22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeविशेषपुन्हा शीतयुद्ध?

पुन्हा शीतयुद्ध?

आंतरराष्ट्रीय परिस्थिती वेगाने बदलत आहे. विशेषत: हिंदी-पॅसिफिक महासागर क्षेत्राबाबत बोलायचे तर तिथे मोठ्या हालचाली होत आहेत. चीन आक्रमक आहेच, त्याची आक्रमकता सगळ्यांनीच अनुभवली आहे, आता पाश्चिमात्त्य देश आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांच्या धोरणांत बदल होऊ लागला आहे. ते पाहता आंतरराष्ट्रीय सुरक्षा व्यवस्थेत मोठा बदल होत आहे.

एकमत ऑनलाईन

चीन हा संपूर्ण जगासाठी डोकेदुखी बनला आहे. आपल्या आक्रमक धोरणाने त्याने जगात पुन्हा शीतयुद्धासारखी स्थिती निर्माण केली आहे. तैवानमध्ये जे घडत आहे, त्यामुळे तर सगळेच देश अस्वस्थ झाले आहेत. जगातील प्रमुख देशांनी तर आपली संरक्षण व्यवस्था सुसज्ज करायला सुरुवात केली आहे. ऑस्ट्रेलियाने आण्विक क्षमता असलेली पाणबुडी खरेदी केली आहे तर भारतानेही मोठी शस्त्रखरेदी करायला सुरुवात केली आहे. आता आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा ध्रुवीकरणाचे राजकारण सुरू होताना दिसू लागले आहे. पुन्हा एकदा जग दोन गटांत विभागेल अशी शक्यता निर्माण झाली आहे.

भारताने जपान, रशिया, अमेरिका आणि फ्रान्ससोबत अनेक करार केले आहेत आणि करत आहे. भारतीय सैन्याला नव्या तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. चीन आणि पाकिस्तान भारताच्या ज्या कुरापती काढत असतात, पाकिस्तान आणि चीनच्या सैन्याच्या काही ना काही हालचाली चालू असतात आणि भारतीय सैन्याला म्हणूनच खूप सतर्क रहावे लागते आणि स्वत:ला सज्जही ठेवावे लागते. भारतानेही संरक्षण तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित केले आहे. आता तर भारताने संरक्षण तंत्रज्ञान स्वत: विकसित करण्याचे आणि इतरांकडूनही खरेदी करण्याचे धोरण अवलंबले आहे.

पण आता दीर्घकालीन धोरणाबाबत बोलायचे तर आज तंत्रज्ञानाने एवढी मोठी झेप घेतली आहे की आपण अनेक बाबींकडे जुन्या दृष्टिकोनातून पाहू शकत नाही. आज जो संघर्ष निर्माण झाला आहे, तो परंपरागत संघर्षाप्रमाणे नाही. त्यामध्ये दोन शत्रू राष्ट्रांचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकून प्रत्यक्ष युद्ध करतात. आता युद्धाचे क्षेत्र बदलले आहे. आता तर अर्थव्यवस्थाही युद्ध क्षेत्र आहे. सध्याच्या युद्धात पारंपरिक संरक्षण तंत्रज्ञानावर भर देण्यात येतोच, पण त्याचबरोबर सायबर तंत्रज्ञान आणि ठिकठिकाणी आपले तळ उभे करायचे अशा नव्या तंत्रांवरही भर देण्यात येत आहे.

सायबर हल्ले
चीनने भारताच्या आसपास आपले अनेक तळ उभे केले आहेत. याद्वारे भारताला नियंत्रित करणे आणि त्याचबरोबर आपले सामर्थ्य वाढवणे हे चीनचे उद्दिष्ट आहे. आता भारतानेही आपले तळ विकसित करायला सुरुवात केली आहे. मॉरिशस आणि तशाच बेटांवर भारताला तसा वावही मिळाला आहे. अमेरिका आता अफगाणिस्तानमधून बाहेर पडला आहे, पण त्याला अफगाणिस्तानावरचे नियंत्रण सोडायचे नाही. अमेरिकेच्या अनुपस्थितीत रशिया आणि चीन अफगाणिस्तानात आपले तळ उभे करण्याची शक्यता आहे. त्यांना शह देण्यासाठी अमेरिकेला रणनीती आखावी लागणार आहे. त्यासाठी उपग्रह, ड्रोन यांची मदत घेता येते, पण त्याला मर्यादा आहेत. भारत-पाक सीमेवरही पाकिस्तानही ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करत आहे. त्याचा बंदोबस्त करण्याचा जोरदार प्रयत्नही भारताकडून होत आहे. केवळ पारंपरिक तंत्रज्ञानाने यावर मात करणे शक्य नाही.

आज तंत्रज्ञानाचा विकास पाहिला तर दुस-या महायुद्धानंतर जशी शीतयुद्धाची परिस्थिती निर्माण झाली, तशी आता होणार नाही. अमेरिका आणि चीन यांच्यात शीतयद्ध सुरू झाले तर ते आधीच्या शीतयुद्धाप्रमाणे असणार नाही. कारण आता हे दोन्ही देश व्यापारांत एकमेकांचे भागीदार आहेत. त्यामुळे शीतयुद्धातही का असेना पण परस्परांच्या आर्थिक हितसंबंधांना धक्का लागणार नाही याची काळजी हे दोन्ही देश घेणार हे नक्की. पण तरीही दोघे एकमेकांची ताकद कमी करण्याचा प्रयत्नही करत राहणार. या संदर्भात मग सायबर हल्ल्याचा विषय येतो. चीन आणि रशियाने तर आता याचाच आधार घेतला आहे. हे दोन्ही देश आता सायबर हल्ले करत आहेत.

यात त्यांच्यावर थेट आरोपही होत नाहीत कारण यात तसे पुरावे लगेच मिळत नाहीत. त्यातूनही पुरावे मिळाले तरी संबंधित देश हात झटकून मोकळे होतात की इंटरनेटचा वापर कुणीही करू शकतो, त्यामुळे हे आपण केलेच नाही असा दावा करू शकतात. याचा फायदा चीन आणि रशिया पुरेपूर घेत आहेत. युरोप, अमेरिका, भारत आणि पश्चिमात्त्य देशांच्या मोकळ्या लोकशाही घटकांवर हल्ला करत आहेत. भारतातही मुंबईत वीजपुरवठा खंडित होण्यामागे चीनकडून झालेल्या सायबर हल्ल्याचा हात असल्याची चर्चा झाली होती. हे रोखायचे असेल तर असे सायबर हल्ले अपयशी ठरतील अशी तांत्रिक यंत्रणा उभी करणे आणि आपलीही सायबर हल्ले करण्याची क्षमता वाढवणे हे दोन पर्याय आहेत.

अमेरिकेच्या अण्वस्त्रांवर सायबर हल्ला
लोकशाही देशांमधील समाजव्यवस्था आणि राजकीय व्यवस्था खुली असते. तर चीन आणि रशियासारख्या देशांत त्यावर सरकारी नियंत्रण असते. हे लोक लोकशाही देशांतील सोशल मीडियावर अफवाबाजीची मोहीम चालवतात. चीन आणि रशिया अशा मोहिमा आखून युद्धासारखी परिस्थिती निर्माण करत आहेत. पूर्वी केवळ शस्त्रांनी लढावयाच्या युद्धापासून स्वत:चे रक्षण करण्याचे आव्हान होते. त्यावेळी शत्रू राष्ट्रापेक्षा वरचढ शस्त्रसज्जता असली की युद्धाची संभावना कमी होत असे. पण आता त्याची व्यापकता वाढली आहे. आता केवळ बॉम्ब आणि बंदुकांनी नव्हे तर अन्य बाबींचाही त्यात समावेश आहे.

आता शत्रू राष्ट्राचे नुकसान करण्यासाठी अनेक देश वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. यात त्याच्या महत्त्वाच्या यंत्रणा निकामी करणे, किंवा अर्थव्यवस्थेवर हल्ला करणे अशा गोष्टींचाही समावेश आहे. प्रत्यक्ष लढाई त्यामानाने सोपी असते. पण अशा समाजावर परिणाम करणा-या गोष्टींचा मुकाबला करणे अवघड जाते. प्रतिक्रिया कशी द्यायची यावर विचार करावा लागतो, त्याचे व्यापक धोरण ठरवावे लागते. पारंपरिक पद्धत बदलत आहे, तंत्रज्ञान बदलत आहे आणि राष्ट्रीय सुरक्षेचे वातावरणच बदलत आहे. आता या नव्या युद्धतंत्राची कला अवगत करायची असेल तर आपली बौद्धिक यंत्रणाही बदलावी लागणार आहे.

हर्ष व्ही. पंत
किंग्ज कॉलेज, लंडन

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या