29.9 C
Latur
Tuesday, March 21, 2023
Homeविशेष‘ऑस्कर’चा डबल धमाका

‘ऑस्कर’चा डबल धमाका

एकमत ऑनलाईन

सिनेसृष्टीत काम करणा-या सर्वांसाठी या क्षेत्रातील सर्वोच्च खिताब म्हणून ओळखल्या जाणा-या ‘ऑस्कर’चे मोल अनन्यंसाधारण असते. ‘अँड ऑस्कर गोज टू…’ या चार शब्दांच्या वाक्यानंतर ‘आपल्यातलं’ नाव उच्चारलं जातं का, याची देशभरातील रसिक चाहते वाट पहात असतात. अनेक वर्षांनंतर भारतातील या चाहत्यांच्या अपेक्षांची पूर्तता यंदा झाली आहे. ती होत असताना दोन ऑस्कर मिळाल्यामुळे भारतातील सिनेरसिकांचा आणि या क्षेत्रातील सर्वच मंडळींचा आनंद द्विगुणित झाला आहे, यात शंकाच नाही. सशक्त, आशयघन आणि परिणामकारक कथानक, दमदार मांडणी आणि तितकेच तगडे मार्केटिंग या त्रिसूत्रीच्या पायावर ऑस्कर पुरस्कारांची कमान उभी राहू शकते, हे या पुरस्कारांनी दाखवून दिले आहे.

भारतात दरवर्षी दोन हजार चित्रपट तयार केले जातात. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या काही दिवसांत त्यांच्या कमाईचे मोठमोठे आकडे आपल्यासमोर येतात. चित्रपटांवरून वादंग निर्माण होणे तर आता आपल्याकडे नित्याचे झाले आहे. मग आपली चित्रपटसृष्टी संख्यात्मकदृष्ट्या इतकी वाढूनसुद्धा गुणात्मकदृष्ट्या मागे का, असा प्रश्न अलीकडील काळात ऑस्कर पुरस्कारांनंतर हमखास विचारला जात असे. वास्तविक, गेल्या काही वर्षांत ऑस्करसाठी निवड झालेले भारतीय चित्रपट खरोखर वेगळ्या वळणाचे, उत्कृष्ट कथानक असलेले आणि तंत्रसमृद्धही होते. सर्वच अंगांनी भारतीय चित्रपट परिपक्व होत असल्याची ही खूण होती; पण तरीही ‘मदर इंडिया’पासून भारतीय चित्रपटांची उपस्थिती ऑस्करच्या शर्यतीत अंतिम फेरीत आतापर्यंत अवघ्या तीन वेळा दिसून आली. त्यामुळे सिनेकलासृष्टीतील सर्वोच्च सन्मान मानली जाणारी ऑस्करची बाहुली यंदाही भारताला हुलकावणी देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते; परंतु यंदा भारताने एक नव्हे तर दोन ऑस्कर पुरस्कार पटकावून ‘डबल धमाका’ घडवून आणला आहे.

ऑस्कर पुरस्कारांचे वितरण पहिल्यांदा १९२९ मध्ये करण्यात आले. गेल्या नऊ दशकांपासून ऑस्करचा वारसा सुरू असून त्याकडे जगातील सर्वांत प्रतिष्ठेचा पुरस्कार म्हणून पाहिले जाते. यंदाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये एसएस राजामौलीचा बहुभाषिक (मूळ तेलगू) चित्रपट ‘आरआरआर’चे लोकप्रिय गीत ‘नाटू-नाटू’ला सर्वोत्तम मूळ गीत आणि ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला सर्वोत्तम लघु माहितीपट म्हणून ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. या विजयाचा आनंदोत्सव संपूर्ण देशभरात दिसून येत आहे. याचे कारण इतिहासात दडलेले आहे. साधारण ११० वर्षांपूर्वी दादासाहेब फाळके यांनी मुंबईच्या अमेरिका इंडिया पिक्चर पॅलेसमध्ये ‘द लाईफ ऑफ क्राईस्ट’ चित्रपट पाहिला. ही गोष्ट १९१० ची आहे.

फाळके हे पहिल्यांदाच चित्रपट पाहत होते आणि भारावून जात टाळी वाजवत होते. त्यानंतर त्यांनी अनेक दिवस हाच चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिला. त्यांनी आपल्या पत्नीलाही हा चित्रपट दाखविला. मग त्यांनी एका निर्णयाची घोषणा केली, ‘मी देखील हिंदीत धार्मिक आणि विचारांवर आधारित पात्रांवर चित्रपट तयार करणार’. ही घोषणा अन्य लोकांनी फारशी मनावर घेतली नाही. त्यांच्या या म्हणण्यावर कोणाचाही विश्वास बसला नाही. परंतु त्यांनी हा निर्णय घेतला नसता, तर आज आपण ‘नाटू नाटू’चा आनंद व्यक्त करू शकलो नसतो. चित्रपट तयार करण्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान शिकण्यासाठी दादासाहेब फाळके हे जहाजातून ब्रिटनला गेले आणि तेथे तीन महिने राहिले. जेव्हा ते मुंबईत परतले तेव्हा त्यांच्या मनातील कल्पनेला मूर्त रूप येण्याची वेळ झाली होती. परंतु हे स्वप्न पूर्ण करणे सोपे नव्हते. सतत चित्रपट पाहत असल्याने त्यांचे डोळे दुखू लागले होते. तरीही ते थांबले नाहीत. १९२३ मध्ये त्यांनी पहिला हिंदी चित्रपट ‘राजा हरिश्चंद्र’ तयार केला. ती एक सुरुवात होती.

कालांतराने चित्रपटाचा सुवर्णकाळ आला. एकीकडे मुंबईत राज कपूर, मेहबूब खान, व्ही. शांताराम, गुरुदत्त यासारखे दिग्गज दिग्दर्शक होते, तर बंगालमध्ये सत्यजित रे, ऋत्विक घटक, मृणाल सेन यांच्यासारखे मुरब्बी दिग्दर्शक. दक्षिण भारतात तेलगू, तमिळ, मल्याळम चित्रपटांची देखील भरभराट होऊ लागली होती. के. बालचंद्र, एन. टी. रामाराव, अदूर गोपालकृष्णनसारखे अनेक निर्माते-दिग्दर्शक झाले आणि त्यांनी भारतीय सिनेमा जगासमोर समर्थपणे आणण्याचा चांगला प्रयत्न केला. जगभरात भारतीय चित्रपटांना वाहवा मिळवून दिली. तत्कालीन काळातही आपले चित्रपट हॉलिवूडपेक्षा वेगळेच होते आणि आजही आहेत. भारतीयांचे वेड आणि आकलन क्षमता ही वेगळीच आहे. मानवी सुख-दु:खाशी जोडलेला सिनेमा हा लोकांच्या आयुष्याचा अविभाज्य घटकही बनला. ‘आवारा हूँ…’ असे म्हणत जेव्हा राज कपूर आपली अघळपघळ पँट वर करण्याचा प्रयत्न करायचा तेव्हा प्रेक्षकही त्याची कॉपी करू लागत. मदर इंडिया, दो आँखे बारह हाथ, मुघल-ए-आझम, श्री ४२० यासारख्या चित्रपटांनी परदेशातही नाव कमावले. सत्यजित रे यांच्या ‘पथेर पांचाली’ चित्रपटाला कान महोत्सवात ‘सर्वोत्तम ुमन डॉक्यूमेंट’चा पुरस्कार मिळाला. या चित्रपटाला ‘बाफ्ता’ पुरस्कारासाठी देखील नामांकन मिळाले.

आणखी एक गोष्ट म्हणजे ऑस्करसाठी नामांकन मिळणे आणि तो मिळवणे ही बाब साधारण नाही. अनेक वर्षांपासून आपले निर्माते ऑस्करवारी करत आले आहेत आणि तेथे छाप पाडण्याचा प्रयत्नही करत आहेत. मदर इंडिया, लगान, सलाम बॉम्बे यासारखे चित्रपट ऑस्करपर्यंत गेले. तेथे निर्मात्यांना चित्रपटाचे मार्केटिंग करणे आणि तेथील निवड समितीच्या सदस्यांसमोर त्याचे सादरीकरण करणे गरजेचे असते. राजामौली आणि त्यांच्या टीमने हे काम अतिशय लीलया पद्धतीने सादर केले. ‘नाटू-नाटू’ गाण्याचे संगीत हे अर्थातच संंगीतकार एम. एम. किडवानी यांचे सर्वोत्तम नाही, परंतु हे गाणे आपल्या भारतीयांचे अचूक पद्धतीने प्रतिनिधित्व करते. स्वातंत्र्य संग्रामात संघर्ष करणा-या नायकांना जेव्हा नाचण्याचे आव्हान मिळते तेव्हा ते असे काही बेभान होऊन नृत्य करतात की ते पाहून उपस्थित इंग्रज महिला आणि पुरुष देखील नाचण्यासाठी उत्तेजित होतात. या गीताचे सौंदर्य त्याच्या शब्दांत किंवा चालीत नाही तर त्यांच्या उत्साहीपणात आहे आणि तो उत्साह आपल्या मनात दडलेला आहे.

१० नोव्हेंबर २०२१ रोजी हे गाणे पहिल्यांदा प्रदर्शित झाले त्यानंतर अवघ्या २४ तासांत त्याला १७ दशलक्ष व् ूज मिळाले होते. पाच भाषांमध्ये त्याचे एकूण व् ुअर्स ३५ दशलक्षांहून अधिक होते. एक दशलक्ष लाईक्सचा टप्पा ओलांडणारे ते पहिले तेलगू गाणे ठरले. त्यामुळे ‘नाटू नाटू’ला गोल्डन ग्लोब मिळाल्यानंतर ऑस्कर देखील मिळण्याची शक्यता वर्तविली जातच होती, ती सत्यात उतरली आहे. भारतीय लघुपट ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ला मिळालेला पुरस्कार हा जवळपास निश्चित मानला जात होता. दक्षिण भारतातील एका गावातील जोडपे आणि त्यांनी दत्तक घेतलेला हत्ती रघू याच्यावर साकारलेला हा हृदयस्पर्शी चित्रपट कोणाही संवेदनशील मनाला भावणारा आहे. या माहितीपटामध्ये तामिळनाडूच्या जंगलातील मानव व हत्तींमधील दृढ नात्याचे कंगोरे उलगडण्यात आले आहेत. मानवतेचा वस्तुपाठ या चित्रपटाने घालून दिला आहे. या चित्रपटातील संदेशाला आणि सजीवांच्या परस्परपूरक जगण्याच्या प्रयत्नांना ऑस्कर पुरस्कारांच्या रूपाने जागतिक पातळीवर पावती मिळाली आहे.

– मानवेंद्र उपाध्याय

Stay Connected

1,567FansLike
183FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या