28.3 C
Latur
Friday, June 25, 2021
Homeविशेषतुझा विसर न व्हावा.....पांडुरंगा !

तुझा विसर न व्हावा…..पांडुरंगा !

एकमत ऑनलाईन

वैशाखाच्या वणव्याने आसमंत होरपळून निघत असतं सृष्टीतील साºया जिवांची काहिली सुरू असते. सगळ्यांना नकोसा असणारा उन्हाळा ऐन उमेदीत असतो. चैत्र, वैशाख, जेष्ठाच्या पावलांनी चालत आलेल्या उन्हाच्या काहिलीत सगळेच कावून गेलेले असतात. त्रस्त करणाºया अनेक प्रश्नांची उत्तरे पाऊस घेऊन येणार असतो. मनात काही आडाखे बांधलेले असतात. डोळ्यात काही स्वप्ने असतात. ती पूर्ण करण्याचा सांगावा घेऊन आषाढाचे आगमन होत असते. पश्चिम क्षितिजावरून एक गंधगार संवेदना सोबत घेऊन वारा उनाड मुलासारखा उधळत अंगणी येतो. त्याच्यामागे धावत येणाºया पावसाचं धरतीवर आगमन होतं. मनात साठलेला पाऊस आकाशातून सदैव बरसत राहतो. डोंगरकड्यावरून उड्या मारत मुक्तपणे हुंदडतो. शेतशिवारात येऊन साठतो. उताराच्या वाटेने पळत राहतो. वेडीवाकडी वळणे घेऊन वाहतो. झाडाफुलापानावरून निथळत राहतो.

शेतशिवारातून कामांची एकच धांदल उडते. उद्याच्या भविष्याची बिजे धरतीच्या कुशीत पावसाच्या साक्षीने पेरली जातात. सगळ्यांनाच घाई झालेली. पेरणीची वेळ साधण्यासाठी सगळीच जमवाजमव चाललेली. तुंबलेली कामं एकेक करून हातावेगळी होऊ लागतात. दिवसाचे प्रहर अपुरे पडायला लागतात. कामाच्या धबडग्यात आषाढ मध्यावर येतो तशी वारकºयांच्या मनात विठ्ठलाच्या भेटीची आस जागू लागते. डोळे आळंदी-पंढरपूरच्या वारीकडे लागतात; पण कामांचा रगाडा काही संपायचे नाव घेत नसतो. दूर क्षितिजाकडून येणाºया रस्त्यावरून माणसांच्या आकृत्यांचे काही बिंदू दिसू लागतात. कपाळी गंधाचा टिळा, गळ्यात तुळशीची माळा आणि मुखी विठ्ठल नामाचा सोहळा घेऊन भक्तांचा मेळा पंढरपूरच्या वाटेने सरकत राहतो.

मनातील भक्तीभाव उसळी घेत असतो तसा आणखी एक बिंदू त्या मेळ्यात सामावून जातो. वारकरी आणि विठ्ठलाचे वर्षानुवर्षाचे एकरूप झालेलं नातं. जणु वारी मराठी मुलुखाचा भावभक्तीसोहळा असतो. वारी मराठी मातीचं सांस्कृतिक संचित आहे. भक्तीचा सहजोद्धार बनून अनेक वर्षांपासून भक्तांची मांदियाळी वारीच्या वाटेने चालत असते. या वाटेने चालणाºया सगळ्या माणसांची जातकुळी एकच, ती म्हणजे पंढरीचा नाथ केवळ तो आणि तो विठ्ठलच भगवान परमात्मा पांडुरंग त्यांच्या (वारक-यांच्या) मनाचा विसावा. त्यांच्या आयुष्याचा उर्जास्त्रोत. तो त्याच्या विचारातच नाहीतर जगण्यात सामावून एकरूप झालेला असतो.

Read More  उर्जा देणारी लोहयुक्त ‘आबई’

खरे पाहता वारीच्या वाटेने चालणारी माणसे कुणी तालेवार नसतात. पद, पैसा, प्रतिष्ठेच्या झुली परिधान करून कुणी वारीला निघालेला नसतो. काळ्यामातीच्या कुशीत जगण्याचं प्रयोजन शोधणारा येथला साधाभोळा माणूस ऊनवारा, पाऊस, तहान, भूक कसलीच चिंता न करता श्रद्धापूर्वक अंत:करणाने विठ्ठल भेटीला नेणा-या रस्त्याने चालत राहतो. प्रवासात मिळेल तो घास-तुकडा खातो. सांज समयी आहे तेथे मुक्कामाला थांबतो. दिली कुणी ओसरी देह टेकवायला, तर तेथेच अंग टाकतो. नाहीच काही असले तर गावातल्या मंदिराचा ओटाही त्याला विश्रांतीसाठी पुरेसा असतो. सोय-गैरसोय या शब्दांच्या पलीकडे तो कधीच पोहचलेला. सोयीनुसार त्याच्या सुखांची परिभाषा कधीच नाही बदलली.

विठ्ठल हेच त्याचे खरे सुख काळ बदलला तशी माणसांच्या जगण्याची प्रयोजनेही बदलली. भौतिक सुखांनी माणसांच्या जगात आपला अधिवास निर्माण केला. पण वारी अजूनही तशीच आहे, आपलं साधेपण मिरवणारी. विज्ञाननिर्मित साधने हाती आल्याने कदाचित तिच्यात काळानुरूप सुगमता आली असेलही; पण परंपरेने वाहत येणारे सहजपण आजही तिच्यात कायम आहे. मनाला ओढ लावणारं वारीत असं काय असावं? माणसं कशाचीही तमा न करता अनवाणी पायांनी वारीच्या वाटेने का धावत राहतात? त्यांच्यात हे सगळं कुठून येत असेल? वारीत एकवटलेली माणसं पाहून हे प्रश्न मनात उगीच भिरभिरायला लागतात. विज्ञानप्रणित निकषांना प्रमाण मानून यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करून फार काही हाती लागण्याची शक्यता नसते.

भक्तांच्या अंतर्यामी विलसणा-या भावकल्लोळातून शोधून पाहिले की, ही कोडी उलगडत जातात. ही सगळी श्रद्धावंत माणसं वारीच्या वाटेने वावरताना मनातला अहं गावाची वेस ओलांडतानाच मागे टाकून येतात आणि माणूस म्हणून एक होतात. हे एकरूप होणं त्यांच्या श्रद्धेचं फलित असेल का? हा प्रश्न निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. वारी सा-यांना आपल्यात सामावून घेते. तुम्ही राव-रंक कुणीही असा, तुमच्याकडील सत्तेची वस्त्रे विसरुन वारीत विरुन जात असाल, तर सगळ्यांनाच माऊली रूप होता येते. कोणत्याही भेदभावाच्या अतित असणारी वारी माणसांच्या विचारांचा परिघ विस्तारत नेते.

Read More  जिल्ह्यात ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन चे आदेश

मनात निर्माण झालेलं मी पणाचं बेट या वारीत पार वितळून जातं. मागे उरतं निखळ माणूसपण चार दिशांनी येणारी चार माणसं, चार दु:खं दिमतीला घेऊन आलेली असतात. कुणाचं शेतच पिकलं नाही. कुणाचा बैल ऐन पेरणीच्या हंगामात गेला. कुणाचं शेत कर्जापोटी गहाण टाकलेलं, तर कुणाच्या लेकीचं नांदणं पणाला लागलेलं. नाना तºहेची दु:खं सोबत घेऊन भक्त पांडुरंगाला भेटायला आलेला असतो. वारीसोबत वावरतांना अनोळखी मने संवाद साधतात. संवादाचे साकव उभे करून आपलेपणाचा प्रवास घडत राहतो. आपली, त्यांची सुख-दु:खे एकमेकांना सांगितली जातात. ऐकली जातात. मनात लपवलेले दु:खाचे कढ वाटून हलके होत जातात. जगात केवळ मलाच दु:खे, वेदना, समस्या नाहीत. ही जाणीव होऊन जगण्याचं बळ वाढत जातं. माणसाला आपल्यातलं आणि माणसातलं माणूसपण कळत जातं आणि जगण्याची प्रयोजने अधिक गडद होत जातात.

विठ्ठल सर्वसामान्यांचा समन्वयवादी देव आहे. माणसांचं रोजचं अवघड जगणं सुघड आणि सोप करणारा. रोजच्या नव्या मरणाला सामोरे जाणाºया माणसांच्या मनात जगण्याचं स्वप्न पेरणारा. खरंतर दु:खाला ना नाश, ना अंत. माणसं कधी ती स्वत:हून ओढवून घेतात, कधी दु:खंच आपल्या पावलांनी चालून येतात. या साºया कलहात संसाराचा सागर सहिसलामत पार करून पैलतीर गाठणं अवघड असल्याची भक्तांची समजूत झालेली. भवसागर कमरेएवढ्या पाण्याइतकाच तर आहे, तो पार कर पैलतीर नक्कीच गाठशील, असेच काहीतरी कमरेवर हात ठेऊन खचलेल्या जिवांना विठ्ठल सूचित करीत असावा. विठ्ठल महाराष्ट्राचा सामाजिक देव. ना त्याच्या हातात कोणती आयुधे, ना कोणती शस्त्रे-अस्त्रे. भक्ताला तो हेच सांगत असावा की, तुझं नितळ, निर्मळ मन हेच जग जिंकण्याचं आयुध आहे, ते सांभाळलं की पुरे. जग जिंकण्यापेक्षा स्वत:ला जिंकलंस तरी खूप झालं.

विठ्ठल सर्वसामान्यांच्या हाकेला धावून जाणारा. पुंडलिकासाठी विटेवर वाट पाहत तिष्ठत राहणारा. भक्तांच्या भेटीची ओढ खरंतर त्यालाच अधिक तो साºयांचाच आहे. तो सापडावा म्हणून सायासप्रयास करायची आवश्यकताच नाही, हे सांगतांना संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘वाचेचा रसाळ अंतरी निर्मळ ! त्याच्या गळा माळ असो नसो !’ भक्ताची भगवंत भेटीसाठी असणारी पात्रतासुद्धा हीच. त्याला भेटायचं तर कुठल्या सोवळ्या-ओवळ्याची वस्त्रे गणवेश म्हणून परिधान करून जाण्याची आवश्यकता नाही. हृदयातून उमलून येणारा आणि ओठातून प्रकटणारा प्रत्येक शब्द गीत होतो. त्यासाठी शास्त्रीय संगीताचा क्लास लावायची गरज नसते. हातात टाळ असला तर उत्तमच, नसला तर टाळ्याही चालतात. म्हणूनच संत जनाबाई ‘दळिता कांडिता तुज गाईन अनंता’ म्हणाल्या असाव्यात. संत सावता माळी कधी विठ्ठलाच्या दर्शनाला धावले नाहीत. त्यांना त्यांचा विठ्ठल कांदामुळा भाजीत दिसत होता. संत सेना महाराजांना आपल्या रोजच्या व्यवसायात आणि जगण्यात सापडत होता. संत नरहरींना विठ्ठल नामाचा व्यवहार कळला होता. म्हणूनच की काय पांडुरंगालाही भक्तांचा लळा होता.

Read More  टिकटॉक,शेयर इट सह या ५९ ऍपवर सरकारची बंदी

पंढरीची वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक ऐश्वर्य आहे, वैभव आहे. ‘वारी’ म्हणजे पंढरीचीच ! तिरुपती, काशी या तीर्थक्षेत्रांच्या भेटींना वारी म्हटले जात नाही. पंढरीच्या वारीला शेकडो वर्षांचा प्राचीन इतिहास व वैभवशाली परंपरा आहे. आषाढी वारीसाठी वारकºयांच्या दिंडीसमवेत गात, नाचत, गर्जत पायी पंढरपूरला जाण्याचा सुखानंद, जीवन धन्य करणारा अनुभव असतो. परंतु यावर्षीच्या कोरोना (कोविड-१९) सारख्या महामारीने शेकडो वर्षाच्या परंपरेने चालत आलेल्या वारीला जाण्यासाठी विश्रांती घ्यावी लागली आहे. जशी सासूरवाशिणीला माहेरची ओढ असावी तशी वारीत जाणा-या प्रत्येक वारक-यांची झालेली आहे.

दररोजच्या धकाधकीत जगणा-या वारक-याला केवळ वारीच्या निमित्ताने मिळणारा वेळ, आज तोही थांबवला आहे. परंतु यावर्षीच्या महाराष्ट्रातील सर्व वारक-यांना पंढरपूरची पदोपदी आठवण येत आहे आणि ती आसुसलेली आठवण मनात दाबून ठेवावी लागत आहे. तूच आहेस देवा करता करविता सृष्टी घडविता आणि दुख:हर्ता. या कोरोनाच्या संकटातून समस्त जगाला वाचव. तुझे गोड नाम नेहमी आमच्या मुखी राहू दे. म्हणून पांडुरंगा तुला एकच मागणे आहे.
सदा माझे डोळा । जडो तुझी मूर्ती ।
हेचि दान देगा देवा । तुझा विसर न व्हावा ।  


प्रा. युवराज भानुदासराव बालगीर

नणंद, मोबा.: ९७३०६००९१२

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
202FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या