20.8 C
Latur
Thursday, October 21, 2021
Homeविशेषधनलाभ

धनलाभ

एकमत ऑनलाईन

‘फलज्योतिषावर माझा बिलकूल विश्वास नाही,’ असं सांगणारे अनेकजण वर्तमानपत्रात राशिभविष्याचा कॉलम चोरून वाचताना आम्हाला सापडलेत. काय असते ही मानसिकता? आपण वाचतोय तसं घडणं शक्य नाही, हे ब-याच जणांना माहीत असतं. कारण कुठलीच गोष्ट ‘आपोआप’ कधीच घडत नसते. ती ‘घडवावी’ लागते, हेही सर्वजण जाणतात. तरीही मग हा कॉलम का वाचतात? वृत्तपत्रात सर्वाधिक वाचला जाणारा तोच कॉलम आहे, असं मध्यंतरी कुठल्यातरी सर्वेक्षणात दिसून आलं होतं म्हणे! काही दिवस आम्ही या कॉलमकडे ‘मार्गदर्शक’ म्हणून पाहायचं ठरवलं होतं. परंतु ‘रागावर नियंत्रण ठेवा,’ असं ज्या दिवशी वाचायला मिळायचं, त्याच दिवशी राग अनावर व्हायचा.

बहुतांश लोक आर्थिक स्थिती कधी सुधारेल, या प्रश्नाचं उत्तर या कॉलमात शोधतात एवढं खरं. ‘अचानक धनलाभाचा योग’ हे वाचून चेहरा खुलला नाही, असं होत नाही. खरंतर असं अचानक घबाड कसं हाती लागेल? पूर्वी एखाद्या ओळखीच्या माणसाला दूरच्या नातेवाईकाची इस्टेट अचानक मिळाल्याचे एक-दोन किस्से आम्ही ऐकले होते. त्या दूरच्या नातेवाईकाला जवळचं कुणीच नव्हतं, हे त्यामागचं कारण. एरवी अशी अचानक संपत्ती मिळण्याची शक्यता असलेली क्षेत्रं खूपच कमी. शेअर बाजार हे असंच एक क्षेत्र. इथं एखाद्याचं नशीब कधी फळफळेल आणि पैशांचा पाऊस पडेल, हे सांगता येत नाही.

एखाद्या नातेवाईकाचं घबाड मिळणं आणि शेअर बाजारात ‘लॉटरी’ लागणं या दोन पटकथांचं मिश्रण झाल्याचं एक उदाहरण कालच वाचायला मिळालं. कहाणी आहे कोची शहरातली. नातेवाईक दूरचा नसून, संबंधिताचे वडीलच आहेत! पण त्यांंनी केलेली गुंतवणूक चिरंजीवांनाच माहीत नाही, अशी अवस्था! या गुंतवणुकीला खूप वर्षं उलटली आणि या कहाणीत दोन महत्त्वाचे ‘ट्विस्ट’ आले. संबंधिताचे वडील १९७० आणि १९८० च्या दशकात उदयपूरमधल्या एका ऑईल कंपनीचे डिस्ट्रिब्यूटर म्हणून काम करीत होते आणि त्याच कंपनीचे २.८ टक्के शेअर्स त्यांनी खरेदी केले होते. त्यांचा भाऊ म्हणजे संबंधिताचा काका शिपिंग कंपनी चालवत असल्यामुळं कंपनीच्या लोकांशी त्याचा संपर्क आला आणि त्यातूनच त्यानं भावाला डिस्ट्रिब्यूटर म्हणून संधी मिळवून दिली.

कंपनीचे ४२.४८ लाख शेअर्स त्यांनी खरेदी करून ठेवले होते. परंतु डिस्ट्रिब्यूशन नेटवर्क सांभाळता-सांभाळता या गुंतवणुकीबद्दल घरात कुणाला सांगायचं राहूनच गेलं. दरम्यान त्यांच्या मृत्यूनंतरही अनेक वर्षे घरात कुणालाच याबाबत माहीत नव्हतं. अगदी अलीकडेच मुलाला ती शेअर सर्टिफिकेट सापडली. आता त्या शेअरची किंमत किती झाली असेल? तब्बल १४४८ कोटी! परंतु ते मिळवण्यासाठी त्याला कायदेशीर लढाई करावी लागतेय. कहाणीतल्या ‘ट्विस्ट’चा हा परिणाम!

संबंधिताच्या वडिलांनी शेअर घेतले, तेव्हा कंपनीचं नावच वेगळं होतं. चिरंजीवांना शेअर सापडायला २०१५ साल उजाडलं आणि तोपर्यंत कंपनीचं नाव बदललेलं होतं. दुसरा ट्विस्ट असा, की शेअर खरेदी केले तेव्हा कंपनी शेअर बाजारात ‘लिस्टेड’ नव्हती; आता आहे! शिवाय संबंधितांच्या वडिलांचे शेअर्स सप्टेंबर १९८९ मध्येच इतरांना हस्तांतरित केलेत, असं कंपनी म्हणतेय. काय म्हणायचं याला? समोर सरोवर दिसतंय; पण पाणी पिता येईना! धनलाभाचा हा कोणता प्रकार?

राधिका बिवलकर

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या