25.4 C
Latur
Wednesday, May 19, 2021
Homeविशेषसैनिक पेशींचा धोकाही!

सैनिक पेशींचा धोकाही!

साथीस कारणीभूत ठरणा-या कोणत्याही फ्लूमध्ये पांढ-या पेशी म्हणजेच सैनिक पेशींची संख्या वाढल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती गरजेपेक्षा अधिक सक्रिय होते आणि त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. या प्रक्रियेला सायटोकिन स्टॉर्म असे म्हणतात. डेक्सामेथासोन आणि अन्य स्टिरॉईड्सची सायटोकिन स्टॉर्मसाठी शिफारस केली जात असली, तरी ज्यांची रोगप्रतिकार शक्ती आधीच कमकुवत झाली असेल, अशा रुग्णांमध्ये ही औषधे उलट परिणाम करतात. कोविडच्या बाबतीत स्टिरॉईड किती प्रभावी आहेत, हे अद्याप स्पष्ट नाही.

एकमत ऑनलाईन

जगभरातील काही शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, १९१८ मध्ये पसरलेला स्पॅनिश फ्लू आणि २००३ मध्ये पसरलेल्या सार्सच्या साथीमध्येही सर्वाधिक मृत्यू विषाणूमुळे न होता रोगप्रतिकार शक्ती अत्याधिक सक्रिय झाल्यामुळे झाले होते. सार्सच्या साथीस कारणीभूत ठरणारा विषाणूही कोरोना गटातीलच एक होता, हे आठवत असेलच. एच-१एन-१ विषाणूमुळे होणा-या स्वाईन फ्लूच्या साथीतसुद्धा रोगप्रतिकार शक्ती सक्रिय करणा-या पेशींची संख्या वाढल्यामुळे सर्वाधिक रुग्णांचा मृत्यू झाला होता. साथीस कारणीभूत ठरणा-या कोणत्याही फ्लूमध्ये पांढ-या पेशी म्हणजेच सैनिक पेशींची संख्या वाढल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती गरजेपेक्षा अधिक सक्रिय होते आणि त्यामुळे मृत्यू होण्याची शक्यता अधिक असते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. नोवेल कोरोना विषाणूमुळे होणा-या कोविड-१९ च्या आजाराने संसर्गग्रस्त व्यक्तींच्या नुकत्याच केलेल्या चाचणीतून असे स्पष्ट झाले आहे की, या संसर्गाने ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये ‘सायटोकिन स्टॉर्म’ची शक्यता सर्वाधिक असते. सायटोकिन स्टॉर्म म्हणजेच रोगप्रतिकार शक्ती प्रदान करणा-या पेशींचे म्हणजेच पांढ-या किंवा सैनिक पेशींचे अत्याधिक झालेले उत्पादन. फ्लूचा संसर्ग झाल्यास सामान्यत: फुफ्फुसांमध्ये सक्रिय प्रतिरक्षक पेशींची संख्या बेसुमार वाढण्याची शक्यता असते.

आपल्या शरीरात जेव्हा एखादा विषाणू (व्हायरस) किंवा जीवाणू (बॅक्टेरिया) प्रवेश करतो, तेव्हा आपली रोगप्रतिकार शक्ती त्याच्याशी संघर्ष सुरू करते. ही शक्ती त्या जीवाणू वा विषाणूला कमकुवत करून अखेरीस त्याला नष्ट करते. परंतु अनेकदा शत्रूसेनेवर हल्ला चढविणारी आपल्या सैनिक पेशींची सेना बंडखोर बनते. रोगप्रतिकार शक्ती जर गरजेपेक्षा जास्त सक्रिय झाली तर रोगाशी लढण्याऐवजी ती आपल्या शरीराचेच नुकसान करते. अशा प्रक्रियेला ‘सायटोकाईन स्टॉर्म’ असे म्हणतात. शरीरात जेव्हा ‘सायटोकाईन स्टॉर्म’ होते तेव्हा ते निरोगी पेशींचेही नुकसान करते. रक्तातील लाल आणि पांढ-या पेशी कमी होऊ लागतात आणि हृदयाचे नुकसान होऊ शकते. जाणकारांचे म्हणणे असे आहे की, सायटोकाईन स्टॉर्म सुरू असताना रुग्णाला तीव्र ताप आणि डोकेदुखीचा त्रास होतो. अनेक रुग्ण कोमात जाऊ शकतात. असे रुग्ण आपल्या कल्पनेपेक्षा अधिक आजारी असतात. अर्थात, ही परिस्थिती आतापर्यंत डॉक्टर केवळ समजून घेऊ शकले आहेत. या परिस्थितीचे आकलन करण्याची पद्धत मात्र आपल्याकडे उपलब्ध नाही. यात रोगप्रतिकारक पेशी म्हणजे इम्यून सेल फुफ्फुसाच्या जवळपास गोळा होतात आणि फुफ्फुसावर हल्लाही करतात. या प्रक्रियेत रक्तवाहिन्या फुटू शकतात. त्यातून रक्त वाहू लागते आणि रक्ताच्या गाठीही बनतात. परिणामी शरीराचा रक्तदाब कमी होतो. हृदय, मूत्रपिंड, फुफ्फुसे असे शरीरातील नाजूक अवयव काम करणे बंद करतात किंवा शिथिल पडू लागतात.

कोणत्याही फ्लू संसर्गात सायटोकाईन स्टॉर्म फुफ्फुसात सक्रिय प्रतिरक्षक पेशींच्या वाढीशी संबंधित असते. अँटीजनशी लढण्याऐवजी फुफ्फुसाची सूज किंवा फुफ्फुसात पाणी साचणे किंवा श्वसनास त्रास होणे अशी संकटे हे स्टॉर्म निर्माण करू शकते. परिणामी रुग्णाच्या फुफ्फुसांची सूज किंवा त्याच्या फुफ्फुसात पाणी बनण्यामुळे श्वसनसंकट उभे राहते आणि रुग्ण सेकेंड्री बॅक्टेरियल न्युमोनियाने ग्रस्त होतो. यात रुग्णाचा ब-याच वेळा मृत्यू ओढवतो. तपासणी आणि उपचारांनंतर ही परिस्थिती आटोक्यात आणणे शक्य असते. परंतु कोविड-१९ ने ग्रस्त रुग्णांच्या बाबतीत ही स्थिती ओढवली तर ती नियंत्रित करण्यासाठी काय करायचे, याचे उत्तर तूर्तास कुणाकडे नाही.

लोहा पालिकेकडून अशुद्ध पाण्याचा पुरवठा

सामान्यत: सायटोकिन्स हे प्रतिरक्षक प्रोटिन म्हणून शरीरात काम करतात. बा आजारांशी ते लढतात. परंतु कोरोनाच्या बाबतीत मात्र तसे घडत नाही. बर्मिंगहॅममधील अल्बामा विद्यापीठातील डॉ. रॅन्डी क्रोन सांगतात की, सायटोकिन्स एक प्रतिरोधक प्रोटिन असून आपल्या शरीराला झालेल्या संसर्गाशी ते लढू शकते. जेव्हा एखाद्याला आजार होतो, तेव्हा त्याला आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर भरवसा असतो आणि त्या जोरावर आपण बरे होऊ असा विश्वास त्याला वाटतो. सामान्य आजारांबरोबरच बॅक्टेरिया आणि व्हायरस यांच्याशीसुद्धा ही प्रणाली लढते. जर शरीर सायकोटिन्सशी आणि सायकोटिन्स बा रोगांशी लढत राहिले तर त्याला सायटोकिन स्टॉर्म सिंड्रोम म्हटले जाते. एखाद्या रुग्णाची प्रतिरक्षक प्रणाली रोगामुळे, बॅक्टेरियामुळे किंवा व्हायरसमुळे भ्रमितसुद्धा होऊ शकते. अशा वेळी सायकोटिन प्रोटीन शरीरात तयार होते. शरीरातील चांगल्या पेशींनाही ते नष्ट करते. सायटोकिन स्टॉर्म एखाद्या संसर्गामुळे, ऑटो-इम्यून स्थिती किंवा अन्य आजारांमुळे होऊ शकते. याचे प्रारंभिक संकेत आणि लक्षणांमध्ये तीव्र ताप, शरीरावर आलेली सूज किंवा लालसर त्वचा, खूप थकवा आदींचा समावेश असतो.

सायटोकिन स्टॉर्म कोरोना विषाणूने ग्रस्त रुग्णात काही विशेष लक्षण मानले जात नाही. ही रोगप्रतिकार प्रणालीची एक प्रतिक्रिया आहे आणि ती अन्य संसर्गजन्य किंवा सामान्य आजारांच्या वेळीही तशीच असते. सायटोकिन स्टॉर्म किंवा सायटोकिन स्टॉर्म सिंड्रोममध्ये रोगप्रतिकारक पेशींचे अतिउत्पादन होते आणि या प्रक्रियेत शिथिलता आल्याने पेशी स्वत: सायटोकिन्स होतात. अमेरिकेतसुद्धा कोविडच्या रुग्णांमध्ये सायटोकिन स्टॉर्मचा प्रकोप पाहायला मिळाला. डॉक्टरांचे म्हणणे असे आहे की, कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये रोगप्रतिकारक क्षमतेच्या पेशी फुफ्फुसांवर खूप लवकर आणि तीव्र स्वरूपाचा हल्ला चढवितात. हे आक्रमण इतके वेगवान असते की, फुफ्फुसांवर फायब्रोसिस नावाच्या खुणा दिसून येतात.

अमेरिकेतील रोग नियंत्रण केंद्राच्या म्हणण्यानुसार, सायटोकिन स्टॉर्म सिंड्रोम हेच २७ टक्के कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूचे कारण ठरले आहे. परंतु सायटोकिन्सच्या आधी ज्येष्ठ नागरिकांच्या शरीरामध्ये अन्य काही आजार आहेत की नाहीत, हेही पाहावे लागते. ६५ ते ८४ वर्षे वयोगटातील लोकांमध्ये डिमेन्शियाने पीडित ३ ते ११ टक्के रुग्णांमध्ये सायटोकिन स्टॉर्म सिंड्रोम होता. ५५ ते ६४ वर्षे वयोगटातील केवळ १ ते ३ टक्के लोकांचाच मृत्यू झाला. २० ते ५४ वयोगटातील एक टक्क्याहून कमी रुग्णांमध्ये सायटोकिन आढळून आले. ‘सायन्स अ‍ॅडव्हान्स’ या नियतकालिकात प्रकाशित शोधनिबंधात म्हटले आहे की, कोविड-१९ च्या रुग्णांमधील ५ टक्क्यांहून कमी लोकांमध्ये (यात काही गंभीर आजार असलेल्या रुग्णांचाही समावेश आहे) सायटोकिन स्टॉर्म सिंड्रोम या नावाने ओळखण्यात येणारी हायपर इन्फ्लेमेटरी प्रतिक्रिया दिसून आली. कोविड-१९ च्या रुग्णांमध्ये सायटोकिन स्टॉर्म निर्माण झाल्याची माहिती वुहानच्या डॉक्टरांकडून जगाला मिळाली आहे. त्यांनी २९ रुग्णांवर एक संशोधन केले आणि त्यांना असे आढळून आले की, त्यांच्यात आयएल-२, आणि आयएल-६ सायटोकिन स्टॉर्मची लक्षणे होती. वुहानमध्येच १५० कोरोना रुग्णांवर केल्या गेलेल्या अन्य एका संशोधनात असे दिसून आले आहे की, कोविडमुळे मृत्युमुखी पडणा-यांमध्ये आयएल-६ सीपीआर सायटोकिन स्टॉर्मचे मॉलिक्युलर इंडिकेटर जास्त होते. जे लोक वाचले त्यात ही लक्षणे कमी प्रमाणात होती.

सायटोकिन स्टॉर्मचे नाते एखाद्या संसर्गजन्य आजाराच्या साथीशी जोडले जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी १९१८ ते २० या काळात स्पॅनिश फ्लू महामारी आली होती, तेव्हाही रुग्ण मृत्युमुखी पडण्याच्या कारणांमागे हे एक प्रबळ कारण मानले गेले होते. या महामारीने जगातील पाच कोटींहून अधिक लोकांचा बळी घेतला होता आणि अलीकडील काळात एच-वन एन-वन म्हणजे स्वाईन फ्लू आणि एच-फाइव्ह एन-वन म्हणजे बर्ड फ्लूच्या प्रकरणांमध्येही याची लक्षणे दिसून आली होती. जेव्हा शरीराची रोगप्रतिकार क्षमता असंतुलित होते तेव्हा मृत्यू होणे निश्चित आहे. अर्थात डेक्सामेथासोन आणि अन्य स्टिरॉईड्सची सायटोकिन स्टॉर्मसाठी शिफारस केली जात असली, तरी ज्यांची रोगप्रतिकार शक्ती आधीच कमकुवत झाली असेल, अशा रुग्णांमध्ये ही औषधे उलट परिणाम करतात. आपल्या प्रतिरक्षक पेशींना बेकाबू होऊ द्यायचे नसेल तर रोगप्रतिकार शक्तीला काबूत आणणे आवश्यक आहे. त्यावर उपचार करण्यासाठी स्टिरॉईड हीच पहिली पसंती आहे. परंतु कोविडच्या संदर्भात मात्र स्टिरॉईड लाभदायक ठरेल की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्रा. विजया पंडित

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,498FansLike
190FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या