34.4 C
Latur
Friday, April 23, 2021
Homeविशेषडिअर मराठी, विथ लव्ह ...

डिअर मराठी, विथ लव्ह …

एकमत ऑनलाईन

डिअर मराठी : आज तुझ्या कौतुकाचा दिवस म्हणजे थोडक्यात तुझा ‘पोळा’च! तसं बैलपोळा पण म्हणता आलं असतं पण अजून कुणाचीतरी ‘अस्मिता’ दुखावली जायची. आमच्या ‘मदरटंग’ची बैलाशी तुलना केली म्हणून कुठून तरी हक्कभंग यायचा नाहीतर खळ्ळखट्याक् व्हायचं. सो.. (हा मराठीतला ठिकठिकाणी वापरावयाचा लेटेस्ट शब्द) जागतिक मराठी दिनाच्या निमित्ताने तुझ्याशी ‘टॉक’ करताना खूप ‘प्राऊड फील’ होत आहे.

तर माय मराठी : तुझा आणि आमचा संबंध अगदी नाळेपासूनचा! मायच्या पोटातून बाहेर आल्यानंतर नाळ तोडली जाते म्हणतात. (आपल्याला तर आठवत नाही बा!) पण ती तोडली जाते जणू काही तुझ्याशी जोडण्यासाठी ! ‘ट्यांऽऽहा’हा पहिला ध्वनी कोणत्या भाषेतला असतो हे निश्चित करता येत नसले तरी तो मराठीतलाच असावा असा आमचा दावा आहे . त्यामुळे तिथूनच आम्ही तुझ्याशी जोडले जातो असं आमचं स्पष्ट मत आहे. नाळेपासून सुरू झालेला प्रवास शेवटच्या संस्कारापर्यंत तुझ्या संगतीने चालतो. दोन हजार वर्षांपूर्वीचा तुझा जन्म मानला जातो. श्रवणबेळगोळच्या ‘चामुंडराये करविले’ असेल की पाचव्या शतकातील दीपवंश असेल आम्ही मरहट्टे (मराठीवाले) तेव्हापासूनच अहिमानी (म्हणजे अभिमानी) असल्याचे उल्लेख सापडतात. आजची तू आणि तेव्हाची तू यात मोठे अंतर असणे स्वाभाविक आहे. काळाच्या ओघात तू बदलत गेली खरी पण तुझा गाभा हलला नाही. ही मराठी जनसामान्यांसाठी खुली करण्याचे श्रेय ज्ञानेश्वर माऊलींना जाते. ‘माझा मराठाची बोलु कौतुके’ असं म्हणत माऊलींनी तुला जनसामान्यांसाठी खुलं केलं. त्यानंतरच्या काळात संतांपासून आजच्या कवी-लेखकांपर्यंत तू चालतच राहिलीस…

परकीय आक्रमणे केवळ राजकीय नव्हती तर सांस्कृतिक आणि भाषिकही होती. मराठवाड्यातील शाळांची दफ्तरं किंवा तहसीलमधील जमिनीच्या नोंदी आजही उर्दूमध्ये सापडतात. यावरून अगदी अलीकडच्या काळातील भाषिक आक्रमणाची कल्पना येऊ शकते. परकीयांची, परभाषिकांची आक्रमणं सहन करूनही ताठ मानेने उभी राहिलीस तू! संयुक्त महाराष्ट्र उभा राहण्यासाठी तूच तर आमचा आधार होतीस. भाषिक सूत्राची अंमलबजावणी हे सूत्र धरून आम्ही नवमहाराष्ट्राच्या निर्मितीचे स्वप्न घेऊन चाललो खरं! पण तुझा लचका पाडण्याचा कर‘नाटकी’ डाव ‘महा’जनांनी साधला. ही वेदना उराशी बाळगून आम्ही मंगल कलश घेऊन पुढे चालू लागलो. मराठी भाषा आमची राजभाषा हे स्वप्न घेऊन चालताना आमची मायबोली आमची राजभाषा होणे तर दूरच पण ती आता जनभाषाही राहते की नाही अशी शंका मनाला कुरतडून खात आहे.

मराठी माये
साठ वर्षे म्हणजे सहा दशकं झाली आमची मराठी भाषिक भूमी निर्माण होऊन. परंतु तुझ्यासाठी आम्ही काय करू शकलो हा प्रश्न विचारला तर आमची छाती गर्वाने फुगून येणे तर दूरच पण आमची मानही वर होत नाही अशी अवस्था! मराठी हा आमच्या जगण्याचा, व्यवहाराचा, अर्थकारणाचा विषय व्हावा; पण तो दुर्दैवाने झाला नाही. ज्या दिवशी मराठी आमच्या राजकारणाचा विषय झाला त्या दिवसापासून तुझ्या दुर्दैवाचे दशावतार सुरू झाले. भाषाप्रेमाचे रुपांतर अस्मितेत झाले आणि आम्ही आंधळे झालो. अस्मितेभोवती फिरताना अस्मिता कशासाठी हेच आम्ही विसरून गेलो. आमच्या भावनांना ठेच पोहोचते खरी पण ती भावना भावनिक असते हे आम्हाला कळलेच नाही. तिच्या लाटेवर स्वार झालो की येणारे झापडबंद आंधळेपण गुदमरून टाकत असले तरी आम्हाला काहीही करता येत नाही. आमची अस्मिता मग दुकानांच्या पाट्याभोवती, रेल्वे-बसच्या फलकांपुरतीच फिरत राहते. डरकाळ्या फोडणे, पाट्या तोडणे हे करणारे आम्ही आमच्या आपल्या तुझ्यावरच्या प्रेमाच्या ढोंगीपणाला तोडू नाही शकलो हेही तेवढंच खरं आहे.

मायमराठी : तात्यासाहेबांसारख्या तुझ्या उपासकाला माय मराठी चिंधी पांघरून मंत्रालयासमोर भीक मागते आहे असे कळवळून सांगावे लागले यापेक्षा आमचे दुर्दैव कोणते? संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर तुझ्यासाठी शासनाकडून पावले उचलली गेली नाहीत असे नाही पण त्या पावलांवर पावलं टाकणारी पावलं हळूहळू कमी होत गेली. भाषेचे ज्ञान, तिच्याबद्दलची तळमळ, आस्था, अभ्यास केव्हाच गतप्राण होऊन गेला. प्रज्ञावंतांच्या जागा गणंगांनी घेतली की यापेक्षा वेगळे काय होणार? मग साहित्य संमेलनाच्या जत्रा झाल्या. शासकीय उपक्रम लाल फितीत अडकले. महानगरातल्या मराठी शाळा गतप्राण झाल्या होत्या. त्यांना संपवून त्या जागांवर मॉल्स उभारून आम्ही मराठीचे गौरव गीत गायला निघालो होतो. म्हणजेच तुझ्याच थडग्यावर तुझेच कौतुक!

आमच्या राजधानीची ‘बंबई’ कधी झाली हे कळलं नाही. शासनाच्या आदेशाने ‘बॉम्बे’ची ‘मुंबई’ झाली असली तरी समाजमान्यतेचे काय? हा प्रश्न उरतोच. तुला टिकवायचं म्हणजे केवळ भावनेच्या पातळीवर टिकवता येणार नाही. ‘अमृतातेही पैजा’असा ‘ज्ञानेश्वरी’चा संदर्भ देऊन तुझी उखडणारी मुळं उखडायची थांबणार नाहीत. त्यासाठी तुला समाजमान्यता असायला हवी. सांस्कृतिक राजधानी म्हणून मिरवणा-या पुण्यातील मराठी ऐकतानासुद्धा अंगावर शहारे येतात. ज्ञाना, जनाची, तुकोबा, रामदासांची, शाहिरांची, भाषाप्रभूंची हीच मराठी का? असा प्रश्न पडतो. ‘सुप्रभात’ ला आम्ही कधीच ‘टाटा’ केला. ‘टाटा’ च्या जागी ‘बाय’ कधी येऊन बसली हे कळलंच नाही. वीज, पंख्याची जागा लाईट, फॅननं एवढी भक्कम केली की कुणी वीज, पंखा म्हणाला तर आम्ही अंगावर पाल पडल्यागत करतो! आमची ‘पसंद’ केव्हाच ‘नापसंद’ झाली आणि तिची जागा घेत ‘लाईक’ या शब्दाने आमच्या मातृभाषाप्रेमाची ‘लायकी’ दाखवून दिली.

आमच्याकडे हल्ली ‘प्रेम विवाह’ होत नाहीत कारण त्यांची जागा ‘लव्ह मॅरेज’ ने घेतलीय! या मॅरेजसाठी आम्ही एकमेकांना ‘आधार’ न देता ‘सपोर्ट’ करतो. ‘यू नो ममा’असं म्हणत आमचे ‘टीनेजर्स’ जेव्हा बोलू लागतात तेव्हा त्यांचं भाषिक कौशल्य आमच्यासाठी ‘प्राऊडेबल’ असतं. असं असलं तरी आम्ही मराठी दिन साजरा करतो. या दिवशी ‘मराठि दीन’ सेलिब्रेट करतानाची आमची अगतिकता मात्र जागतिक असते. सोसायटीमधल्या, कॉलनीमधल्या स्कूलमधल्या, कॉलेजमधल्या कार्यक्रमात मराठीच्या ‘ग्रेटनेस’चे आम्ही कौतुक करतो. ते कुसुमाग्रज का कोण त्यांचा ‘बर्थडे’ असतो म्हणून लॅपटॉपच्या होम स्क्रीनवर आणि थोडा मोठा हवा म्हणून मग प्रोजेक्टरच्या बिग स्क्रीनवर त्यांच्या फोटोपुढे ‘रोज’ (रोज म्हणजे गुलाब नाहीतर तू रोजचा अर्थ दररोज घेशील आणि पाहायला येशील !) ठेवून आम्ही त्यांची कणा(की कना) ही पोएम ‘लाऊडली रीड’ करतो, त्याचं प्रोनाऊन्सेशन्स चुकत असलं तरी ते आमच्या ‘बॉटम ऑफ हार्ट’ मधून असल्यामुळे आमच्या फिलिंग तू समजून घेशील अशी एक्सपेक्टेशन बाळगतो आहे.

डू यू नो? त्या दिवशी आम्ही पूर्ण मराठीत बोलण्याची स्पर्धा घेतो तेव्हा ‘विनर’ ला बंपर प्राईज देतो. तो डिजर्व करतो ना! शुद्ध मराठीत बोलणं किती डिफिकल्ट असतं ना! म्हणून आम्हाला त्याचं खूपच कौतुक करावं वाटतं. ‘वाट आय वॉज गोईंग टू टेल’ असं म्हणत आम्ही तुझी ‘स्वीटनेस’ म्हणजे गोडी सांगतो, तू फणफण करणार नसशील तर एक ‘फन’ तर तुला सांगायची राहिली, जो ‘विनर’ असतो ना तोसुद्धा खूप खूप ट्राय करूनही ‘हंड्रेड पर्सेंट’ मराठी ‘स्पीक’ करू शकत नाही. (हाऊ इंटरेस्ंिटग ना!) मग जास्तीत जास्त मराठी वर्डस् वापरणा-यांचा आम्ही गौरव करतो. बघ आहोत की नाही आम्ही तुझे प्रेमी? त्यातलं एक ‘सिक्रेट’
सांगायचं राहूनच गेलं. आमच्या मागच्या वर्षीच्या स्पर्धेत असलेला विनर चक्क ‘नॉनमराठी’ होता.
ओन्ली युवर्स, वर्ल्डवाईड मराठीप्रेमी

धनंजय गुडसूरकर, उदगीर
मोबा.: ९४२०२ १६३९८

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,483FansLike
172FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या