20.3 C
Latur
Sunday, December 4, 2022
Homeविशेषक्रायसिस

क्रायसिस

एकमत ऑनलाईन

बी केअरफुल बरं का..! ज्यांनी अजून दुकानांवर मराठी पाट्या लावल्या नाहीत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी मुंबई महापालिकेनं अ‍ॅक्शन प्लॅन तयार केलाय, अशी न्यूज ऐकली. महाराष्ट्रात मराठी मस्ट बाबा..! आणि मुंबई असो किंवा पुणे… आफ्टरऑल महाराष्ट्रच ना! महाराष्ट्रात मराठी माणूस दुकानात जातो आणि जे काय हवं ते हिंदीत सांगतो, व्हॉट इज धिस? मग दुकानदार म्हणतो, अब्बी नही है… लेकिन आएगा दो-तीन दिन में! मराठी माणूस दुकानातून खरेदी न करताच माघारी फिरतो. पण आपण हात हलवत घरी चाललोय, यापेक्षा अधिक पेनफुल असते, आपल्याला जे हवं ते मराठीतून मागता येत नाही, ही रिअ‍ॅलिटी! हाऊ सॅड नं? दुकानांचं सोडा… रिक्षात किंवा टॅक्सीत बसलं तरी कुठं जायचंय, हे हिंदीत सांगावं लागतं. आपल्याच गावात फिरायची चोरी झाल्यासारखंच नाही का हे? परवाच आम्ही गरबा डान्स करून परत येत होतो. टॅक्सीवाल्याला सांगितलं, मालाड जाने का है… आणि मॅजिकच झाली… टॅक्सीवाला चक्क मराठीतून बोलू लागला. मग आम्हीही छान गप्पा मारू लागलो त्याच्याशी. बोलता-बोलता त्यानं नवरात्रात ‘भोंडला’ की काहीतरी करतात, अशी इन्फर्मेशन दिली. म्हणजे, सगळ्या मुली गोल करतात. मध्ये हत्तीचं चित्र काढलेलं असतं आणि मग एक्सक्लुजिवली भोंडल्यासाठीची गाणी म्हणतात.

ही ट्रॅडिशन कुठली, असं टॅक्सीवाल्याला विचारलंसुद्धा!
टॅक्सीवाल्यानं जे सांगितलं ते शॉकिंग होतं. तो म्हणाला, महाराष्ट्रातलीच आहे ही ट्रॅडिशन. मग त्यानं गोंधळ वगैरे ट्रॅडिशनवर थोडक्यात ब्रीफ केलं. आम्हाला वाटत होतं, मराठीवरून जे काही चाललंय त्यालाच गोंधळ म्हणतात. पण मराठीत गोंधळाचीसुद्धा एक्सक्लुजिव गाणी असतात आणि ती पण नवरात्रातच म्हणतात, हे ऐकून आम्ही पुन्हा शॉक्ड झालो. संबळ, चौंडकं वगैरे इन्स्ट्रुमेंट्स खरंच एकदा बघितली पाहिजेत, असं मनापासून फील व्हायला लागलं, यू नो? सीरिअसली, नवरात्रात फक्त गरबा खेळतात एवढंच माहीत होतं. आपलं कॉमन नॉलेजसुद्धा किती पुअर आहे, हे रिअलाईज झाल्यामुळे खूप गिल्ट आलेला त्या दिवशी. मेन मार्केटमध्येच ड्रॉप कर, असं टॅक्सीवाल्याला सांगितलं होतं. माझ्या काही फ्रेंड्सना शॉपिंग करायचं होतं. त्यांच्याबरोबर या शॉपमधून त्या शॉपमध्ये फिरताना खूप बोअर झालेलं.

आधीच गरबा खेळून एक्झॉस्ट झालेलो आम्ही. त्यात फ्रेंड्सना शॉपिंगसाठी एनर्जी कुठून आली, डोन्ट नो. एनर्जी लेव्हल खूपच खाली आलेली. मग फ्रेंड्सना बाय करून डायरेक्ट घर गाठलं. जाता-जाता बघितलं, तर ऑलमोस्ट ट्वेन्टी टू थर्टी पर्सेन्ट दुकानांचे बोर्ड इंग्लिशमध्येच लिहिलेले..! आधीच आलेला गिल्ट आणखी वाढला… म्हटलं, इट्स हायटाईम… मराठी कम्पल्सरी केलंच पाहिजे… नो वे..! बीएमसीनं खरंच फक्त अ‍ॅक्शन प्लॅन तयार न करता तो इम्प्लिमेन्ट करायला पाहिजे. ज्यांचे साईनबोर्ड मराठीत नाहीत, त्यांच्यावर डायरेक्ट अ‍ॅक्शनच केली पाहिजे. थँक गॉड यंदा कुणीतरी ‘मराठी गरबा’ अ‍ॅरेंज केला आणि आम्ही नेमका तोच अटेन्ड केला. आता तर ठरवूनच टाकलंय. नेक्स्ट इयर, गूगलवर ‘भोंडला’ सर्च करायचा. त्याची सगळी साँग्ज मेमराईज करायची. फक्त परफॉर्म कुठे करायचा हे कळत नाही. बाल्कनीत कसा करायचा? हाच क्रायसिस आहे.

-हिमांशू चौधरी

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या