21.1 C
Latur
Tuesday, September 28, 2021
Homeविशेषस्वप्नांची निर्घृण समाप्ती नको...!

स्वप्नांची निर्घृण समाप्ती नको…!

एकमत ऑनलाईन

‘स्वप्नं मोफतच असतात, फक्त त्यांचा पाठलाग करताना खरी किंमत मोजावी लागते.’ खरंच स्वप्नं जीवघेणी ठरू शकतात का..? यावर विश्वास ठेवणे थोडे कठीणच जाते. कारण स्वप्नं ही कायम जीवनाला ‘मूर्त’ स्वरूप देण्याचे काम करत असतात. किती भाबडी असतात ना बालमनाची स्वप्नं.विचारांचा कस नसलेली. त्या स्वप्नांवर असलेला विश्वास म्हणजे निरागसतेने कुठेही नतमस्तक होणारा आंतरिक भाव. मात्र मोठे होत जाताना जगाच्या भट्टीत तावून सुलाखून निघताना कधी कधी त्याच स्वप्नांना धक्का बसू लागतो आणि त्यावरील विश्वास डळमळीत होत जातो. पण खरे सांगायचे झाले तर, इथेच सावरायचे असते स्वत:ला कारण ‘बुद्धिप्रामाण्य’ चिकित्सेच्या बळावर आपण विसरतो की; नकळत का होईना त्या भाबड्या स्वप्नांनी आपण घडलेलो असतो.

सध्या महाराष्ट्रात स्पर्धा परीक्षा पास एका विद्यार्थ्याची आत्महत्या अनेकांच्या मनाला चटका लावून गेली. खरे तर ही केवळ आत्महत्या म्हणावी की, आपल्या व्यवस्थेने घेतलेला ‘बळी’ यावर बरीच मतमतांतरे दरम्यानच्या काळात आली. म्हणून सध्या तमाम तरुणाईच्या मनात ज्वलंत असलेल्या ‘स्पर्धा परीक्षा’ या विषयाचा मागोवा घेणे अगत्याचे ठरते. स्वप्नं जरी जगण्याचं बळ देत असली तरी केवळ ‘स्वप्नरंजन’ मात्र आयुष्य उद्ध्वस्त करायला पुरेसे ठरते. वास्तविकता आणि आभासीपणा यात खूप फरक असतो. ज्यावेळी हा फरक समजण्याची गल्लत होते त्याक्षणी आयुष्यातील गणिते चुकू लागतात. स्वप्नरंजन क्षणिक सुख देते मात्र त्यावर यशस्वितेची इमारत नाही उभी करता येत. एखाद्या सिनेमात एखादा अभिनेता किंवा अभिनेत्री काही क्षणात पराभवाच्या छायेतून यशाच्या शिखरावर जातो, त्याचा रुबाबदारपणा, वर्दीतील शान, लाल दिव्याचे असलेले आकर्षण, वर्तमानपत्रात येणा-या यशस्वी अधिका-यांचा प्रवास, समाजमाध्यमावर येणा-या प्रेरणादायी गोष्टी या सगळ्या बाबी कळत-नकळत तरुणाईला भुरळ घालतात आणि ‘आपणही त्यासम व्हावे’ हा विचार अलगदपणे मनात डोकावतो.

काही वर्षांपूर्वी परराष्ट्र मंत्रालयातील एका ज्येष्ठ सनदी अधिका-याने स्पर्धा परीक्षा हा एक ‘संसर्गजन्य आजार’ असल्याचे वक्तव्य केले होते. त्यावर ब-याच प्रतिक्रिया उमटल्या होत्या. आज मात्र त्याची लख्ख जाणीव होताना दिसत आहे. या संसर्गजन्य आजाराची तीव्रता आणि बाधा आता असलेल्या कोरोनापेक्षाही अधिक असून, आपल्या व्यवस्थेला अजूनही लक्षात न येणे हे आपले दुर्दैव. तरुणाईच्या उंबरठ्यावर असताना स्वप्नांचे गाठोडे घेऊन प्रत्येक तरुण प्रवास करत असतो. एका विशिष्ट वयात आल्यावर व्यक्तीला ‘स्व’ ची जाणीव व्हायला लागते. आपलीही समाजात एक ओळख असावी असे त्याला सतत वाटायला लागते आणि तो ध्येयाच्या प्रवासाला निघतो. काहींसाठी हा प्रवास छोटासा तर काहींसाठी लांबचा ठरतो एवढाच काय तो फरक.

तत्कालीन कृषिमंत्र्यांची दुरुस्ती रद्दबादल

‘जेव्हा स्वप्नांचं रूपांतर रोजगारात होतं ना’ तेव्हा सळसळत्या रक्ताचा आणि मनगटात ताकद असणारा तरुणही नेस्तनाबूत होतो, अक्षरश:. ‘स्व’ ची ओळख तयार करण्याच्या प्रयत्नात स्वत:च कोठेतरी हरवलेलो असतो आपण. त्यातच आपली व्यवस्था त्याचा प्रवास सुकर करण्याऐवजी त्यात अडथळ्यांचे काटे पेरण्यात व्यस्त असते. वर्षानुवर्षे न होणा-या परीक्षा, झाल्या तरी उशिरा लागलेले निकाल, प्रक्रियेत होणारा प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार, बेरोजगारी, वाढते वय, नकळत येणारा सामाजिक, कौटुंबिक आणि महत्त्वाचं म्हणजे आर्थिक दबाव स्वप्नांऐवजी रोजगाराचा शोध घ्यायला भाग पाडतो तरुणाईला.डोळ्यांपुढे असणारे पुस्तक, पुस्तकातील अक्षर डोळ्यांपर्यंत न पोहोचता, डोळ्यातील आसवांप्रमाणे त्यांच्यात असलेली स्वप्ने ही डोळ्यांच्या बाहेरच वाहून जातात.

याचा अर्थ स्वप्न पाहूच नयेत हा आहे का..? तर नक्कीच आहे. खरे तर आयुष्यातील मार्ग हा कधीच सरळ नसतो. त्यात अनेक नागमोडी वळणे असतात किंबहुना ती असावीच लागतात कारण ती नसतील तर आयुष्य समृध्द होणार तरी कसे. आपल्यावर फेकलेल्या प्रत्येक दगड-विटांचा वापर आपल्याच ‘स्वप्नरूपी’ घर बनवण्याचे कसब आपल्याला शिकावेच लागेल. ‘काट्यांच्या सहवासातच फुलांच्या सुगंधाला किंमत असते’ हे विसरून नाही ना चालणार. पराभवाचा महापर्वत कधी ना कधी येतोच प्रत्येकाच्या आयुष्यात. मात्र त्या पर्वताला वळसा घालून नाही जाता येत यशस्वितेच्या प्रवासाला. विशेष म्हणजे त्यात कुणालाही वाटेकरी करून घेता येत नाही. अडचणींवर मात करण्याचा एकच मार्ग म्हणजे त्यांना निडरपणे सामोरे जाणे.

परिस्थिती हाताळण्याच्या प्रत्येकाच्या क्षमता वेगवेगळ्या असू शकतात. कधी कधी इतरांचे सल्ले आत्मकेंद्री, एकतर्फीही असू शकतात कारण प्रत्येकाच्या समस्या, आयुष्याची गणिते वेगवेगळी असतात. त्यामुळे आपली गणितं सोडवण्यासाठी इतरांची सूत्रे निरुपयोगी ठरतात. त्यामुळे अंधार दिसल्यावर उजेडासाठी आपल्यातली ठिणगी पेटवायलाच हवीय. समाजाने समोर ठेवलेली ‘बुरसटलेल्या प्रश्नांची प्रश्नपत्रिका’ झुगारून आपला स्वत:चा, स्वतंत्र अभ्यासक्रम आखून आयुष्याच्या ख-या परीक्षेसाठी सज्ज होत, आपल्याला संपवण्याचा सुनियोजित कट उधळून लावावा लागेल प्रत्येकाला.

प्रत्येकजण आयुष्यात नेहमी स्थित्यंतरामधून जात असतो.अंगातला सदरा बदलावा इतक्या झपाट्याने आपला भोवताल बदलत असतो. तसे पाहिले तर अशा स्थित्यंतराची घडामोड आपल्याकडे दीर्घकाळ चालूच असते. पण कायम लक्षात ठेवा कोणी असो वा नसो आपली स्वप्नं पूर्ण होण्यासाठी तुम्ही जेव्हा तुमचं घरटं सोडता ना त्या घरट्यात ‘चार डोळे’ (आई आणि वडील) कायम तुमची वाट पाहत असतात ज्या डोळ्यांत तुम्ही स्वत:बद्दलचा विश्वास पाहिला होता… ज्या मायबापांनी तळहातावर घेऊन कौतुकाने आपले तान्हे जावळ हुंगलेले असते त्यांना सरणावरच्या आपल्या निर्जीव चेह-यावरून थरथरते हात फिरवत विलाप करण्याची वेळ आणणे ही आपण त्यांच्याशी केलेली प्रतारणा नाही का होणार. म्हणूनच आपली स्वप्नं ही केवळ आपली नसतात तर पर्यायाने आपल्यावर प्रेम करणा-या प्रत्येकाची असतात, म्हणून आपल्या स्वप्नांची निर्घृण समाप्ती होणार नाही याची जाणीव आपण सर्वांनी ठेवावी एवढीच माफक अपेक्षा!

विवेकानंद चव्हाण,नांदेड
मोबा. ८६९८१ ८६१३०

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या