22.5 C
Latur
Friday, July 30, 2021
Homeविशेषसमतेची वाट आपल्या घरातून नक्की जाते?

समतेची वाट आपल्या घरातून नक्की जाते?

एकमत ऑनलाईन

एकदा बालभवनात आम्ही गप्पा मारत होतो तेव्हा ६ वर्षांचा पलाश रडत आमच्याकडे आला. कारण होते कबीर त्याला झोका खेळायला देत नव्हता. त्याला आम्ही समजावत होतो तेवढ्यात, ११ वर्षांचा आलाप हसू लागला, मी म्हटलं, ‘‘काय रे आलाप का हसतोस?’’ तो म्हणाला, ‘‘हा पलाश सारखा रडतो. असं नसतं रडायचं मुळुमुळु मुलींसारखं!’’ मी त्याला बाजूला बोलावलं, त्याच्याशी खूप गप्पा मारल्या तेव्हा लक्षात आलं की, आलापच्या घरी जे संवाद वारंवार बोलले जातात तेच तर आलाप बोलत होता. मुलांनी कसं धीट असलं पाहिजे, बळकट आणि कणखर असलं पाहिजे. तर मुलींनी नाजूक, भावूक हळुवार असायला हवे. आपण ज्या समाजात वावरतो त्या समाजात स्त्री आणि पुरुष यांच्यातील वैशिष्ट्यांचं अगदी लहान असल्यापासून वर्गीकरण केलं जातं. हे वर्गीकरण म्हणजे ‘स्त्री’ ही अमुक अशा वैशिष्ट्यांनी बनलेली असावी आणि ‘पुरुष’ तमुक वैशिष्ट्यांसह असावा हे असे सर्व साचेबध्द असते.

या दोन्ही वर्गीकरणामुळे फायदा होण्यापेक्षा मुलांचं नुकसान जास्त होतं. ते वेळीच लक्षात घेऊन सजग पालकांनी आपल्या मुलांना त्यांची जेंडर आयडेंटीटी ओळखायला मदत केली पाहिजे खरं म्हणजे, याकडे ‘जीवनकौशल्ये’ म्हणून पहायला हवं. आपल्या अवतीभोवती कितीतरी मुलं अशी आहेत ज्यांना मैदानी खेळ खेळायला आवडत नाहीत. मुलींसारखं मेकअप करायला आवडतं, छान दिसायला, नट्टापट्टा करायला आवडतो, जी खूप भावूक असतात, हळवी असतात आणि कितीतरी मुली अशा आहेत ज्यांना लांब केस आवडत नाहीत, बारीक केस आवडतात, जीन्स-टी शर्टमध्ये त्यांना जास्त सोयीस्कर वाटतं, त्यांना मैदानी खेळांचं प्रचंड आकर्षण असतं, सर्व प्रकारची वाहनं चालवायला त्यांना आवडतं पण त्यांना चिडवलं जातं, ‘‘काय मुलांसारखी वागतेस!’’ तर मुलांनी मुलींसारखं राहिलं तर काय नट्टापट्टा करतोस.. असं हिणवलं जातं. नेमकं या व्यवहारांमुळं मुलं आपल्याला वाटणा-या भावनांविषयी विचार करताना गोंधळात पडतात.

माझं शरीर पुरुषाचं आहे पण माझ्या भावना मात्र स्त्रीच्या असू शकतात आणि माझं शरीर स्त्रीचं आहे पण माझ्या भावना पुरुषांच्या असू शकतात याला ‘जेंडर’ असं म्हणतात. म्हणजे सेक्स हे मला जन्माने मिळतं तर जेंडर हे सतत घडत असते. मी शरीराने स्त्री किंवा पुरुष असणं हे माझं सेक्स झालं तर त्या शरीरातील पुरुष आणि स्त्री हे सतत पुरुषार्थ किंवा स्त्रीत्व यांना जोडलेले नसतात.

मला शरीर एक मिळालं आणि भावना भिन्न वाटत असतील तर त्या भावनाही साहजिक आहेत ही धारणा हळूहळू समाजामध्ये स्वीकारली जाऊ लागली आहे. ‘लिंगभाव’ म्हणजे ॠील्लीि१ याची नीट ओळख मुलाच्या वाढीतील पहिल्या ६ वर्षांच्या आत अगदी व्यवस्थित होत असते. अभ्यासकांच्या मते, साधारणपणे कोणतंही मूल वयाच्या ३ वर्षांपर्यंत आपलं जेंडर वर्गीकृत करायला लागतं पण तरीही काही वेळा एखादी मुलगी मुलासारखे उभं राहून लघवी करत असेल किंवा एखादा मुलगा मुलीसारखी लिपस्टीक लावून ओढणी घेऊन लाजत असेल तर घाबरू नका. लहान मुलं असा खेळ खेळत असतात आणि कालांतराने त्यांना वाटणा-या भावनांसोबत ते राहतात पण त्यावेळी काय मुलीसारखा रडतोस किंवा काय मुलासारखं वागतेस असे लेबल कृपया मुलांना लावू नयेत.

आपण काय करावं..
> आपल्या मुलाला ते जसं आहे तसं स्वीकारा. त्याच्यामध्ये गैर काही नाही किंवा तुमचं मूल असं वागतं म्हणजे तुमचा अपमान करतं असंही समजण्याचं मुळीच कारण नाही.
> सामाजिक सोहळ्यात आपल्या मुलांना त्याने कसं वागावं याच्यासारख्या सूचना नका देऊ. तुमचं मूल जसं आहे तसं समाजाने स्वीकारलं पाहिजे.
> आपल्या मुलाच्या जेंडरच्या अभिव्यक्तीकडे लाज किंवा शिक्षा म्हणून पाहू नका.
> विरुध्दलिंगी मित्रांसोबतच्या सर्व उपक्रमांत आपल्या मुलाचा सहभाग कसा वाढेल याची आपण काळजी घेतली पाहिजे.
> आपल्या मुलाला कोणी नावं ठेवली किंवा चिडवलं म्हणून त्याला दोष देऊ नये.

थोडक्यात काय तर आपण स्त्री आणि पुरुष यांच्यामधील असलेले नैसर्गिक फरक नाकारायचे आहेत का? मुळीच नाही. बाळाला जन्म देणं, स्तनपान करणं या भूमिका आईच्याच असतील, तसंच काही शारीरिक श्रम हे वडिलांच्या खात्यात असतील. अर्थातच समाजाचा भक्कमपणा त्यातल्या वैविध्यात असतो. पण आपण कुठल्या फरकांना ‘नैसर्गिक’ म्हणतो, हे बारकाईनं पाहिलं पाहिजे. आपल्या समाजात विषमतेमुळे आणि खास करून जेंडरच्या आयडेंटीटीमधील स्पष्टतेचा प्रचंड अभाव निर्माण झाल्यामुळे केवळ स्त्रियांचेच नाही तर पुरुषांचेही हक्क डावलले जातात.

उदा. सतत पुरुषत्वाचा मुलांवरती टाकलेला भार किंवा ओझं मुलांना रडण्याची मुभा देत नाही. कोणत्याही प्रकारचं शोषण आपल्याला थांबवायचं असेल तर सर्वांना आपलं आयुष्य शांतपणे, अहिंसक मार्गाने आणि त्यांच्या इच्छेनुसार जगता आलं पाहिजे. अर्थात सध्याच्या जगात आपल्या मुलांनी समतेच्या मार्गावरून चालले पाहिजे असे वाटत असेल तर त्याची सुरुवात आपल्या घरातून व्हायला हवी.

प्रा. पंचशील डावकर
मो. ९९६०० ०१६१७

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष लागवड योजनेचा शुभारंभ

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
200FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या