते
कोणतीही नवीन गोष्ट लहान मुलांचं लक्ष लगेच वेधून घेत असते. ते गोष्टी लक्षपूर्वक ऐकत असतात. त्यामुळे मुलांची एकाग्रता वाढते. अनोळखी किंवा यापूर्वी कधीच न ऐकलेले शब्द कानावरती पडल्याने त्यांच्या शब्दसंग्रहात वाढ होते. गोष्टी सांगणा-या व्यक्तीच्या चेह-याचे ते निरीक्षण करतात. त्यांच्या शब्दातील चढ-उताराकडे मुलांचं बारीक लक्ष असतं. कधी कधी गोष्टीतलं काहीच न कळणा-या लहान मुलांनांही गोष्टी कळू लागतात. पालकांनी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणेच ते गोष्टी सांगू लागतात. स्वत: गोष्टी रचतात. अबोल मुलंसुध्दा बोलकी होतात.

मुलांची कल्पकता वाढते
मुलांच्या जगात नवीन पात्रांना विशेष महत्त्व असते. गोष्टीमधलं विलक्षण जग त्यांच्यातील कुतुहल जागं करतं. आपल्याभोवतीचं विश्व, ग्रह, तारे, विविध प्रकारचे विषय त्यांना माहीत होतात. एखाद्या गोष्टीबद्दल वाटणारं कुतुहल त्याचा शोध घेण्याचा ते कायम प्रयत्न करत असतात. कल्पनेच्या माध्यमातून ते हव्या त्या गोष्टींचा वेध घेतात. गोष्टीतल्या पात्रांशी समरस होतानाच मुलं स्वत:ची कल्पकता वापरायला लागतात. मुलांना गोष्ट फक्त सुरू करून द्यायची मग गोष्टीतला देवमासासुध्दा शाळेत जातो. टाय बांधतो. मित्रांशी गप्पा मारतो. वेळेवरती स्कूल बसची वाट पाहतो या सगळ्या त्यांनी रचलेल्या गोष्टी त्यांना कमालीचा आनंद देतात. अशा गोष्टी रचण्यामधून काही वेळा मुलांना होणारे त्रासही ध्यानात येतात.

पालक-मुलांमधील नातेसंबंधाची वीण घट्ट होते
मुलं जेव्हा गोष्टीत रमतात तेव्हा ते त्यातील भावनांशी एकरूप होतात. आपल्या भावना सध्या नक्की कोणत्या आहेत त्या स्वीकारायला त्यांना मदत होते. विशेष म्हणजे आपल्यालाच असा त्रास होत नाही तर आपल्या सोबत ताई, दादा, इतरही व्यक्ती आहेत, त्यांनाही तशाच भावना असतात याचे आकलन मुलांना होते. खरे पाहता मुलांच्या सोबत गोष्टी सांगण्यासाठी फक्त रात्रच असावी असे काही नाही जेव्हा केव्हा तुम्ही आणि मुलं निवांत असाल अशी कोणतीही वेळ गोष्टींसाठी योग्य असते. अभ्यासक असं सांगतात की, गोष्टीतल्या गप्पा करता करता मूल आणि पालक यांच्यामध्ये तयार झालेला कम्फर्ट झोन मुलांना अनेक प्रकारच्या ताणातून मुक्त करतो.

भाषिक विकास आणि शिक्षण
मुलांच्या भावविश्वात गोष्ट हा नवीन शब्दांचा, कल्पनांचा परिचय करून देणारा उत्तम मार्ग असतो. अगदी सुरुवातीच्या काळात लहान मुलांसाठी चित्रांच्या पुस्तकांनी सुरुवात करून, किशोरवयीन मुलांसाठी अधिक पुढच्या टप्प्यावरती वाचनाची चालना देणं सोयीचं होतं. गोष्टीतले शब्द, संकल्पना, आकार, जागा, रंग, आकारमान, अशा वेगवेगळ्या पैलूंनी मुलांना भाषेची ओळख होते. वस्तूंची नावे, विविध संकल्पनांबद्दल मुलं प्रश्न विचारतात. कौटुंबिक कलह, आई-बाबांचं वेगळं राहणं किंवा त्यासारख्या घटना घडल्यानंतर मुलांना असे भावनिक धक्के पचवताना ते अधिक वेदनादायक होऊ नये ते समजावून सांगण्यासाठी देखील गोष्टी उपयुक्त ठरू शकतात. गोष्टी ऐकल्यामुळे किंवा वाचल्यामुळे मुलांना हे जग किती वैविध्यपूर्ण आहे आणि आपल्यासारखीच पण अडचणीत असलेली सुध्दा माणसं आहेत याची जाणीव होते.

अनेकदा मुलं वर्गात शिकवल्याने शिकत नाहीत पण गोष्टी सांगितल्या की शिकतात. प्रसिध्द शिक्षणतज्ज्ञ गिजुभाई बधेका यांनी त्यांच्या ‘दिवास्वप्न’ या पुस्तकात ते शिक्षक म्हणून कार्यरत असताना मुलांना एक महिना कशा गोष्टी सांगितल्या आणि ती न ऐकणारी, बेशिस्त मुलं कशी अफलातून पध्दतीने शिकली याचे फार सुंदर आणि ओघवत्या शैलीत वर्णन केले आहे. आयुष्यातला गोंधळ सोडवून सोपेपणा, साधेपणा आणि जगातील इतर व्यक्तींचं दु:ख समजून घेण्याची ताकद केवळ गोष्टीमधून मिळत असते. थोडक्यात काय तर लहान मुलांचं भावविश्व समजून घ्यायचं असेल तर आधी त्यांच्याबद्दलच्या गोष्टी वाचा. मग त्यांचं भावविश्व उमजेल. सध्या कार्टुनच्या आहारी गेलेल्या मुलांना वास्तविक जगाशी जोडायचं असेल तर गोष्टीसारखा सोपा मार्ग नाही.

प्रा. पंचशील डावकर
मो. ९९६०० ०१६१७

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,493FansLike
182FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या