22.8 C
Latur
Sunday, June 26, 2022
Homeविशेषकर्ता माणूस

कर्ता माणूस

एकमत ऑनलाईन

विलासरावांच्या रूपाने मी कर्ता माणूस अनुभवला. सतत कार्यमग्न, लोकांच्या प्रश्नांशी बांधीलकी, कठीण गुंते सहज सोडविण्यात वाक्बगार, अधिकारी आणि प्रशासनाला बळ देणारे नेतृत्व, जनतेला आधार वाटावा असा नेता गेली ३५ वर्षे विधानसभेत वावरताना मी विलासराव अशा अनेक भूमिकांमध्ये बघितले. मला विलासरावांना जवळून अनुभवता आलं, समजून घेता आलं, त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करता आलं, राजकीय निर्णयात त्यांच्यासोबत उभं राहता आलं, हा मी माझ्या राजकीय जीवनातील अमूल्य ठेवा समजतो. महाराष्ट्राच्या प्रशासनावर पकड असलेला मुख्यमंत्री म्हणून विलासरावांकडे बघितले जायचे. विलासराव प्रशासनाचे प्रमुख म्हणून नाही तर प्रशासनाचा सक्रिय हिस्सा बनून काम करायचे.

२६ जुलै २००४, विलासराव देशमुख महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. याच दिवशी पावसाचे भयाण संकट मुंबईवर कोसळले. ९४४ मिलीमीटर पावसाने मुंबईभर अक्षरश: थैमान घातले. त्यादिवशी मी अनुभवलेले विलासराव मला कायम संघर्षाशी दोन हात करण्याची प्रेरणा देतात. २६ जुलैच्या संध्याकाळी पाच वाजताच मुंबईत चहूकडे काळोख पसरला होता. संगमनेरहून दादांचाही (भाऊसाहेब थोरात) फोन आला, मुंबईत फार पाऊस पडतोय, अशा बातम्या येत असल्याचे त्यांनीच मला सांगितले. मुंबईत पावसाचा जोर वाढला होता, मात्र मंत्रालय परिसरात अजून पाऊस सुरू होणे बाकी होते. दरम्यान मी लगेचच विलासरावांना भेटायला वर्षा बंगल्यावर पोहोचलो. महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जोराचा पाऊस सुरू झालेला होता. मुंबईत तर ठीकठिकाणाहून पावसाने जनजीवन ठप्प केल्याच्या बातम्या येत होत्या. मी बघितले, विलासराव मुंबईच्या वेगवेगळ्या भागातील अधिका-यांसोबत संवाद साधत होते, अपेक्षित सूचना देत होते. एक प्रकारची कंट्रोल रूमच त्यांनी त्यावेळी आपल्या कार्यालयातून सुरू केलेली होती. त्याद्वारा ते सतत आढावा घेत होते.

उशिरा पावसाने जोर पकडला, विलासरावांनी मला बोलावून घेतले आणि सांगितले ‘बाळासाहेब पाऊस वाढतोय, तुम्ही आता घरी गेलात तरी चालेल.’ मी म्हटलं, ‘मी थांबतो तुमच्या मदतीला.’ विलासराव म्हणाले, ‘घरचे काळजी करतील, तुम्ही जा.’
मुंबईच्या इतिहासातील सर्वाधिक पाऊस त्यादिवशी कोसळत होता. मुंबापुरीची अक्षरश: वाताहात झाली होती. वाढत्या प्लास्टिकच्या वापरामुळे गल्लोगल्ली नाल्या तुंबल्या होत्या. रस्त्यावर कमरेइतकं पाणी साचलं होतं. वाहतूक ठप्प, वीज व्यवस्था कोलमडलेली, जनजीवन विस्कळीत झालेलं, जीवनावश्यक वस्तू पुरवणा-या दुकानांमध्ये पाणी शिरलं… मुंबई थांबली होती. सकाळी साडेसहालाच मी वर्षा बंगल्यावर गेलो. बघतो तर काय विलासराव त्याच खुर्चीवर बसलेले होते. त्यांचा सतत अधिका-यांशी संवाद सुरू होता. मुंबईच्या सर्वच विभागांशी ते बोलत होते. जनजीवन रुळावर कसे आणता येईल यासाठी प्रयत्नांची शर्थ करत होते.
मी सहज तिथे उपस्थित असलेल्या अधिका-यांना विचारलं, ‘साहेब कधी आले?’ तेव्हा मला उत्तर मिळालं, ‘साहेब रात्रभर येथेच आहेत.’ कामावर प्रचंड श्रद्धा असलेला माणूस त्यादिवशी मी अनुभवला.
हे काम मुंबई महापालिकेचं की महाराष्ट्र सरकारचं, या वादात न पडता मुंबईला सावरण्याची जबाबदारी माझी आहे, या भूमिकेतून विलासराव देशमुख यांनी त्या जीवघेण्या पावसातही प्रशासनाला गतिमान ठेवलं…आणि जिथे मुंबईला रुळावर आणण्यासाठी पुढचे दहा-पंधरा दिवस लागले असते, तिथे पाऊस संपल्यानंतर अवघ्या काही तासांत मुंबईची चाके गतिमान झाली.

हजरजबाबीपणा हा विलासरावांचा आणखी एक विशेष गुण, तत्कालीन मुख्यमंत्री कार्यालयात कार्यरत असलेल्या एका सेवानिवृत्त अधिका-याने सांगितलेला हा प्रसंग. अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि त्या विभागासाठी धोरणात्मक भूमिका निभावण्याचे काम केंद्रीय अल्पसंख्याक आयोग करतो. महाराष्ट्रातील अल्पसंख्याक समाजाच्या हक्कांवर गदा येते आहे अशा संदर्भाने काही तक्रारी या आयोगाकडे गेल्या होत्या, आयोगाने अत्यंत कडक शब्दांत महाराष्ट्र सरकारला पत्र लिहून यासंदर्भाने चिंता व्यक्त केली, शिवाय तातडीने एकत्रित बैठक घेऊन यावर उत्तर देण्याच्या सूचनाही केल्या. मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रशासकीय प्रमुख या नात्याने स्वाधीन क्षत्रिय यांच्याकडे हे पत्र आले. त्यासोबत एक प्रश्नावलीही होती. क्षत्रिय यांनी लगोलग या प्रश्नांची उत्तरे तयार केली, सोबत अतिरिक्त माहितीही जोडली. एक फाईल तयार करून अल्पसंख्याक आयोगाच्या बैठकीअगोदर दोन दिवस मुख्यमंत्री विलासरावांकडे ती अवलोकनार्थ पाठवली. त्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले, ‘आयोग रागावलेला आहे, आम्ही काही उत्तरे तयार केली आहेत, आपण बघून घ्या.’

बैठकीचा दिवस उजाडला, स्वाधीन क्षत्रिय तणावात होते. अल्पसंख्याक आयोग हा अत्यंत कडक शिस्तीचा होता, काही चुकीची उत्तरे गेली तर तो सरकारला धारेवरही धरू शकतो, मुख्यमंत्र्यांना दोषीही ठरवू शकतो, याची जाणीव क्षत्रिय यांना होती. बैठकीअगोदर त्यांनी विलासरावांना विचारले, ‘तुम्ही तयारी केली का? फाईल नजरेखालून घातली का?’ विलासराव म्हणाले, ‘कसला वेळ मिळतोय, मात्र तुम्ही का टेन्शन घेताय? बघू की आपण!’ बैठक मुख्यमंत्री कार्यालयातच होणार होती, विलासराव स्वाधीन क्षत्रिय यांना म्हणाले, ‘बैठकीला कोण कोठे बसणार आहे, चला जरा बघून येऊ.’ स्वाधीन क्षत्रिय विलासरावांना घेऊन बैठकीच्या जागी गेले. राज्याचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त, प्रधान सचिव सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याक विभाग आदी प्रमुख अधिकारी दोन बाजूस आणि त्यांच्यामध्ये मुख्यमंत्री व पुढील बाजूस आयोगाचे लोक बसतील अशी रचना स्वाधीन क्षत्रिय यांनी समजावून सांगितली. अल्पसंख्याक आयोगात केंद्र सरकारने नेमलेले सचिव दर्जाचे निवृत्त अधिकारी, खासदार सहभागी असतात, सहसा ही सारी मंडळी अल्पसंख्याक समाजाचेच प्रतिनिधी असतात. आयोगाचे प्रमुख बैठक सुरू करणार तोच, विलासराव म्हणाले, ‘आपण आमच्याकडे पाहुणे आहात, त्यामुळे आम्ही तुम्हाला प्रथम आमची ओळख करून दिली पाहिजे.’

आयोगातील सदस्यांनी होकार दिला!
… आणि विलासराव बोलू लागले, ‘मी मुख्यमंत्री विलासराव देशमुख. माझ्या शेजारी बसलेत ते जॉनी जोसेफ, हे मुख्य सचिव आहेत. अलीकडून बसलेले सरदार विर्क जे पोलिस महासंचालक आहेत. त्यांच्या शेजारी हसन गफूर, जे मुंबईचे पोलिस आयुक्त आहेत. या बाजूला श्रीमती थेंक्सी फ्रान्सिस थेकेकरा आहेत, त्या सामाजिक न्याय आणि अल्पसंख्याक विभागाच्या प्रधान सचिव म्हणून काम बघतात आणि हे स्वाधीन क्षत्रिय जे प्रधान सचिव – मुख्यमंत्री कार्यालय आहेत.’ ही सर्व मंडळी ख्रिश्चन, शीख, मुस्लिम समाजातील होती. प्रत्येकाची ओळख ऐकताना त्याची जाणीव आयोगातील सदस्यांना होत होती. विलासराव पुढे म्हणाले, ‘राज्याचे प्रशासन या सर्व मंडळींच्या हाती आहे, ते सर्व कारभार बघतात, मी मुख्यमंत्री आहे. आता करा बैठक सुरू!’ विलासरावांनी मिश्किल टिप्पणी केली. त्यावर अल्पसंख्याक आयोगातील सदस्य खळखळून हसले, तणाव निवळला आणि सकारात्मक वातावरणात बैठक पार पडली. ज्या राज्यातील प्रशासनच अल्पसंख्याक समजल्या जाणा-या समाजातील मंडळी बघते, तिथे वाद उरतो कुठे? अशा हजरजबाबी भूमिकेने विलासरावांनी त्यादिवशी सर्वांनाच निरुत्तर केले होते. विलासरावांकडे अद्भूत बुद्धिचातुर्य, तितकाच आत्मविश्वास आणि कोणत्याही कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याचे कसब होते.
\
असाच आणखी एक प्रसंग जो मी स्वत: अनुभवला.
२५ ऑगस्ट २००७, हैदराबादच्या लुम्बिनी पार्कमध्ये बॉम्बस्फोट झाल्याची बातमी सायंकाळी सातच्या बातमीपत्रातून समजली. या बॉम्बस्फोटात शैक्षणिक सहलीसाठी गेलेल्या संगमनेरच्या अमृतवाहिनी इंजिनीअरिंग कॉलेजमधील तीन विद्यार्थ्यांना जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी बातमीही लगोलग आली. या घटनेनंतर मी अनुभवलेले विलासराव म्हणजे कुटुंबातील कर्ता माणूस. बातमी समजल्यानंतर तात्काळ मला विलासरावांचा फोन आला. ‘बाळासाहेब, तुम्ही तातडीने हैदराबादला पोहोचा. मी तेथील मुख्यमंत्र्यांशी बोललो आहे. विद्यार्थ्यांना धीर देणे गरजेचे आहे.’

त्या रात्री मुंबईहून हैदराबादला जाणारी फ्लाईट उपलब्ध नसल्याने पहाटे सहा वाजता फ्लाईटने जाण्याचा निर्णय झाला. मला पाच वाजताच विलासरावांचा फोन आला, निघालात का? मी तेथील मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात आहे. तुम्ही विद्यार्थ्यांना धीर द्या, अशा प्रकारच्या सूचना ते मला करत होते. मी सकाळी नऊ वाजता हैदराबादला पोहोचलो असेल, परत त्यांचा फोन आला, ‘पोहोचलात का? परिस्थिती कशी आहे?’ दुर्घटनास्थळी अनेक मराठी माणसं दाखल झाली होती. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ते धीर देत होते. संध्याकाळपर्यंत विलासरावांनी खूपदा फोन केले, तेथील मुख्यमंत्र्यांशीही त्यांनी सतत संपर्क ठेवला. विद्यार्थ्यांचे पार्थिव कुटुंबात पोहोचवणे, राहिलेल्या विद्यार्थ्यांना घेऊन बस संगमनेरला पोहोचेपर्यंत त्यांनी काळजी घेतली, धीर दिला. एखादा विषय किती काळजीपूर्वक हाताळायचा असतो, हे मी त्यादिवशी अनुभवत होतो. याशिवाय कर्ता माणूस कशी काळजी घेतो याचाही पाठ मला मिळाला होता.

विलासरावजी जे बोलायचे ते लोकांच्या काळजाला थेट भिडायचे. लोकांची भाषाच ते बोलायचे, आपल्या भाषणातून लोकांची व्यथा मांडायचे. त्यांची भाषणं खुमासदार असायची आणि माणसाला विचार करायला लावण्याइतपत गंभीरही.
विलासराव म्हणजे काँग्रेस. कार्यकर्त्यांना उभारी देणे, धीर देणे, हा त्यांचा स्वभाव. १९९५ ला महाराष्ट्राच्या विधानसभांच्या निवडणुकांत काँग्रेसचा दारुण पराभव झाला. शिवसेना-भाजपा युतीचे काँग्रेसेतर सरकार सत्तेवर आले. या काळात काँग्रेसची देशव्यापी पातळीवर पीछेहाट झाली होती, लातुरातून विलासरावांचाही पराभव झाला होता. मात्र विलासराव हादरले नाहीत, जनसेवेची भूमिका आणि बांधीलकी त्यांनी सोडली नाही आणि त्यामुळेच १९९९ साली काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे संयुक्त सरकार महाराष्ट्रात पुन्हा सत्तेवर आले आणि त्या सरकारचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख झाले. विलासरावांच्या निष्ठेला, त्यागाला दिलेला तो न्याय होता. महाराष्ट्रातील प्रत्येकाला आजही विलासराव आपल्यासोबत असल्याचा भास होतो, हा त्यांच्या अस्तित्वाचा विजय आहे, असेच वाटते.

– बाळासाहेब थोरात
महसूल मंत्री तथा विधिमंडळ पक्षनेते, महाराष्ट्र राज्य

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या