19.2 C
Latur
Monday, February 6, 2023
Homeविशेषमुक्तीची पहाट

मुक्तीची पहाट

एकमत ऑनलाईन

हैदराबाद मुक्तिसंग्रामाच्या अमृतमहोत्सवी वर्षाचे औचित्य साधून दैनिक ‘एकमत’चे संपादक मा. मंगेश देशपांडे-डोंग्रजकर सरांनी या विषयावर लेखमाला लिहिण्यास प्रोत्साहित केले. आज या लेखमालेतील ५१वा लेख प्रकाशित होत आहे. सदर लेखन हे नेहमीच आव्हानात्मक असते. पण अनेकांचे सहकार्य व प्रेरणेतून मी वर्षभर नियमितपणे लिहित राहिलो. मा. कौस्तुभ दिवेगावकर, (भाप्रसे), शिक्षण उपसंचालक डॉ. गणपतराव मोरे, शिक्षणाधिकारी (माध्य.) मा. नागेश मापारी, डॉ. नागोराव कुंभार, जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी वडगावे सर, डॉ. विवेक घोटाळे, प्रा. सूर्यनारायण रणसुभे, डॉ. अर्चना टाक यांनीही लेखमालेत अनेक नवीन विषय व संदर्भ आल्याचे आवर्जून कळवले. बाबासाहेब परांजपे फाऊंडेशन परिवारातील सर्व सदस्य, तसेच फोनवर व प्रत्यक्ष भेटीत अनेक वाचकांनी खूप उत्साहवर्धक अभिप्राय दिले. या सर्वांचे मन:पूर्वक आभार. एका दुर्लक्षित इतिहासातील अनेक अज्ञात पैलू आपल्यासमोर आणता आले याचे समाधान असले तरी अजून अनेक विषय समाविष्ट करता आले नाहीत याची जाणीव मला आहे. प्रा. डॉ. सुनील पुरी, जिल्हा ग्रंथालय अधिकारी सुनील गजभारे यांनी आवश्यक संदर्भ उपलब्ध करून दिले. या सर्वांच्या सहकार्याशिवाय हे लिखाण शक्य नव्हते. या सर्वांचे तसेच एकमत परिवार व सर्व वाचकांचे मन:पूर्वक आभार. धन्यवाद.

९ सप्टेंबरला दिल्ली येथे झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये १३ सप्टेंबरला हैदराबादमध्ये पोलिस कारवाईला प्रारंभ करायचा निर्णय घेण्यात आला. पोलिस कारवाई करण्याचे ठरले तेव्हा त्याला ‘ऑपरेशन पोलो’ असे सांकेतिक नाव देण्यात आले. हैदराबादमधील कारवाई ही लष्कराने केलेली कृती होती. तिचे मुख्य संचालक लेफ्टनंट जनरल महाराज राजेंद्र सिंहजी हे होते. त्यांच्या मदतीला पुढील लष्करी अधिकारी होते. १) मेजर जनरल जयंतीनाथ चौधरी हे सोलापूरहून प्रवेश करणा-या सशस्त्र दलाचे कमांडर होते. सर्वांत महत्त्वाची जबाबदारी या विभागाकडे होती. २) मेजर जनरल डी. एस. ब्रार हे सोलापूरच्या उत्तरेला मुंबई विभागातील दलाचे कमांडर होते. ३) मेजर जनरल ए. ए. सुंद्रा हे मद्रास समितीचे कमांडर होते. ४) ब्रिगेडिअर शिवदत्त सिंग हे मध्य प्रांत व व-हाडकडचे कमांडर होते तर ५) एअर व्हाईस मार्शल मुखर्जी हे संपूर्ण हवाई हालचालीचे व कृतीचे नियंत्रक होते. हैदराबादमधील आक्रमण मुख्यत: पश्चिम दिशेने म्हणजेच सोलापूरच्या बाजूने होणार होते.१३ सप्टेंबरला पहाटे चार वाजता प्रत्यक्ष कारवाईला सुरुवात झाली. सकाळी नऊपर्यंत लष्कर नळदुर्गपर्यंत आले. नळदुर्गचा पूल उडवून देण्याचा निजामी लष्कराचा बेत फसला होता. येथे अचानक झालेल्या गोळीबारात हवालदार बचित्तर सिंह शहीद झाले. भारतातील पहिले अशोकचक्र देऊन त्यांना मरणोत्तर सन्मानित करण्यात आले. इकडे भारताने आक्रमण केल्याची बातमी आल्यानंतर हैदराबादमध्ये रझाकार बस आणि ट्रकमध्ये भरभरून रस्त्याने निजाम आणि रझवी यांच्याप्रति आपल्या वफादारीच्या घोषणा देत होते. भारतीय सैन्याला नळदुर्गनंतर फारसा प्रतिकार झाला नाही. बिदर ताब्यात आले व विमानतळही ताब्यात आले. पुढे जहिराबादला अचानक प्रतिकार झाला. शत्रूच्या गोळीबारामुळे होशनाकसिंग हा जवान शहीद झाला. पुढे मात्र भारतीय लष्कराने जोरदार मुसंडी मारली.

१७ सप्टेंबरला निजाम शरण आला. स्वत: निजामानेच सायंकाळी ५ वाजता हैदराबाद रेडिओ केंद्रावरून भाषण करून आपण हे युद्ध थांबवत असल्याचे सांगितले. निजामाने जरी १७ सप्टेंबरला शरणागती पत्करली असली तरी प्रत्यक्ष शरणागती स्वीकारण्याचा समारंभ १८ सप्टेंबरला झाला. आपल्या एका अंगरक्षकासह हैदराबादचे लष्कर प्रमुख जनरल अल द्रूस भारतीय लष्कराकडे आले आणि हैदराबाद शरण येत असल्याचे सांगितले. जनरल जे. एन. चौधरी यांनी ही शरणागती स्वीकारली व भारतीय लष्कराने हैदराबादचा ताबा घेतला. अवघ्या १०९ तासांत ही कारवाई पूर्ण झाली. अशाप्रकारे १७ सप्टेंबर १९४८ रोजी हैदराबाद संस्थानात मुक्तीची पहाट उगवली. भारतीय सैन्याने कारभाराची सूत्रे हातात घेतल्यावर सर्वांत जास्त भीती अर्थात कासिम रझवीला होती कारण रझाकार प्रमुख म्हणून सगळ्यांचाच त्याच्यावर राग असणे साहजिकच होते. १९ सप्टेंबर रोजी कासिम रझवीला सिकंदराबादमध्ये त्याच्या मेव्हण्याच्या घरी अटक करण्यात आली.

२१ सप्टेंबर रोजी म्हणजे पोलिस अ‍ॅक्शन संपल्यानंतर तीनच दिवसांनी वृत्तपत्रांनी अंदाज बांधून अशी बातमी प्रकाशित केली की कासिम रझवीला दिल्लीला आणले जाईल आणि लाल किल्ल्यामध्ये त्याचा खटला चालवला जाईल. यापूर्वी आझाद हिंद सेनेतील अधिका-यांचे आणि महात्मा गांधी खून खटला असे दोन खटले लाल किल्ल्यात चालवले गेले होते. जवाहरलाल नेहरूंनी ताबडतोब सरदार वल्लभभाई पटेल यांना पत्र लिहिले. रझवीला हैदराबादमध्ये ठेवावे. दिल्लीला आणू नये, असे सुचवले. (हे पत्र व त्यांना सरदार वल्लभभाई पटेल यांचे उत्तर हे दोन्ही माझ्या ६६६.ुँं४२ंँीु४ें३ी.ूङ्मे या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.) जवाहरलाल नेहरूंना पाठवलेल्या उत्तरात पटेल म्हणाले की, ‘‘लाल किल्ला हे पवित्र स्थान आहे. रझवीसारख्या गुंडासाठी ते कशाला? रझवी व इतर यावरील खटले शक्यतो लवकरात लवकर हैदराबादमध्ये निकालात काढावेत असे पं. नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल या दोघांनाही वाटत होते.

हैदराबादमध्ये १९५० मध्ये नागरी राज्य सुरू झाले. ८ एप्रिल १९५० रोजी मुख्यमंत्री एम.के. वेलोडी यांनी कासिम रझवीचा खटला जोसेफ पिंटू, मीर अहमदअली खान आणि जगन्नाथराव अशा न्यायसेवेतील तीन अधिकारीवर्गाचा समावेश असलेल्या पीठापुढे चालवण्याचा आदेश दिला. या न्यायाधिकरणासमोर शोएब उल्ला खान खून खटला आणि बिबीनगर दरोडा दोन्ही चालले. रझवीने स्वत:च आपला बचाव केला. आपण जातीयवादी नाही आणि हिंसेला उत्तेजन देण्याचे आपले धोरण नव्हते हे सिद्ध करण्यासाठी महात्मा गांधींच्या निधनानंतर रझवीने पाठविलेला शोकसंदेश पुरावा म्हणून दाखल केला. हैदराबादमधील स्वतंत्र वृत्तीच्या ‘इमरोज’ वृत्तपत्राचे तरुण संपादक शोएब उल्ला खान यांचा रझाकारांनी खून केला होता. कासिम रझवीला सात वर्षांची शिक्षा झाली. १९५६ ला तुरुंगातून सुटका झाल्यानंतर कासिम रझवी मुंबईहून कराचीला गेले. ६ फेब्रुवारी १९४९ रोजी आदेशानुसार निजामाची वैयक्तिक जहागिर ‘सर्फ-ए-खास’ रद्द करण्यात आली. त्याचा वार्षिक महसूल अडीच कोटी होता. त्या बदल्यात निजामाला आजीवन वार्षिक २५ लाखांची भरपाई देण्यात आली. यासोबतच निजामाला वैयक्तिक खर्चासाठी वार्षिक एक कोटी २५ लाख रुपये देण्यात आले. २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक बनले आणि हैदराबाद हे भारताचे एक राज्य. विशेष म्हणजे सर्व काही करून निजाम मात्र नामानिराळे राहिले. निजामास या नवीन राज्याचा प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले.

-भाऊसाहेब उमाटे
लातूर, मो. ७५८८८ ७५६९९

Stay Connected

1,567FansLike
186FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या