25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeविशेषकोरोनाने केला इस्कोट

कोरोनाने केला इस्कोट

एकमत ऑनलाईन

देशभरात कोरोना धुमाकूळ घालत असून मृत्युचे तांडव सुरु आहे. ही परिस्थिती अतिशय बिकट असून याकडे राष्ट्रीय संकट म्हणून पाहण्याची गरज निर्माण झाली आहे. देशावर आलेल्या प्रत्येक संकटांचा यापुर्वीही देशवासीयांनी मोठ्या धीराने एकजुटीने सामना केला. कोणत्याही शासकासाठी अशा प्रकारचा काळ अतिशय आव्हानात्मक असतो. या काळात जनता त्याच्याकडे मोठ्या आशेने पाहत असते. खवळलेल्या समुद्रात अडकलेली नौका पार लागावी म्हणून खलाशी जसे जहाजाच्या महातांडेलाकडे तारणहाराच्या स्वरुपात पाहतात अगदी तसंच राष्ट्राचा प्रमुख त्यांना या आपत्तीतून तारेल अशी आशा देशवासियांच्या मनात जागविणे हे त्या राष्ट्रप्रमुखाचं काम आहे.

परंतु दुर्दैवाने कोरोनासारख्या महामारीने देशातील बहुतांश लोकसंख्या प्रभावित केली असताना या काळात देशाचे सर्वोच्च नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी पाच राज्यांच्या निवडणूक प्रचारात मग्न आहेत. एवढंच नाही तर कोरोनाच्या विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी आवश्यक असणा-या सर्व मार्गदर्शक सूचना पायदळी तुडवत लाखोंच्या सभा देखील घेत आहेत. त्यांच्या लाखोंच्या सभांचे फोटो, व्हिडिओ सोशल माध्यमातून एखादा मोठा तीर मारल्याच्या अविर्भावात व्हायरल होतात.त्याचबरोबर कोरोनासारख्या वादळात अडकलेलं देशाचं जहाज सुखरुप बाहेर काढणारा महातांडेल, हा माणूस असूच शकत नाही ही भावना देशवासियांच्या मनात दिवसेंदिवस प्रबळ होत आहे. शासन व्यवस्थेवरील लोकांचा विश्वास उडून जाणे ही अतिशय धोकादायक भावना दिवसेंदिवस प्रबळ होत आहे,हीचिंतेची बाब आहे.आपत्तीच्या काळात पंतप्रधानपदाची मर्यादा आणि प्रतिष्ठा या दोन्हींना धक्का लावणा-या गोष्टी गेली काही दिवस ते सातत्याने करीत आहेत. याचे त्यांना कसलेही सोयरसुतक वाटत नाही, ही सर्वाधिक संतापजनक बाब…

स्वत: पंतप्रधान व गृहमंत्री कोरोनाच्या विषाणूचा प्रसार होणार नाही याची कसलीही खबरदारी न घेता प्रचार करीत आहेत. दुसरीकडे देशभरातील कोरोनाचे आकडे उरात धडकी भरविणारे आहेत. दिवसेंदिवस त्यामध्ये भर पडतेय. ज्या राज्यांमध्ये मतदान पुर्ण झालेय तिथले आकडे अद्याप बाहेर यायचे आहेत,परंतु निवडणूकांचे निकाल बाहेर आल्यानंतर तिथली परिस्थिती किती भीषण असेल याची कल्पनाही न केलेली बरी.कोरोनाचा हा कहर लक्षात घेता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उरलेले सर्व टप्पे एकदाच उरकून घ्यावी अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली होती. परंतु या मागणीला आयोगाने सपशेल नकार दिला. कोरोनाचा प्रसार रोखण्याची कोणताही ठोस अशी योजना, कृती यांचा सरकारकडे पूर्णत: अभाव असताना, देशातील आरोग्यव्यवस्थेचे धिंडवडे उडालेले असताना देखील निवडणूक आयोग या व्यवहार्य मागणीचा विचार करीत नाही याचे आश्चर्य वाटणे साहजिक आहे. बंगालचा निकाल काय लागायचा तो लागो पण कोरोनाच्या विरोधातील एक दिर्घ लढा या राज्याला लढावा लागणार हे स्पष्ट दिसत आहे.

रेमडेसिवीर स्वस्त – केंद्र सरकारचा मोठा निर्णय

हा लेख लिहित असताना भाजपाशासित राज्यांतील एक एक करामती पुढे येत आहेत. कोरोनाबळींचे आकडे लपविण्यासाठी सुरू असलेली कसरत लोकांपुढे येत आहे.यासोबतच या आजारावरील औषधांच्या वितरणाबाबत केंद्र सरकारचा दुजाभाव देखील स्पष्टपणे समोर येत आहे. आतापर्यंत गुजरात व उत्तर प्रदेश या भाजपाचा स्पष्ट प्रभाव असणा-या दोन्ही राज्यांचे मुख्यमंत्री कोरोनाग्रस्त झाले आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये आरोग्यव्यवस्थेची लक्तरे वेशीला टांगली गेली आहेत. स्मशानांत प्रेते जाळण्यासाठी मोठी रांग लागलेली आहे. गुजरातमधील सुरत या शहरात तर स्मशानाचील आग चोवीस तास धुमसतच आहे. या आगीमुळे स्मशानभूमीतील चिमण्या देखील वितळल्या आहेत. रुग्णालयांतील आरोग्यसज्जता, ऑक्सिजन, बेडस् , इंजेक्शन्स या सुविधांच्या बाबतील ही राज्यांतील यंत्रणा किती घायकुतीला आल्या आहेत हे स्पष्ट झाले.

महाराष्ट्रातही आरोग्यव्यवस्थेची परिस्थिती गंभीर असली तरी शासन पाठीशी असल्याचा अल्पसा का होईना पण जो विश्वास जनतेमध्ये आहे तो इतर राज्यांमध्ये जाणवत नाही. कोरोनाचा विषाणू जनतेला बाधित करीत असताना त्याचा प्रसार कसा रोखावा याची स्पष्ट अशी व्यूव्हरचना या राज्यांमध्ये झालेली दिसत नाही. परिणामी मृत्यूची संख्याही दिवसेंदिवस वाढत आहे. हे कमी की काय म्हणून उत्तरांचलमध्ये आस्थेचा मुद्दा करून लाखोंचा समावेश असणारा कुंभमेळा मोठ्या थाटामाटात साजरा करण्यात आला. अनेक साधू-महंत पवित्र कुंभस्रान करण्यासाठी गंगेत उतरले. स्वत: कोरोनाबाधित असताना सरसंघचालक मोहन भागवत यांनीही आपल्या शिष्यपरिवारांसह गंगेत बुडी मारली. हे सगळं धर्म, परंपरा, आस्था यांच्या नावावर सरकारने ओढून नेलं खरं पण कोरोनाचा विषाणू आस्था,धर्म आदी गोष्टी मानत नसल्याने त्याने या गर्दीतील बहुतांश लोकांना आपल्या मगरमिठीत घेतले.

हा आकडा नेमका किती मोठा असेल याचा अजूनही अंदाज आलेला नाही. कुंभमेळ्यातील महत्वाच्या आखाड्यांनी कोरोनाच्या प्रकोपापुढे सरळ-सरळ शरणागती पत्करुन तो अर्ध्यावरच बंद केला. कोरोनाची ही अशी गंभीर परिस्थिती असताना तेथील सरकारे कोरोना बाधित व बळींची संख्या यांच्या बाबतीत लपवाछपवी का करत आहेत, या प्रश्नाचे उत्तर उघड आणि स्पष्ट आहे. आत्मप्रौढी व खोट्या अस्मितेचा दंभ तेथील नेतृत्वाला वास्तवापासून दूर घेऊन जात आहे परिणामी जनतेची ससेहोलपट होतेय.

मध्य प्रदेश असो की उत्तर प्रदेश, गुजरात असो की हरियाणा या राज्यांतील तथाकथित सुशासनाचे तयार केलेले गोडगुलाबी मिथक कोरोनाच्या एकाच फटक्यात कोलमडून पडले. राज्यातील आरोग्यच नव्हे तर शिक्षण, पायाभूत सुविधा अशा सर्वच आवश्यक सुविधांच्या बाबतीत या राज्यांना भाजपाच्या शासनकाळात योग्य ती कामगिरी करता आली नाही हे वास्तव कोरोनामुळे लोकांसमोर आले आहे. गाईचे शेण चपातीला लोण्यासारखे लावून खाल्ल्याने कोरोना बरा होतो किंवा गाईच्या शेणामुताने अंघोळ केल्याने कोरोनाचे विषाणू मरतात असे जावईशोध लावणा-या साध्वा, तथाकथित साधू-संत, मुल्ला मौलवी यांची कोणतीही युक्ती विषाणूंच्या हल्ल्यापुढे चालत नाही. उलट त्यांच्या बुद्धी व कुवतीच्या मर्यादा उघड होतात. आताही तेच होतंय. कोरोनाने लोकांच्या नाक-तोंडाला मास्क घातलाय पण या काळात शासनाकडून मिळत असलेल्या वागणूकीमुळे आणि शास्त्रीय दृष्टीकोनाचा अंगीकार केलास लोकांच्या बुद्धिला लागलेला मास्क मात्र गळून पडेल अशी आशा करण्यास हरकत नाही. एकंदर देशाची आरोग्यव्यवस्थेची लक्तरे जगभर टांगली गेली आहेत. मोठमोठ्या घोषणा आणि बाता मारुन हा ‘इस्कोट’ दुरुस्त करता येणार नाही.यासाठी ठोस कृती व नियोजनाची गरज आहे. निवडणूकांचा ज्वर ओसरल्यावर तरी किमान देशाचे नेतृत्त्व ‘महातांडेलाच्या’ भूमिकेत येऊन कोरोनाच्या या वादळातून देशाची नौका किना-याला लावेल, अशी आशा आहे.

गिरीश अवघडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या