20.8 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeविशेषधोनी कम बॅक...

धोनी कम बॅक…

‘झारखंड का छोरा’ महेंद्रसिंह धोनी ऊर्फ ‘माही’ हा सामन्यादरम्यान झटपट निर्णय घेण्यात माहीर आहे. धोनीची टी-२० च्या विश्वचषकासाठी भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. त्यामुळे विराट कोहली आणि महेंद्रसिंह धोनी यांची जोडी विश्वचषकासाठीच्या नियोजित संघासाठी उपयुक्त ठरू शकते. धोनी हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. आयसीसीच्या तिन्ही स्पर्धा धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकल्या असून अशी किमया करणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे.

एकमत ऑनलाईन

ब्रिटनमध्ये खेळण्यात येणा-या कसोटी सामन्यात भारतीय संघाने दमदार कामगिरी केली. परंतु खरे आव्हान आगामी आयसीसी टी-२० विश्वचषकाचे. भारताने गेल्या दहा वर्षांत कोणताही विश्वचषक जिंकलेला नाही. अशा काळात धोनीला आगामी टी-२० विश्वचषकासाठी भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून नियुक्त केले आहे. तज्ज्ञांच्या मते, भविष्यात धोनीच्या खांद्यावर आणखी मोठी जबाबदारी येऊ शकते. कारण मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री याची खुर्ची जरा डळमळीत झाली आहे. तूर्त टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचा विचार करू. बीसीसीआयचे सचिव जय शहाने धोनीला भारतीय संघाचा मार्गदर्शक म्हणून जाहीर करून क्रिकेटप्रेमींना सुखद धक्का दिला आहे. धोनी हा शीघ्र निर्णयावरून ओळखला जातो आणि कोहली व धोनीची जोडी विश्वचषकासाठी लाभदायी ठरू शकते. संघात किंवा सामन्यादरम्यान धोनीच्या केवळ असण्याने संघाचे मनोधैर्य वाढते. अशावेळी तो जर प्रशिक्षक झाला तर संघ मानसिकदृष्ट्या आणखीच सक्षम होईल, हे आपल्या लक्षात येईल.

धोनी हा भारतीय क्रिकेट इतिहासातील सर्वांत यशस्वी कर्णधारांपैकी एक मानला जातो. आयसीसीच्या तिन्ही स्पर्धा धोनीच्या नेतृत्वाखाली जिंकल्या असून अशी किमया करणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. धोनीची कामगिरी पाहिल्यास त्याने ३३२ आंतरराष्ट्रीय सामन्यांत संघाचे नेतृत्व केले आहे. एवढेच नाही तर १९५ खेळाडूंना यष्टीचित केले आहे. हा एक विक्रम मानला जातो. धोनीने भारताकडून ३५० एकदिवसीय सामने खेळले असून त्यात ५० पेक्षा अधिक सरासरीने १०,७७३ धावा केल्या. एकदिवसीय सामन्यात धोनीने १० शतकं आणि ७३ अर्धशतकं तडकावले. त्याचबरोबर यष्टीरक्षक म्हणून त्याने ३२१ झेल घेतले आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये धोनीने सर्वाधिक ९८ सामने खेळले असून त्यात ३७ पेक्षा अधिक सरासरीने १६१७ धावा केल्या. कसोटी क्रिकेटमध्ये धोनीने २०१४ मध्ये निवृत्ती जाहीर केली. यानुसार ९० कसोटीत त्याने ३८ पेक्षा अधिक सरासरीने ४८७६ धावा केल्या. कसोटीत धोनीने स्टंपमागे २५६ झेल घेतले आणि ३८ जणांना यष्टीचित केले आहे.

फलंदाज म्हणून त्याने ६ शतकं आणि ३३ अर्धशतकं लगावली आहेत. माजी खेळाडू आकाश चोप्रा म्हणतो की, टी-२० विश्वचषकाची कल्पना धोनीशिवाय करताच येणार नाही. त्यांच्याच नेतृत्वाखाली भारताने विश्वचषक जिंकला आहे. धोनीची प्रशिक्षकपदी नियुक्ती ही संघासाठी उपयुक्त बाब आहे. विश्वचषक जिंकण्याची अपेक्षा आपण बाळगू शकतो, असेही चोप्रा म्हणतो. यावेळी गावसकर यांनी एक सूचना दिली असून त्यानुसार शास्त्री आणि धोनी यांच्यात ताळमेळ राहिला तर संघाला चांगला फायदा होऊ शकतो, असे म्हटले आहे. अर्थात रणनीती आणि निवडीवरून दोघांत ताळमेळ बसला नाही तर संघावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

सुनील गावसकर यांनी २००४ च्या एका घटनेचा उल्लेख केला आहे. तेव्हा गावसकर हे भारतीय क्रिकेट संघाचे सल्लागार होते आणि तत्कालीन मुख्य प्रशिक्षक जॉन राईट हे प्रशिक्षकावरून संभ्रमात होते. एखाद्या कारणाने प्रशिक्षकाने खुर्ची सोडणे किंवा गमावणे ही बाब नवखी नव्हती, परंतु त्यावेळी एक लॉबी धोनीच्या विरोधात उभी राहिली होती. आताही तसाच काहीसा अनुभव येत आहे. मध्य प्रदेश क्रिकेट संघाच्या एका माजी अधिका-याने हितसंबंधाला बाधा येत असल्याचा संदर्भ देत धोनीला मार्गदर्शक करण्यास आक्षेप घेतला आहे. यात म्हटले की, बीसीसीआय कायद्यानुसार एक व्यक्ती दोन पदांचा लाभ घेऊ शकत नाही, असे तक्रारीत म्हटले आहे. धोनी हा आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार देखील आहे आणि आता त्याला टी-२० च्या संघासाठी प्रशिक्षक म्हणूनही नेमले आहे. सर्वांनाच ठाऊक आहे की, धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली आहे आणि आता तो केवळ आयपीएल खेळत आहे.

त्यामुळे या तक्रारीत कोणतेच तथ्य नाही. विराट कोहली म्हणतो, की जेव्हा आपण पहिल्यांदा भारतीय संघाच्या ड्रेसिंग रूममध्ये गेलो, तेव्हा महेंद्रसिंह धोनी हा कर्णधार होता आणि तो आमच्यासाठी नेहमीच कर्णधार राहील. जेव्हा तो कर्णधार राहिला नाही, तेव्हाही त्याने संघाला अप्रत्यक्षरीत्या मार्गदर्शन केले आहे. ब्रिटनचा माजी कर्णधार मायकेल वॉने धोनीला मर्यादित षटकांच्या काळात धोनी हा सर्वश्रेष्ठ कर्णधार असल्याचे म्हटले आहे. धोनी हा यशस्वी कर्णधार आणि यष्टीरक्षक म्हणून ओळखला जातो. आयपीएल सामन्यातही विकेटमागून तो नेहमीच गोलंदाजांना सूचना देत असतो आणि आपण हे पाहिले आहे. फिरकीपटू आल्यानंतर तो आणखीच सक्रिय होतो. धोनी हा खराब चेंडू टाकल्यास गोलंदाजांना तंबी देखील देतो. अर्थात बळीचे संपूर्ण श्रेय गोलंदाजांनाच मिळते. परिणामी आपण धोनीच्या योगदानाकडे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. एवढा अनुभव आणि कौशल्य क्वचितच अन्य कोणत्या यष्टीरक्षकाकडे पहावयास मिळेल.

जेव्हा तो भारतीय संघात होता, तेहा रिव् ू घेण्याच्या बाबतीत त्याचा निर्णय शेवटचा असायचा. एकदिवसीय सामन्यात शंभरपेक्षा अधिक यष्टिचित करणारा जगातील एकमेव यष्टीरक्षक म्हणून धोनीला ओळखले जाते. त्याच्या वेगवान हालचालीला तोड नाही. तो पापणी लवण्याच्या आतच फलंदाजाच्या बेल्स उडवतो.
भारतीय क्रिकेटची शैली, स्वभाव आणि प्रतिमेत बदल झाला असून त्यात धोनीचे योगदान सर्वाधिक आहे. यापूर्वीही भारतीय क्रिकेट संघात केवळ मुंबई आणि दिल्लीच्या खेळाडूंचा बोलबाला असायचा. झारखंडच्या या खेळाडूने केवळ संघात स्थान मिळवले नाही तर संघाला उंचीवर नेले. त्याने केवळ यशस्वी नेतृत्व केले नाही तर दुर्गम भागातून येणा-या प्रतिभावंत खेळाडूंसाठीदेखील मार्ग मोकळा केला. कपिल देवला सोडून द्या. या संघावर आतापर्यंत मोठ्या शहरातून आलेल्या इंग्रजाळलेल्या खेळाडूंचेच प्रभुत्व राहिले आहे. धोनीने ही परंपरा बदलली आणि संघाला तिन्ही फॉर्मेटमध्ये विजय मिळवून दिला. झारखंडला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर गौरव मिळून दिला. धोनीसारखा खेळाडू अनेक दशकांतून एकदाच होतो. त्याच्या अनुभवाचा अधिकाधिक फायदा कसा उचलता येईल, हे पाहणे गरजेचे आहे.

नितीन कुलकर्णी,
क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या