22.2 C
Latur
Friday, August 19, 2022
Homeविशेषसामाजिक बांधीलकीची प्रचीती देणारे

सामाजिक बांधीलकीची प्रचीती देणारे

एकमत ऑनलाईन

अनेक वर्षांपासून वृत्तपत्रलेखन करणारे मधू शिरोडकर यांचे ‘ग्राहक राजा’ हे दुसरे पुस्तक. सुरुवातीलाच ते विनम्रपणे म्हणतात, मी लेखक नाही तर जागल्याच्या भूमिकेतून समाजातील व्यथा, वेदना, समस्या, सर्वसामान्यांचे अनुभव मांडणारा एक वृत्तपत्र लेखक आहे. आणि त्यांनी आपल्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या ‘ग्राहक राजा’ पुस्तकातून जागल्याचे यथार्थ दर्शन घडविले आहे. तसे पाहता एका राष्ट्रीयीकृत बँकेतील सेवानिवृत्त अधिकारी राहूनही आपले संवेदनाक्षम मन आणि लेखणी जोपासणा-या शिरोडकरांचे कौतुकच करायला हवे. असो. पुस्तकात बँक, बँकेची सेवा आणि कर्मचारी यांच्या संदर्भात सुमारे विसावर लेख आहेतच शिवाय म्हाडा ही गृहनिर्माण संस्था, गॅस वितरक, महाराष्ट्रीयन माणसाची गळचेपी, शेतक-यांची आर्थिक स्थिती, सरकारी नोकरांचे आंदोलन, रेल्वेचा उपद्व्याप, ग्रामीण भागाचे औद्योगीकरण अशा सामाजिक विषयावरील साध्या, सोप्या भाषेत लिहिलेले लेख यातून सर्वसामान्यांच्या मनातील वास्तवाचे जणू दर्शन घडवले आहे. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे जुनी आणि आजची विवाह पद्धती,

कोकणातील दशावतार, नाटकांवर बंदीहुकूम, अनाथ मुलांसाठी काम करणारी संपर्क नावाची संस्था, गुजरातमधील सरदार सरोवर प्रकल्प आदी विषयांवर रोखठोक शब्दांत केलेले लेखन त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक बांधीलकीच्या जाणीवेची प्रचीती देणारे असून, शासनाने त्याची जरूर नोंद घ्यावी असेच आहे. या पुस्तकात एकूण ३४ लेख असून, लेखकाला जाणवलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण बाबी म्हणजे बँकिंग सेवेला आधुनिकीकरण हाच पर्याय हे सांगताना बँक कर्मचा-यांमध्ये शिस्त, बँकिंग ही अत्यावश्यक सेवा ठरवून सार्वजनिक सुट्यांचे प्रमाण कमी केले पाहिजे असे मत लेखकाने रोखठोकपणे मांडले असून अशीच मते इतर लेखांतही आहेत. बँकांची विश्वासार्हता, कर्मचारी आणि ग्राहक यात एक आपुलकीचा विश्वास निर्माण केला गेला पाहिजे हे ते म्हणतात. कृषी औद्योगिक अर्थव्यवस्था विशद करताना लेखक म्हणतात, शिक्षण, आरोग्य आणि शेतीव्यवसाय याकडे अधिक लक्ष देऊन शेतकरी व युवकांच्या शक्तीला बळ देणारी तत्परता दाखवणे प्राथमिक गरज आहे. ‘जुन्या विवाह पद्धती’ लेखात ते लिहितात, आज ब-याच ठिकाणी लग्नसमारंभात दिसणारे श्रीमंतीचे ओंगळ प्रदर्शन योग्य नाही.

‘ग्राहक राजा’ या पुस्तकातील सारे लेख मधू शिरोडकर यांनी नजरेसमोर एक विधायक दृष्टिकोन ठेवून लिहिलेले आहेत. त्यात बँकेच्या अथवा सरकारी खात्याच्या त्रुटी दाखविण्याचा लेखकाचा हेतू नाही तर त्यातून काहीतरी चांगले घडावे हा प्रामाणिक हेतू आहे. पुस्तकाच्या शेवटच्या लेखात दुथडीभरून वाहत जाणा-या निर्मळ व पवित्र अशा अथांग प्रवाही गंगा मातेचा उगम ज्याप्रमाणे अगदी लहानशा प्रमाणात गंगोत्रीपासून झाला त्याचप्रमाणे आपल्या नित्यप्रवाही अनेकविध सार्वजनिक सेवेची सुरुवात करणा-या एका सामाजिक कार्यकर्त्याचा गौरव लेखकाने सामाजिक संस्थेचा शिल्पकार म्हणून केला आहे. मुंबई मराठी साहित्य संघाचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी या पुस्तकाचे संपादन केले असून ‘संधीकाल’चे अरविंद जोशी यांनी प्रकाशित केले आहे तर सदर पुस्तकाचे अर्थपूर्ण व आकर्षक स्वरूपात मुखपृष्ठ सतीश खानविलकर यांनी केले आहे.
ग्राहक राजा
लेखक : मधू सदाशिव शिरोडकर
संपादक : अशोक बेंडखळे
प्रकाशक : संधिकाल प्रकाशन
मूल्य : रु. २५०/-, पाने : १६०

-विश्वनाथ पंडित,
मोबा. : ९५८८४ ५०४४२

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या