24.4 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeविशेषवादग्रस्ततेतून प्रसिद्धीचा फंडा

वादग्रस्ततेतून प्रसिद्धीचा फंडा

एकमत ऑनलाईन

चित्रपट असो वा जाहिरात, बॉलिवूडचे तारे केवळ चमकण्यातच धन्यता मानतात. जाहिरातींमधून या मंडळींना मिळणारे उत्पन्न चित्रपटांमधून मिळणा-या उत्पन्नापेक्षा अधिक असते. त्या पैशांच्या झगमगाटात त्यांना बाकी काही दिसत नाही. जाहिरात कंपन्यांचाही दृष्टिकोन आता बदलला आहे. चुकीच्या पद्धतीने का होईना, एकदम कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचायला मिळत असेल तर तसा मार्ग स्वीकारायला त्या मागे-पुढे पाहत नाहीत. जाणूनबुजून ओढवून घेतलेले हे वाद असतात.

‘लेयर शॉट’ या बॉडी स्प्रेच्या जाहिरातीवरून केंद्रातील सरकार सध्या चिंतेत आहे. जाहिरात हटविण्यासाठी आलेला दबाव प्रचंड होता. लेयर शॉट परफ्यूम आणि बॉडी स्प्रेच्या जाहिरातीत एक मुलगा आणि मुलगी एका खोलीत बेडवर बसलेले दाखवले आहेत. तेवढ्यात आणखी तीन मुले तेथे येतात. नवीन तीन मुलांना पाहून मुलीला धक्का बसतो. तीन मुलांपैकी एक मुलगा खोलीत मुलीसोबत बसलेल्या मुलाला विचारतो की, त्याने शॉट मारला का? तिथे उपस्थित असलेल्या मुलीला हा धक्काच असतो. या दुहेरी अर्थाच्या प्रश्नावर मुलगा होकारार्थी उत्तर देतो. त्यानंतर ती मुले म्हणतात, की आता आमची पाळी आहे. ते तिघे पुढे जायला लागतात आणि ती मुलगी कमालीची अवघडते. ती त्या अवस्थेत असतानाच तीनपैकी एक मुलगा शॉटची बाटली उचलतो. लेयर शॉट बॉडी स्प्रेच्या आणखी एका व्हायरल व्हीडीओमध्ये चार मुले एका स्टोअरमध्ये दिसत आहेत. ते स्टोअरमध्ये परफ्यूमच्या विभागात येतात. तेथे एक मुलगी आधीपासूनच आहे. त्या परफ्यूमच्या जागेत शॉटची एकच बाटली आहे, हे पाहून तो मुलगा म्हणतो की, आम्ही चौघे आहोत आणि ती एकच आहे. मग शॉट कोण घेणार? त्याचे बोलणे ऐकून ती मुलगी घाबरते आणि रागाने मागे वळून पाहते. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने यू-ट्यूब आणि ट्विटरला आपापल्या मंचांवरून ही अवमानकारक जाहिरात हटविण्यास सांगितले.

परंतु याच दरम्यान अभिनेत्री आलिया भट्टने टायटन घड्याळाच्या रागा या मॉडेलच्या जाहिरातीमधून आणखी एक वाद निर्माण केला. लग्नाच्या सोहळ्यात कोणत्या प्रसंगासाठी कोणते कपडे परिधान करायचे, याची निवड ती करत असते. त्याच वेळी तिची आई तिला विचारते, हनिमूनच्या वेळी काय परिधान करशील? त्यावर आलिया उत्तर देते, की हनिमूनला कोण कपडे परिधान करतो? यावरून वाद निर्माण झाल्यावरही सरकार लेयर शॉटच्या जाहिरातीवेळी उचलली, तशीच पावले उचलेल असे अपेक्षित आहे. परंतु वास्तव असे आहे की, अशा कारवायांमुळे जाहिरातदारांचे काम आणखी सोपे होते. त्यांचा उद्देश सफल होतो. कारण हा तर जाहिराती यशस्वी बनविण्याचा एक फॉर्म्युलाच आहे. जागतिकीकरणाच्या जमान्यात जाहिरातींबाबतचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलला आहे.

जाहिरातींनी केवळ आपले रंगरूपच बदलले नाही, तर लोकांना डिवचण्यासाठी नवनवीन कॅचलाईन्सचा वापर सुरू केला. जाहिरातींचे उद्दिष्ट मेंदूला एकाग्र करणे हे असते. ग्राहकाचा मेंदू एखाद्या उत्पादनासाठी राजी करणे हा जाहिरातींचा हेतू असतो, असेही म्हणता येईल. एका मेंदूकडून दुस-या मेंदूकडे एक विशिष्ट विचार स्थानांतरित करणे म्हणजे जाहिरात होय. सोशल मीडियाचा जमाना आल्यानंतर जाहिरातींची ढबच बदलून गेली. रेझरच्या जाहिरातीसाठी महिला मॉडेल्स वापरली जाऊ लागली. कमी कपड्यातील किंवा विवस्त्र जाहिरातींनी लोकांच्या मनावर पकड घेतली. सरोगेट जाहिरातींचे युग सुरू झाले… म्हणजेच एक वस्तू दाखवणे आणि दुसरीच विकणे! अशा काही जाहिरातींचा उल्लेख या ठिकाणी गरजेचा आहे, ज्यांनी रातोरात आपले उत्पादन कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचवण्यात यश मिळवले. टाटांनी ‘एकत्वम्’ नावाचा आपला ज्वेलरी सेट लाँच केला. यात एका हिंदू महिलेने मुस्लिम कुटुंबात लग्न केल्याचे दाखवले आहे.

मुस्लिम कुटुंबात तिला खूप प्रेम मिळते, हे जाहिरातीत दाखवले आहे. सर्फ एक्सेल डिटर्जंट पावडरने नवीन जाहिरात प्रसिद्ध केली, त्यात एक सायकलस्वार हिंदू मुलगी मशिदीत जाणा-या एका मुस्लिम मुलाला होळीच्या रंगांपासून वाचवण्यासाठी रंगांच्या फुग्यांचा सामना करते. हिंदुस्थान लिव्हरच्या ब्रुक बाँड चहाच्या जाहिरातीत एक मुलगा कुंभमेळ्याच्या गर्दीत आपल्या वृद्ध पित्याला सोडून पळून जाऊ पाहत आहे. परंतु आपल्या मुलाला गर्दीपासून वाचवण्यासाठी एक माणूस त्याला कपड्याने बांधून ठेवताना दिसतो. हे पाहून पहिला माणूस आपल्या पित्याला शोधायला पुन्हा गर्दीत शिरतो. पित्याला ठाऊक आहे, आपला मुलगा निश्चित परत येणार. त्यामुळे त्याने दोन कप चहाची ऑर्डर दिलेली आहे. लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप या जाहिरातीवर झाला होता. टाटांनी महिला दिनी टायटन ब्रँडसाठी एक जाहिरात प्रसिद्ध केली होती. एका सिमरन नावाच्या कर्मचा-याला ऑफिसमध्ये महिला समजले जाते; पण प्रत्यक्षात तो पुरुष असतो. यावरही प्रचंड टीका झाल्यामुळे ही जाहिरात कंपनीने अखेर मागे घेतली. २००७ मध्ये अमुल माचो अंडरविअरच्या जाहिरातीत सना खान पुरुषांची अंडरविअर धुताना मादक हावभाव करताना दाखवली होती.

माहिती आणि प्रसारण मंत्र्यांनी या जाहिरातीवर बंदी घालण्याचा आदेश दिला होता. परंतु त्यानंतर लगेचच भारतीय जाहिरात मानक परिषदेने ही जाहिरात दाखविण्यास मंजुरी दिली होती. १९९५ मध्ये आलेली टफ शूजची जाहिरात आतापर्यंतच्या सर्वांत वादग्रस्त जाहिरातींपैकी एक होय. मॉडेल मिलिंद सोमण आणि मधू सप्रे यांनी विवस्त्रावस्थेत अंगावर अजगर घेऊन या जाहिरातीसाठी फोटोशूट केले होते. २०११ मध्ये फास्ट ट्रॅक घड्याळाच्या जाहिरातीत क्रिकेटपटू विराट कोहली पायलट आणि अभिनेत्री जेनेलिया डिसूझा एअर होस्टेस दाखवण्यात आली होती. दोघांचे कॉकपिटमधील प्रणयदृश्य दाखविण्यात आले होते. विमान कंपन्यांनी या जाहिरातीवर टीका केली होती. २०१० मधील झटॅक डिओची जाहिरात तर प्रचंड आक्षेपार्ह होती. सुहागरात्रीच्या वेळी नवरी आपल्या पतीची वाट पाहत बेडवर बसलेली आहे, तेवढ्यात तिला परफ्यूमचा सुगंध येतो. ती खिडकीतून बाहेर पाहते, तर तिचा शेजारी परफ्यूम लावत असतो. त्या सुगंधाने ती इतकी उत्तेजित होते की लग्नातील अंगठी काढून टाकते. २००७ मध्ये लक्स कोझीच्या जाहिरातीत अंडरविअरवर टॉवेल गुंडाळलेल्या एका पुरुषाचा टॉवेल त्याचा कुत्रा अचानक ओढतो. ते पाहून एक कमी कपडे परिधान केलेली महिला त्या पुरुषाच्या जवळ जाऊन त्याला किस करते. टॅगलाईन होती- अपनी किस्मत पहन के चलो!

नवरात्रीच्या काळात अभिनेत्री सनी लिओनीने केलेल्या मॅनफोर्स कॉन्डोमच्या जाहिरातीवरून वाद झाला. नवरात्री खेलो; मगर प्यार से, अशी जाहिरातीची टॅगलाईन होती. २०२१ मध्ये डाबरच्या एका फेस क्रीमच्या जाहिरातीमुळे वादळ उठले. या जाहिरातीत दोन महिला एकमेकीच्या चेह-यावर क्रीम लावताना दाखविल्या होत्या आणि त्या एकमेकींकडे चाळणीतून पाहत आहेत, असेही दाखवले होते. ही जाहिरात समलैंगिकतेला उत्तेजन देणारी आहे असा आरोप झाला. फॅब इंडियाच्या दिवाळी कलेक्शनला जश्न-ए-रिवाज नाव देणे महागात पडले होते, तर आलिया भट्टने जाहिरातीतून कन्यादानाच्या रिवाजावरून प्रश्न उपस्थित करणेही वादाचे कारण ठरले होते. जर्मन नाझींनी ज्या प्रकारे यहुदींसाठी शर्टवर सोनेरी रंगाचा तारा टांगला होता, तसा तारा आपल्या शर्टावर टांगणे झारा या फॅशन चेनला महागात पडले होते आणि त्यांना आपले उत्पादनही बाजारातून परत घ्यावे लागले होते.

सव्यसाची ब्रँडच्या मंगळसूत्राच्या जाहिरातीत सावळ्या रंगाच्या एका मॉडेलने केवळ ब्रा, बिंदी आणि मंगळसूत्र परिधान केलेल्या अवस्थेत एका वस्त्रहीन पुरुषाच्या खांद्यावर डोके टेकून बसल्याचे दिसले होते. मंगळसूत्र अंडरगारमेन्टच्या वर्गात मोडते का, असा सवाल सव्यसाचीला करण्यात आला होता. जीन्सच्या एका जाहिरातीत कंगना एका पुरुषाच्या अंगावर पालथी झोपल्याचे दिसले होते आणि त्यावरून गदारोळ माजला होता. झोमॅटोच्या जाहिरातीतील काही शब्दांच्या लघुरूपांवरून वादळ उठले होते. केवळ अंतर्वस्त्र परिधान करून तयार केलेल्या जाहिरातींवरून वाद होण्याच्या घटना नव्वदीच्या दशकानंतरच घडू लागल्या होत्या. डिनो मारिया आणि बिपाशा बसू यांची अशीच एक जाहिरात प्रचंड वादात सापडली होती. जाहिरातींचा जागतिक बाजार २०२१ मध्ये ५९०.३ अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचला होता. २०२२-२०२७ या काळात ५.१ टक्क्यांचा सीजीआर राखत २०२७ मध्ये हा बाजार ७९२.७ अब्ज अमेरिकी डॉलरवर पोहोचेल, अशी शक्यता आहे.

यात भारताची हिस्सेदारी २.९८ अब्ज डॉलर एवढी असेल. जिथे एवढा पैसा आहे, तिथे तत्त्वांच्या गोष्टी करणे हास्यास्पदच ठरेल. अमिताभ बच्चन, हेमा मालिनी, जूही चावला, करीना कपूर, शाहरूख खान, अक्षय कुमार, सलमान खान, अजय देवगण, रणवीर सिंह, रणबीर कपूर, ऋतिक रोशन, दीपिका पदुकोण, आलिया भट्ट, माधुरी दीक्षित असे गाजलेले तारे-तारका कोणतीही तत्त्वे न पाळता विविध उत्पादनांची जाहिरात करतात. दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन याने कोट्यवधी रुपये देऊ करूनसुद्धा तंबाखूजन्य उत्पादनांची जाहिरात करणे टाळले, हा आदर्श या मंडळींपुढे असूनसुद्धा हे तारे केवळ चमकण्यातच धन्यता मानतात. जाहिरातींमधून या मंडळींना मिळणारे उत्पन्न चित्रपटांमधून मिळणा-या उत्पन्नापेक्षा अधिक असते. त्या पैशांच्या झगमगाटात त्यांना बाकी काही दिसत नाही. जाहिरात कंपन्यांचाही दृष्टिकोन आता बदलला आहे. चुकीच्या पद्धतीने का होईना, एकदम कोट्यवधी लोकांपर्यंत पोहोचायला मिळत असेल तर तसा मार्ग स्वीकारायला त्या मागे-पुढे पाहत नाहीत. जाणूनबुजून ओढवून घेतलेले हे वाद असतात.

-योगेश मिश्र,
ज्येष्ठ पत्रकार-विश्लेषक

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या