34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeविशेषमुलांचा अभ्यास आणि पालकांची कसरत

मुलांचा अभ्यास आणि पालकांची कसरत

एकमत ऑनलाईन

कनुप्रिया एका मल्टिनॅशनल कंपनीत एच. आर. आहे. ती पालकांच्या एका सत्रात हर्षबद्दल खूप त्रासलेल्या स्वरात सांगत होती. ‘‘कितीही सांगितलं तरी हा मुळीच अभ्यास करत नाही. त्याला सोबत घेऊन मी शेड्युल बनवलं, मी सध्या वर्क फ्रॉम होम करतीये, त्याला सांगितलं माझ्यासोबत अभ्यासाला बस असं म्हणून. खूप जास्त रागावल्याशिवाय तो अभ्यासाला बसतच नाही. मात्र खेळायला, मित्रांमध्ये गप्पा मारायला त्याला फार आवडतं. मला खूप त्रास होतोय अशा त्याच्या वागण्याचा. मी काय करू?’’

हा त्रागा आपल्या अवतीभोवतीच्या बहुतांश पालकांचा आहे. कनुप्रिया ही त्यामधील एक प्रतिनिधी आहे. मूल अभ्यासासाठी बसत नाही किंवा त्याला अभ्यास कर म्हणून खूपदा सांगावं लागतं. वरच्या क्लासमध्ये मूल गेलं की, मुलांचा अभ्यास नक्की कसा घ्यावा? हे समजत नाही. मुळात पालक म्हणून पालकांच्या आकलनाचा लोचा झालेला असतो आणि तो म्हणजे मुलांचा अभ्यास घेणं, खरोखरच तो काही भाजीपाला, कपडे किंवा बाजारातलं सामान आहे का जे घेता येतं.. तर नाही. जर ते घेता आलं असतं तर ट्युशन्सच्या नावावरती जो उदंड व्यापार चालतो तो चालला नसता किंवा मग वर्किंग पालकांपेक्षा जे पालक घरी राहतात त्यांच्या मुलांचा अभ्यास खूप छान घेतल्यामुळे ते सगळेच टॉपर झाले असते.

तशी उदाहरणं पावलोपावली आपल्याकडे पहायला मिळाली असती. मुळात एक सत्य आपण स्वीकारले पाहिजे ते म्हणजे, ‘‘मुलांचा अभ्यास मुलांनीच करायचा असतो. त्याच्या सहवासात राहून त्याला अभ्यासासाठी आपण प्रोत्साहित करू शकतो.’’ कुठल्याही प्रकारे शिक्षा केल्याने किंवा धाक दाखवून, मुलाला टोचून बोलण्याने त्याच्या मनाला इजा होत असतात. त्याच्या मनात आपल्याला इच्छेविरुध्द ज्या गोष्टी करायला लागतात त्याविषयी अधिकच द्वेष निर्माण होण्याच्या शक्यता जास्त आहेत. अशा मुलांना आपण बावळट आहोत, आपल्याला काहीच जमत नाही, या भीतीपोटी उरलासुरला आत्मविश्वास सुध्दा विरून जाऊ शकतो.

अलोक खूपदा आपण कसं गरिबीतून मोठं झालो हे मुलांना ऐकवत असतो, ‘‘अरे आमच्या लहानपणी हे असं पंख्याखाली, टेबल-खुर्चीवरती आरामात बसुन अभ्यास करायचं भाग्य नव्हतं. साधं जेवायला मिळणं सुध्दा मुश्किल होतं. तरी आम्ही अभ्यास केला कारण आम्हाला आमची गरिबी संपवायची होती. जरा अभ्यास करा. जाण ठेवा आमच्या श्रमाची. ’’

खरं म्हणजे पालक म्हणून थोडं आपण स्वत:चं आत्मपरीक्षण करायला हवं. आपण कशा प्रकारे मुलांशी संवाद साधत आहोत हे पहायला हवे. आपण मुलांची तुलना आपल्या बालपणाशी किंवा आपल्याला आलेल्या दारिद्र्याच्या अनुभवांशी करत आहोत का? त्याला आपण अभ्यासावरून टोमणे मारतो का ? ते मारल्यामुळे आजपर्यंत खरोखर काही परिणाम झालाय का? किंवा मुलांना मी तुझ्यासाठी किती पैसे खर्च करतो याचा अंदाज आहे का? असे सारखे म्हणतो का? हा पालक आणि मूल यातील संवाद भावनिक अर्थाने कोरडाठाक करणारा आहे. आपण पालक म्हणून कितीही खस्ता खाल्ल्या असतील, अनेक प्रकारे कष्ट करत असू पण मुलांनी आपल्या इच्छेनुसारच वागलं पाहिजे हा अतिरेक आहे. हे चित्र त्या दोघांसाठी आनंददायी निश्चितच नाही. त्यासाठी काय करायला हवं?

पालक मुलांच्या सोबत त्याच्या भावविश्वासवे असतील तर ती मुलांना फार आनंददायी आणि आल्हाददायक वाटणारी बाब आहे . म्हणून मुलांचा अभ्यास चालू असताना मोबाईल, लॅपटॉप किंवा इतर कामे करत बसू नये. हवं तर त्याच्या सहवासात पुस्तक वाचावं.

उमरी नगरपालिकेतील प्रभारी राजमुळे घरकुल लाभार्थ्यांचे झाले बेहाल

लोकशाही मार्गाने मुलांना विचारा की, त्यांना नेमक्या कोणत्या वेळा अभ्यासासाठी आवडणार आहेत. काही मुलांना दुपारी, काहींना संध्याकाळी किंवा काहींना सकाळी अभ्यासाचा मूड असतो. त्यांच्या कलेने तो वेळ ठरवायला हवा. त्यांना खेळण्यासाठी बाहेर जायचं आहे नेमकं त्याचवेळी आपण ‘‘अभ्यास कर. बाहेर जाऊ नकोस!’’ म्हणून त्याला अभ्यासाला बसवलं, तर बिच्चारं ते मूल बळजबरीने अभ्यासाला बसणार कारण ते या परिस्थितीमध्ये बिच्चारं आहे. पण अभ्यास कितीसा करणार आहे. त्यापेक्षा त्याला पर्याय द्या, नेमकं कधी अभ्यासाला बसणार आहेस? मुलांना जिथे आवडतं, त्यांना अभ्यास करताना आनंद, मौज वाटेल ती जागा, त्याला हवं असणारं साहित्य कागद, पेन्सिल, खोडरबर, कात्री ते द्यावं.

शाळेतील शिक्षकांना भेटा. त्यांना जाणून घ्या, त्यांच्याशी संवाद साधा, शाळेच्या बैठका, परिषदा, उपक्रम कधीही कमी महत्त्वाचे आहेत असे समजू नये. शिक्षकांना आपल्या मुलाकडून नक्की काय हवंय? कसं हवंय? त्याची चर्चा करायला हवी. खरोखर मुलांना रंजक पध्दतीने शिकवलं जातं का? जे शिकवलं जातं ते बालसुलभ आहे का ते बघा. मुलांना आधी करुद्या : Doing by learning द्वारे शिकू द्या. मूल नेमकं काय करतं, जर त्याने चूक केली तरी ती दुरुस्त करण्यासाठी प्रोत्साहित करा. स्वत: दुरुस्त करायला घेऊ नये. पोहताना जसे आपल्यासाठी इतरांना पोहायला सांगता येत नाही; स्वत: आपल्याला कृती कराव्या लागतात तसेच.

तुमच्या मुलाच्या बाजूने रहा
चांगले गुण मिळवण्यासाठी किंवा चांगले मार्क्स मिळवण्यासाठी तुमच्या मुलावर दबाव आणू नका. त्याच्याशी सौजन्याने आणि सौम्यतेने राहावं आणि त्याच्या दृष्टिकोनातून गोष्टी समजून घेण्याचा हळुवार प्रयत्न करा. तुमच्या मुलाला त्याच्या अभ्यासासाठी सकारात्मक पद्धतीने जबाबदार बनवण्याचा प्रयत्न करा, कारण कोणत्याही प्रकारच्या नकारात्मकतेमुळे मूल बंडखोर बनू शकतं आणि सततच्या अशा रेट्यामुळे निराश होऊन तुमचा निषेध करू शकतं मग तो निषेध ब-याचदा कशासाठी आहे हे तुम्हाला समजेलच असे काही नाही. तुमचा मुलगा कोणत्या प्रकारे छान शिकू शकतो हे समजून घेणे फार महत्त्वाचे आहे. त्याला श्रवण केल्याने, चित्रामधून किंवा कृती केल्यानंतर आकलन होते हे निरीक्षण करणे अत्यंत आवश्यक आहे. वाचनाची आवड तुमच्या मुलांना तुमच्या अनुकरणातूनच लागणार आहे. बालवयात वाचलेल्या असंख्य गोष्टी मुलांच्या अंत:करणाचं पोषण करतात म्हणून त्यांना वाचनप्रक्रियेत पुढाकार द्यावा, हे वाचून दाखवशील का? मला तुझ्या आवाजात ऐकायचं आहे. अशा प्रोत्साहनामधून, गोष्टीमधून मुलांची कल्पकता वाढते. त्याचं भावविश्व समृध्द होतं. अगदी छोट्याशा प्रयत्नांसाठी मुलांना शाबासकी द्या.

प्रा. पंचशील डावकर
मो. ९९६०० ०१६१७

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या