22.4 C
Latur
Saturday, June 19, 2021
Homeविशेषपरिचारिकांचे समर्पण

परिचारिकांचे समर्पण

एकमत ऑनलाईन

दरवर्षी १२ मे हा दिवस जागतिक परिचारिका दिन म्हणून सर्वत्र साजरा होतो. हा दिवस म्हणजे आद्य परिचारिका फ्लोरेन्स नाइटिंगेल यांचा जन्म दिन. इंग्रज परिचारिका व आधुनिक रुग्णपरिचर्या (नर्सिंग) शास्त्राच्या संस्थापिका. त्यांनी सार्वजनिक आरोग्यविज्ञानात मोलाची भर घातली. संपूर्ण जगाला त्यांनी सेवेचा पायंडा घालून दिला. त्यांच्या सेवेला प्रणाम म्हणून ‘लेडी विथ द लॅम्प’ ही उपाधी त्यांना प्रदान करण्यात आली. त्यांच्या खडतर तपश्चर्येमुळे परिचर्या क्षेत्राचा उगम झाला.

फ्लोरेन्स यांचा जन्म इटलीतील फ्लोरेन्स येथे झाला. त्यांचे शिक्षण घरीच झाले. ग्रीक, लॅटिन, फ्रेंच, जर्मन व इटालियन या भाषांखेरीज त्यांना त्यांच्या वडिलांनी इतिहास, तत्त्वज्ञान व गणित हेही विषय शिकविले. १८५० साली कॅसर्सव्हर्ट (जर्मनी) येथील एका संस्थेत दाखल होऊन त्यांनी रुग्णपरिचर्याविषयक संपूर्ण शिक्षणक्रम पार पाडला. ब्रिटिश मंत्रिमंडळातील युद्ध सचिव सिडनी हर्बर्ट यांनी १८५४ मध्ये रशिया विरुद्ध क्रिमियन युद्ध सुरू झाल्यावर नाइटिंगेल यांना युद्धभूमीकडे जाण्याचे सुचविले. तेथील जखमी व आजारी सैनिकांच्या व्यवस्थेत क्रांतिकारक बदल घडवून मृत्यूचे प्रमाण पुष्कळ कमी केले. इंग्लंडमध्ये परतल्यानंतर त्यांनी ब्रिटिश सैनिकांचे आरोग्य, त्यांची राहण्याची व्यवस्था व त्यांना मिळणारे अन्न यांत सुधारणा घडवून आणण्याकरिता अविरत परिश्रम केले.

त्यांच्या प्रयत्नांमुळेच १८५७ मध्ये लष्कराच्या आरोग्यव्यवस्थेची चौकशी करण्यासाठी एक रॉयल कमिशन नेमण्यात आले. त्यामुळे सैनिकांचे अन्न, निवारा व आरोग्य यांसंबंधी इतिहासात प्रथम शांततेच्या काळात शास्त्रीयदृष्ट्या तपासणी करण्यात आली. ब्रिटिश जनतेने उभारलेल्या नाइटिंगेल निधीतून सेंट टॉमस रुग्णालयात ‘नाइटिंगेल स्कूल फॉर नर्सेस’ ही स्त्रियांना रुग्णपरिचर्याविषयक शिक्षण देणारी जगातील पहिली संस्था स्थापण्यात आली. त्यांनी केलेल्या कार्याच्या स्मृती सदैव तेवत राहाव्या म्हणून त्यांचा जन्मदिवस जगभर साजरा करण्यात येतो. परिचारिकांनी समाजाप्रती दिलेल्या बहुमूल्य योगदानाची आठवण फ्लोरेन्स नाइटिंगेलच्या जयंतीला केली जाते. आजारी आणि अपंग रुग्णांची शारीरिक काळजी घेण्याबरोबरच त्यांना मानसिक आधार देणे परिचारिकेचे कर्तव्य आहे.

कोवॅक्सिन केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांच्या दुसऱ्या डोससाठी, लसीच्या तुटवड्यामुळे सरकारचा निर्णय

अनंत काळापासून परिचारिका त्यांचे कर्तव्य समर्पण भावनेने बजावत आल्या आहेत. ‘नर्सिंग’ हा व्यवसाय असा आहे ज्यासाठी खरी बांधीलकी आणि नि:स्वार्थ कठोर परिश्रमाची जोड हवी असते. अन्य कोणत्याही व्यवसाय-नोकरीपेक्षा नर्सिंगच्या व्यवसायात काम करणा-यांना प्रेम, जोश आणि सेवाभावनेने अधिक समर्पण करावे लागते.

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोनाच्या महासंकटाशी लढा देत आहे. ही लढाई जिंकण्यासाठी आपल्याला डॉक्टर आणि परिचारिकांची सर्वाधिक गरज आहे. गतवर्षी सात एप्रिलला सर्वत्र साजरा केल्या जाणा-या जागतिक आरोग्य दिनाची मध्यवर्ती संकल्पना होती- सपोर्ट द नर्सेस अँड मिडवाईफ! जगभरातील डॉक्टर आणि नर्सेस सध्या स्वत:चे घरदार विसरून मानवजातीच्या कल्याणासाठी आणि कोरोना विषाणूपासून लोकांचा बचाव करण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत. आरोग्याच्या क्षेत्रात परिचारिका म्हणजे नर्सेस हा एक महत्त्वपूर्ण घटक आहे, यावर शिक्कामोर्तब करून जागतिक आरोग्य संघटनेने जगभरातील नर्सेसच्या परिस्थितीवर आधारित ‘द स्टेट ऑफ वर्ल्डस् नर्सिंग २०२०’ हा अहवाल जारी केला होता.

नर्सेसच्या परिस्थितीविषयी अशा प्रकारचा हा जगातील पहिलाच अहवाल होता. त्याचप्रमाणे २०२० हे वर्ष जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने आंतरराष्ट्रीय नर्स अँड मिडवाईफ इयर म्हणून साजरे केले गेले, हेही लक्षात ठेवले पाहिजे.जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, जगभरात ६० लाख नर्सेसची कमतरता आहे आणि जर सर्वांसाठी आरोग्य हे ध्येय २०३० पर्यंत जगाला गाठायचे असेल, तर नर्सेस आणि आया (मिडवाईफ) यांची भर्ती, त्यांना प्रशिक्षण देणे, त्यांच्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे, त्यांच्या पगारात वाढ करणे आणि त्यांना सुरक्षित वातावरण देणे यासाठी जगातील सर्व देशांना गुंतवणूक करावी लागेल. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रॉस अ‍ॅडहोनम यांच्या मते, नर्सेस आणि आया हाच आरोग्य यंत्रणेचा कणा आहे. सर्व देशांमधील नर्सेस आणि आयांसाठी गुंतवणूक करण्याचे आवाहन संघटनेने केले आहे. सर्वांसाठी आरोग्य हे ध्येय गाठण्यासाठीच्या वचनबद्धतेचाच हा एक भाग असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

२०१५ मध्ये आंतरराष्ट्रीय समुदायाने शाश्वत विकासाचे उद्दिष्ट (एसडीजी) २०३० पर्यंत गाठण्याचा निर्धार केला होता. सर्वांसाठी आरोग्य हे तत्त्व शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांमध्ये समाविष्ट आहे. एवढेच नव्हे तर नर्सेसचे प्रशिक्षण, नोकरी आणि त्यांच्या कल्याणासाठी गुंतवणूक करण्याने केवळ आरोग्यविषयक उद्दिष्टच साध्य होणार आहे असे नाही, तर शिक्षणासंबंधीच्या शाश्वत विकासाचे लक्ष्य, लैंगिक समानतेच्या संबंधाने शाश्वत विकासाचे लक्ष्य, स्वाभिमानाने काम करण्याचा आणि आर्थिक वृद्धीचा हक्क महिलांना मिळवून देण्याचे लक्ष्य आदी अनेक बाबी यातून साध्य होणार आहेत.

जागतिक आरोग्य संघटना, इंटरनॅशनल कॉन्सिल ऑफ नर्सेस आणि ‘नर्सिंग नाऊ’ या संघटनेच्या वतीने जारी केलेल्या अहवालात जगभरातील नर्सेस आणि आयांची गरज, गरजेच्या प्रमाणात त्यांची कमी असलेली संख्या, कमी उत्पन्न गटातील देशांमध्ये त्यांची असलेली कमतरता, नर्स आणि आयांसमोरील आव्हाने अशा अनेक मुद्यांचा धांडोळा घेण्यात आला आहे. तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठीच्या उपाययोजनांचीही चर्चा केली आहे. जगातील आरोग्य कर्मचा-यांच्या एकूण संख्येत नर्सेसची संख्या सुमारे ५९ टक्के आहे. जगभरात २७.९ दशलक्ष नर्सेस कार्यरत आहेत. त्यातील १९.३ दशलक्ष प्रशिक्षित नर्सेस आहेत. २०३० पर्यंत जगाला आणखी सुमारे ६० लाख नर्सेसची गरज भासणार आहे.

कोविडच्या संकटादरम्यान संपूर्ण जगाला नर्सेसच्या कमतरतेची समस्या प्रकर्षाने जाणवली आहे. कोरोना विषाणू नावाच्या या महाभयंकर संसर्गजन्य आजाराने अनेक देशांमधील डॉक्टर्स आणि नर्सेसचा जीव घेतला आहे आणि असंख्य आरोग्य कर्मचारी या विषाणूच्या संसर्गाने ग्रस्त आहेत. त्यांच्या जीविताला जो धोका उत्पन्न झाला आहे, त्यामुळे शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठण्याच्या प्रयत्नांवरही परिणाम होऊ शकतो. जगभरात ८० टक्के नर्सेस जगाच्या ५० टक्के लोकसंख्येची शुश्रुषा करतात. नर्सेसची ही उपलब्धताही विषमता दर्शविणारी आहे. आफ्रिका आणि अमेरिकेतील काही प्रांतांमध्ये नर्सेसची संख्या खूपच कमी आहे. आग्नेय आशिया आणि आखाती देशांत नर्सेसना असलेली मागणी आणि उपलब्धता यात मोठी तफावत आहे. गरजेच्या प्रमाणात तेथे नर्सेसची संख्या खूपच अपुरी आहे.

भारताचा विचार करायचा झाल्यास, देशाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दर एक हजार लोकसंख्येमागे १.७ नर्सेस असे प्रमाण आहे. जागतिक आरोग्य संघटनेने ठरविलेल्या निकषांच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी आहे. संपूर्ण भारतात अवघ्या ३.०७ टक्के नर्सेस नोंदणीकृत आहेत. ही माहिती सरकारने ३ मार्च २०२० रोजी राज्यसभेत दिली होती. देशाची ६५ टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात आहे. त्या ठिकाणी नर्सेसची संख्या खूपच नगण्य आहे. एकीकडे २०३० पर्यंत ‘सर्वांसाठी आरोग्य’ हे शाश्वत विकासाचे लक्ष्य गाठण्यासाठी संपूर्ण जगात आणखी ६० लाख नर्सेसची गरज आहे, असे हा अहवाल सांगतोच; परंतु आगामी काही दिवसांत नर्सेसच्या उपलब्धतेची स्थिती आणखी बिघडू शकते, असा इशाराही देतो. कारण जगाला नर्सेस पुरविणारे भारत आणि फिलिपीन्स हे दोन प्रमुख देश असून, या देशांनी तसे संकेत दिले आहेत, असे हा अहवाल सांगतो. या दोन्ही देशांची आरोग्य यंत्रणा नर्सेसच्या तुटवड्याच्या समस्येशी झुंजत असल्यामुळे जगात इतरत्र नर्सेस पुरविणे या देशांना आगामी काळात अवघड होणार आहे.

विधिषा देशपांडे

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
203FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या