26.8 C
Latur
Thursday, July 7, 2022
Homeविशेषलांबलेल्या मान्सूनच्या निमित्ताने...

लांबलेल्या मान्सूनच्या निमित्ताने…

एकमत ऑनलाईन

यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी होऊनही त्याचा प्रवास रेंगाळला आहे. जगभरात प्रचंड प्रमाणात केलेल्या जंगलतोडीमुळे आज तापमानवाढीचा राक्षस आपल्यापुढे उभा आहे आणि यामुळे होणा-या हवामानबदलांनी खूप मोठे आव्हान उभे केले आहे. मान्सूनचा वाढता लहरीपणा ही त्याचीच फलनिष्पत्ती आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामानावर आधारित कृषिव्यवस्थापन ही संकल्पना आपण राबवली पाहिजे. स्थानिक पातळीवर हवामानाचा अचूक अंदाज सांगणारी यंत्रणा विकसित केली पाहिजे. सरासरी अंदाज चांगला वर्तवल्यास शेतकरी मृग नक्षत्रावर पेरणी करतो; पण पावसाने ओढ दिल्यास दुबार पेरणीचे संकट ओढावते आणि त्याचे अर्थकारण फसते.

मान्सूनचे आगमन आणि मान्सूनची प्रगती अशा प्रकारे साधारणत: मान्सूनचे अवलोकन केले जाते. यंदाच्या वर्षी अंदमानमध्ये मान्सूनचे आगमन वेळेपूर्वी झाले आणि पुढे केरळमध्येही मान्सून वेळेपूर्वी आला. परंतु त्यापुढील टप्प्यावर मान्सूनची वाटचाल रेंगाळली. सामान्यत: कर्नाटक, तळकोकण, मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्राचा भाग यामध्ये मान्सूनची प्रगती होत असते. पण यावर्षी मान्सूनच्या प्रगतीत अडथळे येतील आणि जूनमध्ये मान्सूनचे प्रमाण कमी राहील, असा अंदाज आम्ही १ जून रोजी दिला होता. आमच्या मान्सून मॉडेलनुसार जून महिन्यातील पावसातला खंड सांगता येऊ शकतो. हे मॉडेल लांबपल्ल्याचा स्थानिक ठिकाणचा पावसाचा अंदाज देणारे असून त्याचे पेटंट माझ्याकडे आहे. विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, अकोला, मराठवाड्यातील जालना, परभणी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, राहुरी, उत्तर महाराष्ट्रातील धुळे, जळगाव, नाशिक, सोलापूर, पाडेगाव, कराड, कोल्हापूर आणि कोकणातील दापोली अशा १५ स्थानिक ठिकाणच्या जून ते सप्टेंबर या कालावधीतील पावसाचा अंदाज या मॉडेलद्वारे सांगितला जातो. कारण पावसामध्ये प्रचंड विविधता असते. कोकणामध्ये सरासरी ३३०० मिलीमीटरहून अधिक पाऊस पडतो; तर महाबळेश्वरला सुमारे ५००० मिलीमीटरच्या दरम्यान पाऊस पडतो. तेथून ६० ते ८० किलोमीटर अंतरावर असणा-या पुण्यामध्ये जून ते सप्टेंबर या कालावधीत सरासरी ५६५ मिलीमीटर पाऊस पडतो. महाराष्ट्रामध्ये नऊ हवामान विभाग आहेत. या विभागांमधील पावसाचे प्रमाणही वेगळे आहे. त्यामुळे सर्वसाधारण अंदाज वर्तवल्यास त्यातून स्थानिक ठिकाणच्या पावसाचे अवलोकन होत नाही. परंतु आपल्याकडे सामान्य लोक सरासरीइतका पाऊस होईल असे म्हटले की आनंदी होतात. वास्तविक, महाराष्ट्रातला धुळ्याचा काही भाग, नंदुरबारचा काही भाग, नाशिकचा काही भाग आणि संपूर्ण नगर जिल्हा, पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग, सांगली-सातारा जिल्ह्यांचे पूर्व भाग, लातूर, उस्मानाबाद, बीड आणि औरंगाबादचा काही भाग हे १२ जिल्हे दुष्काळी जिल्हे म्हणून ओळखले जातात. १९७२ मध्ये ८५ तालुके दुष्काळी होते. पण २०१२, २०१५ आणि २०१८ च्या दुष्काळामध्ये ही संख्या वाढत गेली आणि आज ती १३३ वर पोहोचली आहे.

मान्सूनचे प्रमाण आणि त्याचे वितरण याच्याशी महाराष्ट्राचीच नव्हे सबंध देशाची शेतीव्यवस्था जोडली गेलेली आहे. आज हवामान बदलांमुळे मान्सूनचा लहरीपणा वाढला आहे. पावसाचे वितरण असमान पद्धतीने होत आहे. पावसातील खंड वाढत चालले आहेत. कमी काळात अधिक पाऊस पडण्याच्या घटना वाढत आहेत. या सर्वांच्या मुळाशी जागतिक तापमानवाढ आहे. हवेतील कार्बनचे वाढते प्रमाण तापमानवाढीचा मुख्य कारक आहे. हा कार्बन शोषून घेणारी यंत्रणा म्हणजे झाडे आवि वनस्पती. दुर्दैवाने, आज आशिया खंडातील ५५ दशलक्ष हेक्टर जंगलाचा मानवाकडून -हास करण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेतील ६५ दशलक्ष हेक्टर जंगल तोडलं गेलं आहे. अमेरिकेतील ८५ दशलक्ष हेक्टर जंगलाची तोड करण्यात आली. जगाचा आढावा घेतल्यास गेल्या काही वर्षांत ४०० दशलक्ष हेक्टरवरील जंगल तोडण्यात आले आहे. जी यंत्रणा आपल्या खोडांमध्ये, फांद्यांमध्ये, मुळांमध्ये कार्बन डाय ऑक्साईड साठवत होती तिच्यावरच मानवाने असंख्य प्रहार केले असून आज ती संपुष्टात येतेय की काय अशी भीती निर्माण झाली आहे. दरवर्षी १० दशलक्ष हेक्टर जंगलतोड होत असल्याने कार्बनचे हवेतील प्रमाण वाढत चालले आहे. आज सरासरी ०.३६ टक्के एवढे हवेतील प्रमाण असून ते वाढत चालले आहे. कार्बन डाय ऑक्साईड सूर्याकडून येणारी उष्णता भरून ठेवतो. परिणामी हवेचे दाब कमी होताहेत. त्यामुळे तिथे पाऊस होतो आणि जिथे उष्णता कमी मिळाली आहे तेथे पाऊस कमी होतो आणि दुष्काळाचे सावट पसरते. जगभरात ही परिस्थिती पहायला मिळते आहे.

२०३० सालापर्यंत पावसाच्या वितरणातील फरकामध्ये आणखी वाढ होत जाणार आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, ढगफुटी, महापूर यांसारख्या संकटांची वारंवारिता वाढत जाणार आहे. २०१९ चे उदाहरण पाहिल्यास कोल्हापूर, सांगली, सातारा भागात प्रचंड पाऊस झाला; परंतु तेथून काही किलोमीटर अंतरावर असणा-या मराठवाड्यात मात्र दुष्काळ होता. एकाच राज्यातील विसंगत असे हे चित्र मान्सूनचा लहरीपणा वाढल्याचे स्पष्ट करणारे आहे. यावर्षी आमच्या मॉडेलमध्ये जून महिन्यात पावसात खंड पडेल आणि सरासरीइतका पाऊस पडणे शक्य नाही हे दिसून आले होते. त्यामुळे त्याचा परिणाम पेरण्यांवर, शेतीवर आणि पिण्याच्या पाण्यावर होणार आहे. एक जूनला अंदाज देतानाच आम्ही याची कल्पना दिली होती. वर उल्लेख केलेल्या १५ स्थानकांमध्ये मार्च-एप्रिल महिन्यात वा-याचा वेग १ ते २ किलोमीटर प्रतितास इतका आढळला होता. प्रत्यक्षात तो सात ते आठ किलोमीटर असायला हवा होता. वा-याचा वेग कमी असल्यास मान्सूनचा रस्ता तयार होण्यास अडथळे निर्माण होतात. आपल्या भूपृष्ठावर हवेचा दाब अधिक राहिला तर मान्सून पुढे सरकत नाही. त्याला वेळ लागतो. त्यामुळेच जून महिन्यात पाऊस कमी राहील, खंड पडतील असा अंदाज आम्ही वर्तवला होता आणि आज तशीच परिस्थिती दिसून येत आहे.

यंदा महाराष्ट्रातील ८ जिल्ह्यांमध्ये जूनच्या पहिल्या आठवड्यात १०० टक्के कमी पाऊस झाला आहे. नंदुरबार, धुळे, जळगाव, पालघर, नांदेड, भंडारा आणि मुंबईमधील काही भागाचा यामध्ये समावेश आहे. ८ जूनपर्यंत रायगड, रत्नागिरी, नाशिक, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, गडचिरोली, वाशिम आणि बीड अशा १६ जिल्ह्यांमध्ये ९० ते ९९ टक्के कमी पाऊस झाला आहे. पुणे, सोलापूर, सातारा, अहमदनगर, हिंगोली, यवतमाळ, लातूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशा जिल्ह्यांत ८० ते ९० टक्के कमी पाऊस झाला आहे. सांगली आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत ३६ ते ५४ टक्के कमी पाऊस झाला आहे. एकूण महाराष्ट्रातील सर्वच जिल्ह्यांमध्ये जून महिन्यातील पहिल्या-दुस-या आठवड्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला आहे. संपूर्ण भारताचा विचार केल्यास महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत ५९ टक्के कमी पाऊस झाला आहे. या सर्व परिस्थितीचा खरीप हंगामावर प्रतिकूल परिणाम होणार आहे. पेरणी चांगली होण्यासाठी ६५ मिलीमीटरपर्यंत ओलावा जमिनीमध्ये असावा लागतो. म्हणजे दोन ते तीन फूट खोल माती भिजलेली असली पाहिजे, तरच ती पेरणी करण्याला अर्थ आहे. कमी ओलीवर पेरण्या केल्या आणि नंतर पावसाने दडी मारली, उघडीप पडली की दुबार पेरणीचे संकट येते आणि शेतकरी संकटात येतात. म्हणूनच आम्ही अंदाज वर्तवताना तात्काळ पेरण्या न करण्याचा सल्ला दिला होता. कारण बरेचदा थोडा पाऊस सुरू झाला की शेतकरी पेरण्या करतात. पण नंतर बी मोडवते, थोडेसे उगवते आणि पाणी न मिळाल्याने मरून जाते. दुबार पेरणीमुळे शेतक-यांना डबल खर्च करावा लागतो.

आमच्या अंदाजानुसार १५ जुलैनंतर पावसाचे प्रमाण चांगले राहील. १५ ऑक्टोबरपर्यंत पाऊस राहू शकतो. त्यानुसार आपल्या शेतीचे नियोजन शेतक-यांनी केले पाहिजे. अलीकडील काळात कपाशीचे दर वाढल्यामुळे महाराष्ट्रात कापसाचा पेरा वाढतो आहे. परंतु ते करत असताना भारी जमिनीमध्ये, बागायत शेतीमध्येच कपाशीचे पीक घेतले पाहिजे आणि हलक्या व मुरमाड जमिनीत इतर पिके घेतली पाहिजेत. खरिपात पाऊस चांगला झाल्यास बाजरी आणि तूर हे आंतरपीक पद्धतीने लावले पाहिजे. पीकपद्धतीत हवामानानुसार बदल करणे आवश्यक आहे. त्यामध्ये फळबागांच्या लागवडीकडेही लक्ष द्यायला हवे. काही क्षेत्र पॉलीहाऊस पद्धतीने तयार करणेही गरजेचे आहे. शेतक-याकडे १०-१५ गुंठे पॉलीहाऊस असेल तर त्यामध्ये टोमॅटो, ढोबळी मिरच्या यांसारख्या फळभाज्यांची लागवड करता येईल. याखेरीज फुलशेतीही काही प्रमाणात करता येणे शक्य आहे. या सर्व पार्श्वभूमीवर हवामानावर आधारित कृषिव्यवस्थापन ही संकल्पना आपण राबवली पाहिजे. दुसरीकडे हवामानाच्या अंदाजांची अचूकताही वाढवली पाहिजे. हवामान विभागाने पाऊस येतोय म्हणून सांगितल्यानंतर शेतकरी आकाशाकडे डोळे लावून बसतो; पण पाऊस पडला नाही की त्याची निराशा होते. यासाठी स्थानिक ठिकाणचा पावसाचा अंदाज देणारी व्यवस्था विकसित केली गेली पाहिजे आणि त्याच्या अचूकतेकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. किती पाऊस होईल आणि कोणत्या भागात पाऊस पडेल हे सांगितले गेले पाहिजे.

-डॉ. रामचंद्र साबळे
ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या