सध्या महाराष्ट्रात एका बाजूला कोरोनाने तर दुस-या बाजूला राजकीय घडामोडींनी साºयांना पुरते भंडावून सोडले आहे. एकवेळ पुढच्या महिनाभरात कोरोनाला आटोक्यात आणता येईलही. पण राजकारणाचे काय? हा प्रश्न सतावतो आहे. एका अतिसूक्ष्म विषाणूमुळे कोरानाचा प्रादुर्भाव झाला. या रोगाचे नावही पूर्वी कधीही, कुणीही, कुठेही ऐकले नव्हते. पण राजकारणाचे तसे नाही. अनादी काळापासून हा रोग जगभर भिनलाच आहे. भारत आणि मुख्यत्वे महाराष्ट्र हे या रोगाचे ‘रेड झोन’ मानले जातात. शिवाय हा रोग फक्त कंटेन्मेंट विभागापुरता सीमित राहतो, असेही नाही. प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संसर्ग होवो अथवा ना होवो, तो पसरतच राहतो. त्यावर कोणतीही लस किंवा औषध, इंजेक्शन नाही. त्याचा संसर्ग ज्याला झाला, तो त्यातून सावरण्याचीही बिलकुल शक्यता नाही. बरे, त्याचा संसर्ग होऊ नये म्हणून कोणतीही व कितीही काळजी घेऊनही उपयोग नाही. कारण तुमची इच्छा असो वा नसो; कितीही काळजी घेतली ंिकवा संसर्गक्षेत्रापासून स्वत:ला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, तरी त्याची बाधा व्हायची ती होतेच. अनेक ठिकाणी हा संसर्ग वडिलोपार्जित असतो. वडिलांकडून मुलाकडे, त्याच्याकडून त्याच्या मुलाकडे असा तो पसरत जातो. असो.
हे राजकोरोना आख्यान आज आळवण्याचे कारण हे की, महाराष्ट्रात याचा पुन्हा प्रादुर्भाव होऊ लागला आहे. खरे तर चीनच्या कोरोनाचा फैलाव जगभर, विशेषत: भारतात गेल्या वर्षीच्या अखेरीस होऊ लागला. त्याच सुमारास ‘राजकोरोना’ने सुद्धा देशाला व महाराष्ट्राला ग्रासायला सुरुवात केली. याची लागण सर्वप्रथम मध्य प्रदेशात झाली. तिथे माजी मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी अचानक काँग्रेसचा त्याग करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला व बघता बघता तिथले कमलनाथ सरकार अचानक कोलमडले. त्यावेळी देशात कोरोनाचे रुग्ण आढळायला लागले होते. त्यामुळे शिवराजसिंह चौहान यांचा शपथविधी घाईघाईने व साधेपणाने आटोपण्यात आला.
याच वेळी महाराष्ट्रात राजकीय भूकंप होऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या ‘महाविकास आघाडी’चे सरकार स्थापन करण्याची किमया शरद पवार व शिवसेनेचे नवे चाणक्य संजय राऊत यांनी करून दाखवली होती. या आघाडीने विधिमंडळात बहुमत सिद्ध केले व नंतर उद्धवजींनी विधान परिषदेची निवडणूकही मोठ्या नाट्यानंतर बिनविरोध जिंकली. येथपर्यंत सारे ठीकच झाले. पण त्यामुळे हे सरकार पाच वर्षे कसे टिकणार व कोण टिकवणार, या प्रश्नांची उत्तरे सापडली नाहीत. भाजपकडे १०५ जागा असल्याने आणखी ४० जागा मिळताच ते सत्तेवर दावा सांगणार आहेतच. पण कदाचित त्यांना हा आकडा गाठण्यासाठी थांबावे लागणारही नाही. आघाडीतील आमदारांनी विधानसभा अध्यक्ष पटोले यांच्याकडे सदस्यत्वाचे राजीनामे फेकले, की विधानसभेचे संख्याबळ कमी होऊन ते २१० वर येईल. अशा वेळी १०५सदस्यवाला भाजप सत्तेचा दावा करू शकेल. अर्थात हा सारा जर-तरचा खेळ असला, तरी राजकारणात असे डावपेचही खेळावे लागतात. तसेच डावपेच सध्या खेळले जात आहेत.
Read More मंथन : बदलाच्या उंबरठ्यावर…
मुख्यमंत्रिपदी उद्धवजी आहेत व विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस आहेत. पण खरा लढा या दोघांत नाही. दिल्लीत बसलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व रिंगणाच्या बाहेरूनच सूत्रे हालवणारे पवार व संजय राऊत यांच्याकडेच सामन्याची सूत्रे असल्यासारखे दिसते. फुटबॉलच्या सामन्यात काही खेळाडू पूर्णवेळ मैदानावर नसतात. ते काही काळ मैदानात उतरतात व नंतर मैदान सोडून जातातसुद्धा. पवारांचे तसेच आहे. वयाच्या ८० व्या वर्षीसुद्धा हा मुरलेला खेळाडू मध्येच सामन्यात येऊन शिताफीने पदन्यास करत बॉल भाजपच्या कोर्टातून आपल्या पायाशी घेतो व विद्युतवेगाने पदन्यास करून तो प्रतिपक्षाच्या गोलपर्यंत पोहोचवतोसुद्धा. पवारांनी या खेळात असे दोनदा केले.
विधानसभा निवडणुकांचा प्रचार संपायला दोन दिवस बाकी असताना सोलापूरला ऐन पावसात त्यांनी भिजत भिजत भाषणे केली आणि केवळ सोलापूर नव्हे, तर दक्षिण महाराष्ट्राचा नूर पालटला आणि राष्ट्रवादीला २५ जागाही मिळतील की नाही, याची शंका असताना ते थेट ५४ वर पोहोचले. राजकारणाचा गेम तिथेच पलटला. पवार थेट ड्रायव्हरच्या सीटवर जाऊन बसले. नंतर कोकणात ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत मोठे नुकसान झाले, तेव्हा पवार पुन्हा रिंगणात आले. त्यांनी दोन दिवस रायगड, रत्नागिरी व पुळ्याचा दौरा केला व पुन्हा धुरळा उडवला. हे त्यांचे कसब अचंबित करणारेच आहे.
संजय राऊत पेशाने पत्रकार-संपादक असले, तरी ते आता मुरब्बी राजकारणीसुद्धा आहेत. कुस्तीच्या रिंगणात प्रतिस्पर्ध्याची ताकद अजमावून कोणता पेच केव्हा व कसा टाकायचा, हे जसे मल्लाला समजणे आवश्यक असते, तसेच तो गुण राजकीय नेत्यातसुद्धा असायला हवा. तो राऊतांनी आत्मसात केलेला आहे. प्रतिपक्षाचा कमकुवत भाग ओळखून तिथेच आघात कसा करायचा, हे ते चांगलेच जाणतात. त्या नीतीनेच आतापर्यंत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्ला चढवणाºया राऊतांनी अचानक आपला मोर्चा चित्रपट अभिनेता सोनू सूदकडे वळवला व त्यांच्या मोहिमेवरच हल्ला चढवला.
सूद मुंबईत अडकलेल्या परराज्यांतील कामगारांना घरी जाण्यासाठी मदत करत आहेत. त्यांचा ‘बोलविता धनी’ कोण यावरच त्यांनी प्रश्नचिन्ह उभे केले व प्रतिपक्षाला गोंधळवूनच टाकले. राऊतांवर खूप टीका झाली पण ते डगमगलेले दिसत नाहीत. सूद जाऊन उद्धवजींना भेटले पण राऊतांचे शरसंधान चालूच राहिले. याचे पुढे काय परिणाम होतील, हा वेगळा मुद्दा. सध्या मात्र पवार-राऊत जोडगोळीने गुण मिळवले आहेत, हे मात्र खरे.
इथे भाजपच्या गोटात स्थिती ही आहे की, अमित शहांना बहुधा उसंत नसल्याने देवेंद्र फडणवीस यांच्या सैन्याची अवस्था निर्णायकीची झालेली दिसते. चंद्रकांतदादा पाटील, मुंबईचे किरीट सोमय्या जितके बोलतील, तितका भाजपचा पाय खोलातच चालला आहे. पण त्यांना आवरणार कोण? अशा वेळी कोरोनाची रुग्णसंख्या दिवसागणिक वाढतेच आहे व तिला आवर घालण्याची कोणतीही प्रक्रिया निदान दृष्टिपथात नाही. कोरोना विरुद्ध राज‘कोरोना’च्या लढाईत सध्या कोरोनाच वरचढ ठरताना दिसतोय. सामान्य जनतेला त्याचीच चिंता आहे.