21.4 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeविशेषआशयसंपृक्त शब्दवीणा ... शांता शेळके

आशयसंपृक्त शब्दवीणा … शांता शेळके

एकमत ऑनलाईन

काही व्यक्ती अशा असतात ज्या आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर भेटत असतात..कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्ष त्यांचं सानिध्य आपणास मिळत असतं. अशाच आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक मराठी मनाला ज्यांचा शब्द सानिध्य दरवळ सुगंधित करत असतो. शांता शेळके यांचा जन्म इंदापूरचा, तर बालपण खेड मंचरच्या परिसरातलं. लोकसंस्कृती आणि लोकसाहित्य हा त्यांचा आवडीचा विषय. लोकसाहित्य म्हणजे महाराष्ट्राचं जनजीवन, ग्रामीण माणसाचं वास्तव दर्शन- साधं, सरळ, भाबडं; पण कारुण्यानं ओथंबलेलं. असं हे लोकसाहित्य आणि लोकसंस्कृती शांता शेळकेंच्या साहित्याचा मूळ आधार आहे.

मराठी, संस्कृत आणि इंग्रजी या तिन्ही भाषांवर शांतार्बाइंचे प्रभुत्व होते. वाङ्मयाचे सगळेच प्रकार जरी त्यांनी हाताळले असले तरी गीतकार म्हणून त्या विलक्षण लोकप्रिय झाल्या आणि मराठी माणसांच्या मनापर्यंत पोहोचल्या. एखाद्या गीतातून भावनाट्य चित्रित करण्याचं शब्दकौशल्य त्यांच्या अनेक गीतांतून आपल्याला जाणवतं. विविध क्षणांतील वेगवेगळे तरंग त्यांच्या तरलतेसह टिपणं त्यांना सहज जमायचं.कवयित्री शांता शेळके यांच्या कविता म्हणजे अथांग मनाचा गहिरा तळ शोधत जाणा-या कवितांचा खजिनाच जणू! नववधूच्या हळदओल्या अंगाच्या अलवार कवितांपासून ते रणभूमीवरच्या सरदारांच्या वीररसाने ओथंबलेल्या जोशपूर्ण कवितांचा विशाल पट त्यांच्या कवितांत पाहायला मिळतो. ‘माझा लवतोय डावा डोळा’ अशी खट्याळ कविताही त्या सहज लिहितात.

‘हा माझा मार्ग एकला’ असं निर्वाणीचं भाष्य देखील तितक्याच गंभीरतेने करतात. ‘ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा माझ्या मनातला का तेथे असेल रावा?’ असा हळवा प्रश्नही त्या विचारतात. ‘काय बाई सांगू? कसं ग सांगू? मलाच माझी वाटे लाज’ असं अवखळ भावव्यक्तही होतात. ‘सुकुनी गेला बाग, आठवणींच्या मुक्या पाकळ्या पडल्या जागोजाग..’ असे खिन्न मनाची उदासीनता जिवंत करणारे काव्यही त्या लिहितात. ‘रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला..’ अशी फक्कड लावणीही त्या लयबद्ध रचनेत गुंफतात. ‘विजनामधले पडके देऊळ…’ अशी चित्रमय कविता लिहिताना आठवणींच्या उदासपणासोबतच भक्तीचा मार्ग दाखवितात. त्याचबरोबर ‘गणराज रंगी नाचतो..’ हे मनाला उत्फुल्ल करून जाणारे भक्तिगीतही ओघवत्या शैलीत लिहितात.

‘ऋतू हिरवा ऋतू बरवा, पाचूचा वनि रुजवा..’ निसर्गाचं असं मनमोहक वर्णन त्या करतात तर ‘मी सृष्टीची सुता लाडकी मंद चमकते क्षितिजावरती ..’ असं चांदणीचं गुणगान त्या गातात. मानवी मनाच्या विविध भावभावनांचे कल्लोळ अलगदपणे शब्दबद्ध करून त्यांना एकाच काव्यशेल्यात गुंफण्याचे कसब शांताबाईंना सहज अवगत होते.ओलेत्या पानात, सोनिया उन्हात भरून मेघ आले डहाळी जणू नवी नवरी हळद रंग ओले साद ओली पाखराची, ओढ जागे पावसाची ‘ओलेत्या पानात’ या कवितेतली शब्द निवड अप्रतिम आणि चपखल आहे. या शब्दांमुळे कवितेला एक नादमाधुर्य प्राप्त झालेय, कमालीची गेयता या कवितेत आलीय. कवितेचे रुपडे देखील देखण्या शब्दालंकाराने नटवे झालेय.

ऋतू हिरवा ऋतू बरवा, पाचूचा वनि रुजवा
युग विरही हृदयांवर सरसरतो मधु शिरवा
उन्हे चमचमती, क्षण दिपती क्षण लपती
नितळ निळ्या अवकाशी मधुगंधी तरल हवा

तर ‘ऋतू हिरवा’ या कवितेत ऋतूंचे इंद्रधनुष्यी रंगातले चित्र त्या आपल्या शब्दकुंचल्यातून साकारतात. भिजुनी उन्हे चमचमती, मधुगंधी तरल हवा, मनभावन हा श्रावण, मदनाचे चाप अशी मनमोहक शब्दसंगती त्यांनी योजली आहे.

ही वाट दूर जाते, स्वप्नामधील गावा
माझ्या मनातला का तेथे असेल रावा ?

स्वप्ने सर्वांनाच साद घालत असतात मात्र स्वप्नांची वाट नेमकी कशी आहे आणि ती कुठे जाते याचा खरा अंदाज कुणालाच नाही. मात्र ‘या वाटेने गेल्यावर तरी आपले इप्सित तिथे असेल का’ हा प्रश्न सर्वांनाच असतो. जिथे आपली ध्येयपूर्ती होईल अशा स्वप्नसृष्टीचे वर्णन अत्यंत मनोहर असे आहे. ‘सुकुनी गेला बाग’ या कवितेत शांताबाई आपल्याला आठवणींच्या रम्य प्रांतात फिरवून आणतात. मात्र त्यासाठी शब्द इतके बेमालूम वापरलेत की त्यातून अर्थविस्तार होऊन ते चित्रच डोळ्यापुढे उभे राहते. मुक्या पाकळ्या, विटली नक्षी, मुकेच पक्षी, पाऊल बुडाले, हरवल्या वाटा अशी नेटकी विशेषणे त्यांनी इथे वापरली आहेत.

माज्या सारंगा, राजा सारंगा
डोलकरा रं धाकल्या दीरा रं
चल जावया घरा !
शांताबाईंची कोळीगीते कथा सांगणा-या आहेत, त्यातल्या कथा उत्कंठा वाढविणा-या आहेत त्यामुळे त्याला वेगळीच अनुभूती प्राप्त होते.
रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी
कर्नाटकी कशिदा मी काढीला
हात नगा लावू माझ्या साडीला !

शृंगाररसाचा अतिरेक न करता देखण्या ढंगाची लावणी कशी लिहावी याचं उत्तम उदाहरण म्हणून शांताबाईंच्या लावणीकडे निर्देश करता येईल. आपल्या साडीचं मनमोहक वर्णन करतानाच आपल्या प्रितमास साडीला हात लावू नको असं लाडे लाडेचं सांगणं अगदी मधाळ शैलीत त्यांनी मांडलंय. यातला ठेका ताल धरायला लावणारा आहे. काव्यरचनेत लावणीचा ठसकेबाजपणा आहे, अगदी कोरीव-रेखीव असं हे गाणं आजही रसिकप्रिय आहे.
दाटून कंठ येतो ओठांत येई गाणे

जा आपुल्या घरी तू, जा लाडके सुखाने !
हिंदी सिनेमा वा काव्यात विदाईगीत म्हणून एक स्वतंत्र उपप्रकारच अस्तित्वात आहे, मराठीत तो कमी प्रमाणात हाताळला गेलाय. या आशयाच्या ज्या काही मोजक्या कविता लिहिल्या गेल्यात त्यात या कवितेचे स्थान फार वरचे आहे. काळजाचा ठाव घेत प्रत्येक बापाला हळवं करणारी ही रचना.
स्त्रीमनाच्या भावनांचा वेध घेणारी शांता शेळके यांची अनेक गाणी आहेत. ती गाणी त्या-त्या वेळच्या स्त्रीमनाची अवस्था व्यक्त करतात. खट्याळ रंगाबरोबर विषण्णता, नवथरपणाबरोबर धीटपणा असणारी अशी उडत्या लयीतील गाणी शांता शेळकेंनी खूप लिहिलेली आहेत. शांता शेळकेंच्या कवितेत कधी कधी धीट शृंगार असला तरी त्यांनी कधी मर्यादेचं उल्लंघन केलं नाही. उलट त्यांच्या कवितेत सरळ, शुद्ध, निरागस आत्माविष्कार दिसून येतो. त्यामुळेच त्यांचं साहित्य काळजाला स्पर्शून जातं. ‘असा बेभान हा वारा’, ‘वर्षा पाण्यावरच्या पाकळ्या’, ‘किनारे मनाचे’, ‘अनोळख’ हे त्यांचे काव्यसंग्रह चोखंदळ वाचकांच्या मनाला स्पर्श
करतात.

शांता शेळकेंच्या काव्यलेखनात अनेक प्रकारच्या सूक्ष्म तरल संवेदना आपल्याला जाणवतात. गाण्यातलं मराठीपण त्यातल्या सुगंधासह जपण्यासाठी अस्सल ग्रामीण शब्द गाण्यात घालताना त्यांची प्रतिभा कचरत नाही. सखे, सये अशा संबोधनातून ते घरच वाहू लागतं. उनाड मनाच्या अवखळ प्रियकराचा अल्लडपणा, त्याचं प्रेयसीला चिडवणं हे सगळं त्या मोठ्या मिश्कीलपणे व्यक्त करतात. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक गीतांतून स्त्रीमनाच्या छटा त्यातील स्वाभाविकतेसह व्यक्त केलेल्या आहेत. प्रियकराच्या मनातील विरह, प्रीती, धैर्य, बेछूटपणा यांचाही प्रत्यय देणारी त्यांची अनेक गाणी आहेत. कोणत्या तरी दाहक वेदनेचा चटका बसून संपूर्ण आयुष्यालाच एक रिक्तता यावी, अशी त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत. शांताबाईंची भाषाशैली आणि काव्यशैली पहिल्यापासूनच ओघवती, लालित्यपूर्ण; पण त्याचं सगळं श्रेय त्या आचार्य अत्रे यांना देतात. ‘नवयुग’मध्ये असताना अत्रे एकदा त्यांना म्हणाले, ‘शांता, तुला शब्दांचा सोस फार आहे. लहान मुलं ज्याप्रमाणं रंगीबेरंगी खडे गोळा करतात त्याप्रमाणं तू शब्द गोळा करतेस. बोलण्यातला ओघ आपल्या लेखनात आला पाहिजे.’ अत्र्यांचं हे वाक्य त्यांनी लक्षात ठेवलं आणि आपली संस्कृतप्रचुर भाषाशैली बदलली आणि समृद्ध शांताबाई अधिक जवळच्या वाटू लागल्या..त्यांच्या स्मृतीस अभिवादनरूपी ही शब्द ओंजळ.

रोहिणी पांडे
मोबा. ९५१८७ ४९१७५

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या