22.8 C
Latur
Saturday, October 1, 2022
Homeविशेषकोरोना, औषधे आणि इम्युनिटी

कोरोना, औषधे आणि इम्युनिटी

एकमत ऑनलाईन

कोरोनाचा संसर्गकाळ सुरू झाल्यापासूनच त्यावरील उपचारांसाठी निरनिराळे प्रयोग केले जात आहेत. परंतु संसर्ग आणि त्यामुळे होणा-या मृत्यूंची साखळी अद्याप तुटू शकलेली नाही. वैद्यकीय तज्ज्ञही त्यामुळे वेगवेगळ्या चिकित्सापद्धतींचा अवलंब करून उपचारांसाठी अनेक प्रयोग करीत आहेत. कोरोनावरील उपचारांसाठी आतापर्यंतचे निष्कर्ष आणि शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनावरून कोरोनावरील उपचारांसाठी कोणता उपाय उपयुक्त आहे आणि कोणता उपयुक्त नाही, याबद्दल हळूहळू माहिती समजू लागली आहे. एजिथ्रोमायसिन नावाच्या प्रतिजैविक औषधाचा कोरोनावरील उपचारांसाठी सर्वाधिक वापर केला गेला. एवढेच नव्हे तर या औषधाचा जेवढा वापर झाला, तेवढाच दुरुपयोगही झाला.

एजिथ्रोमायसिन आणि अन्य प्रतिजैविक औषधे (अँटिबायोटिक्स) विषाणूच्या संसर्गावर प्रभावी ठरत नाहीत. अँटिबायोटिक औषधे घेण्याचा सल्ला केवळ जीवाणूजन्य आजारांनी ग्रस्त असणा-या किंवा तशी लक्षणे असलेल्या रुग्णांनाच दिला जातो. काही रुग्णांमध्ये रुग्णालयात राहून उपचार घेतल्यानंतर शेवटच्या टप्प्यात अशा स्वरूपाची लक्षणे दिसतात. जीवाणूजन्य आजारांचा संसर्ग रुग्णांना होऊ नये, यासाठीच केवळ अँटिबायोटिक औषधे दिली जातात. परंतु ही औषधे सातत्याने दिली गेल्यामुळे रुग्णांच्या शरीरात अँटिबायोटिक औषधांसाठीची प्रतिरोधक क्षमता क्षीण झाल्याचे दिसून आले आहे.

रुग्णालयात भर्ती झालेल्या कोविड-१९ च्या रुग्णांच्या शरीरातील रक्त गोठण्याची शक्यता असते असे आढळून आले. अशा रुग्णांना जर रक्त पातळ करणारी औषधे इंजेक्शनच्या माध्यमातून दररोज दिली गेली तर ही समस्या निर्माण होणार नाही, यावर जगभरातील डॉक्टरांमध्ये एकमत झाले. इन्सुलिनच्या इंजेक्शनप्रमाणे हेही इंजेक्शन त्वचेत देता येते. ठोस आधारावर हे स्पष्ट झाले असले तरी त्यावर अधिकृत चाचण्या अद्याप झालेल्या नाहीत. अन्य आजारांवरील लसी कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी सक्षम ठरू शकतात अशी शक्यता काही जणांनी व्यक्त केली होती. उदाहरणार्थ बीसीजी, पोलिओ, एमएमआर या आजारांवरील लस टोचून घेतल्यास कोरोनाचा मुकाबला करता येऊ शकेल असे त्यांचे म्हणणे होते. परंतु त्यात फारसे तथ्य आढळून आले नाही. या लसींमुळे रोगप्रतिकारक क्षमता खरोखर वाढते का, हे पाहण्यासाठी चाचण्या सुरू आहेत. परंतु यात तथ्य न वाटण्याचे कारण असे की, भारतात जन्मत:च सर्वांना बीसीजीची लस टोचली जाते. परंतु तरीही संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या भारतात कमी नाही.

Read More  संपादकीय : चकाकते ती चांदीसुद्धा

कोरोनाचे संकट जेव्हा सुरू झाले तेव्हा देशात क जीवनसत्वाचा वापर बराच वाढला. विशेषत: अधिक प्रमाणात संत्री खाऊन क जीवनसत्व वाढविण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. ड जीवनसत्वाविषयी असेच झाले. बरेच संशोधन केल्यानंतर ड जीवनसत्वही कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती फारशी वाढवू शकत नाही, असे दिसून आले. फॅविपिरॅविर नावाचे विषाणूरोधक औषध भारतीय औषध नियंत्रक विभागाकडून लवकरच सुचविण्यात आले. परंतु युरोपीय महासंघ आणि अमेरिकेने अद्याप या औषधाला मान्यता दिलेली नाही. हे औषध घेण्याचा सल्ला केवळ किरकोळ लक्षणे असणा-या रुग्णांनाच दिला जाऊ शकतो. या औषधाच्या वापरासंबंधीची आकडेवारी पूर्णत: उपलब्ध झालेली नाही. परंतु भारतात नुकत्याच या औषधाच्या चाचण्या घेण्यात आल्या असून, त्याचे निष्कर्ष लवकरच समोर येतील.
हायड्रॉक्सिक्लोरिक्वीन या औषधाची मोठी चर्चा झाली.

या औषधावर जागतिक आरोग्य संघटना आणि ब्रिटनमध्ये परीक्षणे करण्यात आली. दोन्ही ठिकाणच्या चाचण्यांचा निष्कर्ष असा आला की, हे औषध कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी उपयुक्त नाही. इवेरमॅक्टिन हे अँटी पॅरासाइटिक औषध भारत आणि दक्षिण अमेरिकेत विषाणूंमुळे होणाºया संसर्गावर उपचार म्हणून वापरण्यात आले. परंतु कोविड-१९ वर हे औषध परिणामकारक ठरल्याचे कोणतेही पुरावे उपलब्ध नाहीत, त्यामुळे या औषधाचा उपयोग न करणेच इष्ट ठरेल. सरकारी यंत्रणेकडून उकालो या हर्बल आणि आयुर्वेदिक औषधाचे तसेच आर्सेनिक अल्बम या होमिओपॅथी औषधाचे वितरण केले जात आहे. केवळ सांगोवांगी माहितीवरून प्रामाणिक वैज्ञानिक निष्कर्ष काढता येत नाहीत.

कोणतीही वैद्यकीय चाचणी न करता या औषधांची विक्री आणि वितरण करण्यावर आक्षेपच घ्यायला हवा. सिद्ध न झालेली ही औषधे हानिकारक असण्याची शक्यता घेणे केवळ चुकीचे आहे असे नाही, तर अनेकांना त्यामुळे खोटी आशा लागून राहते. त्यामुळे अनेकांचा जीव धोक्यात येऊ शकतो. वर्षानुवर्षे आपल्याकडे असलेल्या कुपोषण, स्थूलता, फुफ्फुसातील संसर्ग अशा आजारांनी ग्रस्त असंख्य लोकांची रोगप्रतिकारशक्ती एखादी जादूची कांडी फिरवावी तशी अचानक वाढविणारे कोणतेही औषध अद्याप विकसित झालेले नाही.

Read More आता डेंग्यूची धास्ती

एन्फ्लुएन्झा या आजारास कारणीभूत ठरणा-या विषाणूवर उपचार करण्यासाठी आॅसेल्टामिविर हे विषाणूरोधी औषध दिले जाते. परंतु कोरोना विषाणूमुळे होणाºया कोविड-१९ च्या संसर्गावर उपचार म्हणून हे औषधही प्रभावी ठरलेले नाही. पेशी आणि प्लाज्मा यांच्या संयोगातून आपल्या शरीरातील रक्त तयार झालेले असते. जे लोक कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत, त्यांच्या शरीरात नैसर्गिकरीत्या अँटिबॉडीज तयार झालेल्या असतात. त्यांच्या शरीरातील या अँटिबॉडीज जर कोविड-१९ ने ग्रस्त असलेल्या रुग्णाच्या शरीरात सोडल्या गेल्या तर चांगले परिणाम दिसून येऊ शकतात.

सध्या तरी जगभरात कोरोनावर खात्रीशीर उपचार म्हणून हीच पद्धती वापरली जात आहे. या उपचाराच्या परिणामकारकतेविषयी अद्याप संशोधने सुरू आहेत. रेमडेसिविर नावाचे विषाणूरोधी औषध कोरोनावरील उपचारासाठी प्रभावी असल्याचे अनेक अध्ययनांच्या माध्यमातून सांगण्यात आले आहे. या औषधामुळे कोविडग्रस्त रुग्ण कमीत कमी वेळात बरा होण्याच्या शक्यता असतात. कदाचित या औषधामुळे रुग्णाला कमीत कमी दिवस रुग्णालयात राहावे लागेल. परंतु या औषधाचा वापर केल्यास कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तीचा मृत्यू होणारच नाही, याची खात्री मात्र देता येत नाही. सध्या रुग्णालयात भर्ती असलेल्या रुग्णांवरील उपचारांसाठी या औषधाचा वापर केला जात आहे.

कोरोनामुळे होणा-या मृत्यूंवर नियंत्रण आणण्यासाठी जे एकमेव उपचार कारणीभूत ठरले आहेत, ते म्हणजे स्टेरॉईडचा वापर. हे जुने आणि स्वस्त औषध आहे. सध्या उपलब्ध असलेल्या उदाहरणांच्या आधारावर असे म्हणता येऊ शकते की, डॅक्सामॅथेसॉनचा वापर करून व्हेन्टिलेटर आणि आॅक्सिजनवर अवलंबून असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण एक तृतीयांशने कमी करता येऊ शकते. अर्थात या औषधांचा वापर केवळ रुग्णालयांतच केला पाहिजे. संसर्गाच्या प्रारंभिक दिवसांमध्येच जर रुग्णाला हे औषध दिले गेले तर त्याची रोगप्रतिकार शक्ती कमी होईल. टॉसिलीजुमाब नावाचे एक औषध इंजेक्शनच्या माध्यमातून देण्यात येते. रक्तात गुठळ्या होणा-या रुग्णाला सामान्यत: हे औषध दिले जाते.

Read More  लातूर जिल्हा कारागृहातील दोन कैदी कोेरोना पॉझिटीव्ह

त्याचा उपयोग गंभीर सूज कमी करण्यासाठी केला जातो. हे लक्षण कोरोना संक्रमित काही रुग्णांमध्ये दिसून येते. याचा वापर करून जीवाणूंचा संसर्ग वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे या औषधाचा वापर करताना विशेषत: काही रुग्णांच्या संदर्भात अतिशय सावधगिरी बाळगणे आवश्यक असते. झिंकचा वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जात असला, तरी त्याचा खास फायदा झाल्याची उदाहरणे नाहीत. कोरोनाचा संसर्ग सुरू होऊन सहा महिने उलटून गेले आहेत. एवढ्या दिवसांनंतरसुद्धा कोविड-१९ च्या संदर्भात आतापर्यंत जो अभ्यास करण्यात आला आहे, त्यांचे निष्कर्ष पूर्णत: विश्वसनीय नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. या सर्व विवेचनानंतर कोविड-१९ संदर्भात एकच गोष्ट सांगता येणे शक्य आहे. ती म्हणजे, रोगप्रतिकारशक्ती हेच कोरोना विषाणूशी लढण्याचे सर्वांत प्रभावी शस्त्र आहे. रोगप्रतिकारशक्ती हेच कोविडपासून बचावासाठीचे एकमेव सुरक्षा कवच आहे.

आरोग्य विशेष
प्रा. विजया पंडित

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या