22.7 C
Latur
Wednesday, October 5, 2022
Homeविशेषचिंता युवापिढीच्या विवाहदृष्टिकोनाची

चिंता युवापिढीच्या विवाहदृष्टिकोनाची

एकमत ऑनलाईन

केरळ उच्च न्यायालयाने अलीकडेच आजच्या युवापिढीच्या विवाहाबद्दल बदललेल्या दृष्टिकोनाबाबत चिंता व्यक्त केली आहे. नवी पिढी विवाहाकडे चुकीच्या दृष्टीने पाहते आहे आणि आनंदी जीवन जगण्यासाठी विवाहापासून चार हात लांब राहणेच पसंत करीत आहे आणि यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपचे प्रमाण वाढत आहे, असे मतवजा निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. उच्च न्यायालयाने तरुणपिढीमध्ये वाढत चाललेल्या या प्रवाहाला ‘विवाहित संबंधांबाबत यूज अँड थ्रो संस्कृती’ची संज्ञा दिली आहे.

केरळ उच्च न्यायालयाच्या नुकत्याच केलेल्या एका टिप्पणीमुळे सर्व देशाचे लक्ष वेधले गेले. नवी पिढी विवाहाकडे चुकीच्या दृष्टीने पाहते आहे आणि आनंदी जीवन जगण्यासाठी विवाहापासून चार हात लांब राहणेच पसंत करीत आहे आणि यामुळे लिव्ह इन रिलेशनशिपचे प्रमाण वाढत आहे, असे मतवजा निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. ते नोंदवताना समाजासाठी हा चिंतेचा विषय असल्याचे न्यायालयाने म्हटले होते. उच्च न्यायालयाने तरुणपिढीमध्ये वाढत चाललेल्या या प्रवाहाला ‘विवाहित संबंधांबाबत यूज अँड थ्रो संस्कृती’ची संज्ञा दिली आहे. न्यायालयाने विवाहाबाबत तरुण पिढीच्या अनास्थेबाबत चिंता व्यक्त केली आहे. ही चिंता स्वाभाविक आहे. कारण विवाह संस्थेवरच समाजाची इमारत उभी आहे. जर विवाह संस्थेलाच हादरे बसू लागले तर समाजरूपी इमारतीला तडे जातील.

विखुरलेल्या विवाह संबंधासाठी पाश्चात्त्य संस्कृतीला दोष देण्याची मानसिकताही दृढ होत चालली आहे. मात्र खरेच पाश्चात्त्य संस्कृतीला दोष देत बसणे एवढ्यानेच भारतातील विखुरलेल्या विवाहित संबंधांच्या समस्येपासून सुटका मिळू शकते का? तसे असते तर ही समस्या एवढ्या तीव्रतेने भारतीय समाजाला विळखा घालू शकली नसती. त्यामुळे तरुण पिढीला विवाह करणे का आवडत नाही, ते एकटेपणाने जगण्याचे का ठरवत आहेत, हे आपल्याला समजून घेणे अधिक गरजेचे आहे.
रक्ताच्या नात्यांव्यतिरिक्त इतर नात्यांची निवड मानवाला स्वत: करायची असते. यामागे मुख्यत: गरज हा सिद्धांत असतो. विवाह नेहमीच भावनिक आणि मानसिकतेसाठी चांगला पर्याय मानला जातो. वैवाहिक संबंधांची सर्वांत मोठी मधुरता ही त्यातील परस्परावलंबित्वामध्ये असते.

संसारी व्यक्ती आपला शारीरिक, भावनिक आणि भौतिक गरजांच्या पूर्ततेसाठी एकमेकांंवर अवलंबून असतात. मात्र, दुर्दैवाची स्थिती तेव्हा निर्माण झाली जेव्हा ही गरज वैवाहिक संबंधांच्या परिघाबाहेर उपलब्ध होऊ लागली. तिथूनच विवाहाची गरज नाकारली जाऊ लागली आणि विवाहामुळे येणा-या उत्तरदायित्वाकडे किंवा जबाबदा-यांकडे ओझे म्हणून पाहिले जाऊ लागले. आज समाजात कोणत्या ना कोणत्या कारणाने का होईना पण जे तरुण विवाह बंधनात गुंतले गेले आहेत त्यापैकी काहींना विवाह करण्याचा निर्णय चुकीचा वाटतो आणि यामागचे महत्त्वाचे कारण म्हणजे स्वश्रेष्ठतेचा भाव. ही भावना स्त्री-पुरुष दोघांमध्येही समान प्रमाणात आढळून येते. स्वत:ची विचारधारा, मूल्ये आणि जीवन जगण्याच्या पद्धतीलाच श्रेष्ठ मानून आपल्या जोडीदाराला दुय्यम समजले जाते किंवा आपल्या मर्जीप्रमाणे, आपल्या मनाप्रमाणे जोडीदाराला जीवन जगण्यास भाग पाडले जाते. त्यामुळे कौटुंबिक तणाव निर्माण होतो आणि वैवाहिक जीवनात भांडणतंट्यांची सुरुवात होते. मानववंशशास्त्राचा सिद्धांत विखुरलेल्या वैवाहिक संबंधांची कारणमीमांसा करण्यास साहाय्यक ठरतो. हा सिद्धांत अशा व्यक्ती किंवा लोकांच्या संदर्भात भाष्य करतो जे स्वत:च्या मूल्यांच्या आधारावर दुस-यांचे मूल्यांकन करतात. ही स्थिती आत्मकेंद्री असल्याचे दर्शविते.

याबाबत एम. जे. कामेली यांचे संशोधन स्पष्ट करते की, स्वार्थी मनोवृत्ती वाढत जाणे आणि दाम्पत्य जीवनात जोडीदाराच्या इच्छा-आकांक्षांकडे लक्ष न देणे यामुळे कुटुंब दुभंगते. एकमेकांना समजून घेणे हा वैवाहिक नातेसंबंधांमधील सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. याचे महत्त्वाचे साधन आहे सकारात्मक सुसंवाद. एका अन्य संशोधनानुसार विवाहित जोडप्यांमध्ये नकारात्मक संवाद किंवा संवादाचा अभाव हे घटस्फोटाचे एक मोठे कारण आहे. वेगवेगळी पार्श्वभूमी असणा-या दोन कुटुंबांमधून आलेल्या पती-पत्नींमध्ये वादविवाद होणे, भांडणतंटे होणे स्वाभाविक असते. परंतु मागील दशकांमध्ये वैवाहिक आयुष्यात येणा-या या समस्यांची सोडवणूक करण्याऐवजी थेट घटस्फोटाचा पर्यायच वापरण्याकडे कल वाढत चालला आहे. वास्तविक, घटस्फोट हा या समस्येवर खरंच उपाय असतो का? कारण घटस्फोट म्हणजे पुढील सर्व मार्ग बंद करणारा पर्याय आहे.

तरुण पिढीला आरोपीच्या पिंज-यात उभे करणे सोपे आहे; परंतु कधी असा विचार करण्याचा प्रयत्न केला आहे का की, मानव हा यंत्रांद्वारे निर्माण झालेले एखादे उत्पादन नाही. तो हाडामांसाचा सामाजिक प्राणी आहे. यामध्ये सामाजिकरणाच्या विविध संस्थांची भागीदारी असते. अशा वेळी सामाजिकरणाच्या विविध संस्थांच्या भूमिकांचे आकलन केले जाणे गरजेचे आहे. कुटुंब ही सामाजिकरणाची पहिली संस्था आहे. कुटुंबात व्यक्तिमत्त्व विकासाचे धडे दिले जातात. मागील दोन-तीन दशकांत यशस्वी होण्याची व्याख्या भौतिक सुख प्राप्त करण्यापुरती मर्यादित झाली आहे आणि त्यालाच जीवनात यशस्वी होणे समजले जाऊ लागले आहे. लहानपणापासून कुटुंबांमधून आणि शैक्षणिक पद्धतीतून याचीच शिकवण दिली जात आहे. साम, दाम, दंड, भेद या नीतीचे पालन करणे हाच यशाचा मंत्र आहे ही बाब मुलांमध्ये बाल्यावस्थेपासून ठसवली जात आहे. परंतु यामुळे मानवता, दयाळूपणा आणि धैर्य यांसारखी मूल्ये कमकुवत होत आहेत. आर्थिक आणि राजकीय संस्थासुद्धा आपल्या कार्यप्रणालीद्वारे किशोरावस्था ते युवावस्थाकडे जाणा-या पिढीला प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे हाच धडा देत आहेत. यावर सर्वांत जास्त आघात सामाजिक माध्यमांनी केला आहे. सामाजिक माध्यमांमुळे स्वैराचाराला पूर्वी कधीही नव्हते इतके महत्त्व आले आहे.

-डॉ. ऋतू सारस्वत
समाजशास्त्र अभ्यासक

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या